अद्भुत कृत्ये करणाऱ्याला पाहा!
अद्भुत कृत्ये करणाऱ्याला पाहा!
“स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर.”—ईयोब ३७:१४.
१, २. सन १९२२ मध्ये कोणता आश्चर्यकारक शोध लावण्यात आला, आणि ज्यांनी हा शोध लावला त्यांची प्रतिक्रिया काय होती?
एक पुरातत्त्ववैज्ञानिक आणि एक इंग्रज उमराव अनेक वर्षांपासून एका खजिन्याच्या शोधात होते. शेवटी, २६ नोव्हेंबर, १९२२ रोजी व्हॅली ऑफ द किंग्स नावाच्या सुप्रसिद्ध खोऱ्यात इजिप्शियन फारोंची थडगी आहेत त्या ठिकाणी पुरातत्त्ववैज्ञानिक हावर्ड कार्टर आणि लॉर्ड कार्नावन यांना तो खजिना गवसला—फारो तुतनखामिनची कबर. एका बंद दरवाज्यासमोर आल्यानंतर त्यांनी त्याला एक छिद्र केले. कार्टर यांनी छिद्रातून मेणबत्ती आत घातली आणि वाकून आत पाहू लागले.
२ कार्टर यांनी या घटनेविषयी नंतर सांगितले: “आत काय आहे हे जाणून घ्यायला लॉर्ड कार्नावन इतके अधीर झाले की त्यांनी न राहावून मला विचारले, ‘काही दिसतंय का?’ पण माझ्या तोंडातून इतकेच शब्द फुटले, ‘हो, सारंच अद्भुत आहे!’” त्या कबरेत सापडलेल्या कित्येक मोलवान वस्तूंत भरीव सोन्याची एक शवपेटी होती. या “अद्भुत” वस्तूंपैकी काही कदाचित तुम्ही छायाचित्रांत किंवा वस्तुसंग्रहालयात पाहिल्या असतील. पण कितीही अद्भुत असल्या तरी वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या त्या वस्तूंचा तुमच्या जीवनाशी फारसा संबंध नसतो. तेव्हा आता आपण काही अशा “अद्भुत” गोष्टींकडे आपले लक्ष वळवू या ज्या निश्चितच तुमच्याशी संबंधित आहेत आणि तुमच्या जीवनाकरता महत्त्वाच्या देखील आहेत.
३. आपल्या जीवनात लाभाच्या ठरतील अशा अद्भुत गोष्टींविषयी आपल्याला कोठे माहिती मिळू शकेल?
३ उदाहरणार्थ, कित्येक शतकांआधी हयात असलेल्या एका माणसाचा विचार करा. आजच्या चित्रपटसृष्टीतील कोणत्याही अभिनेत्यापेक्षा, सुप्रसिद्ध खेळाडूपेक्षा किंवा कोणत्याही राजघराण्यातील सुविख्यात व्यक्तीपेक्षा जास्त वजनदार अशी ही हस्ती होती. त्याला पौर्वात्य लोकांत सर्वात मातब्बर म्हणण्यात आले. त्याचे नाव तुम्ही ऐकले असेल—ईयोब. बायबलमध्ये एक पूर्ण पुस्तक त्याच्याबद्दल आहे. पण हे सर्व असूनही ईयोबाचा समकालीन असलेल्या अलीहू नावाच्या एका तरुणाला, एकदा ईयोबाची चूक त्याच्या लक्षात आणून द्यावी लागली. थोडक्यात अलीहूने ईयोबाच्या हे लक्षात आणून दिले की तो स्वतःला आणि इतर काही लोकांना नको तितके महत्त्व देत होता. ईयोबाच्या ३७ व्या अध्यायात इतर उपयोगी मुद्दे आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या लाभाचा ठरेल असा सल्ला सापडतो.—ईयोब १:१-३; ३२:१–३३:१२.
४. अलीहूने ईयोब ३७:१४ यात आढळणारा सल्ला ईयोबाला दिला त्यापूर्वी काय झाले?
