व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भूतविद्येने आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होऊ शकतात का?

भूतविद्येने आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होऊ शकतात का?

भूतविद्येने आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होऊ शकतात का?

आपल्या सर्वांच्या भौतिक गरजांप्रमाणेच आध्यात्मिक गरजा देखील आहेत. म्हणूनच तर, जीवनाचा काय उद्देश आहे? मानवाच्या वाट्याला इतके दुःख का आहे? आणि मेल्यानंतर आपले काय होते? यांसारखे प्रश्‍न पुष्कळांच्या मनात येत असतात. या आणि यांसारख्या इतर अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यासाठी अनेक प्रांजळ लोक अशा काही सभांमध्ये जातात जेथे मृतांशी संपर्क साधण्याकरता दुरात्म्यांशी संभाषण केले जाते. या लोकांना असा विश्‍वास असतो, की मेलेले लोक आत्मिक व्यक्‍ती बनले आहेत. या सर्व प्रकाराला भूतविद्या असे म्हणतात.

भूतविद्या करणारे संपूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळतात. ते त्यांच्या सभांना व चर्चला जातात. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये अंदाजे ४०,००,००० लोक, इपोलेट लिओन डेनीझार रवे या १९ व्या शतकातील फ्रेंच शिक्षक व तत्त्वज्ञान्याच्या शिकवणुकींचे पालन करतात. इपोलेटने ॲलन कारडेक हे नाव धारण करून भूतविद्येवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. कारडेकला १८५४ साली सर्वात पहिल्यांदा भूतविद्येविषयी कुतूहल निर्माण झाले होते. नंतर त्याने अनेक ठिकाणी दुरात्म्यांना प्रश्‍न विचारले आणि त्यांनी दिलेली उत्तरे त्याने १८५७ साली छापण्यात आलेल्या द बुक ऑफ स्पिरिट्‌स या पुस्तकात लिहून ठेवली. द मिडियम्स बुक आणि द गॉस्पल अकॉर्डींग टू स्पिरिटिझम ही दोन पुस्तकेही त्याने लिहिली.

भूतविद्येचा संबंध जंतरमंतर, चेटूक, जादू किंवा सैतानवाद यांसारख्या धार्मिक प्रथांशी लावण्यात येतो. परंतु, ॲलन कारडेकच्या अनुयायांचे म्हणणे आहे, की त्यांचे विश्‍वास यापासून वेगळे आहेत. त्यांच्या प्रकाशनांमध्ये सर्रासपणे बायबलचा उल्लेख आढळतो व येशू “सर्व मानवजातीचा मार्गदर्शक व आदर्श” आहे असे ते मानतात. येशूच्या शिकवणी “ईश्‍वरी नियमांचे सर्वात शुद्ध प्रकटीकरण” आहेत असे ते म्हणतात. ॲलन कारडेकचा असा विश्‍वास होता, की भूतविद्येसंबंधीची लिखाणे ही मानवजातीसाठी देवाच्या नियमशास्त्राचे तिसरे प्रकटीकरण आहेत. पहिले आणि दुसरे प्रकटीकरण म्हणजे मोशेच्या आणि येशूच्या शिकवणी.

अनेक लोक भूतविद्येकडे आकर्षित होतात. कारण यात शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम दाखवण्यावर आणि दानधर्म करण्यावर जास्त जोर दिला जातो. त्यांतील एक विश्‍वास असा आहे: “दानधर्म केल्याशिवाय तारण मिळणे अशक्य आहे.” त्यामुळे भूतविद्या आचरणारे सामाजिक कार्यात जसे की, इस्पितळे, शाळा आणि इतर समाजोपयोगी संस्था बनवण्यात अगदी सक्रिय आहेत. त्यांचे हे प्रयत्न साहजिकच प्रशंसनीय आहेत. परंतु हे लोक त्यांच्या विश्‍वासांची तुलना बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या येशूच्या शिकवणींशी कशी करतात? आपण दोन उदाहरणांचा विचार करू या: मृतांसाठी आशा आणि मानवाला होत असलेल्या दुःखामागचे कारण.

मृतांसाठी कोणती आशा आहे?

