विधवांना त्यांच्या संकटांत मदत करणे
विधवांना त्यांच्या संकटांत मदत करणे
विधवांच्या संदर्भात बायबलमधली सर्वांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे रूथ आणि तिची सासू नामी यांची. या दोघीही विधवा होत्या. पण नामीने केवळ आपल्या पतीलाच नव्हे तर आपल्या दोन्ही मुलांनाही गमावले होते, ज्यांपैकी एक रूथचा पती होता. कृषिप्रधान समाजात राहात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात सहसा पुरुषच कर्ताधर्ता असायचा; त्याअर्थी त्यांच्यावर खरोखर आभाळ कोसळले होते.—रूथ १:१-५, २०, २१.
पण नामीची सून रूथ तिची जिवाभावाची सखी बनली, तिने नामीचे सांत्वन केले आणि सतत तिच्या पाठीशी राहिली. नामीवर मनापासून प्रेम असल्यामुळे आणि केवळ तिच्यावरच नाही तर देवावरही तितकेच प्रेम असल्यामुळे कालांतराने, नामीकरता रूथ ‘सात पुत्रांहून अधिक चांगली’ बनली. (रूथ ४:१५) रूथने आपल्या मवाबी कुटुंबीयांकडे परत जावे असे नामीने सुचवले तेव्हा रूथने तिला दिलेले उत्तर मनाला स्पर्शून जाते. शिवाय या शब्दांतून तिची एकनिष्ठतेची भावनाही दिसून येते: “तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल; मृत्यु खेरीज करून तुमचा-माझा कशानेहि वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.”—रूथ १:१६, १७.
रूथची ही अप्रतिम मनोवृत्ती यहोवा देवाच्या नजरेतून सुटली नाही. त्याने नामी आणि रूथ यांच्या लहानशा कुटुंबाला आशीर्वाद दिला आणि कालांतराने रूथचे बवाज नावाच्या एका इस्राएली पुरुषासोबत लग्न झाले. त्यांना झालेला पुत्र येशू ख्रिस्ताचा पूर्वज बनला; नामीने या बाळाची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. यहोवा देवाला जडून राहणाऱ्या व त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवणाऱ्या विधवांची यहोवा कशाप्रकारे काळजी वाहतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रूथ व नामीचा हा ऐतिहासिक वृत्तान्त. बायबल आपल्याला असेही सांगते की जे लोक विधवांना त्यांच्या संकटांत मदत करतात ते यहोवा देवाला प्रिय आहेत. मग आज आपल्यामध्ये असलेल्या विधवांना आपण कशाप्रकारे साहाय्य करू शकतो?—रूथ ४:१३, १६-२२; स्तोत्र ६८:५.
मदत करा पण दबाव न आणता
एखाद्या विधवेला मदत देताना, तुम्ही कोणत्याप्रकारे मदत करू शकता हे तिला स्पष्टपणे सांगा पण तिच्यासाठी निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नका. “काही मदत लागली तर सांगा,” या प्रकारची अस्पष्ट विधाने करू नका. कारण असे करणे, थंडीत कुडकुडणाऱ्या उपाशी माणसाला “ऊब घ्या व तृप्त व्हा” असे म्हणून त्याच्यासाठी काहीही न करण्यासारखे ठरेल. (याकोब २:१६) बरेच लोक मदत लागली तरी सांगत नाहीत. उलट ते निमूटपणे सहन करत राहतात. अशा लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला विचारशक्तीचा उपयोग करावा लागतो, त्यांना कशाची गरज आहे हे ओळखावे लागते. पण जर याबाबतीत अतिरेक केला, किंवा त्या विधवेच्या जीवनावर नियत्रंण करण्याचा प्रयत्न केला तर भावना दुखावण्याची किंवा बेबनाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, इतरांसोबत व्यवहार करताना संतुलित असण्याच्या महत्त्वावर बायबलमध्ये जोर दिला आहे. त्यात इतर लोकांबद्दल निःस्वार्थ आस्था बाळगण्याचे प्रोत्साहन तर दिले आहे पण त्याच वेळी दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नये याचीही आठवण करून दिली आहे.—फिलिप्पैकर २:४; १ पेत्र ४:१५.
रूथ नामीशी अशाच संतुलित मनोवृत्तीने वागली. ती एकनिष्ठपणे आपल्या सासूच्या पाठीशी राहिली पण तिने कधीही तिला विशिष्ट निर्णय घ्यायला भाग पाडले नाही किंवा तिच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. आवश्यकता पडली तेव्हा तिने काहीबाबतीत विचारपूर्वक पुढाकार घेतला, उदाहरणार्थ, स्वतः जाऊन नामीकरता व तिच्याकरता अन्न आणले पण तेसुद्धा नामीने दिलेल्या सूचनांनुसार.—रूथ २:२, २२, २३; ३:१-६.
अर्थात, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात. या आधी उल्लेख केलेली सॅन्ड्रा म्हणते: “माझ्या दुःखात मला माझ्या जवळच्या माणसांची गरज होती आणि ते सर्वजण माझ्याजवळ होते.” पण ईलेन, जिचा उल्लेख देखील आधी आला होता, तिला मात्र एकांताची गरज होती. त्याअर्थी, मदत करणे म्हणजे त्या व्यक्तीला नेमके काय हवे आहे हे ओळखणे; आणि मदतीसाठी धावून येण्यास सदैव तयार असण्यासोबतच, तिला एकटे राहावेसे वाटते तेव्हा तिच्या भावनांचा आदर करणे.
कुटुंबाचा आधार
विधवा झालेल्या स्त्रीला एक प्रेमळ कुटुंब असल्यास तिच्या दुःखातून सावरण्याचा आत्मविश्वास तिला मिळू शकतो. कुटुंबातील सदस्य इतरांपेक्षा जास्त मदत देण्याच्या स्थितीत असतील, पण सर्वजण थोडीबहुत मदत देऊ शकतात. “कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.”—१ तीमथ्य ५:४.
बऱ्याचदा आर्थिक मदत देऊन उपकार ‘फेडण्याची’ कदाचित गरज पडणार नाही. कारण काही विधवा आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता आर्थिक दृष्ट्या समर्थ असतात तर इतरजणी, काही देशांत असलेल्या सुविधांनुसार सरकारकडून साहाय्य मिळण्यास पात्र ठरू शकतात. पण याकोब १:२७.
जेव्हा त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असते, अशा वेळी कौटुंबिक सदस्यांनी मदत केली पाहिजे. त्या विधवेला आर्थिक आधार देण्याकरता कोणी जवळचे नातलग नसल्यास, सहविश्वासू बांधवांनी तिच्या मदतीला धावून यावे असे बायबलमध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.”—बायबलमध्ये दिलेल्या या तत्त्वांचे जे पालन करतात, ते खऱ्या अर्थाने ‘विधवांचा सन्मान’ करतात. (१ तीमथ्य ५:३) एका व्यक्तीचा सन्मान करण्याचा अर्थ त्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करणे. एखाद्या व्यक्तीला सन्मान दाखवला जातो तेव्हा, लोक आपली कदर करतात, त्यांना आपली काळजी आहे व त्यांना आपल्याविषयी आदर आहे असे त्या व्यक्तीला जाणवते. केवळ कर्तव्य म्हणून लोक मदत करत आहेत असे तिला वाटणार नाही. रूथ स्वतः काही काळापर्यंत विधवा असली तरीही तिने नामीला खरोखर सन्मान दाखवला. तिने नामीच्या शारीरिक व भावात्मक गरजा आनंदाने व प्रेमळपणे पूर्ण केल्या. म्हणूनच रूथच्या या आदर्श मनोवृत्तीची लोक वाहवा करू लागले; तिच्या भावी पतीने एकदा तिला म्हटले: “माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस.” (रूथ ३:११) अर्थातच नामी ही देवावर प्रेम करणारी स्त्री होती, शिवाय तिचा हक्क गाजवण्याचा स्वभाव नव्हता, उलट रूथ तिच्यासाठी जे काही करत होती त्याबद्दल ती कृतज्ञ होती. तिच्या अशा मनोवृत्तीमुळे रूथला तिची काळजी घेणे आनंददायकच वाटले असेल यात शंका नाही. नामीचे उदाहरण आज विधवांकरता किती उत्तम आहे!
देवाच्या जवळ या
अर्थात, जोडीदाराच्या मृत्यूमुळे जीवनात आलेली पोकळी कौटुंबिक सदस्य आणि मित्र भरून काढू शकत नाहीत. त्यामुळे शोकाकूल व्यक्तीने ‘आमच्यावरील सर्व संकटात जो आमचे सांत्वन करितो, तो पिता व सर्व सांत्वनदाता देव’ याचीच आस धरून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. (२ करिंथकर १:३, ४) हन्ना नावाच्या एका विधवेचे उदाहरण विचारात घ्या. देवाला भिणारी ही विधवा येशूच्या जन्माच्या वेळी ८४ वर्षांची होती.
विवाहानंतर केवळ सात वर्षांनी हन्नाच्या पतीचा मृत्यू झाला. सांत्वनाकरता हन्नाने यहोवाचा आश्रय घेतला. “[ती] मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे.” (लूक २:३६, ३७) यहोवाने हन्नाच्या या प्रामाणिक सेवेचे तिला प्रतिफळ दिले का? होय! त्याने तिच्याबद्दल एका खास मार्गाने प्रेम व्यक्त केले. अर्थात, मोठा होऊन जो या जगाचा मुक्तिदाता होणार होता त्या तान्ह्या बाळाला पाहण्याची तिला यहोवाने संधी दिली. यामुळे हन्नाला किती आनंद व सांत्वन मिळाले असेल याची आपण कल्पना करू शकतो! स्तोत्र ३७:४ येथे दिलेल्या शब्दांची सत्यता तिने अनुभवली: “परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.”
सहविश्वासू बांधवांच्या माध्यमातून देव मदत करतो
ईलेन म्हणते: “डेव्हिड गेल्यानंतर बराच काळ मला एक विशिष्ट प्रकारची शारीरिक वेदना जाणवायची; असे वाटायचे जणू माझ्या बरगड्यांत सुरा खुपसला जातोय. मला वाटले कदाचित अपचनामुळे मला पोटात असे दुखत असेल. एकदा तर वेदना इतकी असह्य झाली की आता डॉक्टरांकडे जावे लागेल असे मला वाटू लागले. एक समजूतदार आध्यात्मिक बहीण असलेल्या माझ्या मैत्रिणीने असे सुचवले की कदाचित मी दुःखी असल्यामुळे मला ही शारीरिक वेदना होत असावी. तिने मला यहोवाला मदत व सांत्वन देण्याकरता प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. मी लगेच, त्याच क्षणी तिने सांगितल्याप्रमाणे केले. मनातल्या मनात प्रार्थना केली आणि माझ्या दुःखातून सावरायला मदत कर अशी यहोवाला विनंती केली. आणि खरोखर, त्याने माझी प्रार्थना ऐकली!” ईलेन हळूहळू सावरू लागली आणि लवकरच तिचे शारीरिक दुखणे देखील नाहीसे झाले.
खासकरून मंडळीचे वडील शोकाकूल विधवांना प्रेमळपणे व मैत्रीपूर्ण रितीने मदत करू शकतात. विचारशीलपणे व समजूतदारपणे नियमित आध्यात्मिक पाठबळ आणि सांत्वन देऊन वडील त्यांना त्यांच्या परीक्षांना तोंड देण्यास व यहोवाशी निकट संबंध ठेवण्यास मदत करू शकतात. आवश्यक असल्यास वडील भौतिक मदत देखील देण्याची व्यवस्था करू शकतात. असे सहानुभूतिशील, समजूतदार वडील खरोखर “वाऱ्यापासून आसरा” ठरतात.—यशया ३२:२; प्रेषितांची कृत्ये ६:१-३.
पृथ्वीच्या नव्या राजाकडून कायमचे सांत्वन
वृद्ध हन्ना दोन हजार वर्षांपूर्वी ज्याला पाहून हर्षित झाली होती तो आज देवाच्या स्वर्गीय राज्याचा मशिही राजा बनला आहे. हे सरकार लवकरच दुःखाची सर्व कारणे नाहीशी प्रकटीकरण २१:३, ४ म्हणते: “पाहा देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. . . . तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” वरील शब्द ‘मनुष्यांच्या’ संदर्भात आहेत हे तुमच्या लक्षात आले का? होय, मनुष्यांना मृत्यूपासून आणि त्यामुळे येणारे दुःख आणि कष्ट यांपासून कायमची मुक्तता मिळेल.
करेल; यात मृत्यूचाही समावेश आहे. या संदर्भातपण सुवार्ता इतकीच नाही! बायबल म्हणते की मृत लोकांचे पुनरुत्थान होईल. “कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) येशूने ज्याचे पुनरुत्थान केले होते त्या लाजारप्रमाणे सर्व मृतजन आत्मिक प्राण्यांच्या रूपात नव्हे तर मनुष्यांच्याच रूपात परत येतील. (योहान ११:४३, ४४) त्यानंतर जे “सत्कर्मे” करतील त्यांना मानवी परिपूर्णता प्राप्त होईल आणि यहोवा त्यांची प्रेमळ पित्यासमान देखभाल करेल आणि ‘आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करेल.’—स्तोत्र १४५:१६.
ज्यांच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि जे या सुनिश्चित आशेवर विश्वास ठेवतात त्यांना मोठे सांत्वन प्राप्त होते. (१ थेस्सलनीकाकर ४:१३) तुम्हालाही वैधव्य आले असेल, तर सांत्वनासाठी व तुमच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देण्याकरता मदतीसाठी ‘निरंतर प्रार्थना’ करत राहा. (१ थेस्सलनीकाकर ५:१७; १ पेत्र ५:७) आणि दररोज वेळ काढून देवाच्या वचनाचे वाचन जरूर करा; असे केल्यामुळे तुम्हाला देवाच्या विचारांकरवी सांत्वन मिळेल. या गोष्टींचे तुम्ही पालन केले तर तुम्ही स्वतः हे अनुभवाल की एक विधवा म्हणून तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही यहोवा खरोखर तुम्हाला शांती मिळवण्यास मदत करेल.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
मदतीसाठी धावून येण्यास सदैव तयार असण्यासोबतच, एखाद्या व्यक्तीला एकटे राहावेसे वाटते तेव्हा तिच्या भावनांचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे
[७ पानांवरील चित्र]
हन्ना या वृद्ध विधवेला देवाने आशीर्वादित केले