व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी

आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी

आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी

“प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.

१. कुटुंबाच्या संबंधाने देवाचा काय उद्देश होता पण काय घडले?

 “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ति १:२८) आदाम व हव्वेला हा आशीर्वाद देऊन यहोवा देवाने कुटुंब व्यवस्थेची सुरवात केली. (इफिसकर ३:१४, १५) ते पहिले दांपत्य भविष्यात त्यांच्या संततीने भरलेल्या पृथ्वीचे स्वप्न पाहू शकत होते. रम्य परादीसात एकजुटीने आपल्या महान निर्माणकर्त्याची उपासना करणाऱ्‍या परिपूर्ण लोकांनी भरलेल्या एका भल्या मोठ्या कुटुंबाचे ते पहिले पिता व माता बनू शकत होते. पण आदाम व हव्वा पापाला बळी पडल्यामुळे पृथ्वी धार्मिक, देवभीरू लोकांनी व्यापली नाही. (रोमकर ५:१२) उलट कौटुंबिक जीवनाचा ऱ्‍हास होऊ लागला आणि द्वेष करणाऱ्‍या, हिंसक आणि “ममताहीन” लोकांनी पृथ्वी भरली; आणि खासकरून या “शेवटल्या काळी” अशी परिस्थिती अधिकच वाढलेली दिसते.—२ तीमथ्य ३:१-५; उत्पत्ति ४:८, २३; ६:५, ११, १२.

२. आदामाच्या संततीकडे कोणत्या क्षमता होत्या पण आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी करण्याकरता कशाची आवश्‍यकता होती?

आदाम व हव्वा यांना देवाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आले होते. आदामाने पाप केल्यानंतरही यहोवाने त्याला मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली. (उत्पत्ति १:२७; ५:१-४) आदामाच्या संततीला आपल्या पित्याप्रमाणे नैतिकतेची जाणीव होती आणि चांगल्यावाईटातला फरक ओळखण्यास ते शिकून घेऊ शकत होते. निर्माणकर्त्याची उपासना कशी केली जावी आणि त्याच्यावर पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्‍तीने प्रीती करणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल त्यांना मार्गदर्शन दिले जाऊ शकत होते. (मार्क १२:३०; योहान ४:२४; याकोब १:२७) शिवाय, “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे” ते शिकू शकत होते. (मीखा ६:८) पण मुळातच पापी असल्यामुळे आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी करण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार होती.

वेळ विकत घ्या

३. ख्रिस्ती मुलांचे संगोपन करण्यासाठी आईवडील कशाप्रकारे ‘वेळ विकत घेऊ’ शकतात?

या समस्यांनी भरलेल्या, कठीण काळात मुले ‘परमेश्‍वरावर प्रीती करणारी’ आणि खऱ्‍या अर्थाने ‘वाईटाचा द्वेष करणारी’ व्हावीत म्हणून बरीच मेहनत घेण्याची आवश्‍यकता आहे. (स्तोत्र ९७:१०) सुज्ञ आईवडील हे आव्हान पेलण्याकरता ‘वेळ विकत घेतात.’ (इफिसकर ५:१५-१७, NW) तुम्हाला देखील मुले असल्यास, तुम्ही हे आव्हान कसे पेलू शकता? पहिली गोष्ट म्हणजे, जीवनात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मनात ठरवा; “जे श्रेष्ठ” त्याकडे म्हणजे आपल्या मुलांना शिकवणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे याकडे लक्ष द्या. (फिलिप्पैकर १:१०, ११) दुसरी गोष्ट म्हणजे आपली राहणी साधी ठेवा. ज्या गोष्टी करणे आवश्‍यक नाही अशा गोष्टी टाळण्यास तुम्हाला शिकावे लागेल. किंवा तुमच्या मालकीच्या ज्या वस्तूंचा सांभाळ करण्यात खूप वेळ जात असेल अशा अनावश्‍यक वस्तूंचा कदाचित तुम्हाला त्याग करावा लागेल. आपली मुले देवभीरू व्हावीत म्हणून त्यांच्या संगोपनाकरता तुम्ही जे काही करता त्याचा ख्रिस्ती पालक या नात्याने तुम्हाला कधीही पस्तावा होणार नाही.—नीतिसूत्रे २९:१५, १७.

