व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या महत्कृत्यांविषयी त्याची स्तुती करा!

यहोवाच्या महत्कृत्यांविषयी त्याची स्तुती करा!

यहोवाच्या महत्कृत्यांविषयी त्याची स्तुती करा!

“माझा जीव प्रभूला थोर मानितो . . . कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत.”लूक १:४६-४९.

१. कोणकोणत्या महत्कृत्यांविषयी आपण उचितपणे यहोवाची स्तुती करतो?

 महत्कृत्ये करणारा यहोवा स्तुतीपात्र देव आहे. भविष्यवक्‍ता मोशे याने ईजिप्तमधून इस्राएल राष्ट्राच्या सुटकेविषयी कथन केले तेव्हा त्याने असे म्हटले: ‘तुम्ही परमेश्‍वराने केलेली सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत.’ (अनुवाद ११:१-७) त्याचप्रमाणे गब्रीएल देवदूताने कुमारी मरियेकडे येऊन येशूच्या जन्माची घोषणा केली तेव्हा तिने म्हटले: “माझा जीव प्रभूला थोर मानितो . . . कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत.” (लूक १:४६-४९) यहोवाने ईजिप्तमधून इस्राएल राष्ट्राची सुटका केली आणि चमत्कारिकपणे त्याच्या प्रिय पुत्राचा जन्म घडवून आणला; यहोवाच्या यांसारख्याच सर्व महत्कृत्यांबद्दल आपण यहोवाचे साक्षीदार त्याची स्तुती करतो.

२. (अ) आज्ञाधारक मानवजातीकरता देवाचा “युगादिकालाचा संकल्प” काय आहे? (ब) पात्म बेटावर योहानाला काय अनुभव आला?

यहोवाची बरीच महत्कृत्ये, त्याच्या ‘युगादिकालाच्या संकल्पाशी’ अर्थात मशीहा व त्याच्या राज्य शासनाद्वारे आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वादित करण्याच्या त्याच्या उद्देशाशी संबंधित होती. (इफिसकर ३:८-१३) हा उद्देश प्रगतीशीलपणे पूर्णत्वाकडे जात असताना वयोवृद्ध प्रेषित योहानाला एका दृष्टान्तात स्वर्गातील एका उघडलेल्या दारातून आत पाहू देण्यात आले. योहानाला कर्ण्याच्या ध्वनीसारखा आवाज ऐकू आला, जो त्याला म्हणाला: “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्‍यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.” (प्रकटीकरण ४:१) “देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्‍यांखातर” प्रेषित योहानाला रोमी सरकारने पात्म बेटावर हद्दपार केले होते; तेथे त्याला “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण” झाले. प्रेषित योहानाने जे काही ऐकले व पाहिले त्यामुळे त्याला देवाच्या युगादिकालाच्या उद्देशाविषयी बरेच काही समजले आणि ते आज सर्व खऱ्‍या ख्रिस्तीजनांकरता आध्यात्मिक बोध आणि समयोचित प्रोत्साहन देते.—प्रकटीकरण १:१, ९, १०.

३. योहानाला दृष्टान्तात दिसलेले २४ वडील कोणाला सूचित करतात?

स्वर्गातील त्या उघडलेल्या दारातून योहानाला २४ वडील दिसले; राजांप्रमाणे ते सिंहासनांवर बसलेले होते आणि त्यांच्या डोक्यांवर मुकूट होते. त्यांनी देवाच्या पाया पडून त्याला नमन केले आणि म्हटले: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटीकरण ४:११) ते वडील पुनरुत्थित झालेल्या व देवाने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे गौरवान्वित स्थान मिळालेल्या सर्व अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना सूचित करतात. निर्मितीशी संबंधित असलेल्या देवाच्या महत्कृत्यांविषयी ते यहोवाची स्तुती करण्यास प्रेरित होतात. आपण देखील यहोवाचे “सनातन सामर्थ्य व देवपण” यांविषयी विचार करतो तेव्हा आश्‍चर्यचकित होतो. (रोमकर १:२०) आणि यहोवाबद्दल आपण जितके अधिक ज्ञान घेतो तितकेच आपण त्याच्या महत्कृत्यांबद्दल त्याची स्तुती करण्यास प्रेरित होतो.