४ स्वतःला ईयोबाचे मित्र म्हणवणाऱ्या तिघांच्या मते ईयोब दोषी होता; विचारांत किंवा कृतींत त्याचे कोठे चुकत होते याविषयी त्या तिघांनीही लांबलचक भाषणे दिली. (ईयोब १५:१-६, १६; २२:५-१०) त्यांचे बोलणे पूर्ण होईपर्यंत अलीहूने स्वतःचे मत व्यक्त करण्याची घाई केली नाही. त्यानंतर तो बोलला; त्याच्या बोलण्यातून त्याचा समजूतदारपणा आणि सुबुद्धी दिसून आली. त्याने अनेक उपयुक्त मुद्दे मांडले पण त्याच्या मुख्य सल्ल्याकडे लक्ष द्या: “ईयोबा, कान देऊन हे ऐक; स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर.”—ईयोब ३७:१४.
अद्भुत कृत्ये करणारा
५. अलीहूने उल्लेख केलेल्या ‘देवाच्या अद्भुत कृत्यांत’ कशाकशाचा समावेश होतो?
५ अलीहूने ईयोबाला स्वतःविषयी, अलीहूविषयी किंवा इतर मानवांविषयी मनन करण्याचा सल्ला दिला नाही याकडे लक्ष द्या. तर त्याने सुज्ञपणे ईयोबाला आणि आपल्यालाही यहोवा देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन करण्यास आर्जवले. ‘देवाची अद्भुत कृत्ये’ यांत कशाचा समावेश आहे असे तुम्हाला वाटते? शिवाय, तुम्हाला तुमचे आरोग्य, आर्थिक बाबी, भविष्य, तुमचे कुटुंब, सहकारी, शेजारी इत्यादी अनेक बाबींविषयी विचार करावा लागतो; मग त्यासोबत देवाच्या कृत्यांचे मनन करण्याची काय गरज आहे? यहोवा देवाच्या अद्भुत कृत्यांत त्याच्या सुबुद्धीचा व आपल्या सभोवती दिसणाऱ्या भौतिक सृष्टीवर त्याच्या अधिकाराचा निश्चितच समावेश होतो. (नहेम्या ९:६; स्तोत्र २४:१; १०४:२४; १३६:५, ६) हे आणखी स्पष्ट होण्याकरता यहोशवा पुस्तकातील एका मुद्द्याकडे लक्ष द्या.
६, ७. (अ) यहोवाने मोशे व यहोशवाच्या काळात कोणती अद्भुत कृत्ये केली? (ब) मोशे आणि यहोशवाच्या काळात घडलेल्या या अद्भुत घटनांपैकी एखादी घटना तुम्हाला पाहता आली असती तर तुमची काय प्रतिक्रिया असती?
६ यहोवाने प्राचीन मिसर [इजिप्त] राष्ट्रावर पीडा आणल्या आणि त्यानंतर त्याने लाल समुद्र दुभंगला; याच समुद्रातून मोशेच्या नेतृत्त्वाखाली प्राचीन इस्राएली लोक इजिप्तच्या गुलामीतून बाहेर पडले. (निर्गम ७:१–१४:३१; स्तोत्र १०६:७, २१, २२) यहोशवाच्या ३ ऱ्या अध्यायात अशाचप्रकारच्या एका घटनेचा उल्लेख आहे. मोशेनंतर इस्राएली लोकांचे नेतृत्त्व करू लागलेला यहोशवा, देवाच्या लोकांना नदी पार करून वाग्दत्त देशात नेणार होता. यहोशवाने म्हटले: “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे.” (यहोशवा ३:५) ही कोणती अद्भुत कृत्ये होती?
७ त्या घटनेच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे, यहोवाने आपल्या लोकांच्या मार्गात अडथळा बनलेल्या यार्देन नदीचे पाणी सुकवले आणि यामुळे हजारो पुरुष, स्त्रिया आणि मुले कोरड्या जमिनीवरून चालून जाऊ शकले. (यहोशवा ३:७-१७) आपण तेथे असतो आणि त्या नदीतून मार्ग तयार होताना व सर्व लोकांना त्यातून सुखरूप पैलतीरी जाताना पाहिले असते तर निश्चितच त्या महत्कृत्याची आपल्या मनावर अमिट छाप पडली असती! कारण त्यातून सृष्टीवर यहोवाचे नियंत्रण असल्याचे दिसून आले. पण आज आपल्या काळातही तितक्याच अद्भुत गोष्टी घडत आहेत. त्यांपैकी काही कोणत्या आहेत आणि आपण त्यांविषयी का मनन केले पाहिजे याविषयी जाणून घेण्यासाठी ईयोब ३७:५-७ यावर विचार करा.