४. कुटुंबातील ऐक्य कसे टिकवून ठेवता येते?

आईवडील आपल्या मुलांना जो वेळ देतात आणि खासकरून आध्यात्मिक गोष्टींसाठी जेव्हा ते त्यांच्यासोबत वेळ खर्च करतात तेव्हा पुढे त्यांना याचे फार चांगले परिणाम मिळतात; आणि कुटुंबातील ऐक्य टिकवून ठेवण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे. पण या संदर्भात, जमेल तेव्हा करू अशी वृत्ती बाळगू नका. आपल्या मुलांसोबत केव्हा वेळ घालवणार आहोत याची निश्‍चित वेळ ठरवा. याचा अर्थ सर्वांनी घरी राहून आपापल्या कोपऱ्‍यात आपापले काम करणे नाही. आईवडील जेव्हा मुलांकडे दररोज वैयक्‍तिक लक्ष देतात तेव्हा त्यांचे व्यक्‍तिमत्त्व खरोखर बहरते. भरपूर प्रेम आणि काळजी व्यक्‍त करणे महत्त्वाचे आहे. विवाहित जोडप्यांनी मुले होऊ देण्याचे ठरवण्याआधीच या महत्त्वाच्या जबाबदारीविषयी गांभिर्याने विचार केला पाहिजे. (लूक १४:२८) मग त्यांना मुलांचे संगोपन करणे कठीण वाटणार नाही. उलट हा एक आशीर्वाद आणि बहुमान आहे अशा दृष्टीने ते पाहू लागतील.—उत्पत्ति ३३:५; स्तोत्र १२७:३.

उपदेश आणि आदर्श या दोन्ही मार्गांनी शिकवा

५. (अ) यहोवावर प्रेम करण्याचे मुलांना शिकवण्याआधी काय आवश्‍यक आहे? (ब) अनुवाद ६:५-७ येथे पालकांना कोणता सल्ला दिला आहे?

मुलांना यहोवावर प्रेम करण्यास शिकवण्याआधी तुम्हाला त्याच्यावर प्रेम असणे आवश्‍यक आहे. देवावर तुम्हाला मनापासून प्रेम असेल तर आपोआपच तुम्ही त्याच्या सर्व सूचनांचे पालन करण्यास प्रेरित व्हाल. यात आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याचे’ मार्गदर्शन देखील सामील आहे. (इफिसकर ६:४) देव आईवडिलांना आपल्या मुलांसमोर उत्तम आदर्श मांडण्याचे, त्यांच्यासोबत मोकळेपणाने संवाद करण्याचे आणि त्यांना शिकवण्याचे मार्गदर्शन देतो. अनुवाद ६:५-७ यात असे म्हटले आहे: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” मुलांना वारंवार शिकवल्यामुळे तुम्ही देवाच्या आज्ञा त्यांच्या मनात बिंबवू शकता. असे केल्यामुळे तुम्हाला यहोवावर किती प्रेम आहे याची तुमच्या मुलाला जाणीव होईल आणि यामुळे तुमचे मूल देखील यहोवाच्या जवळ येईल.—नीतिसूत्रे २०:७.

६. मुलांच्या अनुकरणप्रिय स्वभावाचा आईवडील कशाप्रकारे फायदा घेऊ शकतात?

मुले शिकण्यास उत्सुक असतात. ते फार लक्ष देऊन ऐकतात आणि निरीक्षण करतात; तुम्ही जे बोलता व करता त्याचे ते लगेच अनुकरण करतात. तुमची भौतिकवादी प्रवृत्ती नाही हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना येशूच्या सल्ल्याचे पालन कसे करावे हे समजून घ्यायला मदत मिळते. भौतिक गोष्टींविषयी चिंता न करता आपण ‘प्रथम राज्य मिळवण्यास झटले’ पाहिजे हे तुम्ही त्यांना शिकवता. (मत्तय ६:२५-३३) जेव्हा तुम्ही बायबल सत्याविषयी, देवाच्या मंडळीविषयी आणि नियुक्‍त वडिलांविषयी सकारात्मक पद्धतीने बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना यहोवाचा आदर करण्यास आणि त्याच्या आध्यात्मिक तरतुदींची कदर बाळगण्यास शिकवता. तुमचे बोलणे एक आणि वागणे वेगळेच असेल तर मुले हे लगेच ताडतात; त्यामुळे, उपदेश करण्यासोबतच तुमच्या वागण्यातून आणि मनोवृत्तीतून त्यांना आध्यात्मिक गोष्टींविषयीची तुमची मनःपूर्वक कदर दिसून आली पाहिजे. आपल्या उदाहरणामुळे आपल्या मुलांच्या मनात यहोवाविषयी मनःपूर्वक प्रेम निर्माण झाले आहे हे आईवडिल पाहतात तेव्हा त्यांना खरोखर किती धन्य वाटत असेल!—नीतिसूत्रे २३:२४, २५.

