व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या मार्गावर नेटाने चालल्यानेच आम्हाला बळ व आनंद मिळाला

यहोवाच्या मार्गावर नेटाने चालल्यानेच आम्हाला बळ व आनंद मिळाला

जीवन कथा

यहोवाच्या मार्गावर नेटाने चालल्यानेच आम्हाला बळ व आनंद मिळाला

लुईजी डी. व्हॅलेन्टिनो यांच्याद्वारे कथित

“हाच मार्ग आहे; याने चला,” असे यहोवा आपल्याला आर्जवतो. (यशया ३०:२१) माझ्या बाप्तिस्म्याला ६० वर्षे होऊन गेली आहेत. तेव्हापासून आजपर्यंत यहोवाच्या या आर्जवाचे पालन करणे हे माझे ध्येयच बनले आहे. इटलीहून अमेरिकेच्या ओहायो, क्लीव्हलँड येथे १९२१ मध्ये स्थायिक झालेल्या माझ्या पालकांच्या उदाहरणामुळे मी हे ध्येय लहानपणीच डोळ्यापुढे ठेवले. आम्ही तीन भावंडं होतो—माझा थोरला भाऊ माईक, माझी धाकटी बहीण लिडिया आणि मी.

माझ्या आईबाबांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला; आणि प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडली. १९३२ साली एकदा बाबा रेडिओवरून इटालियन भाषेतला एक कार्यक्रम ऐकत होते. तो कार्यक्रम यहोवाच्या साक्षीदारांचा होता. बाबांना तो कार्यक्रम ऐकून खूपच आनंद झाला. त्यांनी अधिक माहितीसाठी लगेच पत्र पाठवलं आणि न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातून एक इटालियन साक्षीदार आमच्या घरी आला देखील. पहाटेपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर माझ्या आईबाबांची पूर्ण खात्री पटली की त्यांना खऱ्‍या धर्माची ओळख झाली होती.

आईबाबा लगेच ख्रिस्ती सभांना जाऊ लागले; आमच्या घराचे दरवाजे प्रवासी पर्यवेक्षकांना राहण्यासाठी त्यांनी खुले केले. मी त्या वेळी लहानच होतो तरीसुद्धा हे प्रवासी पर्यवेक्षक मला त्यांच्यासोबत प्रचार कार्यात घेऊन जात असत. यहोवाची पूर्ण वेळची सेवा करण्याची इच्छा ते माझ्या बालमनात रुजवू लागले होते. अशा पर्यवेक्षकांपैकी एक होते, बंधू कॅरी डब्ल्यू. बार्बर. ते सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य आहेत. काही वर्षांनंतर म्हणजे १९४१ सालच्या फेब्रुवारी महिन्यात मी बाप्तिस्मा घेतला. तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. १९४४ पासून मी क्लीव्हलँड येथे पायनियर म्हणून सेवा करू लागलो. माईक आणि लिडिया यांनी देखील बायबलमधील सत्य मार्गावर चालण्यास सुरवात केली. माईकने आपल्या मृत्यूपर्यंत यहोवाची सेवा केली. आणि लिडियाने तिचा पती हॅरल्ड वाईडनर याच्याबरोबर २८ वर्षं प्रवासी कार्य केले. सध्या ते खास पायनियर म्हणून सेवा करत आहेत.

तुरुंगवासामुळे माझा निश्‍चय आणखीनच पक्का होतो

यशया २:४ मध्ये आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करण्याविषयी म्हटले आहे. या वचनाच्या एकवाक्यतेत चालण्यास माझ्या बायबल प्रशिक्षित विवेकाने मला प्रवृत्त केल्यामुळे १९४५ च्या सुरवातीला मला ओहायोच्या चिलिकोथे येथील सरकारी कारागृहात टाकण्यात आले. पूर्वी, तुरुंग अधिकारी साक्षीदार असलेल्या कैद्यांना, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली मोजकीच प्रकाशने जवळ बाळगायला परवानगी द्यायचे. पण जवळपासच्या मंडळीतील साक्षीदार त्यांना खूप मदत करायचे. कधीकधी ते तुरुंगाजवळच्या शेतात काही प्रकाशने टाकत. दुसऱ्‍या दिवशी सकाळी कैद्यांना कामाच्या ठिकाणी नेत असताना साक्षीदार असलेले कैदी ती प्रकाशने कुठे कुठे टाकली आहेत ती शोधून कसेतरी तुरुंगात आणायचे. मी तुरूंगात आलो तेव्हा परिस्थिती जराशी सुधरली होती. आम्हाला आणखी काही प्रकाशने बाळगण्याची परवानगी मिळाली होती. तेव्हापासून यहोवा देत असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाची मला किंमत समजू लागली. आजही मला टेहळणी बुरूजसावध राहा! मासिके मिळतात तेव्हा मला तो धडा आठवतो.

