व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?”

“देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?”

“देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?”

“तर मग ह्‍या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?”रोमकर ८:३१.

१. ईजिप्त सोडताना इस्राएली लोकांबरोबर कोण गेले आणि हे लोक त्यांच्याबरोबर का गेले असावेत?

 इस्राएल लोकांनी ईजिप्तमध्ये २१५ वर्षे घालवली होती; यांपैकी अधिकांश काळ ते ईजिप्तचे गुलाम बनून राहिले होते. शेवटी त्यांची सुटका झाली तेव्हा “त्यांच्याबरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला.” (निर्गम १२:३८) या गैर इस्राएली लोकांनी ईजिप्तवर आलेल्या दहा भयंकर पीडा पाहिल्या होत्या; या पीडांनी ईजिप्तच्या लोकांना सळो की पळो करून सोडले होते आणि त्यांमुळे त्यांच्या खोट्या दैवतांचा उपहास झाला होता. पण त्याच वेळी या लोकांनी आणखी एक गोष्ट पाहिली होती. खासकरून चौथी पीडा आली तेव्हापासून, त्यांनी यहोवाचे त्याच्या लोकांना बचावण्याचे सामर्थ्य पाहिले. (निर्गम ८:२३, २४) यहोवाच्या उद्देशांबद्दल त्यांना फारसे ज्ञान नव्हते पण एका गोष्टीची त्यांना खात्री पटली होती: ईजिप्तच्या देवतांनी ईजिप्ती लोकांचे संरक्षण केले नव्हते. पण यहोवाने मात्र आपल्या लोकांचा अर्थात इस्राएली लोकांचा बचाव करण्यासाठी स्वतःचे सामर्थ्य प्रकट केले होते.

२. राहाबने इस्राएली हेरांना साहाय्य का केले आणि इस्राएली लोकांच्या परमेश्‍वरावर तिने ठेवलेला भरवसा व्यर्थ का ठरला नाही?

यानंतर चाळीस वर्षे उलटल्यावर, इस्राएली लोक प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. मोशेच्या नंतर इस्राएलचे नेतृत्व करू लागलेल्या यहोशवाने प्रतिज्ञात देशात दोन हेर पाठवले. या हेरांना यरीहो येथे राहणारी राहाब भेटली. ईजिप्त सोडल्यापासून ४० वर्षे यहोवाने इस्राएली लोकांचे रक्षण करण्यासाठी कोणकोणती महत्कृत्ये केली होती हे राहाबने ऐकले होते. त्यामुळे तिला माहीत होते की देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याच्या लोकांना मदत करणे तिचे कर्तव्य होते. या तिच्या योग्य निर्णयामुळे, इस्राएली लोकांनी यरीहोवर कब्जा केला तेव्हा राहाब व तिच्या घराण्याचे रक्षण झाले. त्यांना चमत्कारिक रितीने बचावण्यात आले यावरूनच सिद्ध झाले की यहोवा त्यांच्या पाठीशी होता. अशाप्रकारे, राहाबने इस्राएली लोकांच्या परमेश्‍वरावर ठेवलेला भरवसा व्यर्थ ठरला नाही.—यहोशवा २:१, ९-१३; ६:१५-१७, २५.

३. (अ) येशूने यरीहोच्या पुनर्स्थापित शहराजवळ कोणता चमत्कार केला आणि यावर यहुदी धर्मपुढाऱ्‍यांची काय प्रतिक्रिया होती? (ब) काही यहुद्यांनी आणि नंतर बऱ्‍याच गैर यहुदी लोकांनी काय ओळखले?