७, ८. मुलांना कमी वयातच प्रशिक्षण देण्यास सुरवात करणे आवश्‍यक आहे हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते आणि याचे श्रेय कोणाला जाते?

मुलांना लहान वयापासूनच प्रशिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे हे व्हेनेझुएला येथील एका उदाहरणावरून दिसून येते. (२ तीमथ्य ३:१५) फेलीक्स आणि मेयर्लिन हे एक तरुण विवाहित जोडपे होते व ते पायनियर सेवा करत होते. त्यांच्या मुलाचा अर्थात फेलीटोचा जन्म झाला तेव्हा त्या दोघांना फेलीटोवर उत्तम संस्कार करून त्याला यहोवाचा खरा उपासक बनवण्याची उत्सुकता होती. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल कथांचं माझं पुस्तक या पुस्तकातल्या गोष्टी, मेयर्लिन फेलीटोला मोठ्याने वाचून दाखवू लागली. लहान वयातच फेलीटो त्या पुस्तकातल्या चित्रांतून मोशे आणि इतर बायबल चरित्रांना ओळखू लागला.

फार लहान वयातच फेलीटोने साक्ष देण्यासही सुरवात केली. त्याने राज्य प्रचारक बनण्याची आपली इच्छा पूर्ण केली आणि नंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. काही काळाने, फेलीटो सामान्य पायनियर बनला. त्याचे आईवडील म्हणतात: “आमच्या मुलाची प्रगती पाहताना आम्हाला जाणीव होते की हे केवळ यहोवाच्या आशीर्वादामुळे आणि त्याच्या शिक्षणामुळे शक्य झाले.”

आध्यात्मिक प्रगती करण्यास मुलांना साहाय्य करा

९. विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या आध्यात्मिक शिक्षणाकरता आपण कृतज्ञ का असले पाहिजे?

मुलांच्या संगोपनाविषयी सल्ला देऊ पाहणारी डझनावरी मासिके, शेकडो पुस्तके आणि अक्षरशः हजारो इंटरनेट वेब साईट्‌स आज उपलब्ध आहेत. न्यूझवीक नियतकालिकात मुलांवर आलेल्या एका विशेषांकात असे म्हणण्यात आले की, सहसा या वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित होणारी “माहिती विसंगत असते. आणि कधीकधी त्या माहितीवर तुम्ही विश्‍वास ठेवता; पण ती अगदी चुकीची होती हे तुमच्या लक्षात येते तेव्हा माणूस आणखीनच गोंधळून जातो.” आपण किती कृतज्ञ आहोत की यहोवाने आपल्या कुटुंबांच्या शिक्षणाकरता आणि आध्यात्मिक विकासाकरता भरपूर मार्गदर्शन पुरवले आहे! विश्‍वासू व बुद्धिमान दासाने केलेल्या सर्व तरतुदींचा तुम्ही पूर्ण फायदा उचलता का?—मत्तय २४:४५-४७.

१०. परिणामकारक बायबल अभ्यास आईवडिलांकरता आणि मुलांकरताही कसा फायदेकारक ठरू शकतो?

१० एक अत्यंत आवश्‍यक गोष्ट म्हणजे मनमोकळ्या वातावरणात घेतलेला नियमित कौटुंबिक बायबल अभ्यास. हा अभ्यास बोधपर, आनंददायक आणि प्रोत्साहनात्मक ठरण्यासाठी चांगली तयारी करणे महत्त्वाचे आहे. मुलांना योग्य प्रश्‍न विचारून आईवडील त्यांच्या मनात व हृदयात काय आहे हे ओळखू शकतात. कौटुंबिक अभ्यास खरोखर परिणामकारक ठरत आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी, घरातले सर्वजण या अभ्यासाची उत्सुकतेने वाट पाहतात का याकडे लक्ष द्या.

११. (अ) आईवडील आपल्या मुलांना कोणती ध्येये डोळ्यापुढे ठेवण्याचे प्रोत्साहन देऊ शकतात? (ब) एका जपानी मुलीने आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला कोणते प्रतिफळ मिळाले?

११ बायबल-आधारित ध्येये देखील आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी करण्यात हातभार लावतात आणि आईवडिलांनी आपल्या मुलांना अशी ध्येये डोळ्यापुढे ठेवण्यास मदत केली पाहिजे. बायबलचे दररोज वाचन करणे, सुवार्तेचा नियमित प्रचारक बनणे, समर्पण आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करणे ही त्यांपैकी काही उचित ध्येये असू शकतात. याशिवाय, पूर्ण वेळेची पायनियर सेवा सुरू करणे, बेथेल सेवा किंवा मिशनरी सेवा ही देखील काही चांगली ध्येये आहेत. एयुमी नावाच्या एका जपानी मुलीने प्राथमिक शाळेत असताना आपल्या वर्गातल्या सर्वांना साक्ष देण्याचे ध्येय ठेवले. आपल्या शिक्षकांची आणि वर्गसोबत्यांची आस्था जागृत करण्यासाठी तिने वेगवेगळी बायबल प्रकाशने शाळेतल्या ग्रंथालयात ठेवण्यासाठी परवानगी मिळवली. यामुळे, प्राथमिक शाळेतील सहा वर्षांत ती १३ बायबल अभ्यास सुरू करू शकली. तिच्या बायबल विद्यार्थ्यांपैकी एका मुलीने व तिच्या कुटुंबातील इतर काही सदस्यांनी देखील बाप्तिस्मा घेतला.

१२. मुले ख्रिस्ती सभांचा पुरेपूर फायदा कसा करून घेऊ शकतील?

१२ आध्यात्मिक सुदृढतेसाठी आवश्‍यक असणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सभांना नियमित उपस्थित राहणे. प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बांधवांना ‘कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडण्याचा सल्ला दिला.’ आपल्याला कधीही सभा चुकवण्याची सवय लागता कामा नये. कारण ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहिल्यामुळे तरुण व वयस्क अशा सर्वांनाच खूप फायदा होऊ शकतो. (इब्री लोकांस १०:२४, २५; अनुवाद ३१:१२) मुलांना सभेत लक्षपूर्वक ऐकण्यास शिकवणे महत्त्वाचे आहे. तसेच सभांसाठी आधी तयारी करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सभेत उत्तरे देण्याद्वारे सक्रिय सहभाग घेतल्यानेच सभांचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळू शकतो. लहान मूल कदाचित एखाद दोन शब्द, किंवा परिच्छेदातील लहानसे वाक्य वाचून दाखवू शकते; हे सुरवातीला ठीक आहे पण हळूहळू मुलांना स्वतःहून उत्तरे शोधून ती स्वतःच्या शब्दांत सांगण्याचे प्रशिक्षण दिल्यास त्यांना याचा खूप फायदा होईल. आईवडिलांनो, तुम्ही स्वतः नियमितपणे अर्थपूर्ण उत्तरे देण्याद्वारे मुलांसाठी चांगला आदर्श मांडत आहात का? तसेच, कुटुंबात प्रत्येकाजवळ एक बायबल, गीत पुस्तक, आणि ज्याच्या आधारावर बायबलमधून चर्चा केली जात आहे ते प्रकाशन असल्यास उत्तम ठरेल.

१३, १४. (अ) आईवडिलांनी सेवेत आपल्या मुलांसोबत कार्य का केले पाहिजे? (ब) क्षेत्र सेवा मुलांसाठी फायदेकारक आणि आनंददायक ठरण्यासाठी कोणती मदत त्यांना पुरवता येईल?

