व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या सेवेत तुमचा आनंद टिकवून ठेवा

यहोवाच्या सेवेत तुमचा आनंद टिकवून ठेवा

यहोवाच्या सेवेत तुमचा आनंद टिकवून ठेवा

प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.”—फिलिप्पैकर ४:४.

१, २. एका बांधवाला व त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही गमावल्यानंतरही आनंदी राहणे कसे शक्य झाले?

 सिएरा लिओन येथे राहणाऱ्‍या जेम्स नावाच्या एका ७० वर्षांच्या बांधवाने आयुष्यभर कष्ट करून चार खोल्यांचे एक घर घेण्याइतके पैसे जमा केले. कित्येक वर्षांचे हे स्वप्न पूर्ण झाले तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! पण जेम्स आणि त्यांचे कुटुंब नव्या घरात राहायला गेल्यावर काही काळातच त्या देशात अंतर्गत युद्ध सुरू झाले. त्यांचे घर बेचिराख झाले. त्यांनी आपले घर गमावले पण आनंद मात्र गमावला नाही. हे कसे शक्य झाले?

जेम्स आणि त्यांच्या कुटुंबाने, आपण काय गमावले यावर नाही तर अजूनही आपल्याजवळ काय आहे यावर लक्ष केंद्रित केले. जेम्स याविषयी सांगतात: “त्या भयानक युद्धादरम्यानही आमच्या सभा होत होत्या, आम्ही बायबल वाचत होतो, सोबत मिळून प्रार्थना करत होतो आणि जे काही थोडेबहुत आमच्याजवळ होते त्यातून एकमेकांना मदत करत होतो. आमचा आनंद टिकून राहिला कारण यहोवासोबत असलेल्या आमच्या अद्‌भुत नातेसंबंधाचा आम्ही कधीही स्वतःला विसर पडू दिला नाही.” आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांवर, आणि त्यातल्या त्यात यहोवासोबत नातेसंबंध असण्याच्या सर्वात मोठ्या आशीर्वादावर लक्ष केंद्रित करण्याद्वारे त्या ख्रिस्ती बांधवांना ‘आनंदी राहणे’ शक्य झाले. (२ करिंथकर १३:११, NW) अर्थात, त्यांच्यावर आलेले क्लेश आणि समस्या सोसणे सोपे नव्हते. पण यहोवासोबत आनंदी राहण्याचे त्यांनी थांबवले नाही.

३. सुरवातीच्या ख्रिस्ती जनांनी आपला आनंद कशाप्रकारे टिकवून ठेवला?

जेम्स आणि त्यांच्या कुटुंबासमोर आलेल्या समस्या सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनाही सोसाव्या लागल्या होत्या. तरीसुद्धा प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “तुम्ही आपल्या मालमत्तेची हानि आनंदाने सोसली.” ही हानी ते आनंदाने का सोसू शकले याचे कारणही पौलाने त्याच वचनात सांगितले: “अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे, व ती टिकाऊ आहे हे समजून.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस १०:३४) होय, पहिल्या शतकातील त्या ख्रिश्‍चनांजवळ एक खात्रीशीर आशा होती. त्यांना असे काहीतरी मिळण्याची आशा होती जे कोणीही लुटू शकत नव्हते—अर्थात देवाच्या स्वर्गीय राज्यातील कधीही न कोमेजणारा “जीवनाचा मुगूट.” (प्रकटीकरण २:१०) आज आपली ख्रिस्ती आशा, मग ती स्वर्गीय जीवनाची असो वा पृथ्वीवरील, ती आपल्याला संकटांना तोंड देतानाही आनंद टिकवून ठेवण्यास मदत करील.

“आशेने हर्षित व्हा”

४, ५. (अ) “आशेने हर्षित व्हा” हा पौलाचा सल्ला रोमी ख्रिश्‍चनांकरता इतका समयोचित का होता? (ब) एका ख्रिस्ती व्यक्‍तीला कोणत्या गोष्टींमुळे आशेचा विसर पडू शकतो?