भूतविद्या आचरणारे अनेक जण पुनर्जन्मावर विश्‍वास करतात. त्यांच्या एका प्रकाशनात असे म्हटले आहे: “पुनर्जन्माचा सिद्धान्तच ईश्‍वरी न्यायाच्या कल्पनेचे उत्तर आहे; हा एकच असा सिद्धान्त आहे जो भविष्याचे स्पष्टीकरण देतो आणि आपल्या आशा भक्कम करतो.” भूतविद्या करणाऱ्‍यांचे असे म्हणणे आहे, की मनुष्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या शरीरातून आत्मा बाहेर निघून जातो—एक फूलपाखरू जसे त्याच्या कोशातून बाहेर पडते तसे मृत्यूसमयी आत्मा शरीरातून बाहेर पडतो. आणि मग हे आत्मे, गत जीवनात केलेल्या पापांचे क्षालन होण्याकरता पुन्हा मनुष्यरूपात जन्म घेतात. पण या पुनर्जन्म घेतलेल्यांना आपण कोणते पाप केले होते अथवा कोणत्या चुका केल्या होत्या ते मात्र आठवत नाही. कारण, “गत जीवनावर पडदा टाकणे देवाला उचित वाटते,” असे द गॉस्पल अकॉर्डिंग टू स्पिरिटिझम या पुस्तकात म्हटले आहे.

“पुनर्जन्माची शिकवण नाकारणे म्हणजे ख्रिस्ताला नाकारण्यासारखेच आहे,” असे ॲलन कारडेकने लिहिले. परंतु, येशूने तर केव्हाच “पुनर्जन्म” हा शब्द उच्चारला नाही किंवा ही शिकवण दिली नाही. (पृष्ठ २२ वरील “बायबल पुनर्जन्माची शिकवण देते का?” ही पेटी पाहा.) त्याऐवजी येशूने मृतांच्या पुनरुत्थानाची, म्हणजे मृतांना पुन्हा जिवंत केले जाईल अशी शिकवण दिली. आणि पृथ्वीवर सेवा करत असताना त्याने तीन मृत लोकांना पुन्हा जिवंत देखील केले. एक होता, नाईन गावातील एका विधवेचा पुत्र; दुसरी, सभास्थानातील एका सभापतीची मुलगी; आणि तिसरा, येशूचाच जवळचा मित्र लाजर. (मार्क ५:२२-२४, ३५-४३; लूक ७:११-१५; योहान ११:१-४४) या तीन विलक्षण घटनांतील एका घटनेचा आपण विचार करू या व “पुनरुत्थान” याद्वारे येशूला काय म्हणायचे होते ते पाहू या.

लाजरचे पुनरुत्थान

येशूने ऐकले की त्याचा मित्र लाजर आजारी होता. दोन दिवसांनंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” शिष्यांना येशूच्या बोलण्यामागचा अर्थ कळला नाही. म्हणून तो जरा आणखी स्पष्ट बोलला: “लाजर मेला आहे.” येशू जेव्हा लाजरच्या कबरेजवळ आला तेव्हा लाजरला मरून चार दिवस झाले होते. तरीसुद्धा येशूने कबरेच्या द्वारापाशी ठेवलेला दगड बाजूला सारण्यास सांगितले. मग त्याने मोठ्याने हाक मारली: “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा, काहीतरी अचंबित करणारे घडले. “जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले: ‘ह्‍याला मोकळे करून जाऊ द्या.’”—योहान ११:५, ६, ११-१४, ४३, ४४.

हा लाजरचा पुनर्जन्म नव्हता. येशूने म्हटले, की मृत लाजर झोपला होता; त्याला शुद्ध नव्हती. बायबलच्या शब्दांत सांगायचे तर “त्याच्या योजनांचा शेवट” झाला होता. त्याला “तर काहीच कळत” नव्हते. (स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५) पुनरुत्थित लाजर हा पुनर्जन्म प्राप्त झालेला आत्मा असलेला वेगळा मनुष्य नव्हता. त्याचे व्यक्‍तिमत्त्व, वय त्याच्या आठवणी त्याच होत्या. मृत्यूमुळे तो त्याची नेहमीची कार्ये अर्ध्यातच सोडून गेला होता. पण पुन्हा जिवंत झाल्यानंतर, त्याच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या त्याच्या प्रिय जनांबरोबर तो आपल्या घरी गेला.—योहान १२:१, २.

