व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्च फादर बायबल सत्याचे पुरस्कर्ते होते का?

चर्च फादर बायबल सत्याचे पुरस्कर्ते होते का?

चर्च फादर बायबल सत्याचे पुरस्कर्ते होते का?

तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवत असला किंवा नसला तरी बायबलच्या देवासंबंधी, येशू ख्रिस्तासंबंधी आणि ख्रिस्ती धर्मासंबंधी तुमच्या दृष्टिकोनावर त्यांचा निश्‍चितच प्रभाव पडला असेल. त्यांच्यापैकी एकाला सुवर्णमुखी तर दुसऱ्‍याला थोर अशा उपाधी दिल्या होत्या. “ख्रिस्ताच्या जीवनाची सर्वोच्च मूर्तिमंत उदाहरणे” म्हणून त्या सर्वांचे वर्णन केले आहे. पण हे लोक कोण आहेत? ते प्राचीन काळातील धार्मिक विचारवंत लोक, लेखक, वेदान्ती आणि तत्त्वज्ञानी आहेत ज्यांनी सद्य काळातील “ख्रिस्ती” विश्‍वास घडवला. ते आहेत चर्च फादर.

“बायबल हेच फक्‍त देवाचे वचन नाही,” असा दावा धार्मिक अभ्यासांचे ग्रीक ऑर्थोडॉक्स प्राध्यापक दमित्रिओस जे. कोन्स्टानटेलोस यांनी केला. “देवाचे वचन प्रकट करणारा पवित्र आत्मा एखाद्या पुस्तकातल्या पानांपुरताच मर्यादित असू शकत नाही.” तर मग, ईश्‍वराकडून मिळालेले दुसरे विश्‍वसनीय सूत्र कोणते असू शकते? ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चला समजून घेणे (इंग्रजी) या पुस्तकात कोन्स्टानटेलोस यांनी म्हटले: “पवित्र परंपरा आणि पवित्र शास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या [जातात].”

त्या पवित्र परंपरा चर्च फादर्सच्या शिकवणी आणि लिखाणे यांवर आधारलेल्या होत्या. हे चर्च फादर म्हणजे सा.यु. दुसऱ्‍या व पाचव्या शतकांदरम्यान असलेले मुख्य वेदान्ती आणि “ख्रिस्ती” तत्त्वज्ञानी होते. आधुनिक काळातील “ख्रिस्ती” मतप्रणालीवर त्यांचा किती प्रभाव पडला आहे? त्यांच्या शिकवणी बायबलनुसार तंतोतंत जुळत होत्या का? येशू ख्रिस्ताच्या अनुयायाकरता सत्य ख्रिस्ती शिकवणींचा आधारभूत पाया काय असला पाहिजे?

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी

सा.यु. दुसऱ्‍या शतकाच्या मध्यात, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे लोक, छळ करणाऱ्‍या रोमनांपुढे आणि पाखंड्यांपुढे आपल्या विश्‍वासाची सफाई देत होते. परंतु, या काळादरम्यान खूपच लोक आपापली वेदान्ती मते प्रकट करत होते. येशूचे “ईश्‍वरत्व” आणि पवित्र आत्म्याचे स्वरूप व त्याची कार्ये यांविषयीच्या धार्मिक वादविवादांमुळे फक्‍त बौद्धिक पातळीवर फुटी निर्माण झाल्या नाहीत. तर “ख्रिस्ती” सिद्धान्तावरून होणारे मतभेद आणि त्यामुळे कायमच्या पडलेल्या फुटी राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्येही पसरू लागल्या. काही वेळा तर त्या दंगली, बंडाळी, अशांतता आणि युद्धालाही कारणीभूत ठरल्या. इतिहासकार पॉल जॉन्सन लिहितात: “[धर्मत्यागी] ख्रिस्ती धर्माची सुरवातच गोंधळ, वादविवाद आणि फुटींनी झाली आणि हीच दशा कायम राहिली. . . . इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्‍या शतकांमध्ये मध्य आणि पूर्व भूमध्यात असंख्य धार्मिक कल्पना जन्मला येऊन पसरू पाहत होत्या. . . . त्यामुळे सुरवातीपासूनच ख्रिस्ती धर्मात गटबाजी होती आणि त्या प्रत्येक गटात खूप तफावत होती.”

