तुम्ही “वेळेचा सदुपयोग” करीत आहात का?
तुम्ही “वेळेचा सदुपयोग” करीत आहात का?
प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील इफिसमधील ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिसकर ५:१५, १६) प्रेषित पौलाला हा सल्ला ख्रिश्चनांना का द्यावा लागला? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आधी आपल्याला त्या प्राचीन शहरात ख्रिश्चनांना तोंड द्याव्या लागणाऱ्या परिस्थितीची माहिती घ्यावी लागेल.
इफिस हे एक धनसंपन्न शहर होते. अनैतिकता, गुन्हेगारी आणि विविध प्रकारच्या दुरात्मिक कार्यांसाठी ते कुप्रसिद्ध होते. शिवाय, समयाविषयी त्या काळी असलेल्या तत्त्वज्ञानी विश्वासांबद्दलही ख्रिश्चनांना सावध राहायचे होते. इफिसमधील गैरख्रिस्ती ग्रीक लोक, समय एकाच दिशेने पुढे जातो असा विश्वास करत नव्हते. ग्रीक तत्त्वज्ञानाने त्यांना अशी शिकवण दिली होती, की जीवनाचे अखंड चक्र चालू असते. त्यामुळे एखाद्याने जीवनाच्या एका चक्रात आपला सर्व वेळ वाया घालवला असेल तर तो त्याला दुसऱ्या चक्रात पुन्हा मिळवता येतो असा त्यांचा विश्वास होता. अशा प्रकारच्या विचारसरणीचा इफिसमधील ख्रिश्चनांवर परिणाम झाला असावा. यहोवाच्या वेळापत्रकाविषयी किंवा ईश्वरीय न्यायदंड बजावण्याच्या त्याच्या समयाविषयी त्यांची देखील बेपर्वा मनोवृत्ती झाली असावी. म्हणूनच “वेळेचा सदुपयोग” करा हा पौलाने त्यांना दिलेला सल्ला अतिशय उचित होता.
पौल देखील सर्वसाधारण वेळेविषयी बोलत नव्हता. त्याने वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, एक नियुक्त वेळ, एका खास उद्देशास्तव असलेली ठराविक वेळ असा होतो. पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना, देवाची कृपा संपादन करण्याचा जो समय त्यांना मिळाला त्या समयाचा सदुपयोग करण्याचा सल्ला दिला. कारण अंत आल्यावर ईश्वरी दया व तारणाची संधी पुन्हा मिळणार नव्हती.—रोमकर १३:११-१३; १ थेस्सलनीकाकर ५:६-११.
आपणही आज अशा उचित समयात जगत आहोत. जगाकडून मिळणाऱ्या क्षणिक सुखामागे धावून देवाची कृपा प्राप्त करण्याचा पुन्हा कधी न मिळणारा हा वेळ दवडण्याऐवजी ख्रिश्चनांनी सुज्ञपणे ‘सुभक्तीच्या कार्यांत’ त्यांच्याजवळ असलेल्या वेळेचा सदुपयोग करावा. आणि अशाप्रकारे आपला निर्माणकर्ता यहोवा देव याच्याशी आपला नातेसंबंध आणखी मजबूत करावा.—२ पेत्र ३:११; स्तोत्र ७३:२८; फिलिप्पैकर १:१०.