कालांतराने, लाजरचा पुन्हा मृत्यू झाला. तेव्हा, त्याच्या पुनरुत्थानामुळे कोणता उद्देश साध्य झाला? येशूने केलेल्या सर्व पुनरुत्थानांमुळे, देवाच्या अभिवचनांवर आपला विश्‍वास आणखी पक्का होतो, की देव त्याच्या नियुक्‍त समयी त्याच्या सेवकांना पुन्हा जिवंत करील. येशूने केलेले हे चमत्कार “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्‍वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल,” या त्याच्या शब्दांवर आपला आणखीनच भरवसा वाढवतात.—योहान ११:२५.

भवितव्यात होणाऱ्‍या पुनरुत्थानाविषयी येशूने म्हटले: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) लाजरच्या बाबतीत जे घडले तेच मृत लोकांच्या बाबतीत घडणार आहे. पुनरुत्थान म्हणजे शुद्धीवर असलेल्या आत्म्यांचे आणि सडून मातीत एकजीव झालेल्या किंवा इतर जिवंत प्राण्यांचा भाग बनलेल्या पुनरुत्थित शरीरांचे पुनर्मिलन नव्हे. अगाध बुद्धी व असीम सामर्थ्य असलेल्या स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याकडे मृतांचे पुनरुत्थान करण्याची क्षमता आहे.

तेव्हा, येशू ख्रिस्ताने दिलेल्या पुनरुत्थानाच्या शिकवणीवरून, प्रत्येक मानवाबद्दल देवाला प्रेम आहे हे आपल्याला कळून येत नाही का? आता आपण सुरवातीला उल्लेखलेल्या दुसऱ्‍या प्रश्‍नाचे उत्तर पाहू या.

मनुष्याच्या वाट्याला आलेल्या दुःखामागचे कारण

मानवाचे बहुतेक दुःख हे, निर्बुद्ध, अनुभव नसलेल्या व दुष्ट लोकांच्या कार्यांचा परिणाम आहे. परंतु अशा घटनांबद्दल काय ज्यांचा दोष थेटपणे लोकांवर लावता येत नाही? जसे की, इतके अपघात व नैसर्गिक आपत्ती का येतात? काही मुलांत जन्मतःच दोष का असतात? ॲलन कारडेकच्या मतानुसार या सर्व शिक्षा आहेत. त्याने असे लिहिले: “आपल्याला शिक्षा होते याचा अर्थ काहीतरी चूक घडली आहे. पण ती चूक आपण सध्याच्या जीवनात केली नाही म्हणजेच ती गत जीवनातील आहे.” भूतविद्या करणाऱ्‍या लोकांना अशाप्रकारे प्रार्थना करायला शिकवले जाते: “प्रभू तू सर्वन्यायी आहेस. तुझ्याकडून माझ्या वाट्याला आलेले हे आजारपण मला भोगलेच पाहिजे. . . . हे मी माझ्या गत जीवनाचे प्रायश्‍चित्त आणि माझ्या विश्‍वासाची परीक्षा व तुझ्या इच्छेच्या आज्ञेत राहण्याचा पुरावा म्हणून कबूल करतो.”—द गॉस्पल अकॉर्डिंग टू स्पिरिटिझम.

परंतु येशूने असे काही शिकवले का? नाही. येशूला बायबलमधील हे वाक्य माहीत होते: “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) त्याला माहीत होते, की काही वेळा वाईट गोष्टी अचानक घडतात. त्या आपल्या पापांची शिक्षा नाहीत.

येशूच्या जीवनांतील या घटनेचा विचार करा: “तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, ‘गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा अंधळा जन्मास आला? ह्‍याच्या की ह्‍याच्या आईबापांच्या?’” या प्रसंगी येशूने दिलेले उत्तर अतिशय बोधपर होते. त्याने म्हटले: “ह्‍याने किंवा ह्‍याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्‍याच्या ठायी देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. . . . असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला, आणि त्याला म्हटले, ‘जा; शिलोह . . . नावाच्या तळ्यात धू.’ मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.”—योहान ९:१-३, ६, ७.