यहोवाच्या स्तुतीयोग्य महत्कृत्यांविषयी घोषणा करा

४, ५. दाविदाने कशाप्रकारे यहोवाची स्तुती केली याची काही उदाहरणे द्या.

स्तोत्रकर्त्या दाविदाने देवाच्या महत्कृत्यांविषयी त्याची स्तुती केली. उदाहरणार्थ, दाविदाने एका भजनात असे म्हटले: “सीयोननिवासी परमेश्‍वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्रांराष्ट्रांस विदित करा; हे परमेश्‍वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठविणाऱ्‍या, माझा द्वेष करणाऱ्‍यांपासून मला झालेली पीडा पाहा; मग मी तुझी सारी कीर्ति वर्णीन; तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सीयोनकन्येच्या द्वारासमोर हर्ष करीन.” (स्तोत्र ९:११, १३, १४) आपला पुत्र शलमोन याला मंदिराच्या इमारतीचा आराखडा दिल्यानंतर दाविदाने देवाला धन्य म्हटले व त्याची या शब्दांत स्तुती केली: “हे परमेश्‍वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच . . . हे परमेश्‍वरा राज्यहि तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्‍नत आहेस. . . . तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुति करितो.”—१ इतिहास २९:१०-१३.

बायबल आपल्याला दाविदाप्रमाणेच देवाची स्तुती करण्यास वारंवार सांगते, किंबहुना आर्जवते. स्तोत्रसंहिता या पुस्तकात देवाच्या स्तुतीची अनेक स्तोत्रे आहेत आणि यांतील जवळजवळ निम्मी स्तोत्रे दाविदाने लिहिलेली आहेत. दाविदाने सदोदित यहोवाची स्तुती केली व त्याला आभारप्रदर्शन केले. (स्तोत्र ६९:३०) शिवाय, अगदी प्राचीन काळापासूनच देवाने प्रेरित केलेली दाविदाची व इतरांची स्तुतीगीते, त्याच्या स्तुतीकरता उपयोगात आणली गेली आहेत.

६. देवप्रेरित स्तोत्रे कशाप्रकारे आपल्याला मोलाची ठरू शकतात?

ही स्तोत्रे यहोवाच्या उपासकांकरता खरोखर किती मोलाची आहेत! देवाने आपल्याकरता केलेल्या सर्व महत्कृत्यांबद्दल आपण जेव्हा त्याचे आभार मानू इच्छितो तेव्हा आपोआपच आपल्याला स्तोत्रसंहितेतील सुंदर शब्द आठवतात. उदाहरणार्थ, दररोज पहाटे एका नवीन दिवसाचे स्वागत करताना आपल्याला कदाचित या शब्दांत यहोवाची स्तुती करण्याची प्रेरणा होईल: “परमेश्‍वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे . . . चांगले आहे. कारण हे परमेश्‍वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करितो.” (स्तोत्र ९२:१-४) आपल्या आध्यात्मिक प्रगतीत बाधा बनलेल्या एखाद्या गोष्टीवर जेव्हा आपण मात करतो तेव्हा स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांत कदाचित आपल्याला आपला आनंद व कृतज्ञता प्रार्थनेद्वारे व्यक्‍त करावीशी वाटेल: “याहो या, आपण परमेश्‍वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू, उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.”—स्तोत्र ९५:१, २.

७. (अ) ख्रिस्ती राज्यगीतांचे काय वैशिष्ट्य आहे? (ब) सभांना लवकर येण्याचे आणि शेवटपर्यंत थांबण्याचे एक महत्त्वाचे कारण कोणते आहे?

मंडळीच्या सभांमध्ये, संमेलनांत आणि अधिवेशनांत आपण बऱ्‍याचदा यहोवाच्या स्तुतीकरता गीत गातो. विशेष म्हणजे, या गीतांतील बरीच गीते स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील देवप्रेरित स्तोत्रांवर आधारित आहेत. यहोवाच्या स्तुतीकरता आधुनिक भाषेत आपल्याकडे कितीतरी अर्थभरीत गीत आहेत हे खरोखर आनंददायक नाही का? यहोवाकरता स्तुतीगीत गाण्यासाठी खासकरून आपण सभा सुरू होण्याआधीच आले पाहिजे आणि शेवटपर्यंत थांबले पाहिजे; यामुळे आपण आपल्या बांधवांसोबत मिळून गीत व प्रार्थनेतून यहोवाची स्तुती करू शकतो.

