व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन करा

देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन करा

देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन करा

“हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही.”स्तोत्र ४०:५.

१, २. देवाच्या अद्‌भुत कृत्यांसंबंधी आपल्याजवळ काय पुरावा आहे आणि यामुळे आपण काय करण्यास प्रेरित झालो पाहिजे?

 तुम्ही बायबल वाचता तेव्हा, देवाने त्याच्या प्राचीन लोकांसाठी अर्थात इस्राएल राष्ट्रासाठी किती अद्‌भुत कृत्ये केली होती हे तुमच्या सहज लक्षात येईल. (यहोशवा ३:५; स्तोत्र १०६:७, २१, २२) आज जरी यहोवा त्यारितीने मानवांच्या कार्यांत दखल देत नसला तरीसुद्धा, आजही आपल्या भोवती त्याच्या अद्‌भुत कृत्यांचे अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे दावीदासोबत आपणही असे म्हणू शकतो: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.”—स्तोत्र १०४:२४; १४८:१-५.

आज अनेक लोक निर्माणकर्त्याच्या अद्‌भुत कृत्यांचा स्पष्ट पुरावा दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा ती धडधडीतपणे नाकारतात. (रोमकर १:२०) पण आपण देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन केले पाहिजे आणि आपल्या जीवनदात्यापुढे आपले काय स्थान आहे आणि त्याच्याप्रती आपले काय कर्तव्य आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. असे करण्यास आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने ईयोब ३८ ते ४१ अध्याय उत्तम आहेत कारण यांत यहोवाने आपल्या अद्‌भुत कृत्यांविषयी काही बाबी ईयोबाच्या लक्षात आणून दिल्या. देवाने मांडलेले काही समर्पक मुद्दे विचारात घ्या.

शक्‍तिशाली आणि अद्‌भुत कृत्ये

३. ईयोब ३८:२२, २३, २५-२९ यात लिहिल्याप्रमाणे देवाने कोणत्या गोष्टींबद्दल प्रश्‍न विचारले?

देवाने ईयोबाला विचारले: “तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय? ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध यांच्या प्रसंगासाठी राखून ठेविली आहेत.” आज जगाच्या कित्येक भागांत हिमवर्षा आणि गारा पडणे या सामान्य गोष्टी आहेत. पुढे देव म्हणतो: “पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाट कोण फोडितो? गर्जणाऱ्‍या विद्युल्लतेला मार्ग कोणी करून दिला? अशासाठी की निर्जन प्रदेशात, मनुष्यहीन अरण्यात पाऊस पडावा, उजाड व वैराण प्रदेश तृप्त करावा, कोवळी हिरवळ उगवेशी करावी. पर्जन्यास कोणी पिता आहे काय? दहिवरबिंदूस कोण जन्म देतो? हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते? आकाशातील हिमकणांस कोण जन्म देतो?”—ईयोब ३८:२२, २३, २५-२९.

४-६. हिमाविषयी मनुष्याचे ज्ञान अपूर्ण आहे असे का म्हणता येते?

जे लोक धकाधकीचे जीवन असलेल्या समाजांत राहतात आणि ज्यांना प्रवास करावा लागतो अशा लोकांना हिमवर्षा म्हणजे अनावश्‍यक कटकट वाटते. पण इतर असंख्य असेही लोक आहेत ज्यांना बर्फ पडताना पाहून खूप आनंद होतो कारण यामुळे त्यांना हिवाळ्यातील काही खास करमणुकींत भाग घेण्याची संधी मिळते. पण देवाने ईयोबाला विचारलेल्या प्रश्‍नाचा विचार करा. हिम किंवा बर्फ याविषयी तुम्हाला सविस्तर ज्ञान आहे का? ते कसे दिसते हे तुम्हाला माहीत आहे का? हो, बर्फ कसा दिसतो हे तर सर्वांनाच माहीत आहे. कदाचित आपण चित्रांत पाहिले असेल किंवा प्रत्यक्ष बर्फ पडताना पाहिला असेल. पण एका हिमकणाविषयी काय? ते कसे दिसतात तुम्हाला माहीत आहे का, कधी तुम्ही ते निरखून पाहिले आहेत का?

