व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनातले यश लहानपणी आलेल्या अनुभवांवर अवलंबून नाही

जीवनातले यश लहानपणी आलेल्या अनुभवांवर अवलंबून नाही

जीवनातले यश लहानपणी आलेल्या अनुभवांवर अवलंबून नाही

निकलस. लहानपणापासूनच त्याची बंडखोर प्रवृत्ती होती. * कालांतराने त्याच्या वैचारिक संघर्षाची परिणती त्याला ड्रग्स आणि दारूचे व्यसन लागण्यात झाली. निकलस सांगतो: “माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते. यामुळे मला आणि माझ्या बहिणीला खूप काही सोसावे लागले.”

मलिन्डा. हिचे आईवडील नियमाने चर्चला जाणारे सुप्रतिष्ठित नागरिक होते. पण ते एका गुप्त धार्मिक पंथात सामील झाले होते. आता तीस वर्षांची असलेली मलिन्डा खेदाने सांगते, “त्यांच्या या पंथातल्या काही गोष्टी मला जाचक ठरल्या; एका अर्थाने माझे बालपण माझ्यापासून हिरावले गेले.” ती पुढे सांगते: “त्या कटू अनुभवांतून निर्माण झालेल्या नैराश्‍याच्या आणि कमीपणाच्या भावना माझ्या मनात खोलवर रुजल्या आणि तेव्हापासून त्या माझ्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग बनल्या आहेत.”

मलिन्डाप्रमाणेच, अशा असंख्य व्यक्‍ती जगात आहेत ज्यांचे बालपण हिंसा, दुर्व्यवहार, आईवडिलांचे दुर्लक्ष आणि इतर कारणांमुळे हिरावले गेले. बालमनावर झालेले हे आघात अतिशय खोल असतात. पण या जखमांमुळे एक व्यक्‍ती कधीही देवाच्या वचनातील सत्य स्वीकारू शकत नाही किंवा जीवनात थोडाही आनंद मिळवू शकत नाही असा याचा अर्थ होतो का? निकलस आणि मलिन्डा यांच्या बालपणातील कटू अनुभवांमुळे ते विश्‍वासू ख्रिस्ती बनण्यात कधी यशस्वी होऊ शकतील का? यहुदियाचा राजा योशीया याचे उदाहरण विचारात घ्या.

शास्त्रवचनांतील एक उदाहरण

सा.यु.पू. सातव्या शतकात योशीयाने यहुदावर ३१ वर्षे राज्य केले. (सा.यु.पू. ६५९-६२९) वडिलांचा वध झाल्यानंतर योशीया गादीवर आला, त्या वेळी यहुदाची परिस्थिती अतिशय खेदजनक होती. यहुदा आणि यरुशलेम बआलच्या उपासकांनी आणि अम्मोन्यांचे मुख्य दैवत माल्कम याला शपथा वाहणाऱ्‍यांनी व्यापले होते. त्या काळी देवाचा संदेष्टा म्हणून कार्य करणाऱ्‍या सफन्याने म्हटले की यहुदाचे सरदार ‘गर्जना करणाऱ्‍या सिंहासारखे’ आणि त्याचे न्यायाधीश ‘संध्याकाळी बाहेर पडणाऱ्‍या लांडग्यांसारखे’ होते. त्यामुळे साहजिकच या राष्ट्रात हिंसाचार आणि भ्रष्टाचार बोकाळला होता. बहुतेकजण मनातल्या मनात असा विचार करत होते, की “परमेश्‍वर बरे करीत नाही व वाईटहि करीत नाही.”—सफन्या १:३–२:३; ३:१-५.

मग योशीया मोठा होऊन कशा प्रकारचा राजा बनला? बायबलचा इतिहासकार एज्रा लिहितो: “[योशीयाने] यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले. परमेश्‍वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला त्यांनीच तोहि चालला; उजवीडावीकडे वळला नाही.” (२ इतिहास ३४:१, २) याचा अर्थ, योशीया देवाच्या नजरेत योग्य आचरण करण्यात यशस्वी झाला. पण त्याची कौटुंबिक पार्श्‍वभूमी कशाप्रकारची होती?

लहानपणी प्रेम मिळाले की गैरवागणूक?

सा.यु.पू. ६६७ साली योशीयाचा जन्म झाला तेव्हा त्याचा पिता आमोन फक्‍त १६ वर्षांचा होता. आणि त्याचे आजोबा मनश्‍शे यहुदावर राज्य करत होते. मनश्‍शेबद्दल असे म्हणतात की यहुदावर राज्य करणाऱ्‍या सर्वात दुष्ट राजांपैकी तो होता. त्याने बआल दैवताच्या पूजेसाठी वेद्या बांधल्या आणि “परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ” त्याने केले. त्याने आपल्या पुत्रांना अग्नीत होम करून अर्पिले, जादूटोणा केला, चेटूक करणाऱ्‍यांशी संबंध ठेवला, भूतविद्येला बढावा दिला आणि फार मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचे रक्‍त वाहिले. इतकेच पुरे नव्हते की काय, म्हणून मनश्‍शेने एक कोरीव मूर्ती करून ती यहोवाच्या मंदिरात ठेवली. यहोवाने इस्राएलांपुढून ज्या राष्ट्रांचा नाश केला होता त्यांच्याहूनही हीन कृत्ये करण्यास मनश्‍शेने यहुदा व यरुशलेमच्या लोकांना प्रवृत्त केले.—२ इतिहास ३३:१-९.

मनश्‍शे इतका दुराचारी होता की यहोवाने त्याला शिक्षा दिली. त्याला बेड्या घालून अस्सिरियाच्या सम्राटाच्या खास शहरांपैकी असलेल्या बॅबिलोनला नेण्यात आले. बंदिवासात असताना मात्र मनश्‍शेला आपल्या वर्तणुकीचा पश्‍चात्ताप झाला, आणि त्याने स्वतःला नम्र करून यहोवाकडे क्षमा-याचना केली. देवाने त्याच्यावर कृपा केली आणि पुन्हा एकदा त्याला येरुशलेमचे राज्य दिले. यानंतर मनश्‍शेने खऱ्‍या उपासनेची पुनर्स्थापना करण्यासाठी पावले उचलली आणि यात त्याला काही प्रमाणात यश देखील आले.—२ इतिहास ३३:१०-१७.

मनश्‍शेच्या दुराचरणाचा आणि नंतर त्याने केलेल्या पश्‍चात्तापाचा त्याचा पुत्र आमोन याच्यावर कसा परिणाम झाला? आमोन अत्यंत दुष्ट निघाला. मनश्‍शेने पश्‍चात्ताप केल्यानंतर, राष्ट्रात एकेकाळी त्याने स्वतःच सुरू केलेला अमंगळपणा दूर करण्यासाठी पावले उचलली तेव्हा आमोनने त्याला साथ दिली नाही. २२ वर्षांच्या वयात सिंहासनाचा वारसा मिळाल्यावर आमोनने “आपला बाप मनश्‍शे याच्या करणीप्रमाणे परमेश्‍वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.” यहोवासमोर नम्रतेने वर्तण्याऐवजी तो “अधिकाधिक पाप करीत गेला.” (२ इतिहास ३३:२१-२३) आमोन यहुदावर राज्य करू लागला तेव्हा योशीया अवघ्या सहा वर्षांचा होता. त्याचे बालपण किती भयंकर गेले असेल याची आपण कल्पना करू शकतो!

दुष्ट आमोनचे राज्य दोन वर्षांत संपुष्टात आले कारण त्याच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचून त्याला जिवे मारले. पण राष्ट्रातील लोकांनी आमोनविरुद्ध कट रचणाऱ्‍यांना ठार मारले आणि त्याचा पुत्र योशीया याला राजा घोषित केले.—२ इतिहास ३३:२४, २५.

पण इतक्या वाईट वातावरणात लहानपण गेले असले तरीही योशीया यहोवाच्या नजरेत जे योग्य तेच करत राहिला. त्याची कारकीर्द इतकी यशस्वी ठरली की बायबल त्याच्याबद्दल असे म्हणते: “मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्‍या मनाने, आपल्या साऱ्‍या जिवाने व आपल्या साऱ्‍या बलाने परमेश्‍वरभजनी लागणारा योशीयासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेहि झाला नाही.”—२ राजे २३:१९-२५.

ज्यांना लहानपणी वाईट अनुभव आले असतील त्यांच्याकरता योशीयाचे उदाहरण किती आश्‍वासन देणारे आहे! त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? योग्य आचरण करण्याचा निर्णय घेऊन शेवटपर्यंत त्यावर ठामपणे टिकून राहण्यास योशीयाला कशामुळे मदत मिळाली?

यहोवाला ओळखण्याचा प्रयत्न करा

योशीयाच्या जीवनात सुरवातीच्या काही वर्षांत त्याच्यावर सकारात्मक प्रभाव पाडणारी एक व्यक्‍ती म्हणजे त्याचे पश्‍चातापी आजोबा मनश्‍शे. त्या दोघांचा किती संबंध आला किंवा मनश्‍शेने पश्‍चात्ताप करून आपला मार्ग बदलला तेव्हा योशीया किती वर्षांचा होता याबद्दल बायबल काही सांगत नाही. यहुदी कुटुंबांत सहसा घनिष्ट संबंध असल्यामुळे, मनश्‍शेने कदाचित सर्वत्र असलेल्या भ्रष्ट आचरणापासून आपल्या नातवाचे रक्षण करण्याचा आणि त्याच्या मनात खरा देव यहोवा व त्याच्या वचनाबद्दल आदर निर्माण केला असेल असे आपण म्हणू शकतो. मनश्‍शेने योशीयाच्या हृदयात पेरलेले सत्याचे बीज कालांतराने इतर सकारात्मक गोष्टींचे खतपाणी मिळाल्यावर फलद्रूप झाले असेल. यहुदावरील आपल्या राज्याच्या आठव्या वर्षी, १५ वर्षांच्या योशीयाने यहोवाची इच्छा जाणून घेण्यास आणि त्यानुसार चालण्यास सुरवात केली.—२ इतिहास ३४:१-३.

याप्रमाणेच, काहीजणांच्या कुटुंबात आध्यात्मिक मार्गदर्शन देणारे कोणीच नसेल; फक्‍त एखाद्या दूरच्या नातलगाने, ओळखीच्या व्यक्‍तीने किंवा शेजाऱ्‍याने त्यांच्या मनात सत्याचे बीज पेरले असेल. पण नंतर खतपाणी मिळाल्यास हे बीज फलद्रूप होण्याची शक्यता आहे. या आधी उल्लेख केलेल्या मलिन्डा नावाच्या मुलीच्या घराशेजारी एक आजोबा राहायचे. ते नियमितपणे मलिन्डाच्या घरी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके आणून द्यायचे. मलिन्डा मोठ्या प्रेमळपणे त्यांची आठवण काढून सांगते: “मला या शेजारच्या आजोबांबद्दल सर्वात विशेष वाटणारी गोष्ट म्हणजे ते कोणतेही सण पाळत नव्हते. मला ही गोष्ट विशेष वाटण्याचे कारण असे की हॅलोवीन आणि यांसारख्या इतर सणांच्या वेळी माझ्या आईवडिलांच्या त्या गुप्त धार्मिक पंथात काही खास रितीरिवाज पाळले जायचे.” दहा वर्षांनंतर एका ओळखीच्या व्यक्‍तीने मलिन्डाला यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहातील ख्रिस्ती सभेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले तेव्हा तिला या शेजारच्या आजोबांची आठवण झाली आणि तिने लगेच ते आमंत्रण स्वीकारले. यामुळे तिला सत्य शोधण्यात खूप मदत मिळाली.

देवापुढे नम्र राहा

योशीयाच्या कारकीर्दीत यहुदा राष्ट्रात लक्षणीय धार्मिक सुधार घडून आले. यहुदा राष्ट्रातून मूर्तिपूजा दूर करण्याकरता व राष्ट्राच्या शुद्धिकरणाकरता सहा वर्षांपर्यंत मोहीम राबवल्यानंतर योशीयाने यहोवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरवात केली. हे काम सुरू असताना मुख्य याजक हिल्किया याला एक फार मोलवान वस्तू गवसली. त्याला ‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्राच्या ग्रंथाची’ मूळ प्रत सापडली. हा अतिशय अनपेक्षित शोध लागल्यानंतर हिल्कियाने तो ग्रंथ शापान याला दिला; शापान चिटणीसाने याविषयीची सर्व हकीकत राजाला सांगितली. हे सारे यश मिळाल्यामुळे २५ वर्षीय योशीया गर्विष्ठ झाला का?—२ करिंथकर ३४:३-१८.

