व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या नावावरील कलंक दूर होतो

देवाच्या नावावरील कलंक दूर होतो

राज्य घोषकांचा वृत्तान्त

देवाच्या नावावरील कलंक दूर होतो

देवाचे वचन बायबल म्हणते, की “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) यास्तव, खरे ख्रिस्ती देवाच्या नावावर कलंक येऊ नये म्हणून आपले आचरण चांगले ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात.

झांबियात दूरवर सेनांगा नावाचे एक गाव आहे. तेथे एकदा एका शाळा शिक्षकांच्या घरचा रेडिओ चोरीला गेला. यहोवाचे साक्षीदार त्या भागात प्रचारकार्य करत असल्यामुळे या शिक्षकांनी त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला. त्यांनी पोलिस चौकीत जाऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली की साक्षीदारांनीच आपला रेडिओ चोरला. साक्षीदार त्यांच्या घरी आले होते याचा पुरावा म्हणून त्यांनी एक हस्तपत्रिका देखील दाखवली जी त्यांना स्वतःच्या घरात सापडली होती. परंतु पोलिस काही त्यांच्यावर विश्‍वास ठेवायला तयार नव्हते. त्यांनी त्यांना घरी जाऊन पुन्हा एकदा सर्व काही तपासून पाहायला सांगितले.

चोरीचा आळ घेतलेल्या या साक्षीदारांना मंडळीतल्या वडिलांनी शाळा शिक्षकांबरोबर जाऊन या विषयी बोलण्याचे उत्तेजन दिले. त्याप्रमाणे बांधव त्यांच्याकडे गेले. साक्षीदारांनी त्यांच्याबरोबर याविषयी चर्चा केली व म्हटले की त्यांना यहोवाच्या नावावर आलेला हा कलंक दूर करायचा होता. चर्चेदरम्यान या बांधवांनी त्या शाळा शिक्षकांना एका तरुण मनुष्याविषयी सांगितले. शिक्षकाच्या घरी साक्षीदार आले असताना हा तरुण तेथे होता. साक्षीदारांनी त्याला एक हस्तपत्रिका देखील दिल्याचे सांगितले. साक्षीदारांनी त्या तरुण मनुष्याचे वर्णन सांगितल्यावर शिक्षकांना त्याची ओळख पटली. तो तर शिक्षकांच्याच चर्चचा सदस्य होता! मग हे शिक्षक त्या तरुणाशी बोलले, पण त्या तरुणाने चोरी केल्याचा साफ इंकार केला. शिक्षकांनी याविषयी त्या तरुणाच्या आईवडिलांशी चर्चा केली व ते आपल्या घरी निघून गेले. एका तासाभरातच, त्या तरुण मनुष्याची आई चोरलेला रेडिओ घेऊन शिक्षकांच्या घरी पोहंचली.

शिक्षकांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. दिलगिरी व्यक्‍त करण्यासाठी ते वडील वर्गाकडे गेले आणि आपण लावलेल्या खोट्या आरोपांची त्यांनी माफी मागितली. वडिलांनी त्यांना माफ केले पण त्यांना विनंती केली की त्यांनी झालेल्या गोष्टीची जाहीर घोषणा करावी जेणेकरून साक्षीदार निर्दोष आहेत हे सर्वांना कळून येईल. तेव्हा, शाळेमध्ये याविषयी एक घोषणा करण्यात आली. अशाप्रकारे यहोवाच्या नावावरील कलंक दूर झाला. यहोवाच्या साक्षीदारांना त्या भागात आपले प्रचार कार्य चालू ठेवता आले आहे!

[१९ पानांवरील नकाशे/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

आफ्रिका

झांबिया

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.