काहीजणांनी हिमकणांचा कित्येक दशके अभ्यास केला व त्यांची छायाचित्रे घेतली आहेत. एका हिमकणात बर्फाचे शेकडो बारीकबारिक, व कित्येक सुंदर डिझाईन्सचे स्फटिक असतात. ॲट्‌मॉस्फियर या पुस्तकात असे म्हटले आहे: “वेगवेगळ्या रचनांच्या हिमकणांना अंतच नाही हे सर्वज्ञात आहे; तसे पाहिल्यास दोन हिमकण सारखे असण्यास कोणताही नैसर्गिक नियम कारणीभूत नाही असे वैज्ञानिकांचे म्हणणे असले तरीसुद्धा, आजपर्यंत कधीही दोन सारखे हिमकण सापडलेले नाहीत. विल्सन ए. बेन्ट्‌ली यांनी या संदर्भात फार मोठ्या प्रमाणात संशोधन केले. त्यांनी सूक्ष्मदर्शकातून हिमकणांचे परीक्षण करण्यासाठी व त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी ४० वर्षे खर्च केली. पण या सबंध काळात त्यांना एकदाही दोन एकसारखे दिसणारे हिमकण आढळले नाहीत.” आणि जरी क्वचित कधी दोन जुळे हिमकण आढळले तरीसुद्धा आजपर्यंत आढळलेल्या असंख्य रचनाची नवलाई कधी कमी होईल का?

देवाने ईयोबाला विचारलेला प्रश्‍न आठवा: “तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस का?” बरेचजण ढगांना हिमाचे भांडार मानतात. या भांडारांत जाऊन असंख्य प्रकारच्या हिमकणांची यादी करण्याची आणि ते कसे उत्पन्‍न झाले याचा अभ्यास करण्याची तुम्ही कल्पना करू शकता का? एका विज्ञान विश्‍वकोशात असे म्हटले आहे: “ढगांतील पाण्याचे थेंब जवळजवळ -४० डिग्री सेल्सियसच्या (-४० डि. फॅ.) तापमानात गोठण्याकरता आवश्‍यक असलेल्या बर्फाच्या अणूतील केंद्रकाचे स्वरूप व उत्पत्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही.”—स्तोत्र १४७:१६, १७; यशया ५५:९, १०.

७. पावसाबद्दल मनुष्याला कितपत ज्ञान आहे?

पावसाविषयी काय? देवाने ईयोबाला विचारले: “पर्जन्यास कोणी पिता आहे काय? दहिवरबिंदूस कोण जन्म देतो?” त्याच विज्ञान विश्‍वकोशात याविषयी असे म्हटले आहे: “वातावरणातील गुंतागुंतीच्या हालचाली आणि हवेतील बाष्परूपी व कणरूपी जलांशामुळे ढगांतील बाष्प निवून द्रवीभूत होण्याची क्रिया कशी घडते याविषयी एक सर्वसामान्य सिद्धान्त मांडणे जवळजवळ अशक्यच वाटते.” सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी सविस्तर सिद्धान्त मांडले आहेत पण ते पावसाच्या क्रियेसंबंधी पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. आणि तरीसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे की जीवनावश्‍यक पाऊस पडण्याचे थांबत नाही; पृथ्वीला जलपुरवठा होतच राहतो आणि यामुळे वनस्पतीजीवन व प्राणीजीवन अस्तित्वात राहते व सुखावह होते.

८. प्रेषितांची कृत्ये १४:१७ येथील पौलाचे शब्द का उचित आहेत?