त्या काळात, बहुतेक सगळ्याच लेखकांना आणि विचारवंतांना असे वाटत होते की “ख्रिस्ती” शिकवणी समजावून सांगण्यासाठी तत्त्वज्ञानी भाषा वापरण्याची गरज आहे. “ख्रिस्ती धर्म” नुकताच स्वीकारलेल्या सुशिक्षित मूर्तिपूजकांना संतुष्ट करण्यासाठी हे धार्मिक लेखक प्राचीन ग्रीक आणि यहुदी साहित्यावर खूप अवलंबून होते. ग्रीक लेखक जस्टीन मार्टर (सुमारे सा.यु. १००-१६५) यांनी सुरवात केल्यापासून, तथाकथित ख्रिस्ती, ग्रीक संस्कृतीचा तत्त्वज्ञानी वारसा आपल्या लेखनांमध्ये आत्मसात करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत गेले.

ही प्रथा, ॲलेक्झान्ड्रियाचा ग्रीक लेखक ओरिजन (सुमारे सा.यु. १८५-२५४) याच्या लिखाणांमध्ये यशस्वी ठरली. पहिल्या तत्त्वांवर (इंग्रजी) या ग्रंथात ओरिजनने ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आधारे “ख्रिस्ती” धर्मशास्त्रातील मुख्य शिकवणी पद्धतशीररित्या समजावून सांगण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला होता. नायसियन धर्मसभेने (सा.यु. ३२५) ख्रिस्ताचे “ईश्‍वरत्व” समजावण्याचा व स्थापित करण्याचा प्रयत्न देखील एक मोठी घटना होती ज्यामुळे “ख्रिस्ती” मतप्रणाली समजावून सांगण्याला प्रोत्साहन मिळाले. त्या धर्मसभेनंतर अशा एका युगाची सुरवात झाली ज्यामध्ये चर्चच्या सामान्य धर्मसभा, मतप्रणालीविषयी तंतोतंत व्याख्या करण्याचा प्रयत्न करू लागल्या.

लेखक आणि वक्‍ते

सिसेरियाचा युसेबियस (पहिली नायसियन धर्मसभा झाली त्या काळात लेखन करणारा) सम्राट कॉन्स्टंटाईनशी संलग्न होता. नायसियन धर्मसभेनंतर ग्रीकमध्ये बहुतेककरून लेखन करणाऱ्‍या तत्त्ववेत्त्यांनी शंभर एक वर्षांपर्यंत वादविवाद करून ख्रिस्ती धर्मजगताची वैशिष्ट्यपूर्ण त्रैक्याची शिकवण निर्माण केली. यांच्यामधील प्रमुख जण होते, आपलेच मत पुढे करणारा ॲलेक्झांड्रियाचा बिशप अथेनेसियस आणि आशिया मायनरच्या कप्पाडोसियातील तीन चर्च पुढारी अर्थात बेसिल थोर, त्याचा भाऊ निसाचा ग्रेगरी आणि त्यांचा मित्र नेझिएनससचा ग्रेगरी.

त्या काळातील लेखक आणि प्रचारक एकदम वाकबगार वक्‍ते असत. ग्रीक भाषेतील नेझिएनससचा ग्रेगरी आणि जॉन क्रायसॉस्टम (अर्थात “सुवर्ण-मुखी”) तसेच लॅटिन भाषेतील मिलानचा ॲब्रोस व हिप्पोचा ऑगस्टीन हे अगदी निपुण वक्‍ते होते; त्यांच्या काळातील कला क्षेत्रातल्या सर्वात आदरणीय व लोकप्रिय कला प्रकाराचे ते पंडित होते. त्या काळातील सर्वात प्रभावशाली लेखक होता ऑगस्टीन. त्याच्या तात्त्विक ग्रंथांचा आजच्या “ख्रिस्ती” मतप्रणालीवर मोठा प्रभाव पडला आहे. त्या काळातील सर्वात ख्यातनाम पंडित, जेरोम याच्याच साहाय्याने प्रामुख्याने मूळ भाषेतून बायबलचे लॅटिन व्हल्गेट भाषांतर करण्यात आले.

परंतु, काही महत्त्वाचे प्रश्‍न सामोरे येतात; ते असे: हे चर्च फादर बायबलचे तंतोतंत पालन करत होते का? त्यांच्या शिकवणी प्रेरित शास्त्रवचनांना धरून होत्या का? त्यांची लिखाणे देवाविषयी अचूक ज्ञान मिळवण्याकरता योग्य मार्गदर्शन पुरवतात का?