हा मनुष्य किंवा त्याचे आईवडील त्याच्या जन्मापासून अंधळे असण्याला जबाबदार नव्हते हे येशूच्या शब्दांनी दाखवून दिले. म्हणूनच, या अंध मनुष्याला एखाद्या गत जीवनात केलेल्या पापांची शिक्षा मिळाली होती, असे येशूने सुचवले नाही. मानवांना पापाचा वारसा मिळाला आहे हे येशूला ठाऊक होते. पण तो काही त्यांच्या जन्मापूर्वी त्यांनी केलेल्या पापांसाठी नव्हता तर तो वारसा त्यांना आदामाकडून मिळाला आहे. आदामाच्या पापामुळे सर्व मानव शारीरिकरीत्या अपरिपूर्ण जन्मतात, आजारी पडतात आणि मरण पावतात. (ईयोब १४:४; स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२; ९:११) या सर्वांतून मानवजातीची मुक्‍ती करण्यासाठी तर येशूला या पृथ्वीवर पाठवण्यात आले होते. येशू “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” आहे असे बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने म्हटले.—योहान १:२९. *

देवानेच त्या मनुष्याला जन्मांध केले होते जेणेकरून एक ना एक दिवशी येशूकडून तो बरा होऊ शकेल असे येशू म्हणाला नाही, हेही लक्षात घ्या. देवाने असे करणे क्रूर व उपहासात्मक ठरले असते. शिवाय यामुळे त्याची स्तुती झाली असती का? नाही. उलट, या अंध मनुष्याचे चमत्कारिकरीत्या बरे झाल्याने “देवाची कार्ये प्रगट” झाली. येशूने केलेल्या इतर चमत्कारांप्रमाणे, या चमत्कारातूनही दुःखाने जर्जर झालेल्या मानवजातीबद्दल देवाला असलेले खरे प्रेम दिसून आले. शिवाय, सर्व मानवजातीचे आजारपण व दुःख, देव त्याच्या नियुक्‍त समयी पूर्णपणे काढून टाकणार आहे या अभिवचनाची देखील या चमत्कारावरून पुष्टी मिळाली.—यशया ३३:२४.

आपला स्वर्गीय पिता दुःख देण्याऐवजी ‘जे मागतात त्यांना विशेषेकरून चांगल्या देणग्या’ देतो हे ऐकून आपल्याला सांत्वन मिळत नाही का? (मत्तय ७:११) अंधाचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील, लंगडे उड्या मारतील व पळू लागतील तेव्हा परात्पर देवाचा किती महिमा होईल!—यशया ३५:५, ६.

आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करणे

येशूने म्हटले: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:४) होय, आपण देवाचे वचन, बायबल वाचतो व त्यानुसार जीवन व्यतित करतो तेव्हा आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात. दुरात्म्यांशी संभाषण केल्याने आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण होत नाहीत. ॲलन कारडेकने ज्याला देवाच्या नियमशास्त्राचे पहिले प्रकटीकरण म्हटले त्यात, अर्थात मोशेच्या नियमशास्त्रात दुरात्म्यांशी संपर्क साधणे सडेतोडपणे धिक्कारले आहे.—अनुवाद १८:१०-१३.

बहुतेक लोकांना (भूतविद्या आचरणाऱ्‍यांना देखील) माहीत आहे, की देव सर्वसमर्थ, सनातन, परिपूर्ण, दयाळू, चांगला व न्यायी आहे. परंतु बायबल त्याची याहीपेक्षा जास्त माहिती देते. ते म्हणते की त्याला एक नाव आहे. ते आहे यहोवा. आणि आपण येशूने केला त्याप्रमाणे या नावाचा आदर केला पाहिजे. (मत्तय ६:९; योहान १७:६) देव एक खरी व्यक्‍ती असून मानव त्याच्याशी सलोखा ठेवू शकतात, असे बायबल म्हणते. (रोमकर ८:३८, ३९) बायबल वाचल्यावर आपल्याला समजले, की यहोवा दयाळू आहे, ‘आपल्या पातकांच्या मानाने त्याने आपल्याला शासन केले नाही, त्याने आपल्या दुष्कृत्यांच्या मानाने आपल्याला प्रतिफळ दिले नाही.’ (स्तोत्र १०३:१०) त्याच्या लिखित वचनाद्वारे सार्वभौम प्रभू यहोवा त्याचे प्रेम, त्याची महानता, त्याचा समंजसपणा प्रकट करतो. आज्ञाधारक मानवांना तोच मार्गदर्शन देतो; त्यांचे संरक्षण करतो. यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या दोघांना ओळखल्यावरच आपल्याला “सार्वकालिक जीवन” मिळू शकते.—योहान १७:३.