या संदर्भात प्रेषित पौल ज्या निष्कर्षावर आला त्याच्याशी तुम्हीही सहमत नाही का? या अद्‌भुत कृत्यांत ती घडवून आणणाऱ्‍याच्या अस्तित्वाचा पुरावा ओळखण्यास त्याने सर्वांना प्रोत्साहित केले. पौलाने यहोवा देवाविषयी सांगितले: “त्याने स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.”—प्रेषितांची कृत्ये १४:१७; स्तोत्र १४७:८.

९. देवाच्या अद्‌भुत कार्यांतून त्याचे महान सामर्थ्य कशाप्रकारे प्रकट होते?

इतकी अद्‌भुत आणि हितकारक कृत्ये करणाऱ्‍याकडे असीम बुद्धिमत्ता आणि प्रचंड सामर्थ्य आहे यात शंका नाही. त्याच्या सामर्थ्याच्या संदर्भात याचा विचार करा: असे म्हणतात की दररोज जवळजवळ ४५,००० वादळे येतात. म्हणजे दर वर्षी १ कोटी ६० लाख पेक्षा जास्त. याचा अर्थ, या क्षणी जवळजवळ २,००० वादळे जगातल्या कोणत्यातरी भागात होत असतील. वादळ येते तेव्हा ढगांमध्ये होणाऱ्‍या घर्षणामुळे जी ऊर्जा उत्पन्‍न होते ती दुसऱ्‍या महायुद्धाच्यावेळी टाकण्यात आलेल्या १० किंवा त्यापेक्षाही अधिक अणू बॉम्बमधून उत्पन्‍न झालेल्या ऊर्जेइतकी असते. या ऊर्जेपैकी काही आपल्याला वीजेच्या रूपात दिसते. वीज चमकण्याची क्रिया अतिशय विलक्षण आहे. शिवाय, या क्रियेमुळे नायट्रोजन वायूचे काही प्रकार उत्पन्‍न होण्यास मदत होते व जमिनीपर्यंत पोचल्यावर ते झाडे व वनस्पतींत शोषले जाऊन नैसर्गिक खताचे काम करतात. त्याअर्थी वीज चमकण्याची क्रिया ऊर्जेचा आविष्कार असला तरीसुद्धा यामुळे खरोखर फायदा होतो.—स्तोत्र १०४:१४, १५.

तुमच्यावर कसा परिणाम होतो?

१०. ईयोब ३८:३३-३८ येथे दिलेल्या प्रश्‍नांचे तुम्ही कसे उत्तर द्याल?

१० स्वतःला ईयोबाच्या जागी ठेवा; सर्वसमर्थ देवाने तुम्हाला जवाब मागितला आहे अशी कल्पना करा. आज बरेच लोक देवाच्या अद्‌भुत कृत्यांकडे लक्ष देत नाहीत याच्याशी कदाचित तुम्ही देखील सहमत व्हाल. ईयोब ३८:३३-३८ येथे दिलेले प्रश्‍न यहोवा आपल्याला विचारतो. “आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय? पृथ्वीवर त्याची सत्ता तुला नेमून देता येईल काय? तुजवर विपुल जलवर्षाव व्हावा म्हणून मेघास तुला पुकारून सांगता येईल काय? विद्युल्लता तुझ्या आज्ञेत आहेत काय? आणि त्या येऊन, काय आज्ञा, असे तुला म्हणतात काय? घनमेघात अक्कल कोणी घातली? अभ्रांस समज कोणी दिली? कोणास आपल्या बुद्धिसामर्थ्याने मेघांची हाजिरी घेता येते? आकाशाचे बुधले कोण ओतितो? तेव्हा धूळ भिजून गोळा बनतो. व ढेकळे विरघळून एकमेकांस चिकटून जातात.”

११, १२. देव अद्‌भुत कृत्ये करणारा आहे हे कोणत्या काही गोष्टींवरून शाबीत होते?