काही दिवसांनंतर मात्र आम्हाला तुरुंगात मंडळीच्या सभा चालवण्याची परवानगी देण्यात आली; पण, साक्षीदार नसलेल्यांना या सभांना उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. तरीसुद्धा, काही तुरुंग अधिकारी आणि कैदी गुपचूप या सभांना उपस्थित राहायचे. काहींनी तर नंतर सत्य देखील स्वीकारले. (प्रेषितांची कृत्ये १६:३०-३४) बंधू ए. एच. मॅकमीलन यांसारख्या बांधवांच्या भेटींमुळे खूप सांत्वन मिळायचे. ते नेहमी आम्हाला अशी खात्री द्यायचे, की आम्ही तुरुंगात घालवलेली वर्षे वाया जाणार नाहीत तर भावी नेमणुकींसाठी ती आम्हाला तयार करत आहेत. या प्रिय वृद्ध बांधवाचे हे सांत्वनदायक बोल माझ्या काळजाला भिडले आणि यहोवाच्या मार्गात चालण्याचा माझा निश्‍चय आणखीन पक्का बनला.

मला सहचारिणी भेटते

दुसरे महायुद्ध संपल्यावर आम्ही तुरुंगातून सुटलो. मी माझी पूर्ण वेळेची सेवा पुन्हा सुरू केली. पण १९४७ साली बाबांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाची देखभाल करण्यासाठी मी नोकरी करू लागलो आणि त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने मालीश करण्याचेही मी प्रशिक्षण घेतले. सुमारे ३० वर्षांनंतर आम्हा दोघा पतीपत्नीला सामोऱ्‍या जाव्या लागणाऱ्‍या कठीण काळात हेच प्रशिक्षण कामी येणार होते. पण मी खूपच पुढे चाललोय. आधी मी तुम्हाला माझ्या पत्नीविषयी सांगतो.

१९४९ सालच्या एका दुपारी, मी राज्य सभागृहात होतो तेव्हा एक फोन आला. मी फोन घेतला तर पलीकडून मला एक गोड आवाज ऐकू आला: “हॅलो, माझं नाव क्रिस्टीन गेनचर आहे. मी यहोवाची साक्षीदार आहे. मी नोकरीच्या निमित्ताने क्लीव्हलँड येथे राहायला आले आहे. तेव्हा मला मंडळीचा पत्ता सांगाल का?” क्रिस्टीन जेथे राहायला आली होती तेथून आमचे राज्य सभागृह बरेच लांब होते. पण मला तिचा गोड आवाज खूपच आवडल्यामुळे मी तिला लगेच राज्य सभागृहाला कसे यायचे ते सांगून टाकले. पुढच्या रविवारीच यायला तिला मी उत्तेजन दिले. आणि त्याच रविवारी मी जाहीर भाषण देणार होतो. मग रविवार आला तेव्हा सर्वांच्या आधी मी राज्य सभागृहात पोहंचलो. पण मला तो नवीन चेहरा दिसत नव्हता. सभा सुरू झाली, मी भाषण द्यायला स्टेजवर गेलो. संपूर्ण भाषणादरम्यान माझं लक्ष दरवाज्याकडे होतं, पण कोणी आले नाही. दुसऱ्‍या दिवशी मग मी क्रिस्टीनला फोन केला. तर तिने सांगितले, की तिला राज्य सभागृहाला यायला कोणती बस धरायची हे माहीत नव्हते म्हणून ती येऊ शकली नाही. मग मी तिला म्हणालो, सर्व काही समजावून सांगण्यासाठी मीच एकदा भेट घेतो.

तिचे आईवडील मूळचे झेकोस्लाव्हाकियाचे होते. मृतजन कोठे आहेत? ही पुस्तिका वाचल्यानंतर ते बायबल विद्यार्थ्यांबरोबर सहवास राखू लागले होते. १९३५ साली त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. १९३८ साली क्रिस्टीनचे वडील अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनियाच्या क्लायमर येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत कंपनी सर्व्हन्ट (आता ज्यांना अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हटले जाते) बनले होते. १९४७ साली क्रिस्टीनचा बाप्तिस्मा झाला. ती तेव्हा १६ वर्षांची होती. क्रिस्टीन आध्यात्मिक वृत्तीची मुलगी होती; शिवाय देखणीही होती. मी तिच्या प्रेमात पडलो. १९५० सालच्या जून २४ तारखेला आमचं लग्न झालं. तेव्हापासून क्रिस्टीन माझी विश्‍वासू सहचारिणी बनली आहे; देवाच्या राज्याला ती नेहमी प्रथम स्थान देते. ही सद्‌गुणी सहचारिणी मला साथ द्यायला तयार झाल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानतो.—नीतिसूत्रे ३१:१०.

सुखद धक्का!

नोव्हेंबर १, १९५१ रोजी आम्ही दोघांनी पायनियरींग सुरू केली. दोन वर्षांनंतर, ओहायोच्या टोलेडो येथील एका अधिवेशनात बंधू हूगो रिमर आणि बंधू अल्बर्ट श्रोडर मिशनरी सेवा करू इच्छिणाऱ्‍या पायनियरांच्या एका गटाबरोबर बोलले. आम्ही दोघंही त्या गटात होतो. आम्हाला क्लीव्हलँड येथेच पायनियरींग करीत राहण्याचे उत्तेजन देण्यात आले. पण लगेचच दुसऱ्‍या महिन्यात आम्हाला एक सुखद धक्का बसला—फेब्रुवारी १९५४ मध्ये सुरू होणाऱ्‍या वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या २३ व्या वर्गासाठी आम्हाला आमंत्रण मिळाले होते!

त्या वेळी, न्यू यॉर्क, साऊथ लॅन्सींग येथे असलेल्या गिलियड स्कूलला जाण्यासाठी आम्ही कारने प्रवास करत होतो तेव्हा क्रिस्टीन सारखी म्हणत होती: “अहो, गाडी जरा हळू चालवा!” क्रिस्टीन खरे तर घाबरली होती. मी तिला म्हणालो: “क्रिस्टीन, आपण यापेक्षाही हळू गेलो तर आपण जागेवरच थांबून राहू.” पण तिकडे पोहंचल्यावर आम्हाला बरं वाटलं. बंधू नेथन नॉर यांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले, त्यांना तिथला सगळा परिसर दाखवला. पाणी, वीज यांची आपण बचत कशी करू शकतो, ते त्यांनी आम्हाला समजावून सांगितले. आणि राज्य हितांना प्रथम स्थान देताना काटकसर करणे हा एक सद्‌गुण आहे, असे ते म्हणाले. त्यांनी दिलेला तो सल्ला आमच्या मनात जणू कायमचाच कोरला गेला. आजही आम्ही त्या सल्ल्याचे पालन करतो.

रिओत आगमन

गिलियड प्रशालेतून आम्हाला पदवी मिळाल्यानंतर डिसेंबर १०, १९५४ रोजी आम्ही कडाक्याची थंडी असलेल्या न्यू यॉर्क सिटीतून विमानात बसलो. आणि ब्राझीलमधील रिओ दी जेनिरो या उष्ण ठिकाणी आमच्या नव्या नेमणुकीची आशा मनात बाळगून आम्ही पोहोचलो. आमच्याबरोबर पिटर आणि बिली कारबेल्लो हे दांपत्य देखील होते. तेही आमच्याबरोबर इथे मिशनरी कार्यासाठी आले होते. प्वेर्टो रिको, व्हेनेझुएला आणि उत्तर ब्राझीलमधील बेलेम या ठिकाणी थांबून आमचा विमान प्रवास एकूण २४ तासांचा होता. परंतु, विमानाच्या इंजिनात काही बिघाड झाल्यामुळे आम्हाला ३६ तासांनंतर रिओ दी जेनिरोचे दर्शन घडले. विमानातून ते किती सुरेख दिसत होते! शहरातील दिवे काळ्या मखमली गालिच्यावर कोंदलेल्या हिऱ्‍यांप्रमाणे चमकत होते; चंद्राचा चंदेरी प्रकाश गुआनाबारा खाडीच्या पाण्यावर चकाकत होता.

बेथेल परिवाराचे अनेक सदस्य आमच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. सर्वांनी आमचे हार्दिक स्वागत केल्यावर त्यांनी आम्हाला शाखा कार्यालयात नेले. शेवटी, पहाटे तीन वाजता आम्ही आमच्या बिछान्यात शिरलो. दोन-तीन तासांतच सकाळची घंटा वाजली तेव्हा, आमच्या मिशनरी कार्याचा हा पहिला दिवस आहे, याची आम्हाला आठवण झाली!

पहिलाच धडा

आम्हाला दोघांना पहिलाच धडा शिकायला मिळाला. एकदा आम्ही एका साक्षीदार कुटुंबाच्या घरी संध्याकाळचे गेलो होतो. आम्ही जायला निघालो तेव्हा त्या कुटुंब प्रमुखाने आम्हाला म्हटले, “कुठं निघालात? बाहेर पाऊस पडतोय.” आम्ही रात्र तेथेच घालवावी असा आग्रह ते आम्हाला करू लागले. “आमच्या गावीसुद्धा पाऊस पडतो!” असं हसत हसत मी त्यांना म्हणालो व आम्ही दोघं बाहेर पडलो.

रिओ हे डोंगरांच्या कुशीत असल्यामुळे शहरात लगेच पाणी साठून पूर होतो. रस्त्यात आमच्या गुडघ्या इतके पाणी साचले होते. आम्ही तसेच पुढे चालत गेलो. शाखेजवळ पोहंचलो तर छाती इतके पाणी! आणि पाणी चांगलेच जोरदार वाहत होते. आम्ही कसेबसे बेथेलमध्ये पोहंचलो. आम्ही चिंब भिजून गेलो होतो. दुसऱ्‍या दिवशी क्रिस्टीन आजारीच पडली. तिला टायफॉईड झाला. त्यानंतर कित्येक आठवडे तिला अशक्‍तपणा जाणवत होता. आम्हाला चांगलाच धडा शिकायला मिळाला होता. नवीन मिशनरी या नात्याने आम्ही स्थानिक अनुभवी साक्षीदारांचे म्हणणे ऐकायला हवे होते.

मिशनरी व प्रवासी कार्यातील पहिली पावले

अशी आमची सुरवात झाली; पण आम्ही क्षेत्रात जाण्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो. आम्ही ज्यांना ज्यांना भेटायचो त्यांना त्यांना पोर्तुगीज भाषेत संदेश वाचून दाखवायचो. त्याचबरोबर आम्ही ती भाषा बोलायलाही शिकलो. कधीकधी घरमालक क्रिस्टीनला म्हणायचा: “तुम्ही काय बोलता ते मला समजतं, पण ते (माझ्याकडं बोट दाखवून) काय बोलतात ते मला समजत नाही.” दुसरा घरमालक मला म्हणायचा: “तुम्ही काय बोलता ते मला समजतं, पण त्या (क्रिस्टीनकडे बोट दाखवून) काय बोलतात ते मला समजत नाही.” तरीपण पहिल्या काही आठवड्यांत आम्हाला टेहळणी बुरूज मासिकासाठी शंभराहून अधिक वर्गण्या मिळालेल्या पाहून किती आनंद झाला! खरे तर, ब्राझीलमध्ये आम्ही राहिलो त्या पहिल्या वर्षांत आमच्या अनेक बायबल विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मा घेतला. आम्हाला मिळालेली मिशनरी नेमणूक किती फलदायी आहे याची आम्हाला प्रचिती मिळाली होती.

ब्राझीलमधील अनेक मंडळ्यांना १९५० च्या दशकाच्या मध्यात विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटी व्हायच्या नाहीत. कारण तेव्हा विभागीय पर्यवेक्षक होण्यासाठी फार कमी बांधव पात्र होते. त्यामुळे १९५६ साली साऊ पाऊलु या राज्यात विभागीय कार्य करण्याची मला नेमणूक मिळाली; त्या वेळी मी अद्याप पोर्तुगीज भाषा शिकत होतो. मी पोर्तुगीज भाषेत एकही जाहीर भाषण दिले नव्हते.

आम्हाला ज्या मंडळीला पहिली भेट देण्याची नेमणूक मिळाली होती त्या मंडळीला दोन वर्षे विभागीय पर्यवेक्षकांची भेट झाली नव्हती. म्हणून तेथील बांधव खूप अपेक्षा बाळगून जाहीर भाषणासाठी आले होते. हे भाषण तयार करण्याकरता मला, पोर्तुगीज भाषेतल्या टेहळणी बुरूज मासिकातील परिच्छेदांची कात्रणे कापून ती कागदांवर चिकटवावी लागली. मग रविवारचा दिवस उजाडला. सभागृह गच्च भरले होते. इतके की स्टेजवर पण लोक बसले होते. सर्व जण जाहीर भाषण ऐकायला आतुर झाले होते. मग मी भाषण द्यायला, नव्हे वाचायला सुरवात केली. अधूनमधून मी डोकं वर करून श्रोत्यांकडे पाहत होतो. पण श्रोत्यांतील कोणी (मुलंसुद्धा) चुळबुळ करीत नव्हते; सर्वजण एक टक लावून माझ्याकडे पाहत होते. हे पाहून मला खूप आश्‍चर्य वाटलं. मी मनातल्या मनात म्हटलं: ‘अरे वा, माझी पोर्तुगीज सुधरली वाटतं! किती लक्ष देऊन ऐकताहेत हे सर्व!’ अनेक वर्षांनंतर मी पुन्हा त्या मंडळीला भेट द्यायला गेलो तेव्हा, माझ्या पहिल्या भेटीच्या वेळेस उपस्थित असलेला एक बांधव माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला: “तुम्ही दिलेले ते पहिलं जाहीर भाषण तुम्हाला आठवतं का? त्या भाषणातील एक शब्दही आम्हाला समजला नव्हता.” मग मीही कबूल केले की मलाही त्यातील पुष्कळ काही समजले नव्हते.

विभागीय कार्यातील माझ्या त्या पहिल्या वर्षी मी नेहमी जखऱ्‍या ४:६ हे वचन वाचायचो. त्यातील, “पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने” या शब्दांवरून मला सदोदित याची आठवण व्हायची की राज्य कार्याच्या प्रगतीचे एकमात्र कारण यहोवाचा आत्मा होता. आणि खरंच, आमच्या मर्यादा असतानाही तेथे मात्र प्रगती होत राहिली.

आव्हाने आणि आशीर्वाद

विभागीय कार्य म्हणजे सततचा प्रवास. टाईपरायटर, प्रकाशनांची खोकी, सूटकेसेस, ब्रिफकेसेस हे सर्व सामानसुमान घेऊन प्रवास करावा लागायचा. क्रिस्टीनने आमच्या प्रत्येक सामानाला नंबर दिला होता. त्यामुळे आम्हाला बस बदलावी लागायची तेव्हा कोणतेही सामान मागे राहिले नाही हे आम्हाला पाहता येत होते. दुसऱ्‍या ठिकाणी पोहंचण्यासाठी कच्च्या रस्त्यांवरून १५-१५ तास बसने प्रवास करणे यात काहीच नवीन नव्हतं. कधीकधी तर, मोडकळीस आलेल्या पुलावरून दोन बस एकाच वेळी विरुद्ध दिशेने जायच्या तेव्हा आम्ही जीव मुठीत धरून बसायचो. कारण या दोन्ही बस इतक्या जवळून जायच्या की त्यांच्यामध्ये कागदाच्या जाडीइतकीसुद्धा जागा नसायची. आम्ही ट्रेनने, जहाजाने आणि घोड्यावरूनही प्रवास केला आहे.

आम्ही १९६१ साली प्रांतीय कार्य सुरू केले. मंडळ्यांना भेटी देण्याऐवजी आम्ही विभागांना भेटी देऊ लागलो. एकाच आठवड्यांतील अनेक दिवशी संध्याकाळी आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही यहोवाच्या संस्थेने बनवलेल्या फिल्म्स दाखवत असू. हे खेळ दाखवण्यास प्रतिबंध करणारे स्थानिक पाळक काही करण्याआधीच आम्ही आमचे काम आवरत असू. त्यासाठी आम्हाला त्वरित हालचाली कराव्या लागत असत. एकदा एका शहरातील एक सभागृह आम्ही बुक केल्यानंतर पाळकांनी त्या सभागृहाच्या मालकाला आमचं बुकींग रद्द करायला लावलं. मग किती तरी दिवसांनी खूप शोधून एक सभागृह मिळाले; पण या वेळेस आम्ही कोणालाही त्याविषयी सांगितले नाही आणि सर्वांना आधीच्या सभागृहाचाच पत्ता दिला. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळाआधी, क्रिस्टीन गुपचुप त्या सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली आणि ज्यांना फिल्म पाहायचा होता त्यांना तिने, जिथे खरोखर खेळ दाखवला जाणार होता त्या नवीन ठिकाणी जाण्यास सांगितले. त्या दिवशी १५० लोकांनी कार्यरत असणारी नवीन जग संस्था असे उचित शीर्षक असलेला इंग्रजी फिल्म पाहिला.

दूरवरच्या क्षेत्रात प्रवासी कार्य करणे कधीकधी तोंडची गोष्ट नव्हती. तरीपण, तिथल्या नम्र बांधवांना आमच्या भेटींची किती कदर होती. आपल्या लहानशा घरात आम्हाला जागा देऊन ते आमचा पाहुणचार करू इच्छित होते. या प्रेमळ बांधवांचा आम्हाला सहवास लाभला होता त्याबद्दल आम्ही यहोवाचे खूप आभार मानले. या बंधूभगिनींबरोबर मैत्री केल्यामुळे आम्हाला अनेक सुखावह आशीर्वाद मिळाले. (नीतिसूत्रे १९:१७; हाग्गय २:७) त्यामुळे ब्राझीलमधील २१ वर्षांची आमची मिशनरी सेवा संपुष्टात आली तेव्हा आम्हाला खूप दुःख झाले.

संकटकाळी यहोवाने मार्ग दाखवला

१९७५ साली क्रिस्टीनचे ऑपरेशन झाले. आम्ही पुन्हा प्रवासी कार्य सुरू केले; पण क्रिस्टीनची तब्येत आणखीनच बिघडली. तिच्या उपचारासाठी आम्हाला अमेरिकेला पुन्हा जावे लागले. १९७६ सालच्या एप्रिल महिन्यात आम्ही कॅलिफोर्नियाच्या लाँग बीच येथे राहणाऱ्‍या माझ्या आईकडे राहायला आलो. बाहेरगावी वीस वर्ष राहिल्यानंतर, आम्हाला काय करावे तेच कळेना. मग मी मालीश करण्याचं काम सुरू केलं. त्यातून येणाऱ्‍या मिळकतीने आमची गुजराण होऊ लागली. कॅलिफोर्निया सरकारकडून क्रिस्टीनला इस्पितळात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. पण तेथील डॉक्टरांनी तिला रक्‍ताविना उपचार देण्यास नकार दिल्यामुळे दिवसेंदिवस तिला अशक्‍तपणा जाणवू लागला. या वेळी आम्ही अतिशय हतबल झालो होतो; आम्हाला मार्गदर्शन द्यावे म्हणून आम्ही यहोवाला कळकळीने विनंती केली.

एकदा दुपारच्या वेळी मी क्षेत्र सेवेतच होतो तेव्हा मला एका डॉक्टरांचा दवाखाना दिसला. तो दवाखाना पाहिल्या पाहिल्या मी आत जायचे ठरवले. डॉक्टर खरे तर घरी जायच्या तयारीत होते तरीपण त्यांनी मला आत बोलावले. आम्ही दोन तास बोललो. मग ते म्हणाले: “तुम्ही मिशनरी या नात्याने करत असलेल्या कामाचे मला कौतुक वाटते. मी तुमच्या पत्नीवर विनामूल्य आणि रक्‍ताविना उपचार करेन.” त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर मला माझ्या कानांवर विश्‍वासच बसेना!

हे प्रेमळ डॉक्टर साधेसुधे डॉक्टर नव्हते. ते एक सन्मानित तज्ज्ञ होते. ते जिथे काम करतात त्या इस्पितळात त्यांनी क्रिस्टीनची बदली केली. तिच्याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले आणि क्रिस्टीनची तब्येत काही दिवसांतच सुधारली. त्या कठीण समयी यहोवाने आम्हाला मार्ग दाखवल्याबद्दल आम्ही त्याचे किती आभार मानावेत तेवढे कमीच!

नवीन नेमणुका

क्रिस्टीनची तब्येत बरी झाल्यावर आम्ही पायनियरींग सुरू केली. लाँग बीचमधील अनेकांना यहोवाचे उपासक बनण्यास मदत करण्याचा सुहक्क आम्हाला मिळाला. १९८२ साली आम्हाला संयुक्‍त संस्थानांत विभागीय कार्य करण्यास सांगण्यात आले. पुन्हा एकदा प्रवासी कार्यासाठी आमचा उपयोग करून घेतल्याबद्दल आम्ही यहोवाचे दरदिवशी आभार मानत होतो. हे कार्य आम्हाला अतिशय आवडायचे. आम्ही कॅलिफोर्नियात आणि मग न्यू इंग्लंड येथे सेवा केली. या विभागात काही पोर्तुगीज भाषिक मंडळ्या देखील होत्या. यात नंतर बर्म्युडाचा देखील समावेश झाला.

चार वर्षांनंतर आम्हाला दुसरी नेमणूक मिळाली. या चार वर्षांत आम्हाला खूप तजेला मिळाला. आता आम्हाला जी नेमणूक मिळाली होती ती खास पायनियरींगची होती. आम्हाला ठिकाण निवडायचे होते. प्रवासी कार्य सोडताना आम्हाला खूप वाईट वाटले; परंतु नवीन नेमणूक पूर्ण करण्याचा आम्ही निश्‍चय केला. पण आता कोणते ठिकाण निवडायचे? मॅसाच्यूसेट्‌स येथील न्यू बेडफोर्ड या ठिकाणच्या एका पोर्तुगीज भाषिक मंडळीला मदत हवी आहे हे प्रवासी कार्य करत असताना माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे मग आम्ही न्यू बेडफोर्डला गेलो.

तेथे गेल्यावर तेथील मंडळीने मोठी पार्टी देऊन आमचे स्वागत केले. त्यांचं प्रेम पाहून आम्हाला असं वाटलं, की या बांधवांना खरोखरच आपली गरज होती! या जाणीवेने आमचे डोळे पाणावले! आमचं स्वतंत्र घर मिळेपर्यंत, दोन लहान मुली असलेल्या एका तरुण जोडप्याने आम्हाला त्यांच्या घरी राहायला जागा दिली. आम्ही अपेक्षासुद्धा केली नव्हती इतके आशीर्वाद आम्हाला यहोवाने या खास पायनियर नेमणुकीत दिले. १९८६ पासून आम्ही या शहरातील जवळजवळ ४० लोकांना यहोवाचे साक्षीदार होण्यास मदत केली आहे. हे सर्व आमच्या आध्यात्मिक परिवाराचे सदस्य आहेत. शिवाय, यांतील पाच स्थानीय बांधवांनी कळपाचे पालन करण्याइतपत आध्यात्मिक प्रगती केली आहे; हे पाहून मला आज खूपच आनंद होतो. आम्ही एका फलदायी मिशनरी कार्यात होतो!

आम्ही तरुणपासून यहोवाची सेवा करण्यास सुरवात केली व सत्यालाच आमचा जीवन मार्ग बनवला आहे हे पाहून आता आम्हाला खूप समाधान वाटतं. वय आणि आजारपण यांमुळे आता आमचं शरीर आम्हाला पहिल्यासारखं साथ देत नसलं तरी यहोवाच्या मार्गावर नेटाने चालत राहिल्यानेच आम्हाला आजही शक्‍ती आणि आनंद मिळतो.

[२६ पानांवरील चित्र]

रिओ दी जेनिरोत नुकतेच आगमन

[२८ पानांवरील चित्र]

आमचा आध्यात्मिक परिवार—मॅसाच्यूसेट्‌स येथील न्यू बेडफोर्डमधील पोर्तुगीज मंडळी