व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दोन स्त्रियांवर वैधव्याचा परिणाम

दोन स्त्रियांवर वैधव्याचा परिणाम

दोन स्त्रियांवर वैधव्याचा रिणाम

सॅन्ड्रा. ऑस्ट्रेलियात राहणारी एक विधवा स्त्री. काही वर्षांपूर्वी सॅन्ड्राच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा तिला या घटनेचा जबरदस्त धक्का बसला. “आपला साथीदार आणि सर्वात जिवाभावाचा मित्र गेलाय ही जाणीव झाली तेव्हा मी ते दुःख पचवू शकले नाही. हॉस्पिटलमधून मी घरी कशी परत आले किंवा नंतर काय केले, मला काहीही आठवत नाही. पुढच्या काही आठवड्यांत माझ्या भितीचं रूपांतर निरंतर शारीरिक वेदनेत झालं.”

सॅन्ड्रापेक्षा वयाने थोडी मोठी असलेली तिची एक मैत्रीण आहे. तिचं नाव ईलेन. सहा वर्षांपूर्वी तिलाही वैधव्य आले. ईलेनचे पती डेव्हिड यांचा मृत्यू होण्याआधी सहा महिने तिने त्यांची रात्रंदिवस सेवा केली. त्यांना कॅन्सर झाला होता. शेवटी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ईलेनला ते दुःख इतके असह्‍य झाले की काहीकाळ तिला अंधत्व आले. दोन वर्षांनंतर एकदा ती सार्वजनिक ठिकाणी खाली पडून बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी तिला तपासले तेव्हा कोणत्याही आजाराचे चिन्ह आढळले नाही. पण त्यांच्या लक्षात आले की ईलेनने आपले दुःख मनातच कोंडून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी तिला घरी जाऊन मनभरून रडण्याचा सल्ला दिला. “दुःखातून सावरायला मला बराच अवधी लागला.” एकाकीपणा सहन होत नसे तेव्हा, “कधीकधी मी बेडरूममध्ये जाऊन डेव्हिडच्या कपड्यांत डोके लपवून बसायचे” असे ईलेन म्हणते.

होय, प्रिय सोबत्याच्या मृत्यूमुळे कोणावर कसा परिणाम होईल हे सांगता येत नाही. वैधव्य म्हणजे केवळ पतीविरहीत जीवन नव्हे. उदाहरणार्थ, सॅन्ड्रा काही काळ आपली ओळख गमवून बसली. अलीकडेच आपल्या पतीला गमवलेल्या कित्येक विधवांप्रमाणे तिलाही अतिशय कमजोर आणि निराधार वाटू लागले. सॅन्ड्रा सांगते: “कोणतेही निर्णय सहसा माझे पतीच घ्यायचे आणि आता अचानक ते सर्व निर्णय मला एकटीला घ्यायचे होते. मला रात्री नीट झोप लागेनाशी झाली. सतत थकल्यासारखं वाटायचं. काय करावं हेच सुचत नसे.”

सॅन्ड्रा आणि ईलेनची व्यथा सबंध जगात दररोज कित्येक स्त्रियांना सहन करावी लागते. आजारपण, दुर्घटना, युद्ध, जातिसंहार, आणि हिंसाचार यांसारख्या कारणांमुळे अधिकाधिक स्त्रियांना वैधव्य येऊ लागले आहे. * यांपैकी बऱ्‍याच स्त्रियांना काय करावे हे समजत नाही आणि त्या निमूटपणे आपले दुःख सहन करत राहतात. वैधव्य आलेल्या स्त्रीला तिच्या दुःखातून सावरायला जवळचे लोक आणि नातेवाईक काय करू शकतात? पुढील लेखात या संदर्भात काही सल्ला दिला आहे जो कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल.

[तळटीप]

^ इतर काही स्त्रिया विधवा नसल्या तरीही त्यांच्या पतीने त्यांना सोडून दिल्यामुळे त्याच स्थितीत आहेत. आपल्या पतीपासून विभक्‍त झालेल्या व घटस्फोटित स्त्रियांनाही बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागते; तेव्हा पुढच्या लेखातील बरीच तत्त्वे त्यांना देखील उपयोगी पडू शकतात.