११ अलीहूने ईयोबाच्या लक्षात आणून दिलेल्या केवळ काही मुद्द्‌यांवर आपण विचार केला आणि यहोवाने ईयोबाला “मर्दाप्रमाणे” ज्यांचे उत्तर देण्याचे आव्हान केले असे काही प्रश्‍न आपण पाहिले. (ईयोब ३८:३) “काही” आपण यासाठी म्हणतो कारण ३८ व ३९ अध्यायांत देवाने निर्मीतीच्या इतर लक्षवेधक गोष्टींचाही उल्लेख केला. उदाहरणार्थ, आकाशातील नक्षत्रपुंज. त्यांचे सर्व नियम कोणाला माहीत आहेत? (ईयोब ३८:३१-३३) यहोवाने ईयोबाला काही पशूपक्ष्यांची उदाहरणे दिली जसे की सिंह, कावळा, पहाडी रानशेळ्या, रानगाढवे, गवा, शहामृग, बलवान घोडा आणि गरूड. देवाने ईयोबाला असे विचारले की या विविध पशूपक्ष्यांना अस्तित्वात राहण्यास व वाढण्यास मदत करणारे त्यांचे विशेष गुण ईयोबाने त्यांना दिले होते का? तुम्हाला घोडे किंवा इतर पशू विशेष आवडत असतील तर या अध्यायांचा अभ्यास तुम्हाला अतिशय मनोरंजक वाटेल.—स्तोत्र ५०:१०, ११.

१२ ईयोब अध्याय ४० व ४१ चे देखील तुम्ही परीक्षण करू शकता. या अध्यायांत पुन्हा एकदा यहोवाने ईयोबाला खासकरून दोन प्राण्यांविषयी त्याच्या प्रश्‍नांची उत्तरे मागितली. आपल्या माहितीप्रमाणे हे प्राणी म्हणजे अवाढव्य व बलशाली हिपोपोटामस (बेहेमोथ) आणि भयानक नाईल मगर (लिव्याथान). हे दोन्ही प्राणी अतिशय आश्‍चर्यकारक असून त्यांचे गुण लक्षवेधक आहेत. यहोवाच्या सर्व अद्‌भुत कृत्यांविषयी जाणून घेतल्यावर आपण कोणते निष्कर्ष काढावेत याविषयी आता आपण पाहू या.

१३. देवाच्या प्रश्‍नांचा ईयोबावर काय परिणाम झाला आणि या गोष्टींचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

१३ देवाने विचारलेल्या प्रश्‍नांचा ईयोबावर कसा परिणाम झाला याविषयी ईयोबच्या ४२ व्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळते. आधी ईयोब स्वतःकडे आणि इतरांकडे अवाजवी लक्ष देत होता. पण देवाच्या प्रश्‍नांच्या माध्यमाने त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा ईयोबाने आपली विचारसरणी बदलली. त्याने कबूल केले: “तुला सर्व काही करिता येते; तुझ्या कोणत्याहि योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. यास्तव मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्‌भुत आहे, ते मला कळले नाही.” (ईयोब ४२:२, ३) होय, देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन केल्यानंतर ईयोबाने कबूल केले की ती अद्‌भुत कृत्ये त्याच्या आटोक्याबाहेरची आहेत. सृष्टीतील आश्‍चर्यांचे परीक्षण केल्यावर, आपल्यालाही देवाच्या बुद्धीसामर्थ्याविषयी असाच अचंबा वाटला पाहिजे. पण कोणत्या उद्देशाने? यहोवाच्या अद्‌भुत सामर्थ्याचा आणि शक्‍तीचा केवळ अचंबा वाटणे पुरेसे आहे का? की आपण त्यापलीकडे काही करण्यास प्रेरित झाले पाहिजे?

१४. देवाच्या अद्‌भुत कृत्यांच्या संदर्भात दाविदाची कशी प्रतिक्रिया होती?

