व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नकारात्मक भावनांशी झुंजताना

नकारात्मक भावनांशी झुंजताना

नकारात्मक भावनांशी झुंजताना

● आसाफाने तक्रारीच्या सुरात म्हटले: “मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ; कारण मी दिवसभर पीडा भोगिली आहे; प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे.”—स्तोत्र ७३:१३, १४.

● बारुखने असा विलाप केला: “हाय हाय! परमेश्‍वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.”—यिर्मया ४५:३.

● नामीने दुःखाच्या स्वरात असे म्हटले: “सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्‍वराने मला रिकामी परत आणिले; परमेश्‍वर मला प्रतिकूल झाला, सर्वसमर्थाने मला पीडिले आहे, तर मला नामी का म्हणता?”—रूथ १:२०, २१.

निराशेच्या गर्तेत अडकून दुःखी झालेल्या यहोवाच्या अनेक विश्‍वासू उपासकांची उदाहरणे बायबलमध्ये आहेत. खरे तर आपण सर्वच जण अपरिपूर्ण असल्यामुळे कधी ना कधी निराश होतोच. आपल्यातील काही जणांवर भयंकर परिस्थिती गुदरल्यामुळे इतरांपेक्षा ते फार लवकर निराश होतात; त्यांना सतत स्वतःविषयी नकारात्मक विचार करण्याची सवय लागते.

अशा या भावनांवर आपण मात केली नाही तर त्यामुळे इतरांबरोबरचा आणि यहोवा देवाबरोबरचा नातेसंबंध कदाचित बिघडू शकतो. एक ख्रिस्ती बहीण आपली समस्या कबूल करते: “मला लोक त्यांच्या घरी जेवायला किंवा दुसऱ्‍या कोणत्याही कारणासाठी आमंत्रण द्यायचे तेव्हा मी कित्येकदा त्यांना सरळ नाही म्हणायचे. कारण मला सारखं वाटायचं की मंडळीतील इतरांबरोबर संगती करण्याच्या मी पात्र नाही.” परंतु अशाप्रकारच्या या मनोवृत्तीमुळे एखाद्याचे जीवन उद्ध्‌वस्त होऊ शकते! मग या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो?

यहोवाच्या निकट या

आसाफने ७३ व्या स्तोत्रात त्याला वाटणाऱ्‍या चिंतेचे अगदी स्पष्टरीत्या वर्णन केले आहे. दुष्ट लोकांच्या समृद्ध जीवनाशी त्याने स्वतःच्या जीवनाची तुलना केली तेव्हा त्याला त्यांचा हेवा वाटू लागला. दुष्ट लोक अहंकारी व हिंसक असूनही ते सहजरीत्या शिक्षेपासून सुटायचे, हे त्याने पाहिले होते. त्यामुळे आपण ज्या धार्मिक मार्गाने चालत आहोत त्याचा आपल्याला काही फायदा होईल की नाही, याविषयी त्याच्या मनात आलेल्या शंका तो या स्तोत्रात व्यक्‍त करतो.—स्तोत्र ७३:९, १३, १४.

तुम्हीही आसाफप्रमाणे दुष्ट लोकांना सर्व काही करुनसवरुन उजळ माथ्याने चालताना पाहिले आहे का? आसाफने त्याच्या नकारात्मक भावनांवर मात कशी केली? तो पुढे म्हणतो: “ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करीत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली; पण मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणिला तेव्हा ती मला समजली.” (स्तोत्र ७३:१६, १७) यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे आसाफने सकारात्मक पाऊले उचलली. पौलाने म्हटल्याप्रमाणे त्याने स्वतःतील ‘आध्यात्मिक वृत्तीला’ जागृत करून ‘स्वाभाविक वृत्तीला’ दाबून टाकले. नवीन आध्यात्मिक दृष्टिकोनामुळे त्याला समजले, की यहोवाला दुष्टाईचा वीट आहे व त्याच्या योग्य समयी तो दुष्टाई करणाऱ्‍यांच्या दुष्कर्मांची त्यांना शिक्षा देईल.—१ करिंथकर २:१४, १५.

बायबलच्या ज्ञानाच्या आधारे जीवनाच्या वास्तविकतेवर आपले लक्ष केंद्रित ठेवणे किती महत्त्वाचे आहे! यहोवा आपल्याला आठवण करून देतो की तो दुष्टांच्या कार्यांकडे दुर्लक्ष करीत नाही. बायबल म्हणते: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. . . . चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये.” (गलतीकर ६:७-९) यहोवा दुष्टांना “निसरड्या जागांवर उभे” करील; तो त्यांना “पाडून त्यांचा नाश” करील. (स्तोत्र ७३:१८) सरतेशेवटी ईश्‍वरी न्यायाचा विजय होईल.

यहोवाच्या मेजावरून सदोदीत मिळणारे आध्यात्मिक अन्‍न घेतल्याने व देवाच्या लोकांबरोबर संगती केल्याने तुम्हाला तुमचा विश्‍वास मजबूत करण्यास व निराशेवर अथवा नकारात्मक भावनांवर मात करण्यास मदत मिळेल. (इब्री लोकांस १०:२५) आसाफप्रमाणे आपणही यहोवाच्या निकट राहिलो तर आपल्याला त्याचा प्रेमळ पाठिंबा अनुभवता येईल. आसाफ पुढे म्हणतो: “मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखविशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करिशील.” (स्तोत्र ७३:२३, २४) लहान असताना अत्याचाराला बळी पडलेल्या एका ख्रिस्ती भगिनीला आसाफच्या या शब्दांचे मर्म अचूक कळले. ती म्हणते: “मंडळीच्या निकट सहवासात राहिल्यामुळे मी जीवनाची दुसरी बाजू देखील पाहू शकले. मंडळीतील ख्रिस्ती वडील किती प्रेमळ आहेत, ते पोलिस नसून प्रेमळ मेंढपाळ आहेत हे मी स्पष्टपणे पाहू शकले.” खरेच, सहानुभूती दाखवणारे ख्रिस्ती वडील, नकारात्मक भावना काढून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.—यशया ३२:१, २; १ थेस्सलनीकाकर २:७, ८.