८, ९. ईयोब ३७:५-७ ही वचने कोणत्या अद्भुत कृत्यांविषयी सांगतात पण आपण त्यांविषयी का विचार केला पाहिजे?
८ अलीहूने म्हटले: “देव अद्भुत शब्दाने गर्जतो; आम्हास अगम्य अशी मोठी कृत्ये तो करितो.” अलीहू कोणत्या “अद्भुत” गोष्टींविषयी बोलत होता? तो हिमवर्षा आणि पर्जन्यवृष्टीचा उल्लेख करतो. शेतकऱ्याच्या कामांत काही काळ व्यत्यय आणणाऱ्या या गोष्टी त्याला देवाच्या कृत्यांवर मनन करण्याची संधी आणि प्रेरणा देतात. आपण कदाचित शेतकरी नसू पण पाऊस आणि हिमवर्षा यांसारख्या गोष्टींचा कदाचित आपल्यावरही काही न काही परिणाम होत असेल. आपण जगातल्या कोणत्या भागात राहतो त्यानुसार हिम आणि पाऊस कदाचित आपल्याही कार्यात व्यत्यय आणत असतील. मग आपण या अद्भुत नैसर्गिक गोष्टींमागे कोण आहे आणि या गोष्टींचा काय अर्थ होतो याचा कधी थांबून विचार करतो का? तुम्ही कधी असा विचार केला आहे का?
९ विशेष म्हणजे, ईयोबाचा ३८ वा अध्याय आपण वाचतो, तेव्हा स्वतः यहोवा देवानेही अशाच दृष्टिकोनातून ईयोबापुढे काही अर्थपूर्ण प्रश्न मांडलेले आढळतात. आपल्या निर्माणकर्त्याने हे प्रश्न ईयोबाला उद्देशून विचारले असले तरीसुद्धा त्यांचा आपल्या मनोवृत्तीशी, आपल्या अस्तित्वाशी आणि आपल्या भविष्याशी निश्चितच संबंध आहे. तेव्हा देवाने कोणते प्रश्न विचारले आणि त्यांचा काय अर्थ होतो यावर आपण विचार करू या, म्हणजेच ईयोब ३७:१४ येथे सांगितल्याप्रमाणेच आपण करू या.
१०. ईयोबाच्या ३८ व्या अध्यायाचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे आणि यात कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत?
१० अध्याय ३८, या शब्दांनी सुरू होतो: “परमेश्वराने वावटळीतून ईयोबास उत्तर दिले; तो म्हणाला, अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणार हा कोण? आता मर्दाप्रमाणे आपली कमर बांध; मी तुला हे विचारितो; मला सांग.” (ईयोब ३८:१-३) ही सुरवातच जबरदस्त होती. यामुळे ईयोबाला आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करून आपण विश्वाच्या निर्माणकर्त्यासमोर उभे आहोत आणि त्याने आपल्याला जवाब मागितला आहे हे ओळखण्यास मदत झाली. या गोष्टीची आज आपण आणि सर्व लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे. त्यानंतर, अलीहूने उल्लेख केलेल्या काही गोष्टींशी मिळतेजुळते प्रश्न देवाने ईयोबाला विचारले. “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे? तिला मापनसूत्र कोणी लाविले? हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसविली?”—ईयोब ३८:४-६.
११. ईयोब ३८:४-६ या वचनांवर विचार केल्यावर आपल्याला कशाची जाणीव होते?
११ पृथ्वी घडवण्यात आली तेव्हा ईयोब कोठे होता—किंबहुना आपल्यापैकी कोणीही कोठे होते? पृथ्वीचा नकाशा तयार करून मोजायच्या पट्टीने तिची लांबी रुंदी आपल्यापैकी कोणी आखली का? निश्चितच नाही! त्यावेळी तर मनुष्यांचे अस्तित्वही नव्हते. पृथ्वीची एका इमारतीशी तुलना करून देवाने विचारले: “तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसविली?” पृथ्वीवरील सजीव सृष्टी अस्तित्वात राहावी व तिची भरभराट व्हावी या दृष्टीने पृथ्वी सूर्यापासून अगदी अचूक अंतरावर आहे. शिवाय तिचा आकार देखील अचूक आहे. जर पृथ्वी आणखी थोडी मोठी असती तर हायड्रोजन वायू आपल्या वातावरणातून बाहेर पडू शकला नसता आणि या ग्रहावर सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले असते. कोणीतरी तिची “कोनशिला” अगदी अचूक ठिकाणी बसवली यात शंका नाही. या गोष्टीचे श्रेय ईयोबाला जात होते का? आपल्याला जाते का? की यहोवा देवाला जाते?—नीतिसूत्रे ३:१९; यिर्मया १०:१२.