१४ स्तोत्र ८६ या अध्यायात आपल्याला या संदर्भात समर्पक असलेले दाविदाचे विचार आढळतात; या आधीच्या एका स्तोत्रात दावीद म्हणतो: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करितो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करिते.” (स्तोत्र १९:१, २) पण दाविदाने केवळ इतकेच म्हटले नाही. स्तोत्र ८६:१०, ११ यात आपण वाचतो: “तू थोर व अद्‌भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस. हे परमेश्‍वरा, तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.” निर्माणकर्त्याच्या सर्व अद्‌भुत कृत्यांविषयी अचंबा वाटण्यासोबतच दाविदाला देवाबद्दल योग्य प्रकारचे भय देखील वाटत होते. याचे कारण उघडच आहे. ज्याने ही अद्‌भुत कृत्ये केली आहेत त्याला नाखूष करण्याची दाविदाची इच्छा नव्हती. आपली देखील हीच मनोवृत्ती असली पाहिजे.

१५. दाविदाला देवाविषयी आदरयुक्‍त भय वाटणे योग्यच का आहे?

१५ दाविदाने हे ओळखले असेल की ज्याअर्थी देवाजवळ इतके प्रचंड सामर्थ्य आहे त्याअर्थी जे लोक त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टी करतात त्यांच्या विरोधात तो या सामर्थ्याचा निश्‍चितच उपयोग करू शकतो. साहजिकच या लोकांसाठी हे अनिष्टसूचक ठरेल. देवाने ईयोबाला विचारले: “तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय? ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध यांच्या प्रसंगासाठी राखून ठेविली आहेत.” हिम, गारा, वादळवारा आणि विजा या सर्व गोष्टी त्याची शस्त्रे आहेत. आणि खरोखर या किती भयंकर नैसर्गिक शक्‍ती आहेत!—ईयोब ३८:२२, २३.

१६, १७. देवाजवळ असलेल्या आश्‍चर्यकारक सामर्थ्याचे उदाहरण द्या आणि गतकाळात त्याने आपले सामर्थ्य कशाप्रकारे प्रकट केले?

१६ वरती उल्लेखलेल्या एखाद्या कारणामुळे आलेली नैसर्गिक आपत्ती तुम्हाला आठवत असेल, जसे झंझावात, तुफान, चक्रिवादळ, गारपीट किंवा महापूर. उदाहरणार्थ, २००० सालाच्या सुरवातीला नैर्ऋत्य युरोपात फार मोठे वादळ आले. हवामानाचा अभ्यास करणाऱ्‍यांना देखील या भयंकर वादळाचे आश्‍चर्य वाटले. ताशी २०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्‍या जोराच्या वाऱ्‍यांनी मार्गात येणारी हजारो घरांची छते उडवली, विजेचे खांब पाडले आणि ट्रक्स देखील उलटवले. जरा ते दृश्‍य डोळ्यापुढे आणा: त्या वादळात जवळजवळ २७ कोटी वृक्ष एकतर उन्मळून पडले किंवा तुटून पडले. पॅरिसच्या बाहेर व्हर्साय पार्कमध्येच १०,००० झाडे पडली. वीज नसल्यामुळे लाखो घरे अंधारात बुडाली. जवळजवळ १०० लोक मृत्यूमुखी पडले. आणि हे सर्व काही अवधीतच घडले. किती भयंकर शक्‍ती!

१७ कदाचित एखाद्याला वाटेल की वादळे तर अचानक येतात, त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. पण विचार करा की सर्वसमर्थ देवाने आपल्या सामर्थ्याचा नियंत्रित पद्धतीने विशिष्ट कारणासाठी उपयोग करून असेच अद्‌भुत कृत्य केले तर काय घडेल? अब्राहामाच्या दिवसांत त्याने असे केलेही होते. तेव्हा अब्राहामाला कळून आले की सदोम व गमोरा या दोन शहरांची दुष्टाई सर्व पृथ्वीच्या न्यायाधीशाच्या नजरेतून सुटली नाही. ही शहरे इतकी भ्रष्ट झाली होती की त्यांविषयीची ओरड देवाच्या कानापर्यंत पोचली होती. देवाने सर्व नीतिमान लोकांना या दंडित शहरांतून बचावण्यास मदत केली. त्या घटनेचा अहवाल आपण असे वाचतो: “तेव्हा परमेश्‍वराने सदोम व गमोरा यांवर गंधक व अग्नि यांचा वर्षाव आकाशातून केला.” हे एक अद्‌भुत कृत्य होते. नीतिमानांचा बचाव झाला आणि जे आपला मार्ग बदलू इच्छित नव्हते त्या दुष्टांचा नाश झाला.—उत्पत्ति १९:२४.

१८. यशयाच्या २५ व्या अध्यायात कोणत्या अद्‌भुत गोष्टींविषयी सांगितले आहे?

१८ काही काळानंतर देवाने बॅबिलोनच्या प्राचीन शहराविरुद्ध न्यायदंड घोषित केला. यशयाच्या २५ व्या अध्यायात उल्लेख केलेले हेच बॅबिलोन शहर असावे. तेथे देवाने भाकीत केले: “तू शहराला मोडतोडीचा ढीग बनविले आहे; तटबंदीचा गाव धुळीस मिळविला आहे; विदेश्‍यांच्या वाड्यांनी भरलेले शहर नष्ट केले आहे; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.” (यशया २५:२) हे अगदी असेच घडले याला आज बॅबिलोनचे अवशेष पाहण्याकरता जाणारे लोक पुष्टी देतात. बॅबिलोनचा नाश हा केवळ एक योगायोग होता का? नाही. उलट यशयाने याविषयी जे म्हटले त्याच्याशी आपणही सहमत आहोत: “हे परमेश्‍वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्‍चर्यकारक कृत्ये केली आहेस; तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत.”—यशया २५:१.

भविष्यातील अद्‌भुत कृत्ये

१९, २०. यशया २५:६-८ येथील भविष्यवाणीची कशाप्रकारे पूर्णता होण्याची आपण अपेक्षा करू शकतो?

१९ देवाने वरील भविष्यवाद गतकाळात पूर्ण केला आणि तो भविष्यातही अद्‌भुत कृत्ये करेल. या संदर्भात, यशयाने जेथे देवाच्या ‘आश्‍चर्यकारक कृत्यांविषयी’ सांगितले तेथे आपल्याला आणखी एक विश्‍वसनीय भविष्यवाणी आढळते; बॅबिलोनच्या नायनाटाविषयीची भविष्यवाणी ज्याप्रमाणे पूर्ण झाली त्याप्रमाणे ही भविष्यवाणी देखील पूर्ण होईल. यात कोणती ‘आश्‍चर्यकारक’ गोष्ट भाकीत करण्यात आली आहे? यशया २५:६ (पं.र.भा.) सांगते: “सैन्यांचा यहोवा या पर्वतावर सर्व लोकांसाठी पुष्ट पदार्थांचे भोजन, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाचे, मांद्याने भरलेल्या पुष्ट पदार्थांचे, राखून ठेवलेल्या चांगल्या गाळलेल्या द्राक्षारसाचे भोजन तयार करील.”

२० ही भविष्यवाणी, देवाने अभिवचन दिलेल्या आणि अगदी उंबरठ्याशी असलेल्या नव्या जगात खात्रीने पूर्ण होईल. तेव्हा, आज कित्येकांना पीडित करणाऱ्‍या असंख्य समस्या नाहीशा झालेल्या असतील. किंबहुना यशया २५:७, ८ येथील भविष्यवाणी आपल्याला खात्री देते की देव आपल्या सृष्टीसामर्थ्याने इतिहासातील सर्वात अद्‌भुत कार्य करेल: “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो, कारण परमेश्‍वर हे बोलला आहे.” कालांतराने प्रेषित पौलाने, मृतांना देव कशाप्रकारे पुन्हा जिवंत किंवा पुनरुत्थित करेल याविषयी सांगताना याच भविष्यवाणीचा काही भाग उद्धृत केला. खरोखर हे किती अद्‌भुत कृत्य असेल!—१ करिंथकर १५:५१-५४.