पंधराशे वर्षांनंतर, यरीहोच्या पुनर्स्थापित शहराजवळच येशू ख्रिस्ताने एका अंधळ्या भिकाऱ्‍याला बरे केले. (मार्क १०:४६-५२; लूक १८:३५-४३) आपल्यावर दया करावी अशी या माणसाने येशूला काकुळतीने विनंती केली; साहजिकच, येशूला यहोवा साहाय्य करत होता याची त्याला जाणीव असावी. पण यहुदी धर्मपुढारी आणि त्यांच्या अनुयायांनी मात्र येशूचे चमत्कार पाहिल्यानंतरही, तो देवाचे कार्य करत असल्याचा हा पुरावा आहे हे मानले नाही. उलट ते येशूला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू लागले. (मार्क २:१५, १६; ३:१-६; लूक ७:३१-३५) त्यांनी येशूला जिवे मारल्यानंतर तो पुन्हा जिवंत झाला ही वस्तूस्थिती समोर आली तेव्हासुद्धा ते मानायला तयारच नव्हते की हे देवाचे कृत्य होते. उलट येशूच्या अनुयायांना छळण्यात आणि ‘प्रभु येशूची सुवार्ता सांगत असताना’ त्यांच्यापुढे अडथळे आणण्यात ते अग्रेसर होते. पण तरीसुद्धा काही यहुद्यांनी आणि नंतर बऱ्‍याच गैर यहुद्यांनी या गोष्टींची दखल घेतली आणि त्यांवरून योग्य निष्कर्ष काढला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की देवाने त्या फाजील धार्मिकता मिरवणाऱ्‍या यहुदी धर्मपुढाऱ्‍यांचा धिक्कार केला होता पण येशू ख्रिस्ताच्या विनम्र अनुयायांना तो पाठिंबा देत होता.—प्रेषितांची कृत्ये ११:१९-२१.

आज कोणाला देवाचा पाठिंबा आहे?

४, ५. (अ) धर्म निवडण्याच्या बाबतीत काही लोकांना काय वाटते? (ब) खरा धर्म ओळखण्यासाठी कोणता सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न विचारात घेणे आवश्‍यक आहे?

खऱ्‍या धर्माच्या प्रश्‍नावरून एका पाळकाने अलीकडेच एका टीव्ही मुलाखतीत असे म्हटले: “ज्या धर्माचे आचरण केल्यामुळे एक व्यक्‍ती पूर्वीपेक्षा चांगली व्यक्‍ती बनते, त्यालाच मी खरा धर्म म्हणेन.” खरा धर्म एका व्यक्‍तीला पूर्वीपेक्षा चांगली व्यक्‍ती बनवतो हे कबूल आहे. पण केवळ चांगल्या व्यक्‍ती निर्माण करणे हा एखाद्या धर्माला देवाचा पाठिंबा असल्याचा पुरावा आहे का? खरा धर्म ठरवण्याचा हा एकुलता एक निकष आहे का?

प्रत्येकाला आपल्या जीवनात वैयक्‍तिक निर्णय घ्यायला आवडते. यात स्वतःच्या आवडीनुसार धर्म निवडण्याचा निर्णयही आला. पण निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणजे ती व्यक्‍ती निश्‍चितच योग्य निवड करेल असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, काही लोक धर्माची निवड त्या धर्माचे किती अनुयायी आहेत, त्यांच्याजवळ किती संपत्ती आहे, त्यांचे भपकेबाज रितीरिवाज किंवा आपल्या कौटुंबिक सदस्यांच्या मतांच्या आधारावर करतात. पण एखादा धर्म खरा आहे किंवा नाही हे यांपैकी कोणत्याच गोष्टींवरून सिद्ध होत नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे: कोणता धर्म आपल्या अनुयायांना देवाची इच्छा पूर्ण करण्याचे प्रोत्साहन देतो, देवाचा पाठिंबा असल्याचा खात्रीलायक पुरावा कोणत्या धर्माजवळ आहे आणि यामुळे कोणत्या धर्माचे अनुयायी खात्रीने असे म्हणू शकतात की ‘देव आम्हाला अनुकूल आहे?’

६. येशूच्या कोणत्या शब्दांनी खऱ्‍या व खोट्या धर्माच्या विषयावर प्रकाश टाकला?

खरा धर्म ओळखण्यासाठी येशूने एक नियम दिला होता; त्याने म्हटले: “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात; पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ७:१५, १६; मलाखी ३:१८) तर आता आपण खऱ्‍या धर्माची काही ‘फळे’ किंवा ओळख चिन्हे विचारात घेऊ या. यांवरून आपल्याला अगदी प्रामाणिकपणे हे ठरवता येईल की आज कोणत्या धर्माला देवाचा पाठिंबा आहे.

देवाचा पाठिंबा असलेल्यांची ओळख चिन्हे

७. केवळ बायबलच्या आधारावर शिकवण्याचा काय अर्थ होतो?