मनुष्याजवळ उत्तरे आहेत?
१२. ईयोब ३८:६ येथे दिलेला प्रश्न आपल्याला कशाविषयी विचार करायला लावतो?
१२ देवाने असेही विचारले: “[पृथ्वीच्या] स्तंभाचा पाया कशावर घातला?” हा देखील एक विचार करायला लावणारा प्रश्न नाही का? ईयोबाला ज्याविषयी काहीच माहीत नव्हते अशा एका विषयाचे आज आपल्याला ज्ञान आहे, अर्थात, गुरुत्वाकर्षण. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की प्रचंड मोठ्या सूर्यातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळेच आपली पृथ्वी अधांतरी राहते, जणू तिच्या स्तंभाचा पक्का पाया घालण्यात आला आहे. पण तरीसुद्धा गुरुत्वाकर्षणाबद्दल पूर्णपणे कोणाला समजले आहे?
१३, १४. (अ) गुरुत्वाकर्षणाबद्दल काय कबूल केले पाहिजे? (ब) ईयोब ३८:६ यातील माहितीचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?
१३ अलीकडेच प्रकाशित झालेल्या द युनिव्हर्स एक्सप्लेन्ड या पुस्तकात हे कबूल करण्यात आले आहे की ‘गुरुत्वाकर्षण ही सर्वात परिचयाची पण जिच्याविषयी मानवांकडे सर्वात कमी ज्ञान आहे अशी नैसर्गिक शक्ती आहे.’ पुढे या पुस्तकात म्हटले आहे की “गुरुत्वाकर्षणाची शक्ती कोणतेही दृश्य माध्यम नसताना मोकळ्या जागेतून तत्काल प्रवास करते. पण अलीकडच्या वर्षांत भौतिकशास्त्रज्ञांनी असा अंदाज केला आहे की गुरुत्वाकर्षण कदाचित ग्रॅव्हिटॉन्स नावाच्या कणांपासून बनलेल्या लहरींतून प्रवास करत असावे . . . पण असे कण अस्तित्वात आहेत असे दाव्याने कोणी म्हणू शकत नाही.” याचा जरा विचार करा.
१४ यहोवाने ईयोबाला हे प्रश्न विचारले तेव्हापासून ३००० वर्षे लोटली आहेत आणि या दरम्यान विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. पण तरीसुद्धा, या पृथ्वीवर जीवनाचा उपभोग घेणे आपल्याला शक्य व्हावे म्हणून पृथ्वीला तिच्या कक्षेतच परिभ्रमण करण्यास लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाबद्दल आजपर्यंत न आपण पूर्णपणे खुलासा करू शकलो न या विषयावरील तज्ज्ञ मंडळी. (ईयोब २६:७; यशया ४५:१८) अर्थात, आपण सर्वांनी आता गुरुत्वाकर्षणाचे कोडे सोडवण्यासाठी सखोल संशोधन सुरू केले पाहिजे असे आम्हाला सुचवायचे नाही. पण देवाच्या अद्भुत कृत्यांपैकी केवळ या एका गोष्टीचा जरी विचार केला तरी देवाबद्दल किती वेगळ्याप्रकारे विचार करायला आपल्याला मदत होते. त्याच्या अगम्य बुद्धीचा आणि ज्ञानाचा विचार केल्यावर तुम्हालाही भयचकित झाल्यासारखे वाटत नाही का? आणि त्याच्या इच्छेविषयी आपण का अधिक जाणून घेतले पाहिजे याची तुम्हाला जाणीव होत नाही का?
१५-१७. (अ) ईयोब ३८:८-११ यात खासकरून कशाविषयी सांगण्यात आले आहे आणि यावरून कोणते प्रश्न उपस्थित होतात? (ब) समुद्रांविषयी आणि जगाच्या पाठीवर त्यांच्या वर्गीकरणाविषयी मनुष्याला असलेल्या ज्ञानाच्या संदर्भात काय कबूल करावे लागेल?
१५ निर्माणकर्ता ईयोबाला पुढचा प्रश्न विचारतो: “समुद्र उफळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्यास कवाडे लावून तो कोणी अडविला? त्या समयी मी त्यास मेघवस्त्राचे पांघरूण घातले, दाट अभ्राचे त्यास बाळंते केले; मी त्याची मर्यादा फोडून काढिली आणि त्यास अडसर व दरवाजे लाविले: आणि मी म्हणालो, ‘तू येथवरच ये; यापलीकडे तू येता कामा नये; येथे तुझ्या उन्मत लहरी थांबल्या पाहिजेत.’”—ईयोब ३८:८-११.
१६ समुद्र अडविण्याच्या या विषयासोबत जगातील भूप्रदेश, समुद्र आणि भरती ओहोटीच्या प्रक्रियेचाही विचार येतो. या गोष्टींचे मनुष्याने किती काळापासून निरीक्षण व संशोधन केले आहे? अक्षरशः हजारो वर्षांपासून. आणि खासकरून गत शतकात तर या विषयांवर अधिकच कसून अभ्यास करण्यात आला. तुम्हाला कदाचित वाटेल की या संदर्भात असलेल्या जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे एव्हाना आपल्याला मिळाली असतील. पण या २००१ सालात देखील जर तुम्ही या विषयावर मोठमोठ्या ग्रंथालयांत जाऊन किंवा इंटरनेटच्या अफाट माहिती भांडारात संशोधन केले तर तुम्हाला काय आढळेल?
१७ एका नामांकित संदर्भ ग्रंथात हा कबुलीजवाब तुम्हाला सापडेल: “जगाच्या पाठीवर जमिनीच्या व समुद्रांच्या, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूपृष्ठांच्या वर्गीकरणाविषयी संशोधन व विश्लेषण करणे ही कित्येक वर्षांपासून वैज्ञानिकांपुढे असलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या समस्यांपैकी एक आहे.” असे म्हटल्यानंतर ह्या विश्वकोशात पुढे चार संभाव्य सिद्धान्त उद्धृत करण्यात आले आहेत. पण हे सिद्धान्त केवळ “अनेक गृहितकांपैकी आहेत” असेही त्यात मान्य केले आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की गृहितकाची व्याख्या म्हणजे “पुरेसा आधार नसल्यामुळे दिलेले तात्पुरते स्पष्टीकरण.”
१८. ईयोब ३८:८-११ वाचल्यानंतर तुम्ही कोणत्या निष्कर्षावर येता?
१८ ईयोब ३८:८-११ येथे दिलेले प्रश्न आपल्या या काळाला समर्पक आहेत हे यावरून स्पष्ट होत नाही का? निश्चितच आपल्या या ग्रहावर सर्व गोष्टी सुव्यवस्थितपणे मांडण्याचे श्रेय आपल्याला दिले जात नाही. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्रात भरतीओहोटी व्हावी आणि त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांजवळ असलेले परिसर किंवा आपला राहता परिसर पूरग्रस्त होऊ नये याकरता चंद्राचे विशिष्ट ठिकाण आपण नेमलेले नाही. पण हे कोणी घडवून आणले ते तुम्हाला माहीत आहे. अद्भुत कृत्ये करणाऱ्याने.—स्तोत्र ३३:७; ८९:९; नीतिसूत्रे ८:२९; प्रेषितांची कृत्ये ४:२४; प्रकटीकरण १४:७.
यहोवाचे श्रेय त्यालाच द्या
१९. ईयोब ३८:१२-१४ येथील काव्यात्मक वर्णन कोणत्या नैसर्गिक वस्तूस्थितींकडे आपले लक्ष वेधतात?
१९ ईयोब ३८:१२-१४ येथे अप्रत्यक्षरित्या उल्लेख करण्यात आलेल्या पृथ्वीच्या परिभ्रमणाचेही श्रेय मनुष्य घेऊ शकत नाही. या परिभ्रमणामुळेच आपण अद्भुतरम्य सूर्योदय पाहू शकतो. ओल्या मातीवर मुद्रेचा ठसा स्पष्ट उमटावा त्याप्रमाणे, पहाटचा सूर्य जसजसा उगवतो तसतसे पृथ्वीचे विविध पैलू अधिकाधिक स्पष्ट दिसू लागतात. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा थोडा जरी बारकाईने विचार केला तर आपल्याला जाणीव होईल, की पृथ्वी वेगाने फिरली असती तर किती भयंकर परिणाम झाले असते. खरोखर पृथ्वीचा वेग किती आश्चर्यकारक आहे! शिवाय, ती अगदी हळूहळू पण फिरत नाही; कारण असे झाले असते तर दिवस आणि रात्र लांबच लांब होऊन अत्यंतिक उष्णता किंवा गारठा झाला असता आणि पृथ्वीवर मानवी जीवन अशक्य झाले असते. खरोखर, पृथ्वीच्या परिभ्रमणाची गती मानवांनी नाही तर देवाने निश्चित केली हे सुदैवच म्हटले पाहिजे.—स्तोत्र १४८:१-५.
२०. ईयोब ३८:१६, १८ येथे विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही काय उत्तर द्याल?
२० आता हे पुढील प्रश्न देव तुम्हालाच विचारत आहे अशी कल्पना करा: “समुद्राच्या झऱ्यापर्यंत तुझा कधी रिघाव झाला आहे काय? सागराच्या खोल प्रदेशी तू कधी भ्रमण केले आहे काय?” कोणा महासागर वैज्ञानिकालाही याचे संपूर्ण उत्तर देता येणार नाही. “पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय? तुला हे सर्व ठाऊक असेल तर सांग.” (ईयोब ३८:१६, १८) तुम्ही पृथ्वीवरील सर्व किंवा अधिकांश प्रदेश पाहिले आहेत का? पृथ्वीवरील सर्व निसर्गरम्य ठिकाणे आणि इतर अद्भुत गोष्टी पाहायला किती आयुष्ये लागतील? खरोखर तो काळ किती अद्भुतरम्य असेल!
२१. (अ) ईयोब ३८:१९ येथे दिलेल्या प्रश्नांमुळे कोणते वैज्ञानिक विचार उद्भवतात? (ब) प्रकाशासंबंधीची वस्तूस्थिती जाणल्यावर आपण काय करण्यास प्रेरित झाले पाहिजे?
२१ ईयोब ३८:१९ यात विचारलेल्या अर्थभरीत प्रश्नांकडे लक्ष द्या: “प्रकाश वसतो तिकडची वाट कोणती? अंधकाराचे स्थान कोठे आहे?” तुम्हाला कदाचित माहीत असेल की बराच काळ असे समजले जात होते की पाण्याच्या तळ्यात एखादा दगड टाकल्यावर निर्माण होणाऱ्या लहरीप्रमाणे प्रकाश, तरंगांच्या माध्यमातून प्रसारित होतो. मग १९०५ साली ॲल्बर्ट आईन्स्टाइनने याबाबतीत खुलासा केला. त्यांनी स्पष्ट केले की प्रकाश विशिष्ट ऊर्जामूल्यांच्या पुंजांच्या अथवा कणांच्या रूपात कार्य करतो. पण या सिद्धान्तामुळे प्रकाशासंबंधी सर्व शंका दूर झाल्या का? या संदर्भात अलीकडच्या काळातील एका ज्ञानकोशात केलेल्या या विधानाचा विचार करा: “प्रकाशाला तरंग म्हणावे की कण?” या प्रश्नाचे त्याच ज्ञानकोशाने दिलेले हे उत्तर पाहा: “[प्रकाश] तरंग आणि कण दोन्ही असू शकत नाही. कारण या दोन गोष्टींची [तरंग व कण] रचना एकमेकांपासून अगदी वेगळी आहे. तेव्हा, या प्रश्नाचे सर्वात अचूक उत्तर असे आहे, की प्रकाश तरंगही नाही आणि कणही नाही.” अर्थात, या बाबतीतही देवाच्या कृत्यांचे पूर्ण स्पष्टीकरण कोणीही देऊ शकला नाही तरीसुद्धा आपल्याला सूर्याचा प्रकाश व त्याची ऊब (प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या) मिळतच राहते. प्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती जीवनाची भरभराट होते आणि आपल्याला खाद्य आणि प्राणवायू प्राप्त होतो. प्रकाशामुळेच आपण वाचू शकतो, आपल्या प्रिय माणसांचे चेहरे पाहू शकतो, रम्य सूर्यास्तांचा आनंद घेऊ शकतो आणि इतरही असंख्य फायदे उपभोगू शकतो. पण असे करताना आपण देवाच्या अद्भूत कृत्यांची कदर बाळगायला नको का?—स्तोत्र १०४:१, २; १४५:५; यशया ४५:७; यिर्मया ३१:३५.