२१. मृतांकरता देव कोणती अद्‌भुत कार्ये करेल?

२१ पुन्हा कोणी दुःखाने अश्रू गाळणार नाही, याचे आणखी एक कारण म्हणजे सर्व शारीरिक दुखणी नाहीशी केली जातील. येशू या पृथ्वीवर असताना त्याने अनेकांना बरे केले—त्याने अंधळ्यांना परत दृष्टी दिली, बहिऱ्‍यांना ऐकण्याची क्षमता आणि अपंगांना बळ दिले. योहान ५:५-९ येथे सांगितल्याप्रमाणे त्याने ३८ वर्षांपासून चालण्याफिरण्यास असमर्थ असलेल्या एकाला बरे केले. पाहणाऱ्‍यांना हा एक चमत्कार किंवा अद्‌भुत कृत्य आहे असे वाटले. आणि ते होते देखील! पण येशूने त्यांना सांगितले की तो याहूनही अद्‌भुत कार्य करेल: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहान ५:२८, २९.

२२. दुबळे व दरिद्री भविष्याकडे आशेने का पाहू शकतात?

२२ हे सर्व घडेल यात शंका नाही कारण याची प्रतिज्ञा करणारा यहोवा आहे. तो आपल्या जीवनदायक सामर्थ्याचा विचारपूर्वक उपयोग करेल तेव्हा याचे अतिशय अद्‌भुत परिणाम दिसून येतील. तो राजा असलेल्या आपल्या पुत्राकरवी काय करेल याविषयी स्तोत्र ७२ यात सांगितले आहे. धार्मिकांची भरभराट होईल. शांतीचा अंत होणार नाही. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर देव दया करेल. तो अभिवचन देतो: “पृथ्वीवरील डोंगरांच्या माथ्यांवर भरपूर धान्य होईल; तिचे फळ लबानोनासारखे डोलेल, आणि नगरांतले लोक भूमीच्या गवतासारखे भरभराटीस येतील.”—स्तोत्र ७२:१६, पं.र.भा.

२३. देवाच्या अद्‌भुत कृत्यांविषयी जाणल्यावर आपण काय करण्यास प्रेरित झाले पाहिजे?

२३ निश्‍चितच, आपण यहोवाच्या सर्व अद्‌भुत कृत्यांवर, अर्थात त्याने गतकाळात काय केले, तो आज काय करत आहे आणि भविष्यात तो काय करेल याबद्दल मनन केले पाहिजे. “परमेश्‍वर देव, इस्राएलाचा देव, तोच काय तो अद्‌भुत कृत्ये करितो; त्याचा धन्यवाद होवो. त्याचे गौरवयुक्‍त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन, आमेन.” (स्तोत्र ७२:१८, १९) यहोवाच्या अद्‌भुत कृत्यांविषयी आपण सदोदीत आपल्या नात्यातल्या व इतर लोकांशी उत्साहाने बोलले पाहिजे. होय, आपण “राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्‌भुत कृत्ये जाहीर” करू या.—स्तोत्र ७८:३, ४; ९६:३, ४.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• ईयोबाला विचारलेले प्रश्‍न मनुष्याचे ज्ञान सीमित असल्याचे कशाप्रकारे दाखवून देतात?

ईयोब ३७-४१ अध्यायांत उल्लेखलेल्या देवाच्या अद्‌भुत कृत्यांपैकी तुम्ही खासकरून कशाने प्रभावित झाला?

• देवाच्या अद्‌भुत कृत्यांपैकी काहींचे मनन केल्यावर आपली प्रतिक्रिया कशी असावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

हिमकणांच्या रचनांतील अद्‌भुत विविधतेविषयी आणि विजेच्या अद्‌भुत शक्‍तीविषयी विचार केल्यावर तुम्ही कोणत्या निष्कर्षावर येता?

[चित्राचे श्रेय]

snowcrystals.net

[१३ पानांवरील चित्रे]

देवाच्या अद्‌भुत कृत्यांविषयी सदोदीत बोला