व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कबुलीजबाबामुळे होते आध्यात्मिक सुधारणा

कबुलीजबाबामुळे होते आध्यात्मिक सुधारणा

कबुलीजबाबामुळे होते आध्यात्मिक सुधारणा

“मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे.” (स्तोत्र ३२:३, ४) या मर्मभेदक शब्दांतून प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याच्या भावना आपल्याला समजून येतात. त्याने एक घोर पाप केले होते व ते पाप कबूल करण्याऐवजी त्याने ते लपवून ठेवले होते. त्यामुळे त्याला मानसिक वेदना जाणवत होती.

दावीदाच्या अंगी उल्लेखनीय गुण होते. तो एक शूरवीर, निष्णात मुत्सद्दी, कवी आणि संगीतकार होता. तरीसुद्धा तो स्वतःच्या बलावर नव्हे तर देवावर अवलंबून राहिला. (१ शमुवेल १७:४५, ४६) त्याचे “मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे” होते असे त्याच्याविषयी म्हटले आहे. (१ राजे ११:४) परंतु त्याने असे पाप केले होते ज्याची शिक्षा त्याला मिळणे भाग होते. कदाचित स्तोत्राच्या ३२ व्या अध्यायात त्याने याविषयीच उल्लेख केला असावा. ज्या परिस्थितीत त्याने हे पाप केले होते त्यावर विचार केला तर आपल्याला बरेच काही शिकता येईल. मग त्यानुसार आपण पाश ओळखून पाप करण्याचे टाळू शकतो. तसेच, देवाबरोबर आपला नातेसंबंध आपल्याला पुन्हा प्रस्थापित करायचा आहे तर आपण आपल्या पापांची कबूली दिली पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आपण पाहू शकतो.

एक निष्ठावान राजा पाप करतो

इस्राएली राष्ट्र, अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेले होते. पण दावीद जेरुसलेमेतच राहिला. एकदा संध्याकाळी, राजमहालाच्या गच्चीवर फिरत असताना एक सुंदर स्त्री स्नान करत असल्याचे त्याने वरून पाहिले. पाहिल्याबरोबर तेथून निघून जाण्याऐवजी तो तिच्याकडे कामवासनेने पाहतच राहिला. ती सुंदर स्त्री, दावीदाच्या सैन्यातील एका सैनिकाची अर्थात उरीयाची पत्नी बथशेबा होती हे माहीत झाल्यावर त्याने तिला आपल्या राजमहालात बोलावून घेतले व तिच्याबरोबर व्यभिचार केला. काही दिवसांनंतर बथशेबाने तिला दिवस गेल्याचा संदेश दावीदाला पाठवला.—२ शमुवेल ११:१-५.

दावीद आता एका जाळ्यात सापडला होता. दोघांचे पाप उघड झाल्यास दोघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार होती. (लेवीय २०:१०) त्यामुळे त्याने एक कट रचला. त्याने बथशेबाचा नवरा उरीया याला युद्धातून घरी बोलवले. युद्धाविषयीची माहिती विचारल्यानंतर दावीदाने उरीयाला आपल्या घरी जाण्यास सांगितले. यामुळे, उरीयाच बथशेबाच्या होणाऱ्‍या बाळाचा बाप आहे, असे लोक गृहीत धरतील असे दावीदाला वाटले.—२ शमुवेल ११:६-९.

पण दावीदाची निराशा झाली; कारण उरीया त्याच्या बायकोला भेटायला गेलाच नाही. तिकडे जोरदार युद्धात सर्व सैनिक असताना आपण घरी जावे, ही कल्पनाच उरीयाला पटत नव्हती. इस्राएली सैन्य युद्धात असताना, कोणीही पुरूष स्त्रियांजवळ जात नसत; त्यांच्या पत्नीजवळही नाही. त्यांना शुद्ध राहायचे होते. (१ शमुवेल २१:५) दावीदाने मग उरीयाला जेवायला बोलवून भरपूर दारू पाजली आणि मग त्याला आपल्या घरी जायला सांगितले. तेव्हाही उरीया आपल्या बायकोजवळ गेला नाही. उरीयाने विश्‍वासू वर्तन राखल्यामुळे दावीदाचे घोर पाप आणखीन ठळक झाले.—२ शमुवेल ११:१०-१३.

स्वतःच्या पापाचे जाळे त्याच्याभोवती आणखीनच घट्ट होत चालले होते. तो खूप अस्वस्थ झाला. त्याला आता फक्‍त एकच मार्ग दिसत होता. त्याने उरीयाला पुन्हा युद्धात पाठवले आणि सोबत सेनाधिपती यवाब याच्यासाठी एक पत्र दिले. त्या पत्रात एक संक्षिप्त संदेश होता: “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयास ठेवा; आणि त्यास तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्यास मार लागून तो मरेल.” कलमाच्या फक्‍त एका ओळीने शक्‍तिशाली राजाने आपल्या पापाचे नामोनिशाण मिटवले होते; उरीयाला त्याने कायमचेच झोपवले.—२ शमुवेल ११:१४-१७.

आपल्या नवऱ्‍यासाठी बथशेबाचे सुतक संपल्यावर दावीदाने तिच्याशी लग्न केले. कालांतराने बथशेबाने त्यांच्या बाळाला जन्म दिला. हे सर्व काही होईपर्यंत दावीदाने आपल्या पापाची कोठेही वाच्यता केली नाही. तो कदाचित स्वतःच्या कार्यांचे स्वतःलाच समर्थन देत होता. इतरांप्रमाणेच उरीयाचा देखील युद्धातच सन्मानीय मृत्यू झाला नव्हता का? शिवाय, त्याला त्याच्या बायकोजवळ जा असे सांगितले असताना त्याने राजाची आज्ञा कोठे मानली? पापावर पांघरूण घालण्यासाठी ‘कपटी हृदय’ सर्व प्रकारच्या पळवाटा शोधते.—यिर्मया १७:९; २ शमुवेल ११:२५.

पापाकडे नेणारी चुकीची पावले

पण धार्मिकतेचा चाहता दावीद इतक्या खालच्या थराला कसा पोहंचला की त्याने व्यभिचार व खून यांसारखी पातके केली? हे सर्व काही अचानक घडले नाही. त्याच्या पापाच्या बीजाला त्याच्या हृदयात हळूहळू अंकूर फुटत गेला हे स्पष्ट दिसते. दावीदाच्या सैन्यातील सर्व लोक यहोवाच्या शत्रूंविरुद्ध लढायला गेले होते. मग दावीद एकटाच मागे का राहिला? शिवाय, तो त्याच्या राजमहालाच्या गच्चीवर आरामात फिरत होता. तो इतका निवांत होता, की युद्धाची काळजी करण्याऐवजी त्याच्या मनात एका विश्‍वासू सैनिकाच्या पत्नीविषयी वाईट विचार येऊ लागले. आज खरे ख्रिश्‍चन, आपल्या मंडळीच्या आध्यात्मिक कार्यांमध्ये सक्रिय भाग घेत असल्यामुळे व सुवार्तेच्या प्रचार कार्यात स्वतःला मग्न ठेवत असल्यामुळे या जगाच्या दुष्ट प्रभावांपासून एक प्रकारचे संरक्षण त्यांना मिळत असते. कारण वाईट गोष्टींचा विचार करायलाच त्यांना वेळ उरत नाही.—१ तीमथ्य ६:१२.

इस्राएली राजांना नियमशास्त्राची एक नक्कल करून ती दररोज वाचण्याची आज्ञा देण्यात आली होती. असे का केले पाहिजे त्याविषयी बायबल सांगते: “म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधि पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्‍वर ह्‍याचे भय बाळगावयाला शिकेल. असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्‍या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही.” (अनुवाद १७:१८-२०) असे दिसते, की दावीदाने ही घोर पातके केली तेव्हा तो या सुचनेचे पालन करीत नव्हता. देवाच्या वचनाचे नियमितरीत्या वाचन व मनन केल्याने, आजच्या कठीण काळांत गंभीर पातके करण्यापासून आपण दूर राहू शकतो.—नीतिसूत्रे २:१०-१२.