देवाच्या उद्देशांविषयी आपल्याला हवी असणारी सर्व माहिती बायबलमध्ये आहे. देवाला संतुष्ट करण्याकरता आपण काय केले पाहिजे हेही बायबलमध्ये सांगितले आहे. बायबलचे काळजीपूर्वक परीक्षण केल्याने आपल्या प्रश्‍नांची खरी व समाधानकारक उत्तरे आपल्याला मिळतील. बरोबर काय व चूक काय यांबद्दलचे मार्गदर्शन बायबलमध्ये आहे. शिवाय बायबलमध्ये एक भक्कम आशा देखील आहे. नजीकच्या भवितव्यात देव “[मानवजातीच्या] डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या [असतील].” (प्रकटीकरण २१:३, ४) यहोवा, येशू ख्रिस्तामार्फत मानवजातीला आदामाकडून वारशाने मिळालेल्या पाप व अपरिपूर्णतेपासून मुक्‍त करील. आणि आज्ञाधारक मानव परादीस पृथ्वीवर चिरकाल जगतील. तेव्हा त्यांच्या सर्व शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या जातील.—स्तोत्र ३७:१०, ११, २९; नीतिसूत्रे २:२१, २२; मत्तय ५:५.

[तळटीप]

^ पाप आणि मृत्यूची सुरवात कशी झाली याबाबतीत अधिक माहिती हवी असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा ६ वा अध्याय पाहा.

[२२ पानांवरील चौकट]

बायबल पुनर्जन्माची शिकवण देते का?

पुनर्जन्माच्या शिकवणीला बायबलमधील कोणतेही वचन पुष्टी देते का? ही शिकवण मानणारे लोक बायबलमधील काही वचनांचा उपयोग करून हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात, की बायबलमध्ये ही शिकवण आहे. तर आपण त्या वचनांचा जरा विचार करू या:

“योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्‍यांनी संदेश दिले; . . . ‘जो एलीया येणार तो हाच आहे.’”—मत्तय ११:१३, १४.

एलियाने बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे रूप घेऊन पुन्हा जन्म घेतला होता का? आपण “एलीया आहा काय?” असे योहानाला विचारण्यात आले तेव्हा त्याने “मी नाही,” असे उत्तर दिले. (योहान १:२१) परंतु मशीहाआधी योहान “एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने” चालेल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. (लूक १:१७; मलाखी ४:५, ६) दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने एलियासारखेच कार्य केल्यामुळे त्याला एलिया असे संबोधण्यात आले आहे.

“नव्याने जन्मल्यावाचून कोणालाहि देवाचे राज्य पाहता येत नाही. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्‍चर्य मानू नका.”—योहान ३:३, .

एका प्रेषिताने नंतर असे लिहिले: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला.” (१ पेत्र १:३, ४; योहान १:१२, १३) येशू येथे भवितव्यातील पुनर्जन्माबद्दल नव्हे तर त्याचे अनुयायी जिवंत असतानाच त्यांना मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अनुभवाबद्दल बोलत होता.

“मनुष्य मृत झाल्यावर चिरकाल जगतो: पृथ्वीवरील माझे अस्तित्व समाप्त झाल्यानंतर मी पुन्हा येण्याची वाट बघत थांबून राहीन.”द गॉस्पल अकॉर्डींग टू स्पिरिटिझम या पुस्तकात उद्धृत केलेले ईयोब १४:१४ या वचनाचे “ग्रीक भाषांतर.”

मराठी बायबलमध्ये या वचनाचे भाषांतर अशाप्रकारे करण्यात आले आहे: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन.” या वचनाचा मागचा पुढचा संदर्भ वाचा. वाचल्यावर तुम्हाला दिसून येईल की त्यात मृत जन त्यांच्या ‘सुटकेसाठी’ कबरेत वाट पाहत आहेत. (वचन १३) ते वाट पाहत आहेत म्हणजे ते अस्तित्वविरहीत आहेत. “माणूस मेला की सारे संपलेच! मानव मेल्यावर कुठला राहायला?”—ईयोब १४:१०, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.

[२१ पानांवरील चित्र]

पुनरुत्थानाच्या आशेवरून, देवाला प्रत्येक मानव किती प्रिय आहे ते स्पष्ट होते

[२३ पानांवरील चित्रे]

देव मानवाचे सर्व दुःख नाहीसे करील