व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकमेकांची काळजी घेणारे जागतिक बंधुत्व

एकमेकांची काळजी घेणारे जागतिक बंधुत्व

एकमेकांची काळजी घेणारे जागतिक बंधुत्व

जिकडे पाहू तिकडे लोकच लोक. वृद्ध लोक, अपंग लोक. गरोदर बायका आणि लहान मुलांना हाताला धरून चाललेली तरुणी जोडपी. हे सगळे स्त्री-पुरुष आणि मुले निर्वासित आहेत; मुलकी युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे घर सोडून शेजारच्या देशात ते आश्रयाला जात आहेत. काहींना तर कित्येकदा आपली घरे सोडावी लागली आहेत. दंगलीची किंवा नैसर्गिक आपत्तीची चाहूल लागताच ते घरातल्या काही आवश्‍यक वस्तू गोळा करतात, मुलांना उचलतात आणि सुरक्षित ठिकाणी धाव घेतात. मग, सगळे काही पूर्वस्थितीला आल्यावर ते पुन्हा घरी येतात आणि आपली घरे पुन्हा वसवण्याचा प्रयत्न करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये, मध्य आफ्रिकन संघराज्याने विविध देशांतील निर्वासितांना आपल्या देशात थारा दिला आहे. अलीकडे, यहोवाच्या साक्षीदारांसोबत हजारो लोकांना काँगोचे प्रजासत्ताक संघराज्य सोडून मध्य आफ्रिकन संघराज्यात आश्रय घ्यावा लागला.

बांधव मदतीला धावून आले

मध्य आफ्रिकन संघराज्यातील साक्षीदारांनी हे मदतकार्य एक बहुमान समजून पार पाडले. आश्रयाला येणाऱ्‍या ख्रिस्ती बांधवांकरता राहण्याची व्यवस्था करण्यात आली. सुरवातीला, खाजगी घरांमध्ये त्यांना खोल्या देण्यात आल्या परंतु निर्वासितांची संख्या वाढू लागली तशी अतिरिक्‍त व्यवस्था करावी लागेल हे दिसून आले. काही राज्य सभागृहांमध्ये अनेक लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. स्थानीय साक्षीदारांनी लगेच तेथे राहणाऱ्‍यांसाठी लाईट व पाण्याचे पाईप बसवले आणि आवश्‍यक असेल तेथे फरशी बसवून दिली. ही तात्पुरती राहण्याची सोय करण्यासाठी निर्वासितांनी देखील स्थानीय बांधवांना मदत केली. नवीन येणाऱ्‍या लोकांना जीवन-दायी आध्यात्मिक अन्‍न देण्यासाठी लिंगाला भाषेत ख्रिस्ती सभांचा एक पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्थानीय साक्षीदार आणि त्यांचे पाहुणे यांच्यातील सहकार्य पाहून आंतरराष्ट्रीय बंधुत्व एक वास्तविकता आहे याची ग्वाही मिळाली.

निर्वासित कुटुंबे नेहमीच एकसाथ येत नव्हती. काही वेळा, एकमेकांपासून विलग झालेले कौटुंबिक सदस्य या ठिकाणी येऊन भेटले. प्रत्येक राज्य सभागृहात सुरक्षितपणे पोचलेल्या लोकांच्या नावांची यादी ठेवली होती. त्याचप्रमाणे अद्याप न सापडलेल्या लोकांना शोधून काढण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली. त्या देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची हाताळणी करणारे शाखा दफ्तर, मार्गावर असलेल्या साक्षीदारांची मदत करण्यासाठी व हरवलेल्यांना शोधण्यासाठी दररोज तीन वाहने पाठवत होते. या वाहनांवर मोठ्या अक्षरांमध्ये असा फलक लावण्यात आला होता: “वॉचटावर—यहोवाचे साक्षीदार.”

एके प्रसंगी, आपल्या पालकांपासून विलग झालेल्या सात निर्वासित मुलांना यहोवाच्या साक्षीदारांची एक गाडी दिसली; त्यांना याचा किती आनंद झाला असेल कल्पना करा. ती सगळी गाडीकडे धावत गेली आणि आपणही साक्षीदार आहोत अशी स्वतःची ओळख पटवून दिली. बांधवांनी त्यांना गाडीत बसवून राज्य सभागृहात नेले आणि शेवटी त्यांना त्यांची कुटुंबे मिळाली.

या प्रामाणिक ख्रिश्‍चनांना एकदाच नव्हे तर वारंवार अशा परिस्थितींचा सामना करायला कशी मदत मिळाली? पवित्र शास्त्रवचनांमध्ये सांगितल्यानुसार आपण शेवटल्या काळात जगत आहोत अशी त्यांना पक्की खात्री आहे.—२ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण ६:३-८.

त्यामुळे, त्यांना ठाऊक आहे की, लवकरच यहोवा देव युद्धे, द्वेष, हिंसा आणि भांडणे संपुष्टात आणील. निर्वासितांची समस्या गतकाळात जमा होईल. परंतु ही परिस्थिती येईपर्यंत, १ करिंथकर १२:१४-२६ येथील प्रेषित पौलाच्या सल्ल्यानुसार यहोवाचे साक्षीदार एकमेकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नद्या, सीमा, भाषा आणि अंतर यांमुळे त्यांच्यात दुरावा असला तरीही त्यांना एकमेकांची काळजी आहे आणि म्हणून गरजवंत बांधवांच्या मदतीसाठी ते तत्काळ पावले उचलतात.—याकोब १:२२-२७.

[३० पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

आफ्रिका

मध्य आफ्रिकन संघराज्य

काँगोचे प्रजासत्ताक संघराज्य

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[३० पानांवरील चित्रे]

तीन राज्य सभागृहांचे स्वागत केंद्रांत रूपांतर करण्यात आले

[३१ पानांवरील चित्र]

स्वयंपाकाची सुविधा लागलीच करण्यात आली

[३१ पानांवरील चित्र]

अधिकाधिक निर्वासितांचे आगमन

[३१ पानांवरील चित्रे]

जन्मतःच निर्वासित