“यहोवानं माझ्यावर खूप दया केली आहे!”
“यहोवानं माझ्यावर खूप दया केली आहे!”
मार्च, १९८५ सालच्या एका रम्य सायंकाळी, अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातील लेखन विभागाचे बंधूभगिनी एक महत्त्वाचा प्रसंग साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. त्या दिवशी बंधू कार्ल एफ. क्लाईन यांनी पूर्ण वेळेच्या सेवेत ६० वर्षे पूर्ण केली होती. बंधू क्लाईन अगदी उत्साहाने म्हणाले होते: “यहोवानं माझ्यावर खूप दया केली आहे!” त्यांनी असेही म्हटले, की स्तोत्र ३७:४ हे त्यांचे आवडते बायबल वचन होते. नंतर चेलो वाद्य वाजवून त्यांनी सर्वांना खूष केले.
यानंतर पुढील १५ वर्षांमध्ये बंधू कार्ल क्लाईन यांनी लेखन विभागात व यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून कार्य केले. आणि शेवटी जानेवारी ३, २००१ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी कार्ल क्लाईन यांनी पृथ्वीवरील आपले जीवन विश्वासूपणे समाप्त केले.
कार्ल यांचा जन्म जर्मनीचा. त्यांचे कुटुंब संयुक्त संस्थानात राहायला आल्यामुळे इल्यिनोईस, शिकागोच्या उपनगरात ते लहानाचे मोठे झाले. लहान वयापासूनच कार्ल आणि त्यांचा भाऊ टेड हे दोघे बायबलमध्ये आवड घेऊ लागले होते. १९१८ मध्ये कार्ल यांचा बाप्तिस्मा झाला. १९२२ साली बायबल विद्यार्थ्यांच्या एका अधिवेशनात कार्लने ऐकलेल्या स्फूर्तीदायक गोष्टींमुळे त्यांच्या मनात क्षेत्र सेवेबद्दलचे प्रेम निर्माण झाले होते. हे प्रेम जीवनभर टिकले. त्यांना एकही आठवडा प्रचार कार्य चुकवायची इच्छा नसायची. आपल्या जीवनाच्या अगदी शेवटल्या आठवड्यांतही त्यांनी प्रचारकार्यात भाग घेतला.
बंधू कार्ल १९२५ साली मुख्यालयाचे सदस्य बनले. सुरवातीला त्यांना छापखान्यात काम मिळाले. संगीत त्यांच्यासाठी जीव की प्राण होते. काही वर्षांपर्यंत तर त्यांनी ख्रिस्ती रेडिओ कार्यक्रमांमध्ये आपल्या चेलोवर ऑर्केस्ट्रा कार्यक्रम देखील केले. त्यानंतर, त्यांनी सेवा विभागात कार्य केले. सेवा विभागाचे पर्यवेक्षक बंधू टी. जे. सल्लेवन यांच्या सहवासात काम करायला त्यांना आवडायचे. यादरम्यान त्यांचा भाऊ टेड आणि त्यांची पत्नी डोरीस यांनी प्वेर्टो रिको येथे मिशनरी सेवा सुरू केली.
बंधू कार्ल क्लाईन यांनी अर्धे शतक लेखन विभागात कार्य केले. या विभागातील कार्याला त्यांनी विलक्षण हातभार लावला. कारण, वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करायला त्यांना खूप आवडत असे. शिवाय ते बायबलचे गाढे पंडितही होते. १९६३ साली बंधू कार्ल क्लाईन यांनी बोलिव्हिया येथे सेवा करणारी एक जर्मन मिशनरी, मार्ग्रेटा हिच्याशी विवाह केला. तब्येतीची समस्या असतानाही त्यांनी तिच्या प्रेमळ सहकार्यामुळे निवृत्तीचे वय ओलांडल्यावरही कित्येक वर्षे या कार्यात मोलाचा हातभार लावला. कार्ल यांचा स्वाभाविक स्पष्टवक्तेपणा आणि संगीतकारासारखा आवेश या गुणांमुळे मंडळ्यांमधील व अधिवेशनांतील त्यांची भाषणे सर्वांच्या स्मरणात राहिली. त्यांचा मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी न्यू यॉर्क येथील मोठ्या बेथेल कुटुंबात सकाळच्या दैनिक वचनाची चर्चा केली तेव्हा सर्वांना आनंद वाटला व लाभही झाला.
टेहळणी बुरूज नियमितपणे वाचणाऱ्यांना, ऑक्टोबर १, १९८४ च्या अंकात प्रकाशित झालेली बंधू कार्ल क्लाईन यांची जीवन कथा अजूनही आठवत असेल. त्यांच्या अनुभवांची ती अपीलकारक कथा होती. तुम्हीही ती एकदा किंवा अनेकदा वाचली तरीसुद्धा तुम्हाला ती आवडेल. हा लेख लिहिल्यानंतर या लेखकाने पंधरा वर्षे विश्वासू व भक्तिमान ख्रिस्ती म्हणून आपले जीवन व्यतित केले होते.
बंधू क्लाईन प्रभूच्या अभिषिक्तांपैकी एक होते. ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये राज्य करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. यहोवाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे हा आम्हाला पूर्ण भरवसा आहे.—लूक २२:२८-३०.
[३१ पानांवरील चित्र]
टी. जे. सल्लेवन आणि टेड व डोरिस यांच्याबरोबर कार्ल, १९४३ साली
[३१ पानांवरील चित्र]
कार्ल आणि मार्ग्रेटा, ऑक्टोबर २०००