एज्राने याविषयी असे लिहिले: “त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडिली.” आपल्या पूर्वजांनी देवाच्या सर्व आज्ञांचे पालन केले नाही याची जाणीव झाल्यामुळे योशीयाने मनापासून वाटलेले दुःख अशाप्रकारे व्यक्‍त केले. यातून खरोखर योशीयाची नम्रता दिसून आली! राजाने लगेच आपल्या पाच प्रतिनिधींना हुल्दा संदेष्ट्रीच्या द्वारे यहोवाला प्रश्‍न करण्यास पाठवले. राजाने नेमलेल्या या प्रतिनिधींनी असे वृत्त दिले: ‘यहोवाची आज्ञा न पाळल्यामुळे अनिष्ट येईल. पण राजा योशीया, तू देवापुढे नम्र झाला म्हणून तुला तुझ्या कबरेत शांतीने पोचविले जाईल आणि जो गहजब येणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.’ (२ इतिहास ३४:१९-२८) योशीयाच्या मनोवृत्तीमुळे यहोवा संतुष्ट झाला.

लहानपणी आपल्याला कशाही प्रकारचे अनुभव आलेले असोत, पण आपण खरा देव यहोवा याच्यासमोर नम्र होऊन त्याच्याबद्दल आणि त्याचे वचन बायबल याबद्दल आदर व्यक्‍त केला पाहिजे. या आधी उल्लेख केलेल्या निकलसने असेच केले. तो म्हणतो: “ड्रग्स आणि दारूचे व्यसन जडल्यामुळे माझ्या जीवनात असंख्य समस्या होत्या. पण तरीसुद्धा बायबलच्या ज्ञानाची मला ओढ होती आणि आपल्या जीवनात एक निश्‍चित उद्देश असावा अशी मनापासून इच्छा होती. शेवटी यहोवाच्या साक्षीदारांसोबत माझी गाठ पडली. मी माझ्या सवयी बदलल्या आणि सत्याचा स्वीकार केला.” होय आपण ज्या वातावरणात राहतो, ते कसेही असले तरीसुद्धा आपण देवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल आदरपूर्वक मनोवृत्ती बाळगू शकतो.

यहोवाने केलेल्या तरतुदींचा फायदा करून घेणे

योशीयाला यहोवाच्या संदेष्ट्यांबद्दलही मनापासून आदर होता. म्हणूनच, त्याने हुल्दा संदेष्ट्रीच्या द्वारे यहोवाकडे विचारपूस केली; शिवाय, त्याच्या काळातील इतर संदेष्ट्यांचाही त्याच्यावर प्रभाव होता. उदाहरणार्थ, यिर्मया आणि सफन्या हे दोघे त्या काळात यहुदातील मूर्तिपूजेमुळे येणाऱ्‍या यहोवाच्या न्यायदंडांविषयी घोषणा करत होते. त्यांच्या संदेशाकडे लक्ष दिल्यामुळे योशीयाला खोट्या उपासनेविरुद्ध आणखी उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असेल!—यिर्मया १:१, २; ३:६-१०; सफन्या १:१-६.

आज “धन्याने,” अर्थात येशू ख्रिस्ताने त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांच्या समूहाला, म्हणजेच “विश्‍वासू व बुद्धिमान दासाला” यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी नेमले आहे. (मत्तय २४:४५-४७) बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनांच्या आणि मंडळीच्या द्वारे हा दास वर्ग बायबलच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे कोणते लाभ होतात हे आपल्या लक्षात आणून देतो आणि हा सल्ला आपल्या दैनंदिन जीवनात आपण कशाप्रकारे उपयोगात आणावा यासंबंधी व्यावहारिक सूचना देखील देतो. आपल्या व्यक्‍तिमत्त्वात मुळावलेल्या सवयी किंवा विचारसरणी बदलण्यास आपली मदत करण्यासाठी यहोवाने केलेल्या या तरतुदींचा उपयोग करणे किती महत्त्वाचे आहे! निकलसला लहानपणापासून कोणाच्याही अधिकाराखाली राहणे अजिबात आवडत नव्हते. तो देवाच्या वचनातील सत्य शिकू लागला तेव्हा त्याचा हा स्वभाव, यहोवाची पुरेपूर सेवा करण्यात त्याच्यासाठी एक अडथळा बनला. आणि हा स्वभाव बदलणे काही सोपे काम नव्हते. पण काही काळानंतर त्याला यात यश आले. कसे? तो म्हणतो: “दोन समजूतदार वडिलांच्या मदतीमुळे, मी माझी खरी समस्या ओळखू शकलो आणि त्यांनी प्रेमळपणे बायबलमधून दिलेला सल्ला लागू करण्यास मी सुरवात केली.” पुढे तो म्हणतो: “दुसऱ्‍यांच्या अधीन राहताना अजूनही कधीकधी मला चीड येते पण माझ्या बंडखोर स्वभावावर आता मी नियंत्रण मिळवले आहे.”