त्यांच्या शिकवणुकींना बायबलचा आधार आहे. येशूने म्हटले: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.” तसेच: “जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो.” (योहान ७:१६, १७; ८:४७) साहजिकच, ज्यांना देवाचा पाठिंबा आहे त्यांनी केवळ त्याच्या वचनात प्रकट केलेल्या गोष्टीच शिकवल्या पाहिजेत; मनुष्यांच्या बुद्धीवर किंवा पारंपरिक समजुतींवर आधारित असलेल्या शिकवणींचा त्यांनी अव्हेर केला पाहिजे.—यशया २९:१३; मत्तय १५:३-९; कलस्सैकर २:८.

८. उपासनेत देवाच्या नावाचा प्रयोग करणे का महत्त्वाचे आहे?

देवाच्या यहोवा या नावाचा ते प्रयोग करतात आणि त्याचा प्रचार करतात: यशयाने अशी भविष्यवाणी केली होती: “त्या दिवशी तुम्ही म्हणाल, ‘यहोवाची उपकारस्तुती करा, त्याच्या नावाचा धावा करा. लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे नाव उंचावले आहे असे सांगा. यहोवाला गा, कारण त्याने उत्तम गोष्टी केल्या आहेत, हे सर्व पृथ्वीत कळले आहे.’” (यशया १२:४, ५, पं.र.भा.) येशूने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) त्याअर्थी, ख्रिस्ती लोकांना मग ते यहुदी असोत वा गैर यहुदी, त्यांना ‘देवाच्या नावाकरिता काढून घेतलेले लोक’ यानात्याने सेवा करायची होती. (प्रेषितांची कृत्ये १५:१४) साहजिकच, ‘त्याच्या नावाकरिता काढून घेतलेले लोक’ असण्याचा ज्या लोकांना गर्व वाटतो त्यांनाच देव स्वखुषीने पाठिंबा देईल.

९. (अ) आनंदी मनोवृत्ती खऱ्‍या धर्माच्या अनुयायांचे वैशिष्ट्य का आहे? (ब) खऱ्‍या व खोट्या धर्मातील फरक यशयाने कसा दाखवला?

ते देवाच्या आनंदी व्यक्‍तिमत्त्वाचे अनुकरण करतात. आपल्याला “सुवार्ता” देणारा यहोवा देव एक “आनंदी देव” आहे. (१ तीमथ्य १:११, NW) मग त्याचे उपासक दुःखी किंवा सतत निराशावादी कसे असू शकतात? आज जगात सर्वत्र दुःखद परिस्थिती आणि प्रत्येकाच्या जीवनातही असंख्य समस्या आहेत, पण तरीसुद्धा खरे ख्रिस्ती आनंदी मनोवृत्ती बाळगतात कारण ते नियमितरित्या पौष्टिक आध्यात्मिक अन्‍नाचा आस्वाद घेत असतात. खोट्या धर्मांच्या अनुयायांशी यशयाने त्यांची अशी तुलना केली: “ह्‍याकरिता प्रभु परमेश्‍वर म्हणतो, ‘पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करितील पण तुम्ही फजीत व्हाल; पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करितील, पण तुम्ही खिन्‍न चित्ताने ओरडाल, भग्नहृदय होऊन आकांत कराल.’”—यशया ६५:१३, १४.

१०. खऱ्‍या धर्माच्या अनुयायांवर, चुका करून धडे शिकण्याची पाळी सहसा का येत नाही?

१० ते बायबलच्या तत्त्वांनुसार आचरण करतात व जीवनातील निर्णय घेतात. नीतिसूत्रे लिहिणाऱ्‍याने असा सल्ला दिला की “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) देवाच्या बुद्धीकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या मनुष्यांच्या परस्परविरोधी सिद्धान्तांऐवजी जे लोक देवाकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात अशांना देव पाठिंबा देतो. एक व्यक्‍ती देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनाला आकार देण्याचा जितका जास्त प्रयत्न करेल तितक्याच चुका तिला जीवनात टाळता येतील.—स्तोत्र ११९:३३; १ करिंथकर १:१९-२१.

११. (अ) खऱ्‍या धर्मातील सदस्यांत पाळकवर्ग आणि सामान्य सदस्य असा फरक का असू शकत नाही? (ब) देवाच्या लोकांत पुढाकार घेणाऱ्‍यांनी कळपाकरता कसा आदर्श मांडला पाहिजे?