१३ सुज्ञ आईवडील आपल्या मुलांचा तारुण्यसुलभ उत्साह यहोवाच्या सेवेकडे निर्देशित करतात; प्रचार कार्याला मुलांनी जीवनात महत्त्वाचे स्थान द्यावे म्हणून ते त्यांची मदत करतात. (इब्री लोकांस १३:१५) आपल्या मुलांना ‘सत्याचे वचन नीट सांगणारे, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेले’ सेवक बनण्याच्या दिशेने आवश्‍यक प्रशिक्षण मिळत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे आईवडिलांनी सेवेत आपल्या मुलांसोबत कार्य केले पाहिजे. (२ तीमथ्य २:१५) तुमच्याविषयी काय? तुम्ही एक पालक असल्यास, तुम्ही आपल्या मुलांना क्षेत्र सेवेची तयारी करण्यास मदत करता का? असे केल्यामुळे तुमची सेवा आनंददायक, अर्थपूर्ण आणि प्रतिफळदायक बनेल.

१४ सेवेत आईवडिलांनी मुलांसोबत कार्य करणे का महत्त्वाचे आहे? कारण असे केल्यामुळे मुले त्यांच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतात. त्याच वेळी पालक देखील आपल्या मुलांच्या मनोवृत्तीचे, वागणुकीचे आणि त्यांच्या क्षमतेचे निरीक्षण करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवाकार्यात आपल्या मुलांना सोबत न्या. शक्य असल्यास प्रत्येक मुलाला आपली प्रचाराची बॅग द्या आणि ती बॅग व्यवस्थित सांभाळून ठेवण्यास त्यांना शिकवा. अशाप्रकारे योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिल्यामुळे तुमच्या मुलांच्या मनात सेवाकार्याविषयी खरी आवड निर्माण होईल आणि प्रचार कार्य हा देवाबद्दल आणि आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल खरे प्रेम व्यक्‍त करण्याचा मार्ग आहे हे ते शिकतील.—मत्तय २२:३७-३९; २८:१९, २०.

सुदृढ आध्यात्मिकता टिकवून ठेवा

१५. कुटुंबाची आध्यात्मिकता टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे कोणत्या काही मार्गांनी हे केले जाऊ शकते?

१५ कुटुंबाची आध्यात्मिक सुदृढता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. (स्तोत्र ११९:९३) हे करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या कुटुंबासोबत आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घ्या. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत दैनंदिन बायबल वचनाची चर्चा करता का? “मार्गाने चालत असता,” क्षेत्र सेवेत आलेले अनुभव किंवा नुकत्याच मिळालेल्या टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! मासिकांतील मुद्दे सांगण्याची तुम्हाला सवय आहे का? प्रार्थनेत दररोज यहोवाला प्रत्येक नव्या दिवसाकरता आणि त्याच्या सर्व विपूल आशीर्वादांकरता आभार मानण्याची तुम्ही “निजता, उठता” आठवण ठेवता का? (अनुवाद ६:६-९) तुम्ही जे काही करता त्यातून देवावर तुम्हाला असलेले प्रेम तुमच्या मुलांना दिसून येईल तेव्हा त्यांना सत्याचा मनापासून स्वीकार करण्यास मदत मिळेल.

१६. मुलांना स्वतःहून संशोधन करण्याचे प्रोत्साहन दिल्यामुळे कोणता फायदा होईल?

१६ कधीकधी, मुलांना काही समस्यांना किंवा कठीण प्रसंगांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी मार्गदर्शन देण्याची गरज पडू शकते. पण प्रत्येक वेळेस काय करायचे हे त्यांना सांगण्याऐवजी त्यांना स्वतःहून संशोधन करून विशिष्ट गोष्टीसंबंधी देवाचा दृष्टिकोन काय आहे हे शोधून काढण्याचे प्रोत्साहन देणे अधिक चांगले ठरणार नाही का? ‘विश्‍वासू दासाने’ पुरवलेल्या सर्व साधनांचा आणि प्रकाशनांचा चांगला उपयोग करण्यास मुलांना शिकवल्यामुळे त्यांना यहोवासोबत एक घनिष्ट नातेसंबंध विकसित करण्यास मदत मिळेल. (१ शमुवेल २:२१ब) शिवाय, संशोधन करताना आढळलेल्या उपयोगी मुद्द्‌यांवर तुमची मुले कुटुंबात सर्वांसोबत चर्चा करतील तेव्हा कुटुंबाची आध्यात्मिकता साहजिकच आणखी वाढत जाईल.

यहोवावर पूर्णपणे विसंबून राहा

१७. एकट्या पालकांनी मुलांना ख्रिस्ती मार्गात वाढवण्याविषयी निराश का होऊ नये?

१७ एकट्या पालकांच्या कुटुंबांविषयी काय? या पालकांना आपल्या मुलांचे संगोपन करणे अधिकच आव्हानात्मक असते. पण एकट्या पालकांनो, निराश होऊ नका! तुम्हीही यशस्वी होऊ शकता. कारण अशा कित्येक एकट्या पालकांची उदाहरणे आहेत ज्यांनी देवावर भरवसा ठेवून व त्याच्या मार्गदर्शनाचे आज्ञाधारकपणे पालन करून आपल्या मुलांना आध्यात्मिकरित्या सुदृढ बनवले. (नीतिसूत्रे २२:६) अर्थात एकट्या पालकांनी यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिले पाहिजे. तो त्यांना साहाय्य करेल हा विश्‍वास त्यांनी बाळगला पाहिजे.—स्तोत्र १२१:१-३.

१८. आईवडिलांनी आपल्या मुलांच्या कोणत्या मानसिक व शारीरिक गरजांबद्दल जागरूक असावे पण याबाबतीतही महत्त्व कशाला दिले जावे?

१८ सुज्ञ आईवडील नेहमी हे लक्षात ठेवतात की ‘हसण्याचा आणि नृत्य करण्याचाही समय असतो.’ (उपदेशक ३:१, ४) मुलांच्या मनाच्या आणि शरीराच्या विकासाकरता विरंगुळा आणि संतुलित व हितकर करमणूक आवश्‍यक आहे. नीतिशुद्ध संगीताचा आनंद घेतल्यामुळे आणि खासकरून देवाच्या स्तुतीकरता गीत गायिल्यामुळे मुलांना एक चांगली मनोवृत्ती विकसित करण्यास मदत मिळते आणि यहोवासोबतचा नातेसंबंध बळकट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरू शकते. (कलस्सैकर ३:१६) प्रौढपणी एक देवभीरू व्यक्‍ती बनण्याची तयारी लहानपणीच करता येते आणि असे केल्यामुळे परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जीवनाचा आनंद उपभोगणे शक्य होईल.—गलतीकर ६:८.

१९. मुलांचे संगोपन करण्याच्या आपल्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देईल याची आईवडील का खात्री बाळगू शकतात?

१९ प्रत्येक कुटुंबाने आध्यात्मिकरित्या सुदृढ व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे. जर आपण देवावर मनापासून प्रेम केले आणि त्याच्या वचनाचे पालन करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला तर तो आपल्या प्रयत्नांना निश्‍चितच यश देईल आणि त्याच्या प्रेरित मार्गदर्शनानुसार वागण्यासाठी आवश्‍यक असलेले सामर्थ्य आपल्याला पुरवेल. (यशया ४८:१७; फिलिप्पैकर ४:१३) आठवणीत असू द्या, की तुमच्या मुलांना शिक्षण देण्याची व त्यांना प्रशिक्षित करण्याची आज तुमच्याजवळ जी संधी आहे ती फक्‍त काही काळासाठीच आहे, ती पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. तेव्हा देवाच्या वचनाचे पालन करण्याचा होईल तितका प्रयत्न करा. आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंब उभारण्याच्या तुमच्या सर्व प्रयत्नांवर यहोवा निश्‍चितच आशीर्वाद देईल.

आपण काय शिकलो?

• मुलांना प्रशिक्षित करण्यासाठी वेळ विकत घेणे इतके महत्त्वाचे का आहे?

• पालकांचा उत्तम आदर्श असणे का आवश्‍यक आहे?

• मुलांना आध्यात्मिक प्रगती करण्यास साहाय्य करण्याचे काही महत्त्वाचे मार्ग कोणते आहेत?

• कुटुंबाची आध्यात्मिक सुदृढता कशी टिकवून ठेवता येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४, २५ पानांवरील चित्रे]

आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबे एकत्र मिळून नियमित बायबलचा अभ्यास करतात, ख्रिस्ती सभांना जातात आणि सेवाकार्यात सहभागी होतात