२२. देवाच्या अद्भुत कृत्यांविषयी दावीदाची कशी मनोवृत्ती होती?
२२ यहोवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन करण्याचा आपला उद्देश केवळ आश्चर्यचकित होणे किंवा देवाच्या बुद्धीपुढे स्तब्ध होणे इतकाच आहे का? मुळीच नाही. प्राचीन काळात स्तोत्रकर्त्या दाविदाने देवाची सर्व कृत्ये समजून घेण्यास व त्यांचे वर्णन करण्यास आपण असमर्थ आहोत हे कबूल केले होते. त्याने लिहिले: ‘हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही; मी ती सांगू लागलो तर ती माझ्या गणनेपलीकडे आहेत.’ (स्तोत्र ४०:५) अर्थात याचा अर्थ या अद्भुत कृत्यांविषयी आपण कधीच बोलू नये असे दावीद येथे सुचवत नव्हता. हे स्तोत्र ९:१ या वचनात दावीदाने व्यक्त केलेल्या संकल्पावरून सिद्ध होते: “मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन.”
२३. देवाच्या अद्भुत कृत्यांसंबंधी तुमची मनोवृत्ती कशी आहे आणि या संदर्भात तुम्ही इतरांना कशी मदत करू शकता?
२३ आपणही दावीदाप्रमाणेच संकल्प करू नये का? देवाच्या अद्भुत कार्यांविषयी म्हणजे त्याने आजवर जे काही केले आहे आणि पुढे तो जे काही करणार आहे त्याविषयी आश्चर्य वाटत असल्यामुळे त्यांविषयी इतरांना सांगण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होऊ नये का? निश्चितच, आपण ‘राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुतकृत्ये जाहीर केली पाहिजेत.’ (स्तोत्र ९६:३-५) होय, आपल्याला देवाविषयी जे शिकायला मिळाले आहे त्याविषयी इतरांनाही जाणून घेण्याची संधी देण्याद्वारे आपण देवाच्या अद्भुत कृत्यांसाठी नम्रतापूर्वक कृतज्ञ आहोत हे दाखवतो. या लोकांना कदाचित निर्माणकर्त्याविषयी लहानपणापासून काहीच शिकवले गेलेले नसेल, पण आपण त्याच्याविषयी सकारात्मक पद्धतीने त्यांना माहिती दिल्यास कदाचित त्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव होईल. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ज्याने “सर्व काही निर्माण केले” त्या अद्भुत कृत्ये करणाऱ्या यहोवा देवाबद्दल अधिक शिकण्याची व त्याची सेवा करण्याची इच्छा कदाचित त्यांच्या मनात जागृत होईल.—प्रकटीकरण ४:११.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• ईयोब ३७:१४ येथे दिलेला सल्ला वाचल्यानंतर देवाच्या कृत्यांविषयी तुमच्या मनात कोणता विचार येतो?
• ईयोब ३७ व ३८ अध्यायात दिलेल्या कोणत्या गोष्टींचा संपूर्ण खुलासा विज्ञानाला करता आला नाही?
• देवाच्या अद्भुत कृत्यांविषयी तुमच्या कशा भावना आहेत आणि यामुळे तुम्हाला काय करण्याची प्रेरणा मिळते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[७ पानांवरील चित्र]
समुद्राला मर्यादा घालून कोणी अडवले?
[७ पानांवरील चित्र]
देवाने निर्माण केलेल्या या पृथ्वीवरील सर्व निसर्गरम्य ठिकाणे आजवर कोणी पाहिली आहेत?