शिवाय, दहा आज्ञांतील शेवटल्या आज्ञेत स्पष्टपणे असे म्हटले होते: “आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको.” (निर्गम २०:१७) दावीदाला अनेक पत्नी व उपपत्नी होत्या. (२ शमुवेल ३:२-५) तरीसुद्धा, दुसरी एक देखणी स्त्री पाहिल्यावर तिलाही प्राप्त करण्याची त्याच्या मनात इच्छा झाली. या अहवालावरून येशूच्या शब्दांचे गांभीर्य आपल्याला समजून येते: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) या कारणास्तव, असे चुकीचे विचार येतात तेव्हा त्यांच्यावर मनन करीत राहण्याऐवजी आपण लगेच ते आपल्या मनांतून व हृदयांतून झटकून टाकावेत.

पश्‍चात्ताप आणि दया

दावीदाने केलेल्या पापाचा बायबलमधील हा स्पष्ट अहवाल, कोणाच्या लैंगिक इच्छा तृप्त करण्यासाठी दिलेला नाही. तर, यहोवाच्या उल्लेखनीय गुणांमधील एक गुण, अर्थात दया या गुणाचे जबरदस्त व प्रेरणादायक उदाहरण आपल्याला या अहवालावरून पाहायला मिळते.—निर्गम ३४:६, ७.

बथशेबाने पुत्राला जन्म दिल्यानंतर यहोवाने संदेष्टा नाथानाला दावीदाकडे पाठवले. हे यहोवाच्या दयेचे एक कार्य होते. दावीदाला त्याच्या पापाची जाणीव करून देण्यास कोणी आले नसते व दावीदही शांत राहिला असता तर कदाचित पापाच्या बाबतीत दावीदाचे हृदय निबर झाले असते. (इब्री लोकांस ३:१३) परंतु दावीदाने यहोवाकडून आलेल्या दयेला प्रतिसाद दिला. नाथानाचे कुशल परंतु स्पष्ट बोलणे दावीदाच्या जिव्हारी लागले आणि देवाविरुद्ध आपण पाप केले आहे हे त्याने नम्रपणे कबूल केले. खरे तर दावीदाने बथशेबाबरोबर केलेल्या पापाच्या वृत्तान्ताचा उल्लेख करणारे ५१ वे स्तोत्र, दावीवादाने पश्‍चात्ताप व आपले घोर पातक कबूल केल्यानंतर लिहिले. आपण देखील कोणतेही गंभीर पाप केले असेल तर आपले हृदय निर्ढावू देऊ नये.—२ शमुवेल १२:१-१३.

दावीदाला क्षमा मिळाली खरी, परंतु त्याने केलेल्या पापाची मात्र त्याला शिक्षा मिळाली. (नीतिसूत्रे ६:२७) शिक्षा न करता त्याला तसेच सोडून कसे चालेल? देव असे प्रत्येकालाच त्याच्या चुकांबद्दल सोडून देऊ लागला तर त्याच्या दर्जांना काही महत्त्वच राहणार नाही. देव मग कूचकामी महायाजक एलीप्रमाणे होईल ज्याने त्याच्या दुष्ट पुत्रांना फक्‍त सौम्य सल्ला दिला आणि त्यांच्या वाईट कामांविरुद्ध कसलेच पाऊल उचलले नाही. (१ शमुवेल २:२२-२५) उलट, पश्‍चात्ताप करणाऱ्‍याला तो प्रेमळ-दया दाखवतो. यहोवाची दया तजेला देणाऱ्‍या थंड पाण्याप्रमाणे चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला तिच्या पापाचे दुष्परिणाम सहन करण्यास मदत करते. यहोवाच्या क्षमेच्या व सहउपासकांच्या उभारणीकारक सहवासाच्या उबेत ही व्यक्‍ती आध्यात्मिकरीत्या सावरू शकते. होय, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर पश्‍चात्ताप करणारी व्यक्‍ती ‘[देवाच्या] कृपेची समृद्धी’ अनुभवू शकते.—इफिसकर १:७.

“शुद्ध हृदय” व ‘नवीन आत्मा’

दावीदाने आपले पाप कबूल केल्यावर त्याच्या मनात निरुपयोगीपणाची भावना आली नाही. स्तोत्रातील त्याचे मनोगत वाचल्यावर आपल्याला समजते, की पापांची कबुली दिल्यामुळे त्याला किती हलके हलके वाटू लागले आणि यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्याचा त्याने निश्‍चय केला. उदाहरणार्थ, ३२ वे स्तोत्र पाहा. पहिल्या वचनात तो असे म्हणतो: “ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!” एखाद्याने गंभीर पाप केले आहे परंतु त्याने जर प्रामाणिकपणे पश्‍चात्ताप केला तर तो आनंदी होऊ शकतो. आपल्या पापांबद्दल आपणच जबाबदार आहोत हे दावीदाप्रमाणे कबूल करून ती व्यक्‍ती त्याची प्रामाणिकता दाखवू शकते. (२ शमुवेल १२:१३) त्याने यहोवापुढे स्वतःचे समर्थन करायचा किंवा इतरांवरही दोष ढकलायचा प्रयत्न केला नाही. पाचवे वचन म्हणते: “मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीति लपवून ठेविली नाही; मी आपले अपराध परमेश्‍वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.” खऱ्‍या मनाने केलेल्या पश्‍चात्तापामुळे आराम मिळतो; त्यानंतर गत चुकांबद्दल एखाद्याला त्याचा विवेक बोचत राहणार नाही.

यहोवाकडे क्षमा मागितल्यावर दावीदाने अशी विनंती केली: “देवा, माझ्या ठायी शुद्ध अंतःकरण निर्माण कर. एक नवीन निष्ठावंत आत्मा मला दे.” (स्तोत्र ५१:१०) आपल्याला “शुद्ध हृदय” व ‘नवीन आत्मा’ द्यावा अशी दावीदाने देवाकडे विनंती केली. यावरून असे दिसते, की दावीदाला त्याच्या पापी प्रवृत्तीची आणि त्याचे हृदय स्वच्छ करण्यासाठी देवाच्या मदतीची आवश्‍यकता आहे याची जाणीव होती. निराश होण्याऐवजी त्याने देवाची सेवा आवेशाने करत राहण्याचा निश्‍चय केला. त्याने अशी प्रार्थना केली: “हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ति वर्णील.”—स्तोत्र ५१:१५.

दावीदाने केलेला हा खरा पश्‍चात्ताप आणि देवाची सेवा करण्याचा त्याचा निश्‍चय पाहून यहोवाची प्रतिक्रिया काय होती? त्याने दावीदाला या प्रकारे आश्‍वासन दिले: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तोत्र ३२:८) पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व्यक्‍तिच्या भावनांकडे व आवश्‍यकतांकडे यहोवा जातीने लक्ष देतो असे आश्‍वासन तो आपल्याला देतो. यहोवाने दावीदाला आणखी सूक्ष्मदृष्टी देण्यासाठी, एखाद्या गोष्टीकडे वरवर न पाहता अगदी खोलवर जाऊन पाहण्याची क्षमता देण्यासाठी पाऊले उचलली. त्यामुळे भवितव्यात जर त्याला पुन्हा कधी मोह झाला असता तर तो त्याच्या कार्यांचा स्वतःवर आणि इतरांवर होणाऱ्‍या परिणामांचा विचार करू शकला असता व सुज्ञपणे वागू शकला असता.

गंभीर पाप केलेल्या परंतु पश्‍चात्ताप केलेल्या सर्व लोकांना दावीदाच्या जीवनातील या घटनेवरून उत्तेजन मिळू शकते. आपले पाप कबूल करण्याद्वारे व खऱ्‍या मनाने पश्‍चात्ताप करण्याद्वारे आपण सर्वात मौलवान गोष्ट पुन्हा प्राप्त करू शकतो. ती गोष्ट म्हणजे यहोवा देवाबरोबरचा आपला नातेसंबंध. पाप करून शांत राहिल्यामुळे होणारी मानसिक यातना किंवा बंडखोर होऊन आपले मन निगरगट्ट होऊ दिल्यामुळे भोगावे लागणारे भयानक परिणाम यांच्यापेक्षा तर क्षणिक दुःख व लज्जा सहन करणे जास्त बरे आहे. (स्तोत्र ३२:९) शिवाय, “जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” आहे त्या प्रेमळ व दयावान देवाची प्रेमळ दया आपण अनुभवू शकतो.—२ करिंथकर १:३.

[३१ पानांवरील चित्र]

उरीयाला ठार मारण्याद्वारे दावीदाने आपल्या पापाच्या परिणामांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला