आनंदी परमेश्वरासोबत आनंदी व्हा
आनंदी परमेश्वरासोबत आनंदी व्हा
“बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो [“आनंदी राहा,” NW] . . . प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील.”—२ करिंथकर १३:११.
१, २. (अ) आज बऱ्याच लोकांच्या जीवनात आनंद का नाही? (ब) आनंद म्हणजे काय आणि आपण कशाप्रकारे आनंदी राहू शकतो?
या बिकट काळात बऱ्याच लोकांच्या जीवनात आनंदी होण्यासारखे फारसे काही घडत नाही. त्यांच्यावर किंवा त्यांचे ज्यांच्यावर प्रेम आहे अशा कोणा व्यक्तीवर संकट येते तेव्हा त्यांना देखील प्राचीन काळात ईयोबाने म्हटल्याप्रमाणे, “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो,” असेच वाटत असेल. (ईयोब १४:१) खरे ख्रिस्ती लोकही या ‘कठीण दिवसांतील’ ताणतणावांपासून सुटलेले नाहीत. आणि म्हणूनच कधीकधी यहोवाचे काही विश्वासू सेवक देखील निरुत्साहित होतात यात काही आश्चर्य नाही.—२ तीमथ्य ३:१.
२ पण कठीण परीक्षाप्रसंगातून जात असताना देखील ख्रिस्ती लोक आनंदी राहू शकतात. (प्रेषितांची कृत्ये ५:४०, ४१) हे कसे शक्य आहे हे समजून घेण्याकरता आनंद म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेतले पाहिजे. आनंद या शब्दाची व्याख्या “काहीतरी चांगले मिळाल्यामुळे किंवा मिळण्याची आशा असल्यामुळे उत्पन्न होणारी भावना” अशी करण्यात आली आहे. * त्याअर्थी, आपल्याला आज कोणकोणते आशीर्वाद मिळालेले आहेत याचा जर आपण विचार केला आणि भविष्यात देवाच्या नव्या जगात आपल्याला कोणते आनंददायक आशीर्वाद मिळणार आहेत यावर मनन केले तर आपण निश्चितच आनंदी राहू शकतो.
३. प्रत्येकाजवळ आनंद मानण्याजोगी काही न काही कारणे असतातच असे कोणत्या अर्थाने आपण म्हणू शकतो?
३ प्रत्येकाजवळ असे काही न काही असते ज्यासाठी तो कृतज्ञ असू शकतो. एखाद्या कुटुंबप्रमुखाची नोकरी गेली आहे, असे समजा. अर्थात, आपल्या प्रिय माणसांच्या गरजा तृप्त करण्यास उत्सुक असल्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषणाबद्दल काळजी वाटणे साहजिक आहे. पण जर तो शारीरिकरित्या सुदृढ आणि निरोगी असेल तर तो यासाठी कृतज्ञ असू शकतो. काम मिळाल्यास, तो मेहनत करण्यास समर्थ आहे. दुसरे उदाहरण एखाद्या ख्रिस्ती स्त्रीचे घ्या, जिला एखादा रोग जडला आहे. अशा परिस्थितीतही, ती आपल्या जवळच्या माणसांबद्दल आणि कुटुंबातील सदस्यांबद्दल कृतज्ञता बाळगू शकते ज्यांच्या मदतीमुळे व आधारामुळे ती स्वाभिमानाने आणि धैर्याने त्या आजाराला तोंड देऊ शकते. आणि सर्व खरे ख्रिस्ती, मग त्यांची परिस्थिती कशीही असो, ते “आनंदी देव” यहोवाला आणि “जो आनंदी व एकच अधिपती” त्या येशू ख्रिस्ताला ओळखण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद मानू शकतात. (१ तीमथ्य १:११; ६:१५, NW) होय, यहोवा देव आणि येशू ख्रिस्त सर्वात आनंदी आहेत. यहोवाची इच्छा होती त्याप्रमाणे जरी आज पृथ्वीवरील परिस्थिती नसली तरीसुद्धा यहोवाने व येशू ख्रिस्ताने आजवर आपला आनंद टिकवून ठेवला आहे. त्यांच्या उदाहरणावरून आनंदी राहण्याबद्दल आपण बरेच काही शिकू शकतो.
त्यांनी कधीही आपला आनंद गमवला नाही
४, ५. (अ) पहिल्या मानवांनी यहोवाची आज्ञा मोडली तेव्हा यहोवाने काय केले? (ब) यहोवाने मानवजातीबद्दल कशाप्रकारे आशावादी दृष्टिकोन बाळगला?
४ एदेन बागेत, आदाम व हव्वा यांना परिपूर्ण आरोग्य आणि परिपूर्ण मानसिक क्षमता होती. त्यांना फलदायी कार्य आणि ते करण्यासाठी आदर्श वातावरण देण्यात आले होते. सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे त्यांना नियमितपणे यहोवासोबत संभाषण करणे शक्य होते. परमेश्वराचा उद्देश होता की त्यांचे भविष्य आनंदी असावे. पण हे सर्व उत्तम आशीर्वाद मिळूनही आपले पहिले मातापिता समाधानी नव्हते; त्यांनी यहोवाने मना केलेले “बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे” फळ चोरून खाल्ले. त्यांचे हे अवज्ञेचे कृत्य आज आपल्याला म्हणजे त्यांच्या वंशजांना भोगाव्या लागणाऱ्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरले.—उत्पत्ति २:१५-१७; ३:६; रोमकर ५:१२.
५ पण आदाम व हव्वा यांच्या कृतघ्नतेमुळे यहोवाने आपला आनंद गमवला का? नाही, त्याने असे घडू दिले नाही. त्याला खात्री होती की आदामाच्या वंशजांपैकी निदान काही असे असतीलच, जे त्याची सेवा करण्यास प्रेरित होतील. या गोष्टीची त्याला इतकी खात्री होती की आदाम व हव्वेला पहिले मूल होण्याआधीच यहोवाने त्यांच्या वंशजांपैकी जे आज्ञाधारक राहतील त्यांना पापापासून मुक्त करण्याचा आपला उद्देश जाहीर केला! (उत्पत्ति १:३१; ३:१५) त्यानंतरच्या शतकांत, अधिकांश लोक आदाम व हव्वेच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालले; पण अधिकांश लोकांच्या आज्ञाभंजकतेमुळे यहोवाने संपूर्ण मानवी कुटुंबाला त्यागले नाही. उलट, त्याने अशा स्त्रीपुरुषांची दखल घेतली ज्यांनी त्याचे ‘मन आनंदित केले’ व ज्यांनी त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याला संतुष्ट करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला.—नीतिसूत्रे २७:११; इब्री लोकांस ६:१०.
६, ७. कोणत्या कारणांमुळे येशू आपला आनंद टिकवून ठेवू शकला?
६ येशूबद्दल काय? त्याने त्याचा आनंद कसा टिकवून ठेवला? तो स्वर्गात एक शक्तिशाली आत्मिक प्राणी होता; पृथ्वीवरील स्त्रीपुरुषांची सर्व कार्ये त्याच्यासमोर उघड होती. त्यांची अपरिपूर्णता त्याच्यापासून लपलेली नव्हती, पण तरीसुद्धा येशूने त्यांच्यावर प्रेम केले. (नीतिसूत्रे ८:३१) नंतर, जेव्हा तो पृथ्वीवर आला आणि त्याने मानवांसोबत प्रत्यक्ष “वस्ती केली” तेव्हाही त्याचा मानवांबद्दलचा दृष्टिकोन बदलला नाही. (योहान १:१४) देवाच्या परिपूर्ण पुत्राला पापी मानव कुटुंबाबद्दल इतकी सकारात्मक मनोवृत्ती कशामुळे ठेवता आली?
७ याचे पहिले कारण म्हणजे त्याने स्वतःविषयी आणि इतरांविषयीही अवाजवी अपेक्षा बाळगल्या नाहीत. त्याला माहीत होते की जगातल्या सर्व लोकांचे तो मनपरिवर्तन घडवू शकणार नाही. (मत्तय १०:३२-३९) त्यामुळे एकाही प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्तीने राज्याच्या संदेशाचा स्वीकार केल्यास त्याला आनंद वाटत असे. तसेच, त्याच्या शिष्यांची वागणूक आणि मनोवृत्ती पाहून बऱ्याचदा त्याचा अपेक्षाभंग होत असला तरीही त्याला माहीत होते की मनातल्या मनात त्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्याची खरोखर इच्छा होती आणि या कारणामुळे तो त्यांच्यावर प्रेम करत होता. (लूक ९:४६; २२:२४, २८-३२, ६०-६२) किंबहुना, आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करताना येशूने आपल्या शिष्यांच्या तेव्हापर्यंतच्या चांगल्या आचरणाविषयी असे म्हटले की “त्यांनी तुझे वचन पाळले आहे.”—योहान १७:६.
८. आनंदी राहण्याच्या बाबतीत आपण कोणकोणत्या मार्गांनी यहोवाचे आणि येशूचे अनुकरण करू शकतो?
८ यहोवा देवाने आणि येशू ख्रिस्ताने याबाबतीत आपल्यापुढे मांडलेल्या आदर्शाविषयी मनन केल्याने आपल्या सर्वांना फायदा होईल यात शंका नाही. आपण अपेक्षा केल्याप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही तेव्हा अनावश्यक काळजी न करण्याच्या बाबतीत आपल्याला यहोवाचे आणखी जवळून अनुकरण करता येईल का? किंवा आपल्या सध्याच्या परिस्थितीविषयी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून तसेच स्वतःविषयी आणि इतरांविषयी कधीही अवाजवी अपेक्षा न बाळगून आपण येशूच्या आदर्शाचे आणखी चांगल्याप्रकारे अनुकरण करू शकतो का? यांपैकी काही तत्त्वांचा क्षेत्र सेवाकार्यात कशाप्रकारे अवलंब करता येईल याचा आता आपण विचार करूया कारण जगातल्या कोणत्याही भागात आवेशी ख्रिस्तीजन या कार्याला खूप महत्त्व देतात.
सेवाकार्याविषयी आशावादी दृष्टिकोन बाळगा
९. यिर्मयाचे मन कशाप्रकारे पुन्हा आनंदित झाले आणि त्याच्या उदाहरणामुळे आपल्याला कशाप्रकारे मदत होते?
९ आपण यहोवाची सेवा आनंदाने करावी अशी त्याची इच्छा आहे. सेवेतील आनंद, आपल्याला मिळणाऱ्या परिणामांवर अवलंबून असू नये. (लूक १०:१७, २०) यिर्मया संदेष्ट्याने वर्षानुवर्षे अशा क्षेत्रात प्रचार केला जेथे त्याला त्याच्या कार्याचे फळ मिळाले नाही. त्याने जेव्हा लोकांच्या प्रतिकूल प्रतिसादावरच आपले लक्ष केंद्रित केले तेव्हा त्याचा आनंद नाहीसा झाला. (यिर्मया २०:८) पण तो लोकांना सांगत असलेला संदेश किती सुंदर होता यावर जेव्हा त्याने मनन केले तेव्हा मात्र त्याचे मन पुन्हा आनंदित झाले. यिर्मयाने यहोवाला म्हटले: “मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो.” (यिर्मया १५:१६) होय, देवाचे वचन लोकांना सांगण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे या जाणीवेने यिर्मया आनंदित झाला. हेच आपल्याबाबतीतही खरे ठरू शकते.
१०. आपले सध्याचे क्षेत्र फलदायी नसले तरीही आपण सेवाकार्यातील आपला आनंद कशाप्रकारे टिकवून ठेवू शकतो?
१० अधिकांश लोकांनी सुवार्तेकडे लक्ष दिले नाही तरीसुद्धा क्षेत्र सेवेतील आपला आनंद आपण गमवण्याचे कारण नाही. आपली सेवा करण्यास काहीजण निश्चित प्रेरित होतील याची यहोवाला कशाप्रकारे पूर्ण खात्री होती हे आठवा. यहोवाप्रमाणेच आपणही ही आशा कधीही सोडू नये की निदान काहीजण तरी यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या वादाबद्दल समजून घेतील आणि राज्य संदेशाचा स्वीकार करतील. लोकांची परिस्थिती बदलत राहते हे आपण कधीही विसरू नये. कधीकधी अनपेक्षितपणे काहीतरी संकट कोसळते तेव्हा अगदी बेपर्वा व्यक्ती देखील जीवनाविषयी गांभिर्याने विचार करू लागते. अशा एखाद्या व्यक्तीला तिच्या ‘आध्यात्मिक गरजेची जाणीव’ होईल तेव्हा तिला मदत करण्यासाठी तुम्ही असाल का? (मत्तय ५:३, NW) कोण जाणे, कदाचित अगदी पुढच्या वेळेसच तुम्ही तुमच्या क्षेत्रात जाल तेव्हा तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटेल जी सुवार्ता ऐकून घेण्यास इच्छुक असेल!
११, १२. एका गावात काय घडले आणि यावरून आपण काय शिकू शकतो?