देवाच्या शिकवणी की मनुष्यांच्या?

अलीकडेच, ग्रीक कर्मठवादी मेट्रोपोलिटन पिसिदियाचे मेथोडियस यांनी ख्रिस्ती धर्माचा ग्रीक पाया (इंग्रजी) हे पुस्तक लिहून दाखवले की, आधुनिक “ख्रिस्ती” मतप्रणालीचा पाया ग्रीक संस्कृती आणि तत्त्वज्ञान आहे. त्या पुस्तकात ते बिनदिक्कतपणे मान्य करतात: बहुतेक सर्वच प्रमुख चर्च फादर्सना ग्रीक मूलतत्त्वे आवश्‍यक वाटत होती आणि त्यांनी प्राचीन ग्रीक साहित्यातून ती उसनी घेऊन ख्रिस्ती सत्ये समजावण्यासाठी व योग्यप्रकारे व्यक्‍त करण्यासाठी त्यांचा वापर केला होता.”

पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे तिन्ही मिळून एक आहेत या त्रैक्याचेच उदाहरण घ्या ना. पुष्कळसे चर्च फादर्स, नायसियन धर्मसभेनंतर कट्टर त्रैक्यवादी बनले. त्यांची लिखाणे आणि वर्णनात्मक लेख त्रैक्याला ख्रिस्ती धर्मजगताचा ठळक सिद्धान्त बनवण्यात महत्त्वपूर्ण ठरली. परंतु, त्रैक्याचा उल्लेख बायबलमध्ये आढळतो का? नाही. मग चर्च फादर्सना हा सिद्धान्त कोठून मिळाला? धार्मिक ज्ञानकोश (इंग्रजी) यात सांगितल्यानुसार, पुष्कळांचे म्हणणे आहे की, त्रैक्य हा “मूळ सिद्धान्त नसून तो मूर्तिपूजक धर्मांतून उसना घेऊन ख्रिस्ती धर्मात सामील करण्यात आला आहे.” आपल्या ख्रिस्ती धर्मातील मूर्तिपूजक शिकवणी (इंग्रजी) यात याला पुष्टी मिळते; तेथे म्हटले आहे: “[त्रैक्य] मुळातच मूर्तिपूजक आहे.” *योहान ३:१६; १४:२८.

नाहीतर आत्मा अमर आहे हीच शिकवण बघा ना. या शिकवणीनुसार देह मेल्यावरही मनुष्याचा एक अंश मात्र जिवंत राहतो. पुन्हा एकदा ही शिकवणसुद्धा ख्रिस्ती धर्मात सामील करायला चर्च फादर्सच प्रामुख्याने जबाबदार होते; नाहीतर, ख्रिस्ती धर्मात मृत्यूपश्‍चात आत्मा जिवंत राहतो अशी कोणतीही शिकवण नव्हती. बायबल स्पष्टपणे दाखवून देते की, “जो जिवात्मा पाप करितो तो मरेल.” (यहेज्केल १८:४) आत्मा अमर असतो हा विश्‍वास चर्च फादर्सनी कोणत्या आधारावर केला? देवाने एक आत्मिक आत्मा निर्माण केला आणि गर्भधारणेच्या वेळी देहात तो टाकल्यावर मनुष्य पूर्णपणे जिवंत प्राणी झाला ही धारणा ख्रिस्ती तत्त्वज्ञानात बऱ्‍याच काळानंतर निर्माण झाली. पूर्वेकडील ओरिजन आणि पश्‍चिमेकडील सेंट ऑगस्टीन यांच्यामुळेच आत्मा, एक आत्मिक गोष्ट आहे ही शिकवण सर्वसामान्यपणे स्वीकारण्यात आली आणि त्याच्या स्वरूपाविषयी एक तात्त्विक कल्पना निर्माण झाली. . . . [ऑगस्टीनच्या सिद्धान्ताला] . . . बऱ्‍याच प्रमाणात (काही त्रुटींसहित) नवप्लेटोवाद कारणीभूत होता,” असे न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिया म्हणतो. शिवाय, प्रेसबिटेरियन लाईफ ही पत्रिका म्हणते: “आत्मा अमर आहे ही एक ग्रीक कल्पना असून प्राचीन गूढ पंथांनी ती निर्माण केली व तत्त्वज्ञानी प्लेटोने त्यात आणखी भर घातली.” *

ख्रिस्ती सत्याचा भक्कम आधार

चर्च फादर्सचा इतिहास आणि त्यांच्या शिकवणींचे मूळ कोठून होते हे आपण थोडक्यात पाहिले आहे; पण तरीही असा प्रश्‍न विचारणे उचित आहे की, एका खऱ्‍या ख्रिश्‍चनाने चर्च फादर्सच्या शिकवणींवर विश्‍वास करावा का? बायबलमधूनच आपण याचे उत्तर पाहू या.

“पिता” ही धार्मिक उपाधी कोणासाठीही वापरू नये असे खुद्द येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे सांगितले होते: “पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.” (मत्तय २३:९) कोणत्याही धार्मिक पुढाऱ्‍याला “पिता” ही उपाधी वापरणे गैरख्रिस्ती आणि शास्त्रवचनाच्या विरुद्ध आहे. देवाच्या वचनाचे लिखाण सा.यु. ९८ च्या सुमारास पूर्ण करण्यात आले; प्रेषित योहानाने ही शेवटली लिखाणे केली होती. त्यामुळे, इतर कोणत्याही मानवांकडून देवाच्या सत्यांचा उलगडा मिळण्याची खऱ्‍या ख्रिश्‍चनांना गरज नाही. मानवी परंपरेद्वारे “देवाचे वचन रद्द” करू नये याची ते काळजी घेतात. मानवी परंपरेला देवाच्या वचनाचे स्थान देणे आध्यात्मिकरित्या घातक आहे. येशूने इशारा दिला: “आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेहि खाचेत पडतील.”—मत्तय १५:६, १४.

बायबलमधील देवाच्या वचनाशिवाय इतर कोठूनही एखाद्या ख्रिश्‍चनाला देवाच्या सत्यांचा उलगडा होण्याची आवश्‍यकता आहे का? नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रेरित वृत्तान्तात काहीही जोडले जाऊ नये अशी ताकीद दिली आहे: “जो कोणी ह्‍यांत भर घालील त्याच्यावर ह्‍या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील.”—प्रकटीकरण २२:१८.

ख्रिस्ती सत्य देवाच्या लिखित वचनात अर्थात बायबलमध्ये सामावलेले आहे. (योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६; २ योहान १-४) त्याची अचूक समज प्राप्त करण्यास लौकिक तत्त्वज्ञानावर विसंबून राहण्याची गरज नाही. देवाने प्रेरित केलेल्या गोष्टी मानवी बुद्धीच्या आधारे समजण्याचा प्रयत्न केलेल्या लोकांच्या बाबतीत पाहायचे झाल्यास, प्रेषित पौलाने विचारलेल्या प्रश्‍नांचाच येथे पुन्हा एकदा उल्लेख करणे उचित आहे की, “ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहिले? ह्‍या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही?”—१ करिंथकर १:२०.

शिवाय, खरी ख्रिस्ती मंडळी, “सत्याचा स्तंभ व पाया” आहे. (१ तीमथ्य ३:१५) त्यातील पर्यवेक्षक मंडळीत कोणत्याही प्रकारची खोटी शिकवण शिरू न देता खऱ्‍या शिकवणींमध्ये भेसळ होऊ देत नाहीत. (२ तीमथ्य २:१५-१८, २५) ते ‘खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे व विध्वंसक पाखंडी मतांना’ मंडळीत येऊ देत नाहीत. (२ पेत्र २:१) प्रेषितांच्या मृत्यूनंतर, चर्च फादर्सनी ‘फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाला’, ख्रिस्ती मंडळीत मूळारूढ होऊ दिले.—१ तीमथ्य ४:१.

या धर्मत्यागाचे परिणाम आज ख्रिस्ती धर्मजगतात स्पष्टपणे दिसून येतात. ख्रिस्ती धर्मजगताचे विश्‍वास आणि चालीरीती बायबलमध्ये शिकवलेल्या गोष्टींपासून एकदम भिन्‍न आहेत.

[तळटीपा]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या तुम्ही त्रैक्य मानावे का? या माहितीपत्रकात त्रैक्याच्या सिद्धान्तावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.

^ आत्म्यासंबंधी बायबलची शिकवण काय आहे यावरील सखोल चर्चेकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले रिझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स, पृष्ठे ९८-१०४ आणि ३७५-८० पाहा.

[१८ पानांवरील चौकट/चित्र]

कप्पाडोसियाचे फादर

“ऑर्थोडॉक्स चर्चला . . . चवथ्या शतकातील लेखकांबद्दल आणि खासकरून त्याचे ‘तीन थोर पुढारी’ अर्थात नेझिएनससचा ग्रेगरी, बेसिल थोर आणि जॉन क्रायसॉस्टम यांच्याविषयी विशेष आदर वाटत होता,” असे लेखक कॅलिस्टोस या धर्म पुढाऱ्‍याने म्हटले. या चर्च फादर्सच्या शिकवणी प्रेरित शास्त्रवचनावर आधारलेल्या होत्या का? ग्रीक चर्चचे फादर (इंग्रजी) या पुस्तकात बेसिल थोर याविषयी असे म्हटले आहे: “प्लेटो, होमर आणि इतिहासकार व वक्‍तृत्वकलेतील पंडित अशांसोबत त्याचे जवळचे संबंध होते आणि त्याच्या शैलीवर त्यांचा निश्‍चितच प्रभाव पडलेला आहे. . . . बेसिल स्वतः मात्र ‘ग्रीकच’ राहिला.” नेझिएनससचा ग्रेगरी याची कहाणी देखील हीच आहे. “त्याच्या मते, प्राचीन ग्रीक संस्कृतीतल्या परंपरा चर्चने स्वीकारल्या तर त्याचे वर्चस्व आणि श्रेष्ठत्व ठळकपणे दिसून येऊ शकते.”

या तिघांविषयी, प्राध्यापक पानायिओटीस के. ख्रीस्टू लिहितात: “नव्या कराराचे उल्लंघन होऊ नये म्हणून ते कधी कधी ‘तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा’ यांच्यापासून सावध राहायला शिकवतात पण दुसरीकडे ते स्वतःच तत्त्वज्ञानाचा व संबंधित तत्त्वांचा उत्सुकतेने अभ्यास करतात; एवढेच नव्हे तर इतरांनीही असा अभ्यास करावा अशी शिफारस करतात.” स्पष्टतः, अशा चर्चच्या शिक्षकांना वाटत होते की, त्यांच्या कल्पनांसाठी केवळ बायबलचा आधार पुरेसा नव्हता. त्यांनी इतर आधारांचा उपयोग केल्यामुळे त्यांच्या शिकवणी बायबलबाहेरून असाव्यात का? प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना अशी ताकीद दिली: “विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका.”—इब्री लोकांस १३:९.

[चित्राचे श्रेय]

© Archivo Iconografico, S.A./CORBIS

[२० पानांवरील चौकट/चित्र]

ॲलेक्झांड्रियाचा सिरिल एक वादग्रस्त चर्च फादर

चर्च फादर्सपैकी सर्वात वादग्रस्त व्यक्‍ती होता ॲलेक्झांड्रियाचा सिरिल. (सुमारे सा.यु. ३७५-४४४) चर्च इतिहासकार हान्स फॉन कामपनहाऊझन यांच्या मते, तो “हटवादी, क्रोधिष्ट, कपटी व आपल्या कामाबद्दल आणि स्थानाबद्दल अत्यंत गर्विष्ठ होता” आणि “आपल्या सत्तेला व अधिकाराला उपयुक्‍त ठरणाऱ्‍या गोष्टीलाच तो योग्य समजत असे. . . . आपल्या क्रूर व दुष्ट मार्गांबद्दल त्याला कधीच वाईट वाटले नाही.” ॲलेक्झांड्रियाचा बिशप असताना सिरिलने लाच देऊन, बदनामी व निंदा करून कॉन्स्टंटीनोपलच्या बिशपला पदच्युत केले. त्याचप्रमाणे, सा.यु. ४१५ मध्ये हायपाशा नावाच्या एका नामवंत तत्त्वज्ञान्याची निर्घृण हत्या करण्यासाठीही त्याला जबाबदार ठरवले जाते. सिरिलच्या तत्त्वज्ञानी लेखनांविषयी कामपनहाऊझन म्हणतात: “त्याने, केवळ बायबलच्या आधारे नव्हे तर त्या व्यतिरिक्‍त जाणकार लोकांच्या उचित उताऱ्‍यांच्या व संग्रहित उताऱ्‍यांच्या आधारे विश्‍वासासंबंधीचे प्रश्‍न सोडवण्याची प्रथा सुरू केली.”

[१९ पानांवरील चित्र]

जेरोम

[चित्राचे श्रेय]

Garo Nalbandian