संपूर्ण बायबल एकाच खंडात
संपूर्ण बायबल एकाच खंडात
बायबलच्या प्रती बनवण्यासाठी ख्रिश्चनांनी सर्वप्रथम कोडेक्सचा उपयोग केला; ती गुंडाळी नाही तर एक पुस्तक आहे. परंतु ख्रिश्चनांनी, बायबलमधील सर्व पुस्तकांना एकाच खंडात समाविष्ट करण्याची लागलीच सुरवात केली नाही. संपूर्ण बायबल एकाच खंडात सामावण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल फ्लेव्हियस कॅसियोदोरस याने सहाव्या शतकात उचलले.
फ्लेव्हियस मॅग्नस ऑरेलियस कॅसियोदोरस याचा जन्म सा.यु. ४८५-४९० च्या सुमारास, आधुनिक काळातील इटलीच्या दक्षिण टोकाला असलेल्या कॅलेब्रिया येथील एका श्रीमंत घराण्यात झाला. इटालियन इतिहासाच्या खळबळजनक काळात तो राहात होता; कारण त्या द्वीपकल्पावर प्रथम गॉथ लोकांनी आणि नंतर बायझंटाईन लोकांनी कब्जा केला होता. कॅसियोदोरस जवळजवळ ६०-७० वर्षांचा होता तेव्हा त्याने स्क्वीलेचे, कॅलिब्रिया येथील आपल्या घरानजीक व्हिव्हेरियम मठ आणि ग्रंथालय यांची स्थापना केली.
मेहनती बायबल संपादक
बायबल लोकांपर्यंत कसे पोहंचवावे ही मुख्य चिंता कॅसियोदोरसला लागली होती. इतिहासकार पीटर ब्राऊन लिहितात, “कॅसियोदोरसच्या मते, शास्त्रवचने उपलब्ध करण्यासाठी सर्व लॅटिन साहित्याचा उपयोग करण्याची गरज होती. प्राचीन ग्रीक शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यासाठी व प्रती बनवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी सर्व साधने शास्त्रवचने समजण्यासाठी व सावधगिरीने त्यांच्या प्रती काढण्यासाठी वापरली जाणार होती. नुकतेच निर्माण करण्यात आलेल्या आकाशमंडलाप्रमाणे, संपूर्ण लॅटिन संस्कृती देव वचनाच्या प्रचंड सूर्याभोवती भ्रमण करणार होती.”
कॅसियोदोरसने संपूर्ण बायबल पडताळून पाहण्यासाठी व्हिव्हेरियम मठात अनुवादकांना आणि व्याकरणकारांना जमा केले आणि संपादनाच्या त्रासदायक कार्याची देखरेख स्वतःच केली. त्याने केवळ काही निवडक पंडितांनाच या कार्यात सामील केले. या पंडितांना, मजकुरात काही फरक वाटला तर शास्त्र्यांच्या हातून चुका झाल्या आहेत असे समजून लगेच सुधार करायचे नव्हते. व्याकरणाविषयी प्रश्न उद्भवल्यास, तेव्हाच्या स्वीकृत लॅटिन भाषेच्या पद्धतींपेक्षा त्यांना प्राचीन बायबलची हस्तलिखिते अधिक विश्वासार्ह मानायची होती. कॅसियोदोरसने सूचना दिल्या: “योग्य व्याकरणासंबंधी वैशिष्ट्ये . . . तशीच राहू द्यावीत कारण प्रेरित असलेल्या वचनात भेसळ होऊ शकत नाही. . . . एखादी गोष्ट व्यक्त करण्याची बायबलची पद्धत, रूपक आणि वाक्प्रचार त्याचप्रमाणे विशेष नामांची ‘इब्री’ रूपे देखील लॅटिन भाषेनुसार एकदम वेगळी वाटत असली तरीही ती तशीच ठेवावीत.”—द केंब्रिज हिस्टरी ऑफ द बायबल.
कोडेक्स ग्रँडिओर
व्हिव्हेरियम मठातील नकलाकारांना लॅटिन भाषेत बायबलच्या कमीतकमी तीन वेगळ्या आवृत्त्या करायचे काम देण्यात आले होते. यांतील नऊ खंडांच्या एका आवृत्तीत प्राचीन लॅटिन भाषांतर होते जे दुसऱ्या शतकाच्या शेवटी करण्यात आले होते. दुसऱ्या आवृत्तीत लॅटिन व्हल्गेटचा समावेश होता; जेरोमने ही आवृत्ती पाचव्या शतकाच्या सुरवातीच्या आसपास पूर्ण केली. तिसरी आवृत्ती, कोडेक्स ग्रँडिओर अर्थात “मोठे कोडेक्स” बायबलच्या तीन लिखाणांतून तयार करण्यात आले होते. या शेवटल्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये, बायबलची सर्व पुस्तके एकाच खंडात एकत्र करण्यात आली.
असे समजले जाते की, सर्वप्रथम कॅसियोदोरसने लॅटिन * बायबलच्या सर्व पुस्तकांचा एक खंड तयार करणे कितीतरी सोयीचे आहे, त्यामुळे पुष्कळ खंड पाहण्यात वेळ जात नाही हे त्याने पाहिले होते.
बायबलचा एक खंड तयार करून त्याला पॅन्डेक्टे असे नाव दिले.दक्षिण इटलीपासून ब्रिटिश बेटांपर्यंत
कॅसियोदोरसच्या मृत्यूनंतर काही काळातच (सुमारे सा.यु. ५८३), कोडेक्स ग्रँडिओरचा प्रवास सुरू झाला. त्या वेळी, व्हिव्हेरियम संग्रहालयातल्या काही वस्तू रोममधील लेटरन संग्रहालयात नेण्यात आल्या असे म्हटले जाते. सा.यु. ६७८ मध्ये, शेलफ्रिथ नावाच्या अँग्लो-सॅक्सन मठाधिपतीने रोमवरून ब्रिटिश बेटांना परतताना आपल्यासोबत कोडेक्स आणले. अशाप्रकारे, शेलफ्रीथच्या निदर्शनानुसार इंग्लंडमध्ये सध्या नॉर्थुम्ब्रिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी, वरमथ आणि झारोच्या दोन मठांमधील ग्रंथालयात ते आले.
शेलफ्रिथ आणि त्याच्या मठवासियांना कॅसियोदोरसने बनवलेले एका खंडाचे बायबल आकर्षक वाटले असावे कारण ते वापरायला अगदी सुलभ होते. त्यामुळे, वीस-तीस वर्षांच्या आतच त्यांनी एका खंडात आणखी तीन संपूर्ण बायबल तयार केले. याचे एकच प्रचंड मोठे हस्तलिखित आजही उपलब्ध आहे; त्याचे नाव आहे कोडेक्स ॲम्येटीनस. त्याची, बछड्याच्या चामड्याची २,०६० पाने आहेत; प्रत्येक पान ५१ बाय ३३ सेंटीमीटर इतके आहे. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठांसहित त्याची जाडी २५ सेंटीमीटर असून त्याचे वजन ३४ किलोपेक्षा अधिक आहे. ते, आजपर्यंत अस्तित्वात असलेले एक खंडाचे सर्वात प्राचीन लॅटिन बायबल आहे. १९ व्या शतकातला सुप्रसिद्ध बायबल तज्ज्ञ फेन्टन जे. ए. हॉर्ट यांनी १८८७ साली कोडेक्सची ओळख पटवून दिली. हॉर्टने म्हटले: “हे उल्लेखनीय हस्तलिखित पाहून आधुनिक काळातला माणूसही विस्मित झाल्याशिवाय राहणार नाही.”
इटलीला परतणे
कॅसियोदोरसने तयार करवून घेतलेल्या कोडेक्स ग्रँडिओरची मूळ प्रत सध्या हरवलेली आहे. पण त्याच्या आधारे तयार करण्यात आलेले अँग्लो-सॅक्सन कोडेक्स अर्थात कोडेक्स ॲम्येटीनस पूर्ण होताच इटलीला परत नेण्यात आले. शेलफ्रीथचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधीच त्याने रोमला पुन्हा जाण्याचे ठरवले. जाताना त्याने पोप ग्रेगरी दुसरे यांच्यासाठी बक्षीस म्हणून आपल्या लॅटिन बायबलच्या तीन हस्तलिखितांमधील एक आपल्यासोबत नेले. पण वाटेतच, सा.यु. ७१६ मध्ये शेलफ्रीथचा फ्रान्सच्या लाँग्रेस येथे मृत्यू झाला. त्याचे बायबल मात्र इतर प्रवाशांसोबत पुढे गेले. आणि शेवटी हे कोडेक्स, मध्य इटलीच्या माउंट ॲम्येटाच्या मठातील ग्रंथालयात ठेवण्यात आले; कोडेक्स ॲम्येटीनस हे नाव त्याला याच ठिकाणावरून पडले आहे. १७८२ साली, हे हस्तलिखित इटलीच्या फ्लोरेन्समधील मेडिसियन-लॉरेन्शियन ग्रंथालयात हलवण्यात आले; आजपर्यंत त्या ग्रंथालयाची सर्वात बहुमोल वस्तू म्हणून त्याचे जतन करण्यात आले आहे.
कोडेक्स ग्रँडिओरचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे? कॅसियोदोरसच्या काळापासून नकलाकारांनी आणि मुद्रकांनी एका खंडात संपूर्ण बायबल तयार करायला अधिकाधिक इच्छा दाखवली आहे. आजही अशाच पद्धतीने बायबल उपलब्ध असल्यामुळे लोकांना त्याचा उपयोग करणे सोयीचे झाले आहे व त्याच्या शक्तीमुळे त्यांनी आपल्या जीवनात फायदा अनुभवला आहे.—इब्री लोकांस ४:१२.
[तळटीप]
^ सबंध बायबलचे ग्रीक भाषेमध्ये वितरण चवथ्या किंवा पाचव्या शतकापासून सुरू झाले असे दिसते.
[२९ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
कोडेक्स ग्रँडिओरचा प्रवास
व्हिव्हेरियम मठ
रोम
झारो
वरमथ
कोडेक्स ॲम्येटीनसचा प्रवास
झारो
वरमथ
माउंट ॲम्येटा
फ्लोरेन्स
[चित्राचे श्रेय]
Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.
[३० पानांवरील चित्रे]
वर: कोडेक्स ॲम्येटीनस डावीकडे: कोडेक्स ॲम्येटीनसमधील एज्राचे चित्र
[चित्राचे श्रेय]
Biblioteca Medicea Laurenziana, Firenze