११ क्षेत्रात राहणारे लोकही बदलत राहतात. या संदर्भात एक उदाहरण विचारात घ्या. एका लहानशा गावात काही जोडपी आपल्या लहान मुलांसोबत राहात होती. या लोकांचे आपसांत घनिष्ट संबंध होते. यहोवाचे साक्षीदार त्यांच्याकडे जायचे तेव्हा प्रत्येक दारावर एकच उत्तर त्यांना मिळायचे, “आम्हाला ऐकण्याची इच्छा नाही!” क्वचित कोणी राज्य संदेश ऐकून त्याबद्दल आस्था दाखवली तरी शेजारचे हे लोक लगेच त्या व्यक्तीला साक्षीदारांशी काही संबंध न ठेवण्याचा सल्ला द्यायचे. साहजिकच या क्षेत्रात प्रचार करणे एक आव्हान होते. पण साक्षीदार निराश झाले नाहीत; ते प्रचार करतच राहिले. परिणाम काय झाला?
१२ कालांतराने या जोडप्यांची मुले मोठी झाली आणि त्यांनी आपापले संसार थाटले. त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांना जीवनात खरा आनंद मिळू शकला नाही याची त्यांना जाणीव झाली तेव्हा हे तरुण सत्याचा शोध घेऊ लागले. साक्षीदारांनी सांगितलेल्या सुवार्तेचा त्यांनी स्वीकार केला तेव्हा त्यांना सत्य सापडले. आणि अशारितीने कित्येक वर्षांनंतर तेथील लहानशी मंडळी वाढू लागली. निराश न होता प्रचार करत राहिलेल्या त्या राज्य प्रचारकांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! आपणही कोणत्याच परिस्थितीत निराश न होता राज्याचा अद्वितीय संदेश इतरांना सांगत राहिल्यास हाच आनंद आपल्यालाही अनुभवता येईल!
विश्वासू बांधव तुमचे साहाय्य करतील
१३. आपण निरुत्साहित होतो तेव्हा कोणाची मदत घेऊ शकतो?
१३ जीवनातले ताणतणाव वाढतात किंवा एखादा आघातजन्य अनुभव तुम्हाला येतो तेव्हा सांत्वनाकरता तुम्ही कोणाकडे जाऊ शकता? यहोवाचे लाखो समर्पित सेवक सर्वात आधी यहोवाला प्रार्थना करून त्याच्याकडे सांत्वनाची विनंती करतात; यानंतर ते आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींचे साहाय्य घेतात. पृथ्वीवर असताना, येशूला आपल्या शिष्यांच्या आधाराची कदर होती. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, त्याने त्यांना असे म्हटले की “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा.” (लूक २२:२८) अर्थात ते शिष्य अपरिपूर्ण होते पण त्यांची निष्ठा पाहून देवाच्या पुत्राला सांत्वन मिळाले. आपणही आपल्या सहविश्वासू बांधवांच्या साहाय्याने बलवान होऊ शकतो.
१४, १५. एका जोडप्याच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना या दुःखद प्रसंगाला तोंड देण्यास कशामुळे मदत मिळाली आणि त्यांच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?
१४ कठीण परिस्थितीत बांधव किती साहाय्य देतात याचा एका जोडप्याला अनुभव आला. मिशेल व डाएन नावाच्या या जोडप्याला जोनाथान नावाचा २० वर्षांचा मुलगा होता. जोनाथान एक उत्साही ख्रिस्ती होता, तो खूप प्रगती करेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे आढळले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावली पण जोनाथानची अवस्था बिघडतच गेली आणि शेवटी एक दिवशी संध्याकाळ होत आली तेव्हा त्याने प्राण सोडला. मिशेल आणि डाएन यांच्या दुःखाची आपण केवळ कल्पना करू शकतो. त्या दिवशी मंडळीची सेवा सभा होती. सभा जवळजवळ संपली असेल याची मिशेल व डाएन यांना कल्पना होती. पण तरीही त्यांना सांत्वनाची गरज होती आणि म्हणून त्यांच्यासोबत असलेल्या मंडळीच्या वडिलांना त्यांनी राज्य सभागृहात त्यांना नेण्याची विनंती केली. मंडळीला जोनाथानच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली जात होती तेव्हाच ते तेथे पोचले. सभा संपल्यावर मिशेल आणि डाएन यांना आपले दुःख अनावर झाले. ते रडू लागले, पण सर्व बंधूभगिनी त्यांच्या भोवती होते. ते त्यांना जवळ घेऊन दिलासा व सांत्वन देऊ लागले. डाएन सांगते: “आम्ही सभागृहात आलो तेव्हा सर्व काही संपले आहे असे आम्हाला वाटत होते, पण बांधवांनी आमचे खूप सांत्वन केले, त्यांना भेटून आम्हाला खूप दिलासा मिळाला! अर्थात ते आमचे दुःख दूर करू शकत नव्हते पण त्या भयंकर दुःखाला तोंड देण्यास त्यांनी आम्हाला मदत केली!”—रोमकर १:११, १२; १ करिंथकर १२:२१-२६.
१५ मिशेल व डाएन यांच्यावर आलेल्या या संकटामुळे ते बांधवांच्या आणखी जवळ आले. तसेच ते एकमेकांच्याही खूप जवळ आले. मिशेल म्हणतो: “मी माझ्या प्रिय पत्नीवर अधिकच प्रेम करू लागलो आहे. नाउमेदीचे क्षण येतात तेव्हा आम्ही बायबलच्या सत्याविषयी आणि यहोवा आमची कशी काळजी घेतो याविषयी एकमेकांशी बोलतो.” डाएन म्हणते: “आता राज्याची आशा आमच्याकरता अधिकच अर्थपूर्ण बनली आहे.”
१६. आपल्या गरजा काय आहेत हे बांधवांना स्वतःहून सांगणे का महत्त्वाचे आहे?
१६ होय, जीवनात बिकट प्रसंग येतात तेव्हा आपले ख्रिस्ती बंधू व भगिनी “सांत्वन” देऊन आपला आनंद टिकवून ठेवण्यास आपली मदत करू शकतात. (कलस्सैकर ४:११) अर्थात, आपल्या मनातल्या भावना ते आपोआप ओळखू शकत नाहीत. म्हणून, आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा आपण त्यांना असे सांगितले पाहिजे. आणि ते आपल्याला जे काही सांत्वन देतात ते यहोवाकडूनच मिळाले आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.—नीतिसूत्रे १२:२५; १७:१७.
आपल्या मंडळीकडे पाहा
१७. एका एकट्या मातेला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि तिच्यासारख्या परिस्थितीत असलेल्यांविषयी आपण कसा दृष्टिकोन बाळगतो?
१७ सहविश्वासू बांधवांकडे पाहून तुम्ही त्यांच्याविषयी जितका विचार कराल तितकेच तुम्हाला त्यांच्याविषयी अधिक प्रेम वाटेल आणि त्यांच्या सहवासात तुमचा आनंदही वाढत जाईल. तुमच्या मंडळीकडेच पाहा. तुम्हाला कोणकोण दिसतात? जोडीदाराच्या मदतीशिवाय आपल्या मुलांचे सत्याच्या मार्गात संगोपन करण्यास धडपडणारी एकटी माता तुम्हाला दिसते का? तिच्या उत्तम उदाहरणाविषयी तुम्ही विचार केला का? तिला कशाप्रकारच्या समस्या येत असतील याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. जेनीन नावाच्या एका एकट्या मातेने काही समस्यांचा उल्लेख केला: एकलकोंडेपणा, नोकरीच्या ठिकाणी लगट करू पाहणाऱ्या पुरुषांचे प्रस्ताव, आर्थिक चणचण. पण या सर्वांपेक्षा मुलांच्या भावात्मक गरजा पूर्ण करणे अतिशय कठीण जाते कारण प्रत्येक मूल वेगळे असते. जेनीन आणखी एक समस्या सांगते: “पतीच्या अनुपस्थितीत मुलावर घरची जबाबदारी टाकण्याचा मोह होतो, आणि असे न करणे हे एक कठीण आव्हान आहे. मला एक मुलगी आहे आणि सहसा मी विसरून जाते की तिच्याजवळ मन मोकळे करून माझ्या समस्यांचे ओझे तिच्या बालमनावर टाकणे योग्य नाही.” हजारो देवभीरू एकट्या पालकांप्रमाणेच जेनीन पूर्णवेळची नोकरी करून घरच्या जबाबदाऱ्याही पूर्ण करते. ती आपल्या मुलांसोबत बायबल अभ्यास करते व त्यांना सेवाकार्याचे प्रशिक्षण देते आणि मंडळीच्या सभांना त्यांना घेऊन येते. (इफिसकर ६:४) या कुटुंबाचे सदस्य विश्वासात अढळ राहण्यासाठी जी काही धडपड करतात ती पाहून यहोवाला किती आनंद होत असेल याची कल्पना करा! असे बंधूभगिनी आपल्यामध्ये आहेत हे पाहून आपल्यालाही आनंद होत नाही का? निश्चितच होतो.
१८, १९. मंडळीच्या सदस्यांविषयी आपण आपली कदर कशी वाढवू शकतो हे उदाहरण देऊन सांगा.
१८ पुन्हा एकदा तुमच्या मंडळीकडे पाहा. तुम्हाला विश्वासू विधवा भगिनी किंवा विधूर बांधव दिसतील जे कधीही सभांना येण्याचे ‘सोडत’ नाहीत. (लूक २:३७) कधीकधी त्यांना एकटेपणा जाणवत असेल का? साहजिकच. आपल्या जोडीदाराची कमी त्यांना सारखी जाणवत असेल! पण तरीही ते यहोवाच्या सेवेत व्यग्र राहतात आणि इतरांविषयी काळजी व्यक्त करतात. त्यांच्या या खंबीर, सकारात्मक मनोवृत्तीमुळे मंडळीच्या आनंदात भर पडते! ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून पूर्ण वेळेच्या सेवेत असलेले एक ख्रिस्ती बांधव असे म्हणतात: “कित्येक परीक्षांना तोंड देऊनही आजपर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेल्या वयस्क बंधू-भगिनींना पाहून मला सर्वात जास्त आनंद होतो.” होय, आपल्यामध्ये असलेल्या वयस्क ख्रिस्ती बांधवांना पाहून तरुणांना खूप उत्साह मिळतो.
१९ अलीकडेच मंडळीच्या सभांना येऊ लागलेल्या नवीन लोकांविषयी काय? सभांमध्ये उत्तरे देऊन ते जेव्हा आपला विश्वास प्रकट करतात तेव्हा आपल्याला आध्यात्मिक उत्तेजन मिळत नाही का? त्यांनी बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत किती प्रगती केली याविषयी विचार करा. यहोवाला त्यांच्याविषयी खरोखर संतोष वाटत असेल. आपल्यालाही वाटतो का? आपण त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांची प्रशंसा करतो का?
२०. मंडळीतील प्रत्येक सदस्याची मंडळीत महत्त्वाची भूमिका आहे असे का म्हणता येते?
२० तुम्ही विवाहित, अविवाहित किंवा एकटे पालक आहात का? तुम्हाला पिता किंवा माता नाही का किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराला गमवले आहे का? तुम्ही मंडळीसोबत बऱ्याच वर्षांपासून सेवा केली आहे का किंवा अलीकडेच करू लागला आहात का? यांपैकी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असला तरीसुद्धा याची खात्री बाळगा की तुमचे उदाहरण आम्हा सर्वांना प्रोत्साहन देणारे आहे. तुम्ही सर्वांसोबत राज्य गीत गाता, किंवा एखादे उत्तर देता किंवा ईश्वरशासित सेवा प्रशालेत एखादा भाग सादर करता तेव्हा आम्हाला आनंद वाटतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे यहोवाचे मन आनंदित होते.
२१. आपल्याजवळ काय करण्याची अनेक कारणे आहेत पण कोणते प्रश्न आपण विचारू शकतो?
२१ होय, या बिकट काळातही आपण आपल्या आनंदी देवाची आनंदाने उपासना करू शकतो. पौलाने आपल्याला असे म्हणून प्रोत्साहन दिले की ‘बंधूजनहो, आनंदी राहा, प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील.’ आणि खरोखर आपल्याजवळ आनंदी राहण्याची असंख्य कारणे आहेत. (२ करिंथकर १३:११) पण समजा आपल्यावर एखादी नैसर्गिक विपत्ती आली, आपल्याला छळ सोसावा लागला किंवा कठीण आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले तर? अशा परिस्थितीतही आनंदी राहणे शक्य आहे का? पुढील लेखातील माहितीचा विचार करताना तुम्ही स्वतःच निष्कर्ष काढा.
[तळटीप]
^ यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित इन्साईट, खंड २ रा, पृष्ठ ११९ पाहा.
तुम्ही उत्तर देऊ शकता का?
• आनंद या शब्दाचे कसे वर्णन करण्यात आले आहे?
• सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने आपण कशाप्रकारे आनंदी राहू शकतो?
• आपल्या मंडळीच्या क्षेत्राविषयी आशावादी मनोवृत्ती बाळगण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळू शकते?
• तुमच्या मंडळीतल्या बंधू व भगिनींबद्दल तुम्ही कोणत्या मार्गांनी कदर व्यक्त करता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्रे]
आपल्या क्षेत्रातील लोक बदलू शकतात
[१२ पानांवरील चित्र]
तुमच्या मंडळीतल्या बांधवांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते?