व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवी दुःख

मानवी दुःख

मानवी दुःख

“का देवा का?” आशिया मायनरमधील एका भयंकर भूकंपानंतर एका प्रसिद्ध बातमीपत्राच्या पहिल्याच पानावरील ठळक बातमीचे हे शीर्षक होते. बाजूला दिलेल्या चित्रामध्ये, दुःखाने वेडापिसा झालेला एक पिता कोसळलेल्या घरातून आपल्या जखमी मुलीला घेऊन येत असलेले दाखवले होते.

युद्धे, दुष्काळ, साथी आणि नैसर्गिक आपत्तींची परिणती, असीमित दुःख, अमर्यादित अश्रू आणि असंख्य मृत्यू यात झाली आहे. त्यात आणखी भर पडते ती बलात्काराची, बाल अत्याचाराची आणि इतर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्‍यांची. अपघातांमध्ये जखमी होणाऱ्‍या व मरण पावणाऱ्‍यांच्या मोठ्या संख्येचा विचार करा. शिवाय, आजारपणामुळे, वार्धक्यामुळे आणि प्रिय जनांच्या मृत्यूमुळे पीडित असलेले अब्जावधी लोक ते वेगळेच.

विसाव्या शतकाने पाहिलेले दुःख अभूतपूर्व प्रमाणावर होते. १९१४ ते १९१८ या सालांदरम्यान, पहिल्या महायुद्धात सुमारे एक कोटी सैनिक मृत्यूमुखी पडले. काही इतिहासकारांच्या मते तर त्या दरम्यान मरण पावलेल्या नागरिकांची संख्या देखील तितकीच होती. दुसऱ्‍या महायुद्धात, सुमारे पाच कोटी सैनिक आणि नागरिक बळी पडले; त्यामध्ये असहाय स्त्रिया, मुले आणि वृद्ध पुरुष देखील होते. गेल्या सबंध शतकामध्ये, आणखी कोट्यवधी लोक जातीसंहार, क्रांतिकारी चळवळी, जातीय हिंसा, उपासमार आणि दारिद्र्‌य यांना बळी पडले. हिस्टोरिकल ॲटलस ऑफ द ट्‌वेंटियथ सेंच्युरी यात असा अंदाज दिला आहे की, अशा ‘सामूहिक अत्याचारात’ १८ कोटी लोक मृत्यूमुखी पडले असावेत.

एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे एकोणीसच्या स्पॅनिश फ्लूने दोन कोटी लोकांना गिळंकृत केले. गेल्या दोन दशकांमध्ये, सुमारे १.९ कोटी लोक एड्‌सने दगावले; तर, सुमारे ३.५ कोटी लोकांना एड्‌स विषाणुचा संसर्ग झाला आहे. एड्‌समुळे पालक दगावल्याने लाखोलाख मुले अनाथ झाली. आणि आईच्या पोटातच बालकांना एड्‌स जडल्यामुळे असंख्य बालके बळी पडत आहेत.

मुलांवर इतरही कारणांमुळे अत्याचार होत आहेत. संयुक्‍त राष्ट्र बाल निधीने (युनिसेफ) पुरवलेल्या माहितीचा उल्लेख करत १९९५ सालाच्या शेवटी इंग्लंडच्या मॅन्चेस्टर गार्डियन वीकली यात म्हटले होते: “गेल्या दशकातील युद्धांमध्ये, २० लाख मुलांचा मृत्यू झाला, ४० ते ५० लाख मुले अधू झाली, १.२ कोटी मुले रस्त्यावर आली, १० लाखांहून अधिक मुले अनाथ किंवा आपल्या पालकांपासून विलग झाली आणि १ कोटी मुलांच्या मनावर परिणाम झाला.” त्यात आणखी भर पडते दरवर्षी होणाऱ्‍या ४ ते ५ कोटी गर्भपातांची!

भविष्यात काय?

अनेकांना भविष्यात काहीतरी भयंकर घडणार आहे असे वाटते. वैज्ञानिकांच्या एका गटाने म्हटले: “मानवी कार्यांमुळे . . . सजीव जगात असे बदल घडू शकतात की आपल्याला अवगत असलेल्या पद्धतीने जीवन टिकवून ठेवणे शक्य होणार नाही.” त्यांनी पुढे म्हटले: “या क्षणी देखील, पाचमधील एक बालक अगदी हलाखीच्या परिस्थितीत आहे; त्याला नीट खायलाही मिळत नाही आणि दहामधील एक बालक गंभीररीत्या कुपोषित आहे.” वैज्ञानिकांनी “भविष्याबद्दल लोकांना इशारा देण्यासाठी” याच संधीचा फायदा उचलून असे म्हटले: “मानवांवर भयंकर आपत्ती येण्याचे टाळायचे असेल आणि आपल्या पृथ्वी ग्रहावरील अनर्थ टाळायचा असेल तर पृथ्वीची देखरेख आणि त्यावरील जीवन पूर्णपणे बदलले पाहिजे.”

देवाने इतक्या दुःखाला आणि दुष्टाईला परवानगी का दिली? या परिस्थितीवर तो काय उपाययोजना करणार आहे? आणि केव्हा?

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

वरती, व्हीलचेअर: UN/DPI Photo १८६४१०C by P.S. Sudhakaran; मध्ये, उपाशी मुले: WHO/OXFAM; खाली, उपासमारीने रोडावलेला पुरुष: FAO photo/B. Imevbore