मलिन्डा देखील जीवनात महत्त्वाचे निर्णय घेताना मंडळीतल्या वडिलांचा सल्ला घेते. लहानपणीच्या कटू अनुभवांमुळे तिला आलेल्या नैराश्‍याच्या आणि कमीपणाच्या भावनांशी झुंजताना तिला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांतील लेख खासकरून फार मदत करतात. ती म्हणते: “जेवताना एखादाच घास खास चविष्ट लागावा तसा कधीकधी एखाद्या लेखातील एखादा परिच्छेद किंवा एखादेच वाक्य माझ्या मनाला स्पर्शून जाते. साधारण नऊ वर्षांपूर्वीपासून मी असे लेख एका फाईलीत जपून ठेवू लागले. यामुळे कधीही मी सहज हे लेख उघडून वाचू शकते.” आज तिच्या या खास संग्रहात जवळजवळ ४०० लेख आहेत!

कौटुंबिक जीवनात आलेलल्या कटू अनुभवांमुळे एक व्यक्‍ती जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही हे साफ खोटे आहे. यहोवाच्या मदतीने ही व्यक्‍ती आध्यात्मिकरित्या निश्‍चित यशस्वी होऊ शकते. चांगल्या वातावरणात संगोपन झालेले सगळेच जण कायम यहोवाला विश्‍वासू राहतील असे ज्याप्रकारे म्हणता येत नाही, त्याचप्रकारे, केवळ वाईट वातावरणात बालपण गेले म्हणून एक व्यक्‍ती देवभीरू बनणे शक्यच नाही असे म्हणता येत नाही.

मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी नियमशास्त्राची प्रत सापडल्यानंतर योशीयाने “परमेश्‍वरासमोर असा करार केला की मी परमेश्‍वराचे अनुसरण करीन, त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन.” (२ इतिहास ३४:३१) आणि खरोखर जिवात जीव असेपर्यंत योशीयाने त्याचा शब्द पाळला. मलिन्डा आणि निकलसनेही अशाचप्रकारे यहोवा देवाला शेवटपर्यंत निष्ठावान राहण्याचा आणि यहोवाचे विश्‍वासू उपासक या नात्याने यशस्वी होऊन दाखवण्याचा संकल्प केला आहे. तुम्हीही देवाच्या समीप राहून त्याची विश्‍वासूपणे सेवा करण्याचा निर्धार करावा अशी आमची प्रार्थना आहे. तुम्ही निश्‍चितच यशस्वी व्हाल कारण यहोवा स्वतः याचे आश्‍वासन देतो: “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला सबळ करीन; होय, मी तुझे साहाय्य करीन; होय, मी आपल्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.”—यशया ४१:१०, १३, पं.र.भा.

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२६ पानांवरील चित्रे]

अतिशय वाईट वातावरणात लहानपण गेले असूनही योशियाने यहोवाचा शोध केला आणि तो जीवनात यशस्वी झाला

[२८ पानांवरील चित्र]

व्यक्‍तिमत्त्वात मुळावलेल्या सवयी सोडून देण्यास मंडळीतील वडील तुम्हाला साहाय्य करू शकतात

[२८ पानांवरील चित्र]

“टेहळणी बुरूज” आणि “सावध राहा!” तुम्हाला विश्‍वासू राहण्याकरता साहाय्य करू शकतात