प्रेषित पौलाने रोममधील सहविश्‍वासू बांधवांना सार्वकालिक जीवनाच्या ‘आशेने हर्षित होण्याचे’ प्रोत्साहन दिले. (रोमकर १२:१२) रोममधील ख्रिश्‍चनांकरता तो सल्ला अतिशय समयोचित होता. पौलाने त्यांना हे लिहिल्यानंतर अवघ्या दहा वर्षांत त्यांचा अतिशय भयंकर छळ होऊ लागला; काहींना तर नीरो सम्राटाच्या हुकुमावरून मरेपर्यंत यातना देण्यात आल्या. पण देव आपल्याला जीवनाचा मुकूट देईल या त्याच्या प्रतिज्ञेवर पूर्ण विश्‍वास असल्यामुळे त्यांना निश्‍चितच या यातना सहन करण्यास साहाय्य मिळाले असेल. आज आपल्याविषयी काय?

ख्रिस्ती असल्यामुळे आपणही छळ होण्याची अपेक्षा करू शकतो. (२ तीमथ्य ३:१२) शिवाय, आपल्याला माहीत आहे की “समय व प्रसंग” कोणावरही येऊ शकतात. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) आपली प्रिय व्यक्‍ती अचानक एखाद्या दुर्घटनेला बळी पडू शकते. आईवडिलांना किंवा एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीला एखादा जीवघेणा आजार होऊ शकतो. देवाच्या राज्याची आशा आपण सतत डोळ्यापुढे न ठेवल्यास अशा प्रकारच्या परीक्षा येताच आपण आध्यात्मिकरित्या डगमगण्याचा धोका आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे, की ‘आपण “आशेने हर्षित” होतो का? या आशेबद्दल मनन करण्यासाठी आपण कितीदा वेळ काढतो? परादीस आपल्याला वास्तविक वाटते का? आपण स्वतःला तेथे पाहू शकतो का? या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशाची नुकतेच सत्य शिकल्यानंतर आपण जितकी आतूरतेने वाट पाहात होतो तितकीच आज पाहात आहोत का?’ या शेवटल्या प्रश्‍नाचा गांभिर्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. का? कारण जर आपले उत्तम आरोग्य असेल, आपण आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असू किंवा ज्या भागात आपण राहतो तेथे युद्ध, दुष्काळ किंवा नैसर्गिक विपत्ती यांसारख्या गोष्टींचा फारसा परिणाम होत नसेल तर देवाचे नवीन जग येण्याची किती गरज आहे याचा क्षणभरच का होईना, पण आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे.

६. (अ) पौल व सीला यांच्यावर संकट आले तेव्हा, त्यांनी मुख्यतः कशाबद्दल विचार केला? (ब) पौल व सीला यांच्या उदाहरणामुळे आज आपल्याला कोणते प्रोत्साहन मिळते?

पौलाने रोमी ख्रिश्‍चनांना आणखी एक सल्ला दिला; तो म्हणजे, “संकटात धीर धरा.” (रोमकर १२:१२) संकटांचा पौलाला चांगलाच अनुभव होता. एकदा त्याला दृष्टान्तात एक माणूस दिसला, ज्याने “मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर” अशी विनंती केली. तिथल्या लोकांना यहोवाबद्दल शिकून घेण्यास मदत करण्याचे हे आमंत्रण होते. (प्रेषितांची कृत्ये १६:९) या आमंत्रणाचा स्वीकार करून लूक, सीला आणि तीमथ्य यांना घेऊन पौल जहाजातून युरोपकडे निघाला. या आवेशी मिशनऱ्‍यांकरता काय राखून ठेवले होते? संकट! मासेदोनियातील फिलिप्पै शहरात प्रचार केल्यानंतर पौल आणि सीला यांना फटके मारून तुरुंगात डांबण्यात आले. यावरून दिसून येते की, फिलिप्पै येथील काही नागरिकांना राज्य संदेशात आस्था तर नव्हतीच, पण ते या संदेशाचे कट्टर विरोधी होते. पण या घटनांमुळे त्या आवेशी मिशनऱ्‍यांनी आपला आनंद गमवला का? नाही. त्यांना फटके मारून तुरुंगात डांबण्यात आल्यानंतर ‘मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत व गाणे गाऊन देवाची स्तुति करीत होते.’ (प्रेषितांची कृत्ये १६:२५, २६) अर्थात, पौल व सीला यांना फटके मारण्यात आले तेव्हा त्यांना आनंद झाला नसेल; पण त्या दोन मिशनरी बांधवांनी केवळ त्यांना होणाऱ्‍या यातनांकडे लक्ष दिले नाही. ते मुख्यतः यहोवाबद्दल आणि त्याने त्यांना कशाप्रकारे आशीर्वादित केले याबद्दल विचार करत होते. आनंदी राहून ‘संकटात धीर धरल्यामुळे’ पौल आणि सीला यांनी फिलिप्पै आणि इतर ठिकाणच्या बांधवांकरता उत्तम आदर्श मांडला.

७. प्रार्थनेत आपण आभार का व्यक्‍त केले पाहिजे?

पौलाने लिहिले: “प्रार्थनेत तत्पर राहा.” (रोमकर १२:१२) तुम्ही काळजीत असता तेव्हा प्रार्थना करता का? कशाबद्दल प्रार्थना करता? साहजिकच तुम्ही तुमच्या विशिष्ट समस्येविषयी उल्लेख करून यहोवाची मदत मागत असाल. पण या प्रार्थनेत तुम्ही यहोवाने तुम्हाला दिलेल्या आशीर्वादांबद्दल आभार व्यक्‍त करू शकता. समस्या येतात तेव्हा देखील जर आपण यहोवा आपल्याशी किती चांगुलपणाने व्यवहार करतो याबद्दल विचार केला, तर आपल्याला ‘आशेने हर्षित होण्यास’ मदत मिळेल. दाविदाच्या जीवनात अनेक समस्या आल्या, पण त्याने लिहिले: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही; मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.” (स्तोत्र ४०:५) दावीदाप्रमाणेच जर आपणही यहोवाकडून मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर नियमितपणे मनन केले तर आनंदी न राहणे आपल्याला अशक्य वाटू लागेल.

नेहमी सकारात्मक मनोवृत्ती ठेवा

८. छळाला तोंड देत असतानाही एका ख्रिस्ती व्यक्‍तीला कशामुळे आनंदी राहण्यास मदत मिळते?

येशूने आपल्या अनुयायांना परीक्षा प्रसंगांना तोंड देताना सकारात्मक मनोवृत्ती ठेवण्याचे प्रोत्साहन दिले. त्याने म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.” (मत्तय ५:११) अशा परिस्थितीतही आपल्याकडे आनंदी राहण्याची कोणती कारणे आहेत? आपण विरोधाला तोंड देऊ शकतो हाच एक पुरावा आहे की यहोवाचा आत्मा आपल्यावर आहे. प्रेषित पेत्राने त्याच्या काळातल्या ख्रिस्ती बांधवांना असे सांगितले: “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हांवर येऊन राहिला आहे.” (१ पेत्र ४:१३, १४) यहोवा त्याच्या आत्म्याच्या माध्यमाने आपल्यालाही परीक्षांना तोंड देण्यास व त्याला विश्‍वासू राहण्यास आणि पर्यायाने आपला आनंद टिकवून ठेवण्यास मदत करेल.

९. ख्रिस्ती विश्‍वासामुळे तुरुंगवास झालेल्या काही बांधवांना आनंदी राहण्यास कशामुळे मदत झाली?

अतिशय बिकट परिस्थितीतही आनंदी राहण्याची काही न काही कारणे असतातच. अडॉल्फ नावाच्या एका ख्रिस्ती बांधवाला याचा अनुभव आला. तो ज्या देशात राहतो, तेथे बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आहे. अडॉल्फ व त्याच्या कित्येक सोबत्यांना अटक करण्यात आली आणि बायबलवर आधारित असलेल्या विश्‍वासांना न त्यागल्यामुळे त्यांना अनेक वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातील जीवन कठीण होते पण पौल व सीला यांच्याप्रमाणे, ॲडॉल्फ व त्याच्या सोबत्यांना अशा परिस्थितीतही देवाचे आभार मानण्याजोगी कारणे सापडली. ते म्हणतात की त्यांच्या तुरुंगवासाच्या अनुभवामुळे त्यांचा विश्‍वास आणखी दृढ झाला आणि औदार्य, सहानुभूती, आणि बंधूप्रेम यांसारखे अमूल्य ख्रिस्ती गुण वाढवण्यास त्यांना मदत मिळाली. उदाहरणार्थ, एका कैदी बांधवाला त्याच्या घरून पार्सल यायचे तेव्हा तो त्यातल्या वस्तू आपल्या बांधवांनाही द्यायचा. आणि ते बांधव, अनपेक्षितपणे मिळालेल्या या वस्तू “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्‍या यहोवा देवाकडूनच मिळाल्या आहेत असे मानायचे. अशी ही दयाळू कृत्ये, देणाऱ्‍यांना आणि घेणाऱ्‍यांनाही आनंददायक ठरली. अशारितीने, त्यांचा विश्‍वास खचवण्यासाठी आणलेल्या या परीक्षांनी उलट त्यांना आध्यात्मिकरित्या अधिकच बळकट बनवले!—याकोब १:१७; प्रेषितांची कृत्ये २०:३५.

१०, ११. सतत उलटतपासणी आणि मग अनेक वर्षांचा तुरुंगवास झालेल्या एका बहिणीने या परीक्षेला कसे तोंड दिले?

१० एला नावाची एक बहीण देखील अशा एका देशात राहते, जेथे राज्याच्या कार्यावर कित्येक वर्षांपासून बंदी आहे. तिला देखील ख्रिस्ती आशेविषयी इतरांना सांगितल्यामुळे अटक करण्यात आली. आठ महिने तिची सतत उलटतपासणी घेतली जात होती. शेवटी तिला न्याय खटल्यासाठी आणले गेले तेव्हा तिला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली; आणि ती देखील अशा एका तुरुंगात जेथे तिच्याशिवाय एकही यहोवाचा उपासक नव्हता. त्या वेळी एला फक्‍त २४ वर्षांची होती.

११ अर्थात, तरुणपणाची इतकी वर्षे आपल्याला तुरुंगाच्या कोठडीत काढावी लागणार हे कळल्यावर एलाला आनंद झाला नाही. पण परिस्थितीत बदल करणे आपल्या हातात नाही हे ओळखून एलाने आपल्या दृष्टिकोनात बदल करण्याचे ठरवले. ती तुरुंगाला तिचे साक्षकार्याचे वैयक्‍तिक क्षेत्र समजू लागली. ती म्हणते, “तुरुंगात इतके प्रचार कार्य करायचे होते की पाहता पाहता वर्षे कशी निघून जात होती हे कळतही नव्हतं.” पाच वर्षे झाल्यानंतर एलाची पुन्हा उलटतपासणी घेण्यात आली. तुरुंगात डांबले तरीही तिचा विश्‍वास खचला नव्हता हे पाहिल्यावर उलटतपासणी घेणाऱ्‍यांनी तिला म्हटले: “तुझी सुटका होणार नाही; तू बदलली नाहीस.” यावर एलाने ठामपणे त्यांना उत्तर दिले: “नाही, मी बदलले आहे! जेव्हा तुरुंगात टाकण्यात आले तेव्हाच्या तुलनेत आज मी अधिक चांगल्या मनःस्थितीत आहे आणि माझा विश्‍वास पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त मजबूत झाला आहे!” पुढे ती म्हणाली: “तुम्हाला माझी सुटका करायची नसेल तर नका करू, यहोवाला माझी सुटका करणे योग्य वाटेल तोपर्यंत मी इथेच राहीन!” साडेपाच वर्षे कैदेत घालवल्यावरही एलाने आपला आनंद गमवला नव्हता! आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायला ती शिकली होती. तिच्या उदाहरणावरून तुम्हाला काही शिकायला मिळते का?—इब्री लोकांस १३:५.

१२. कठीण प्रसंगांना तोंड देताना ख्रिस्ती व्यक्‍तीला मानसिक शांती कशी अनुभवता येईल?

१२ या आव्हानांना तोंड देण्यासाठी एलाजवळ काही खास सामर्थ्य होते असे समजू नका. तुरूंगवासाची शिक्षा व्हायच्या काही महिन्यांआधी एलाची उलटतपासणी घेण्यात येत होती तेव्हा तिची कशी स्थिती झाली होती याविषयी ती स्वतः कबूल करते की “मला आठवतं माझे दात कडकडत होते, घाबरलेल्या चिमणीसारखी माझी अवस्था झाली होती.” पण एलाचा यहोवावर दृढ विश्‍वास आहे. ती त्याच्यावर भरवसा ठेवण्यास शिकली आहे. (नीतिसूत्रे ३:५-७) यामुळे आज देव तिच्याकरता पूर्वीपेक्षा जास्त वास्तविक बनला आहे. ती सांगते: “मी जेव्हाजेव्हा त्या उलटतपासणीच्या खोलीत जायचे तेव्हा मला आपोआप अगदी शांत वाटू लागायचे. . . . ते लोक मला घाबरवण्याचा जितका प्रयत्न करायचे तितकीच माझी शांती आणखी वाढायची.” एलाला ही शांती यहोवाने दिली. प्रेषित पौल म्हणतो: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

१३. आपल्यावर संकट आले तरीही आपल्याला त्या परीक्षेत टिकून राहण्याचे सामर्थ्य मिळेल हे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

१३ एलाची आता सुटका झाली आहे, पण त्या कठीण परिस्थितीला तोंड देताना तिने आपला आनंद टिकवून ठेवला. अर्थात तिने हे स्वतःच्या नव्हे तर यहोवाने पुरवलेल्या सामर्थ्याने साध्य केले. हेच प्रेषित पौलाच्याही बाबतीत घडले. पौलाने लिहिले: “ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्‍तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. . . . कारण जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.”—२ करिंथकर १२:९, १०.

१४. कठीण परिस्थितीतही एक ख्रिस्ती व्यक्‍ती सकारात्मक मनोवृत्ती कशी बाळगू शकते आणि याचा काय परिणाम होऊ शकतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१४ तुम्हाला सध्या ज्या दबावांना तोंड द्यावे लागते ते कदाचित येथे आपण विचारात घेतलेल्या समस्यांपेक्षा वेगळे असतील. दबाव कोणत्याही प्रकारचे असोत, ते तोंड द्यायला कठीणच असतात. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी कदाचित तुमचे वरिष्ठ इतर धर्मांच्या कर्मचाऱ्‍यांपेक्षा मुद्दामहून तुमच्या कामाची जरा जास्तच टीका करत असतील. कदाचित तुम्हाला दुसरी नोकरी मिळणे शक्य नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकता? अडॉल्फ व त्याच्या सोबत्यांचे उदाहरण आठवा; तुरुंगात राहण्याच्या अनुभवामुळे त्यांना चांगले गुण शिकायला मिळाले. तुम्ही देखील तुमच्या वरिष्ठांना संतुष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकता. ते “कठोर” असले तरीही तुम्ही त्यांना संतुष्ट करण्याचा तुमच्या परीने प्रयत्न केल्यास तुमच्या व्यक्‍तीमत्त्वात धीर आणि सहनशीलता यांसारखे ख्रिस्ती गुण विकसित होतील. (१ पेत्र २:१८) शिवाय, तुम्ही तुमच्या कामातही आणखी निपुण व्हाल आणि अशारितीने पुढे कधी संधी आल्यास दुसऱ्‍या ठिकाणी चांगली नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. आता आपण इतर काही मार्गांनी यहोवाच्या सेवेतला आपला आनंद कसा टिकवून ठेवावा यावर चर्चा करू.

जीवन साधे ठेवल्यामुळे आनंदी

१५-१७. ताणतणावांचे कारण जरी पूर्णपणे काढता आले नाही तरीसुद्धा एका जोडप्याला कोणत्या गोष्टीमुळे जीवनातला ताणतणाव कमी करता आला?

१५ कोणत्या प्रकारचे काम करायचे किंवा कोठे काम करायचे हे ठरवणे कदाचित तुमच्या हातात नसेल, पण जीवनातल्या इतर काही गोष्टी असतील ज्यांवर काही अंशी तुमचे नियंत्रण आहे. पुढील अनुभव विचारात घ्या.

१६ एका ख्रिस्ती जोडप्याने एका वडिलांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते. बोलता बोलता, त्या बांधवाने व त्यांच्या पत्नीने वडिलांजवळ कबूल केले की अलीकडे त्यांना जीवनाच्या दबावांमुळे अगदी पस्त झाल्यासारखे वाटू लागले आहे. त्या दोघांजवळ पूर्ण वेळेच्या नोकऱ्‍या होत्या पण इतर ठिकाणी काम शोधणे शक्य नव्हते. असे किती काळ चालत राहील हे त्यांना कळत नव्हते.

१७ त्यांनी वडिलांना सल्ला मागितला तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “जीवन साधे ठेवा.” कसे? तो पती आणि त्याची पत्नी दररोज कामाला जाण्या-येण्याकरता तीन तास खर्च करत होते. वडील त्या जोडप्याला चांगले ओळखत होते; त्यांनी त्यांना असा सल्ला दिला की जर त्यांनी नोकरीच्या ठिकाणाजवळ घर शोधले तर येण्या-जाण्यात खर्च होणारा वेळ ते कमी करू शकत होते. हाच वेळ ते इतर महत्त्वाच्या कामांसाठी किंवा फक्‍त विसावा घेण्यासाठी उपयोगात आणू शकत होते. जर जीवनाच्या दबावांमुळे तुमचाही आनंद हळूहळू नाहीसा होऊ लागला असेल तर सध्याच्या परिस्थितीत काही फेरबदल केल्यामुळे ही परिस्थिती बदलता येईल का याविषयी तुम्हीही का विचार करत नाही?

१८. कोणतेही निर्णय घेण्याआधी नीट विचार करणे का महत्त्वाचे आहे?

१८ ताणतणाव कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करणे. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती बांधवाने घर बांधण्याचे ठरवले. घर बांधण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता, तरी त्यांनी घरासाठी अतिशय गुंतागुंतीचे डिझाईन निवडले. आता त्यांना जाणीव झाली आहे, की जर घरासाठी डिझाईन निवडण्याआधीच त्यांनी ‘नीट पाहून पाऊल टाकले’ असते तर कित्येक अनावश्‍यक समस्या टळल्या असत्या. (नीतिसूत्रे १४:१५) दुसऱ्‍या एका ख्रिस्ती बांधवाने कर्ज काढू इच्छिणाऱ्‍या एका बांधवाच्या कर्जास जामीन राहण्याची तयारी दाखवली. कराराप्रमाणे कर्ज घेणारा परतफेड करू शकला नाही तर जामीन राहणाऱ्‍याला ते फेडावे लागणार होते. सुरवातीला सर्वकाही सुरळीत चालले, पण काही काळाने कर्ज घेणारा परतफेड करण्यास टाळाटाळ करू लागला. कर्ज देणारा घाबरला आणि जामीन राहणाऱ्‍या बांधवाने पूर्ण कर्ज फेडावे अशी मागणी करू लागला. अर्थातच जामीन राहिलेल्या बांधवावर मोठा दबाव आला. जर त्याने कर्जाची जबाबदारी स्वीकारण्याआधीच सर्व गोष्टींचा नीट विचार केला असता तर ही समस्या टळू शकली असती का?—नीतिसूत्रे १७:१८.

१९. कोणत्या काही मार्गांनी आपण जीवनातील ताणतणाव कमी करू शकतो?

१९ आपण थकतो तेव्हा आपण कधीही असा विचार करू नये की वैयक्‍तिक बायबल अभ्यास, क्षेत्र सेवा आणि सभा या गोष्टींकडे थोडे दुर्लक्ष करून आपण आपला तणाव थोडा कमी करू शकतो किंवा गमवलेला आनंद आणि उत्साह पुन्हा मिळवू शकतो. हे तर यहोवाचा आत्मा मिळण्याचे महत्त्वाचे मार्ग आहेत; आणि आनंद यहोवाच्या आत्म्याच्या फळांपैकी एक आहे. (गलतीकर ५:२२) ख्रिस्ती कार्ये नेहमीच उत्साहवर्धक असतात आणि सहसा खूप थकवा आणणारी नसतात. (मत्तय ११:२८-३०) उलट, आध्यात्मिक नव्हे तर इतर कामांमुळे किंवा मनोरंजनाकरता खूप वेळ दिल्यामुळेच कदाचित आपल्याला जास्त थकवा येत असेल. दररोज रात्री झोपण्याकरता फार उशीर न लावल्यास कदाचित काही काळातच आपला हरवलेला उत्साह परत येईल. एरवीपेक्षा थोडी जास्त विश्रांती घेतल्यामुळे सहसा बरीच मदत मिळते. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून आपल्या मृत्यूपर्यंत कार्य केलेले एन. एच. नॉर सहसा मिशनऱ्‍यांना असे सांगायचे: “कधी निरुत्साहित झाल्यासारखे वाटते तेव्हा सर्वात आधी थोडी विश्रांती घ्या. रात्री चांगली झोप झाल्यानंतर कोणत्याही समस्या तितक्या कठीण वाटत नाहीत!”

२०. (अ) आनंद टिकवून ठेवण्याचे कोणते मार्ग आहेत हे थोडक्यात सांगा. (ब) आनंदी राहण्याची कोणती कारणे तुम्ही सांगू शकता? (पृष्ठ १७ वरील पेटी पाहा.)

२० ‘आनंदी देवाची’ उपासना करणे हा ख्रिस्ती लोकांना मिळालेला एक बहुमान आहे. (१ तीमथ्य १:११, NW) आपण पाहिल्याप्रमाणे, गंभीर समस्या येतात तेव्हा देखील आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो. त्यासाठी आपण राज्याची आशा सदैव डोळ्यापुढे ठेवण्याचा, गरज पडेल तेव्हा आपल्या विचारसरणीत बदल करण्याचा आणि आपले जीवन साधे ठेवण्याचा संकल्प करू या. असे केल्यास, कोणतीही परिस्थिती आपल्यासमोर आली तरीही आपण पौलाच्या या सल्ल्याचे पालन करू शकू, “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.”—फिलिप्पैकर ४:४.

या प्रश्‍नांवर विचारपूर्वक लक्ष द्या:

• ख्रिस्ती व्यक्‍तीने राज्याची आशा क्षणभरही नजरेआड का होऊ देऊ नये?

• कठीण परिस्थितीतही आपला आनंद टिकवून ठेवण्यास आपल्याला कशामुळे मदत होईल?

• आपण आपले जीवन साधे ठेवण्याचा का प्रयत्न केला पाहिजे?

• काही जणांनी कोणत्या बाबतीत आपल्या जीवनात साधेपणा आणला आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चौकट/चित्रे]

आनंदी राहण्याची आणखी काही कारणे

ख्रिस्ती या नात्याने आपल्याकडे आनंदी राहण्याची अनेक कारणे आहेत. पुढील काही कारणांवर विचार करा:

१. आपल्याला यहोवाची ओळख झाली आहे.

२. आपल्याला देवाच्या वचनातील सत्य शिकायला मिळाले आहे.

३. येशूच्या बलिदानाच्या माध्यमाने आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळणे शक्य आहे.

४. देवाचे राज्य शासन करत आहे—लवकरच नवे जग येईल!

५. यहोवाने आपल्याला एका आध्यात्मिक परादीसात आणले आहे.

६. आपण ख्रिस्ती बांधवांच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकतो.

७. प्रचार कार्यात सहभागी होण्याचा बहुमान आपल्याला लाभला आहे.

८. आपण जिवंत आहोत आणि माफक आरोग्यही आपल्याला लाभले आहे.

आनंदी राहण्याच्या आणखी कोणकोणत्या कारणांचा तुम्ही उल्लेख करू शकता?

[१३ पानांवरील चित्र]

पौल व सीला तुरुंगातही आनंदी होते

[१५ पानांवरील चित्रे]

तुम्ही देवाच्या नवीन जगाच्या आनंददायक आशेवर लक्ष केंद्रित केले आहे का?