“हाललू याह!”

८. “हाललू याह” या शब्दप्रयोगाचा काय अर्थ आहे आणि सहसा याचे भाषांतर कसे केले जाते?

“हाललू याह” हा यहोवाची स्तुती करा या अर्थाचा एक इब्री शब्दप्रयोग आहे. बऱ्‍याच भाषांतरांत याचे भाषांतर “याहची स्तुती करा” असे केले आहे. उदाहरणार्थ, स्तोत्र १३५:१-३ (पं.र.भा.) येथे हे आग्रहाचे हार्दिक शब्द आपण वाचतो: “हाललू याह. यहोवाच्या नावाची स्तुती करा, अहो यहोवाच्या सेवकांनो, तुम्ही स्तवन करा. यहोवाच्या मंदिरात, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात जे उभे राहता ते तुम्ही स्तवन करा. तुम्ही याहाला स्तवा, कारण यहोवा उत्तम आहे. त्याच्या नावाला स्तवने गा, कारण ते मनोरम आहे.”

९. आपण कशामुळे यहोवाची स्तुती करण्यास प्रेरित होतो?

आपण देवाच्या आश्‍चर्यकारक निर्मितीकृत्यांचे आणि आपल्याकरता त्याने केलेल्या सर्व उपकारांचे मनन करतो तेव्हा आपण मनःपूर्वक कृतज्ञतेने त्याची स्तुती करण्यास प्रेरित होतो. गतकाळात यहोवाने आपल्या लोकांकरता कोणकोणती चमत्कारिक कृत्ये केली यावर आपण विचार करतो तेव्हा देखील आपली अंतःकरणे त्याची थोरवी गाण्यास प्रेरित होतात. आणि भविष्यात यहोवाने जी अद्‌भुत कृत्ये करण्याची प्रतिज्ञा केली आहे याविषयी जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हाही आपण त्याची स्तुती करण्याचे आणि त्याचे उपकार मानण्याचे मार्ग शोधण्यास प्रेरित होतो.

१०, ११. आपले अस्तित्व देवाची स्तुती करण्याचे एक महत्त्वाचे कारण का आहे?

१० आपले जीवनच यहोवाची स्तुती करण्याचे फार मोठे कारण आहे. दाविदाने स्तोत्रात म्हटले: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तोत्र १३९:१४) खरोखर, आपली अतिशय ‘अद्‌भुत रीतीने घडण झाली आहे;’ दृष्टी, श्रवणशक्‍ती आणि विचारशक्‍ती यांसारख्या मौल्यवान देणग्या आपल्याला देण्यात आल्या आहेत. मग आपण आपले जीवन आपल्याला घडणाऱ्‍याची स्तुती होईल अशारितीनेच व्यतीत करू नये का? पौलाने हेच म्हटले: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

११ आपले यहोवावर खरोखर प्रेम असेल तर आपोआपच आपण सर्वकाही त्याच्या गौरवाकरता करू. येशूने म्हटले की पहिली आज्ञा अशी आहे: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” (मार्क १२:३०; अनुवाद ६:५) यहोवा आपला निर्माणकर्ता आणि “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा असल्यामुळे आपण निश्‍चितच त्याच्यावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची स्तुती केली पाहिजे. (याकोब १:१७; यशया ५१:१३; प्रेषितांची कृत्ये १७:२८) आपली विचारशक्‍ती, आध्यात्मिक क्षमता, आणि आपली शारीरिक शक्‍ती, अर्थात, आपले सर्व विशेष गुण आणि कौशल्ये यहोवाकडूनच आपल्याला मिळालेली आहेत. आपला निर्माणकर्ता या नात्याने यहोवा आपल्या प्रेमास व स्तुतीस पात्र आहे.

१२. यहोवाच्या महत्कृत्यांविषयी आणि स्तोत्र ४०:५ येथील शब्दांविषयी तुम्हाला काय वाटते?