११ ते पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या आदर्शानुसार संघटित आहेत. येशूने हे तत्त्व सांगितले होते: “आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे.” (मत्तय २३:८-११) जर मंडळीतले सगळेजण भाऊभाऊ आहेत तर मग आपल्या नावापुढे मोठमोठ्या पदव्या लावून स्वतःला सामान्य लोकांपासून वेगळे दाखवणाऱ्‍या गर्विष्ठ पाळकवर्गाचा प्रश्‍नच उठत नाही. (ईयोब ३२:२१, २२) देवाच्या कळपाची राखण करणाऱ्‍यांना असे सांगण्यात आले आहे की “देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा.” (१ पेत्र ५:२, ३) खरे ख्रिस्ती मेंढपाळ इतरांच्या विश्‍वासावर सत्ता गाजविण्याचे टाळतात. तर देवाच्या सेवेत आपण सर्व सहकारी आहोत हे ओळखून ते केवळ एक चांगला आदर्श मांडण्याचा प्रयत्न करतात.—२ करिंथकर १:२४.

१२. देवाचा पाठिंबा मिळवू इच्छिणाऱ्‍यांकडून, मानवी सरकारांच्या संदर्भात देव कोणती संतुलित भूमिका अपेक्षितो?

१२ ते मानवी सरकारांच्या अधीन राहतात आणि तरीसुद्धा तटस्थ राहतात. जे लोक “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन” राहात नाहीत ते देवाच्या पाठिंब्याची अपेक्षा करू शकत नाहीत. का? कारण “जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो. तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो.” (रोमकर १३:१, २) पण मानवी अधिकाराच्या अधीन राहावे की देवाच्या अधिकाराच्या अधीन राहावे असा प्रश्‍न काही परिस्थितीत उपस्थित होईल हे जाणून येशूने असे सांगितले, की “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” (मार्क १२:१७) देवाचा पाठिंबा मिळवू इच्छिणाऱ्‍यांनी ‘पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटले पाहिजे’ आणि त्याच वेळेस देवाप्रती असलेल्या अधिक महत्त्वपूर्ण जबाबदारीच्या आड न येणारे सरकारचे कायदेकानूनही पाळले पाहिजेत. (मत्तय ६:३३; प्रेषितांची कृत्ये ५:२९) तटस्थतेच्या महत्त्वावर भर देऊन येशूने आपल्या शिष्यांविषयी असे म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” नंतर त्याने म्हटले: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही.”—योहान १७:१६; १८:३६.

१३. देवाच्या लोकांची ओळख करून देण्यात प्रीती कशाप्रकारे संबंधित आहे?

१३ ते अपक्षपाती असून ‘सर्वांचे बरे’ करण्याचा प्रयत्न करतात. (गलतीकर ६:१०) ख्रिस्ती प्रीती पक्षपात करत नाही, उलट लोकांचा वर्ण, आर्थिक किंवा शैक्षणिक पात्रता, राष्ट्र किंवा भाषा याकडे लक्ष न देता ती सर्वांना सामावून घेते. सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करणे हे देवाचा पाठिंबा असलेल्या लोकांची ओळख करून देणारे चिन्ह आहे. येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

१४. देवाची संमती असलेल्या लोकांना नेहमीच जगाचीही संमती मिळते का? समजावून सांगा.

१४ ते देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता छळ सोसायला तयार असतात. येशूने आधीच आपल्या अनुयायांना अशी ताकीद दिली होती की: “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (योहान १५:२०; मत्तय ५:११, १२; २ तीमथ्य ३:१२) आपल्या विश्‍वासाच्या द्वारे जगाला दोषी ठरवणाऱ्‍या नोहाप्रमाणेच, ज्यांना देवाचा पाठिंबा आहे त्या लोकांचा नेहमीच द्वेष करण्यात आला आहे. (इब्री लोकांस ११:७) आज जे देवाचा पाठिंबा मिळवू इच्छितात ते कधीही देवाच्या वचनाची तीव्रता कमी करण्याचे धैर्य करत नाहीत किंवा छळ होऊ नये म्हणून देवाच्या तत्त्वांबद्दल हातमिळवणी करत नाहीत. जोपर्यंत ते विश्‍वासूपणे देवाची सेवा करतील तोपर्यंत लोक ‘नवल वाटून त्यांची निंदा करतील’ याची त्यांना कल्पना आहे.—१ पेत्र २:१२; ३:१६; ४:४.

