व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्याची आध्यात्मिक तहान भागली

त्याची आध्यात्मिक तहान भागली

राज्य घोषकांचा वृत्तान्त

त्याची आध्यात्मिक तहान भागली

सायप्रस हे भूमध्य सागराच्या ईशान्य टोकावर असलेले एक बेट आहे. बायबलच्या काळात, तांबे आणि उत्तम प्रतीचे लाकूड यासाठी सायप्रस सुप्रसिद्ध होते. पौल व बर्णबा यांनी त्यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यात येथे सुवार्तेची घोषणा केली होती. (प्रेषितांची कृत्ये १३:४-१२) आजही बऱ्‍याच सायप्रसवासीयांच्या जीवनावर सुवार्तेचा चांगला प्रभाव पडत आहे. लूकस नावाच्या चाळीस वर्षांच्या एका गृहस्थाच्या बाबतीत तर हे अगदीच खरे ठरले. कसे ते त्यांच्याच शब्दांत ऐकूया:

“माझा जन्म सात भावंडांच्या कुटुंबात एका शेतमळ्यावर झाला. अगदी लहानपणापासूनच मला वाचनाचा नाद होता. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे एक लहानसे बायबल हे माझे सर्वात आवडते पुस्तक होते. मी दहा वर्षांचा असताना, आम्ही काही मित्रांनी मिळून एक छोटासा बायबल स्टडी ग्रूप सुरू केला. पण गावातल्या वडीलधाऱ्‍यांनी आम्हाला पाखंडी म्हणायला सुरवात केली आणि त्यामुळे काही काळातच आमचा ग्रूप बंद झाला.

“नंतर मी अमेरिकेत शिक्षण घ्यायला गेलो तेव्हा मला अनेक धार्मिक पार्श्‍वभूमींच्या लोकांना भेटायला मिळाले. यामुळे आध्यात्मिक गोष्टींबद्दल माझी पूर्वीपासूनची जिज्ञासा पुन्हा जागृत झाली. विद्यापीठातल्या ग्रंथालयात मी अनेक दिवस वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करत होतो. तसेच, मी अनेक चर्चेसलाही जायचो, पण हे सर्व करूनही माझी आध्यात्मिक क्षुधा भागली नाही.

“शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सायप्रसला परतलो आणि एका वैद्यकीय प्रयोगशाळेच्या संचालक पदावर रुजू झालो. यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेले ॲन्टोनिस नावाचे एक वयस्क गृहस्थ सहसा प्रयोगशाळेत मला भेटायला यायचे. पण ही गोष्ट ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या नजरेतून निसटली नाही.

“लवकरच एक थियोलॉजियन (बायबल विद्वान) मला भेटायला आले आणि यहोवाच्या साक्षीदारांशी संभाषण करू नका असा त्यांनी मला सल्ला दिला. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च हेच खरे चर्च असल्याचे मला लहानपणापासून शिकवण्यात आले होते, त्यामुळे मी ॲन्टोनिसला भेटण्याचे सोडून दिले आणि त्या थियोलॉजियनशीच बायबलवर चर्चा करू लागलो. सायप्रसमधील अनेक मठांनाही मी भेट दिली. तसेच ग्रीसच्या उत्तरेकडे असलेल्या माउंट एथॉसलाही गेलो कारण ऑर्थोडॉक्स धर्मात याला सर्वात पवित्र पर्वत मानले जाते. पण हे सर्व करूनही माझ्या बायबल प्रश्‍नांचे समाधान झाले नाही.

“मग मी देवाला प्रार्थना केली की त्यानेच मला सत्य शोधायला मदत करावी. आणि त्यानंतर लगेच ॲन्टोनिस पुन्हा एकदा प्रयोगशाळेत मला भेटायला आले. मला खात्री पटली की हेच माझ्या प्रार्थनेचे उत्तर होते. म्हणून मी त्या थियोलॉजियनला भेटण्याचे बंद केले आणि ॲन्टोनिस यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागलो. मी सातत्याने प्रगती केली आणि १९९७ साली ऑक्टोबर महिन्यात मी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला केलेले समर्पण जाहीर केले.

“माझी पत्नी आणि १४ व १० वर्षांच्या दोन थोरल्या मुलींनी मात्र सुरवातीला विरोध केला. पण माझ्या चांगल्या वागणुकीमुळे, माझ्या पत्नीने राज्य सभागृहात सभेला यायचे ठरवले. साक्षीदार तिच्याशी खूप चांगले वागले. त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा तिच्यावर खूपच चांगला परिणाम झाला. खासकरून सभेत बायबलच्या वचनांचा वारंवार उपयोग केला जातो हे पाहून ती प्रभावित झाली. लवकरच माझ्या पत्नीने व दोन थोरल्या मुलींनीही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला. त्या तिघींचाही १९९९ साली “देवाचे भविष्यसूचक वचन” या प्रांतीय अधिवेशनात बाप्तिस्मा झाला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही!

“माझा आध्यात्मिक शोध पूर्ण झाला आहे असे मी आज म्हणू शकतो. आज आमचे सबंध कुटुंब अर्थात, मी, माझी पत्नी व चार मुले एकोप्याने यहोवाची शुद्ध उपासना करत आहोत.”