१२ यहोवाच्या महत्कृत्यांवर मनन केल्यास आपल्याला त्याच्यावर प्रेम करण्याची आणि त्याची स्तुती करण्याची असंख्य कारणे सापडतील. दावीदाने त्याच्या स्तोत्रात म्हटले: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही; मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.” (स्तोत्र ४०:५) दावीद यहोवाच्या सर्व अद्‌भुत कृत्यांचे वर्णन करू शकला नाही आणि हे आपल्यालाही शक्य नाही. पण जेव्हाही त्याच्या कोणत्या महत्कृत्यांविषयी आपल्या लक्षात आणून दिले जाते तेव्हा आपण सदोदित त्याची स्तुती करू या.

देवाच्या युगादिकालाच्या उद्देशाशी संबंधित महत्कृत्ये

१३. आपली आशा देवाच्या महत्कृत्यांशी कशाप्रकारे निगडित आहे?

१३ देवाने त्याच्या युगादिकालाच्या उद्देशासाठी केलेल्या स्तुतिपात्र महत्कृत्यांशी आपली भविष्याची आशा निगडित आहे. एदेन बागेतील विद्रोहानंतर, यहोवाने पहिली भविष्यवाणी केली. या भविष्यवाणीत मनुष्यजातीकरता एक आशा होती. सर्पाला शिक्षा देऊन देवाने म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) एका दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी यहोवाने जागतिक जलप्रलय आणला आणि नोहा व त्याच्या कुटुंबाचे त्यातून संरक्षण केले; या महत्कृत्यानंतरही विश्‍वासू मानवांच्या हृदयांत यहोवाने प्रतिज्ञा केलेल्या स्त्रीच्या वंशाविषयीची आशा कायम होती. (२ पेत्र २:५) यानंतर अब्राहाम व दावीद यांसारख्या विश्‍वासू पुरुषांना यहोवाने दिलेल्या भविष्यसूचक प्रतिज्ञांवरून, तो त्या संततीद्वारे काय साध्य करील याविषयी अधिकाधिक ज्ञान मिळत गेले.—उत्पत्ति २२:१५-१८; २ शमुवेल ७:१२.

१४. यहोवाने मानवजातीकरता केलेल्या महत्कृत्यांपैकी सर्वश्रेष्ठ उदाहरण कोणते आहे?

१४ यहोवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला, अर्थात, प्रतिज्ञात संतति असणाऱ्‍या येशू ख्रिस्ताला खंडणी बलिदानाच्या रूपात अर्पण केले तेव्हा, तो मनुष्यांकरता महत्कृत्ये करणारा देव आहे याचा सर्वश्रेष्ठ पुरावा मिळाला. (योहान ३:१६; प्रेषितांची कृत्ये २:२९-३६) या खंडणीमुळे मानवजातीला देवासोबत समेट करणे शक्य झाले. (मत्तय २०:२८; रोमकर ५:११) सर्वात आधी समेट झालेल्यांना यहोवाने ख्रिस्ती मंडळीत एकत्रित केले; या मंडळीची सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी स्थापना झाली. पवित्र आत्म्याच्या मदतीने त्यांनी दूरदूरपर्यंत सुवार्तेचा प्रचार केला आणि येशूच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे आज्ञाधारक मानवजात कशाप्रकारे देवाच्या स्वर्गीय राज्यात सार्वकालिक आशीर्वाद उपभोगू शकते याविषयी लोकांना सांगितले.

१५. यहोवाने आपल्या या काळात कोणती अद्‌भुत कृत्ये केली आहेत?

१५ आज आपल्या काळात यहोवाने अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांतील शेवटल्या सदस्यांना एकत्रित करण्यासाठी अतिशय अद्‌भुतरित्या कार्य केले आहे. स्वर्गात ख्रिस्तासोबत जे राज्य करतील अशा १,४४,००० सदस्यांपैकी शेषजनांवर शिक्का मारीपर्यंत विनाशाचे वारे अडवून धरण्यात आले आहेत. (प्रकटीकरण ७:१-४; २०:६) देवाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “मोठी बाबेल,” अर्थात खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्यातील आध्यात्मिक बंदिवासातून मुक्‍त केले. (प्रकटीकरण १७:१-५) १९१९ साली मिळालेली ही मुक्‍तता आणि देवाचे संरक्षण यांमुळे अभिषिक्‍त शेषजनांना काय करणे शक्य झाले आहे? वेगाने येत असलेल्या ‘मोठ्या संकटात’ यहोवाने सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्याआधी सबंध जगात शेवटची साक्ष देण्याकरता अभिषिक्‍त शेषवर्ग प्रकाशाप्रमाणे चमकू शकले आहेत.—मत्तय २४:२१; दानीएल १२:३; प्रकटीकरण ७:१४.

१६. सध्याच्या काळात सबंध जगात चाललेल्या राज्य प्रचाराच्या कार्याचा काय परिणाम होत आहे?

१६ यहोवाच्या अभिषिक्‍त साक्षीदारांनी सबंध जगात राज्याच्या प्रचाराच्या कार्यात आवेशाने पुढाकार घेतला आहे. यामुळे ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ अधिकाधिक लोक यहोवाचे उपासक बनत आहेत. (योहान १०:१६) पृथ्वीवरील नम्र लोकांना आपल्यासोबत मिळून यहोवाची स्तुती करण्याची संधी आजही दिली जात आहे याबद्दल आपल्याला आनंद वाटतो. जे कोणी आमंत्रणाचा स्वीकार करून ‘येतील’ त्यांना येणाऱ्‍या मोठ्या संकटातून बचाव आणि सर्वकाळ यहोवाची स्तुती करत राहण्याची सुसंधी मिळेल.—प्रकटीकरण २२:१७.

हजारोंच्या संख्येने लोक खऱ्‍या उपासनेकडे येत आहेत

१७. (अ) आज यहोवा आपल्या प्रचार कार्याच्या संबंधाने कोणती महत्कृत्ये करत आहे? (ब) जखऱ्‍या ८:२३ या वचनाची कशाप्रकारे पूर्णता होत आहे?

१७ आपल्या प्रचार कार्याच्या संबंधाने यहोवा आज अतिशय स्तुतिपात्र महत्कृत्ये करत आहे. (मार्क १३:१०) अलीकडील वर्षांत त्याने ‘मोठी व कार्य साधण्याजोगी द्वारे उघडली आहेत.’ (१ करिंथकर १६:९) यामुळे दूरदूरच्या क्षेत्रांतही, जेथे एकेकाळी सत्याचे विरोधक आपल्या कार्यात अडथळे आणत होते, तेथे आज सुवार्तेचा प्रचार करणे शक्य झाले आहे. एकेकाळी आध्यात्मिक अंधकारात राहणारे कित्येक लोक आज यहोवाची उपासना करण्याच्या निमंत्रणाचा स्वीकार करत आहेत. ते पुढील भविष्यवाणीची पूर्णता करत आहेत: “सेनाधीश परमेश्‍वर असे म्हणतो की, ‘त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’” (जखऱ्‍या ८:२३) “आम्ही तुम्हाबरोबर येतो,” हे शब्द ज्यांना उद्देशून म्हणण्यात आले ते आध्यात्मिक यहुदी, अर्थात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे आजच्या काळातील शेषजन आहेत. दहा ही संख्या पृथ्वीवरील गोष्टींच्या संदर्भात पूर्णता सूचित करण्यासाठी वापरली जाते; त्याअर्थी, “दहा जण” त्या ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ प्रतिनिधीत्व करतात ज्यांना ‘देवाच्या इस्राएलासोबत’ “एक कळप” असे करण्यात आले आहे. (प्रकटीकरण ७:९, १०; गलतीकर ६:१६) आज इतके लोक यहोवाचे उपासक या नात्याने एकजुटीने पवित्र सेवा सादर करत आहेत हे पाहून खरोखर किती आनंद होतो!

१८, १९. यहोवाचा आशीर्वाद प्रचार कार्यावर आहे याचा काय पुरावा आहे?

१८ एकेकाळी खोट्या धर्मांच्या वर्चस्वामुळे ज्या देशांतील लोक कधीही सुवार्तेचा स्वीकार करणार नाहीत असे आपल्याला वाटायचे त्याच देशांत आज हजारो, नव्हे लाखोंच्या संख्येने लोक खऱ्‍या उपासनेचा स्वीकार करत आहेत हे पाहून आपल्या आनंदाला पारावार राहात नाही. चालू वर्षाच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक पुस्तकात, अशा देशांकडे लक्ष द्या जे आता १,००,००० पासून जवळजवळ १०,००,००० राज्य प्रचारकांचा अहवाल देत आहेत. राज्याच्या प्रचार कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे याचा हा एक जबरदस्त पुरावा आहे.—नीतिसूत्रे १०:२२.

१९ यहोवाचे लोक या नात्याने आपण आपल्या स्वर्गीय पित्याची स्तुती करतो आणि त्याचे उपकार मानतो कारण त्याने आपल्याला जीवनात एक उद्देश दिला आहे, त्याच्या सेवेत समाधानकारक काम करण्याची संधी दिली आहे आणि भविष्याकरता एक उज्ज्वल आशा दिली आहे. आपण देवाच्या सर्व प्रतिज्ञांची पूर्णता होण्याची आतूरतेने वाट पाहात आहोत आणि ‘सार्वकालिक जीवनासाठी आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखण्याचा’ दृढ संकल्प आपण केला आहे. (यहुदा २०, २१) देवाची स्तुती करणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायाची संख्या आज जवळजवळ ६०,००,००० झाली आहे हे पाहून आपल्याला अत्यानंद होतो! स्पष्टपणे यहोवाच्याच आशीर्वादामुळे, आज अभिषिक्‍त शेषजन दुसऱ्‍या मेंढरांतील त्यांच्या सोबत्यांसह २३५ देशांत जवळजवळ ९१,००० मंडळ्यांत संघटित आहेत. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ अथक परिश्रमांमुळे आज आपण सर्वजण आध्यात्मिकरित्या तृप्त आहोत. (मत्तय २४:४५) प्रेमळ पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली एक प्रगतीशील ईश्‍वरशासित संघटना यहोवाच्या साक्षीदारांच्या ११० शाखा दफ्तरांतून राज्य प्रचाराच्या कार्याचे नियंत्रण करत आहे. आपण अतिशय कृतज्ञ आहोत कारण यहोवाने त्याच्या लोकांची अंतःकरणे ‘द्रव्याने व सर्व उत्पन्‍नाच्या प्रथम फळाने त्याचा सन्मान करण्यास’ प्रेरित केली आहेत. (नीतिसूत्रे ३:९, १०) यामुळेच, आपले जागतिक प्रचाराचे कार्य अखंड सुरू आहे तसेच आवश्‍यकतेप्रमाणे छपाईकरता इमारती, बेथेल आणि मिशनरी गृहे, राज्य सभागृहे आणि संमेलन गृहे बांधली जात आहेत.

२०. यहोवाच्या अद्‌भुत आणि स्तुतिपात्र महत्कृत्यांविषयी विचार केल्यावर आपण काय केले पाहिजे?

२० आपल्या स्वर्गीय पित्याच्या सर्व अद्‌भुत व स्तुतीपात्र महत्कृत्यांचा उल्लेख करणे खरोखर अशक्य आहे. पण कोणतीही निष्कपट हृदयाची व्यक्‍ती यहोवाची स्तुती करणाऱ्‍यांच्या समुदायात सामील होण्यापासून स्वतःला रोखू शकते का? निश्‍चितच नाही! म्हणूनच देवावर प्रीती करणारे आपण सर्वजण आनंदाने जयजयकार करू या: “परमेशाचे स्तवन करा. आकाशातून परमेश्‍वराचे स्तवन करा; उर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो, त्याचे स्तवन करा; . . . कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्‍वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे.” (स्तोत्र १४८:१, २, १२, १३) होय, आज आणि सर्वकाळ आपण यहोवाच्या महत्कृत्यांविषयी त्याची स्तुती गाऊ!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाची काही स्तुतिपात्र महत्कृत्ये कोणती आहेत?

• तुम्हाला यहोवाची स्तुती करण्याची प्रेरणा कशामुळे मिळते?

• आपल्या आशेचा देवाच्या महत्कृत्यांशी कसा संबंध आहे?

• राज्य प्रचाराच्या कार्यासंबंधाने यहोवा आज कशाप्रकारे स्तुतिपात्र महत्कृत्ये करत आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

यहोवाकरता स्तुतीगीते गायिली जातात तेव्हा तुम्ही मनापासून त्यात सहभागी होता का?

[१३ पानांवरील चित्रे]

नम्र लोकांना आपल्यासोबत मिळून यहोवाची स्तुती करण्याची आजही संधी दिली जात आहे याबद्दल आपल्याला आनंद वाटतो