यहोवाकडून मिळणारा सल्ला स्वीकारा

संदेष्टा यिर्मया याचा चिटणीस बारुख, मिळालेल्या नेमणुकीमुळे भावनिकरीत्या दबून गेला होता. परंतु यहोवाने अतिशय प्रेमळपणे बारुखचे डोळे उघडले. यिर्मयामार्फत यहोवा त्याला म्हणाला: “तू आपणासाठी मोठाल्या गोष्टीची वांच्छा करितोस काय? ती करू नको, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्‍वर म्हणतो; पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.”—यिर्मया ४५:२-५.

यहोवाने बारुखला प्रेमळपणे परंतु अगदी सरळ शब्दांत सांगितले, की त्याच्या स्वार्थी आकांक्षा त्याच्या निराशेचे कारण होत्या. देवाने दिलेल्या नेमणुकीत तो आनंदी नव्हता कारण त्याचे अर्धे मन मोठमोठ्या गोष्टी मिळवण्याकडे लागले होते. तुम्हालाही कदाचित हे दिसून येईल, की आपल्याला विचलित करणाऱ्‍या गोष्टी टाळल्या आणि देवाने जे दिले त्यात तृप्त राहून यामुळे मिळणारी मनाची शांती कवटाळली तर नकारार्थी भावनांवर मात करणे आपल्याला तितके कठीण जाणार नाही.—फिलिप्पैकर ४:६, ७.

मवाब देशातील नामी नामक एका विधवेने, तिच्या पतीच्या व दोन मुलांच्या मृत्यूनंतर स्वतःला अगदीच खचून जाऊ दिले नाही. पण काही काळापर्यंत, स्वतःविषयी आणि तिच्या दोन सुनांविषयी तिच्या मनात कटू भावना आल्या खऱ्‍या. आपल्या सुनांना आपापल्या माहेरी जाण्यास सांगताना नामी म्हणाली: “तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्‍वराचा हात मजवर पडला आहे. ती त्यांस म्हणाली, मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे.”—रूथ १:१३, २०.

पण हे संकट कोसळल्यामुळे नामी यहोवापासून आणि त्याच्या लोकांपासून दूर गेली नाही. मवाबात असताना तिने ऐकले होते, की “परमेश्‍वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांस अन्‍न दिले आहे.” (रूथ १:६) यहोवाच्या लोकांच्या सहवासात राहिल्यानेच आपल्याला लाभ होणार आहे हे तिने समजून घेतले होते. नंतर, आपली सून रूथ हिच्याबरोबर ती यहुदास आली आणि त्यांचा नातेवाईक व त्यांचे वतन सोडविण्याचा हक्क असलेल्या बवाजासोबत रूथने कसे वागावे याबद्दल तिने तिला विचारशीलपणे मार्गदर्शन दिले.

तसेच आजही यहोवाचे काही एकनिष्ठ उपासक त्यांच्या वैवाहिक सोबत्याचा मृत्यू झाल्यावरही ख्रिस्ती मंडळीच्या कार्यांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवण्याद्वारे त्यांच्या मानसिक तणावाशी यशस्वीरीत्या लढा देत आहेत. नामीप्रमाणे ते देखील आध्यात्मिक कार्यांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवतात आणि देवाच्या वचनाचे दररोज वाचन करतात.

देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीचा उपयोग केल्याचे फायदे

बायबलमधील ही उदाहरणे, नकारात्मक भावनांच्या परिणामांवर मात कशी करता येईल त्याबाबतीत आपल्याला काही मार्गदर्शन पुरवतात. आसाफने यहोवाच्या निवासमंडपात जाऊन मदत मिळवली व त्याच्यावर तो धीराने विसंबून राहिला. बारुखने मिळालेल्या सल्ल्याकडे लक्ष दिले आणि भौतिक विकर्षणे टाळली. नामी यहोवाच्या लोकांमध्ये सक्रिय राहिली; खऱ्‍या देवाच्या उपासनेतील विशेषाधिकारांसाठी तिने तिच्या तरुण सुनेला अर्थात रूथला तयार केले.—१ करिंथकर ४:७; गलतीकर ५:२६; ६:४.

यहोवाने त्याच्या लोकांना (व्यक्‍तिगतरीत्या व सामूहिकरीत्या) कसे सफल केले त्यावर मनन केल्यास आपणही निराशेवर आणि इतर नकारात्मक भावनांवर मात करू शकतो. आपल्यासाठी खंडणी देण्याकरता यहोवाने जे प्रेमळ कार्य केले आहे त्यावर मनन करा. ख्रिस्ती बंधूसमाज तुम्हाला दाखवत असलेल्या खऱ्‍या प्रेमाची कदर बाळगा. लवकरच येणाऱ्‍या देवाच्या नवीन जगातील जीवनावर आपले लक्ष केंद्रित ठेवा. आणि आसाफप्रमाणे असे म्हणा: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्‍यातच माझे कल्याण आहे; मी प्रभु परमेश्‍वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्‍यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी.”—स्तोत्र ७३:२८.