वस्तुस्थिती पाहून योग्य निष्कर्षावर येण्याची वेळ

१५, १६. (अ) देवाचा पाठिंबा असलेला धार्मिक गट ओळखण्यास कोणते प्रश्‍न सहायक ठरतील? (ब) लाखो लोक कोणत्या निष्कर्षावर पोचले आहेत आणि का?

१५ विचार करा, ‘कोणता असा धार्मिक गट आहे ज्याचे विश्‍वास अधिकांश लोकांपासून वेगळे असूनही तो देवाच्या वचनाला पूर्णपणे जडून राहतो? कोण देवाच्या वैयक्‍तिक नावाच्या महत्त्वावर नेहमी भर देतात आणि या नावानेच स्वतःचीही ओळख करून देतात? कोण आशावादी दृष्टिकोन बाळगून देवाचे राज्य मनुष्यांच्या सर्व समस्यांवर एकच उपाय असल्याचे लोकांना सांगतात? लोकांनी त्यांना जुनाट विचारांचे म्हटले तरीसुद्धा कोण लोक बायबलच्या आदर्शांनुसारच आचरण करतात? कोणता असा समूह आहे ज्यात पगार घेणारा पाळकवर्ग नाही, उलट ज्याचे सर्व सदस्य प्रचार करतात? कोण असे लोक आहेत जे राजकारणात भाग घेत नाहीत पण तरीसुद्धा कधीही कायदा न मोडणारे नागरिक म्हणून त्यांची प्रशंसा केली जाते? कोण इतरांना देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल शिकून घेण्यास मदत करण्यासाठी प्रेमळपणे आपला वेळ आणि पैसा खर्च करतात? आणि या सर्व चांगल्या गोष्टी असूनही कोण असे आहेत ज्यांना नेहमी तुच्छ लेखले जाते, त्यांची थट्टा किंवा छळ केला जातो?’

१६ जगभरात लाखो लोकांनी वस्तुस्थितीचे परीक्षण केले आहे आणि ते या निष्कर्षावर आले आहेत की यहोवाचे साक्षीदारच केवळ खऱ्‍या धर्माचे पालन करत आहेत. यहोवाचे साक्षीदार जे शिकवतात आणि ज्याप्रकारे आचरण करतात त्याच्या आधारावर, तसेच त्यांच्या धर्मातून साधलेल्या हिताचा विचार करून ते या निष्कर्षावर आले आहेत. (यशया ४८:१७) लाखो लोक जखऱ्‍या ८:२३ यात भाकीत केल्याप्रमाणे म्हणत आहेत: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”

१७. केवळ आम्हाला देवाचा पाठिंबा आहे असे म्हणताना यहोवाचे साक्षीदार फाजील गर्विष्ठपणा का दाखवत नाहीत?

१७ केवळ आम्हाला देवाचा पाठिंबा आहे असे म्हणून यहोवाचे साक्षीदार फाजील गर्विष्ठपणा दाखवत आहेत का? नाही. ईजिप्तच्या लोकांना जरी वाटत होते की त्यांना देवाचा पाठिंबा होता तरी इस्राएली लोकांनी मात्र खात्रीने दावा केला की आपल्यालाच देवाचा पाठिंबा आहे. तसेच पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना देखील खात्री होती की देव यहुदी धर्मपुढाऱ्‍यांच्या नव्हे, तर त्यांच्या पाठिशी होता. त्याचप्रमाणे हे आहे. हे वस्तूस्थितीवरूनच स्पष्ट होते. यहोवाचे साक्षीदार आज २३५ देशांत तेच कार्य करत आहेत जे शेवटल्या काळात आपले खरे अनुयायी करतील असे येशूने सांगितले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

१८, १९. (अ) यहोवाच्या साक्षीदारांना विरोधाचा सामना करावा लागतो तरीसुद्धा त्यांनी आपल्या प्रचार कार्यातून माघार घेण्याचे काही कारण का नाही? (ब) साक्षीदारांना देवाचा पाठिंबा आहे याला स्तोत्र ४१:११ कशाप्रकारे समर्थन देते?

१८ यहोवाचे साक्षीदार त्यांना सोपवलेले हे कार्य सातत्याने करत राहतील; छळ किंवा विरोध यामुळे ते आपल्या कार्यात कधीही बाधा येऊ देणार नाहीत. यहोवाचे कार्य पूर्ण केलेच पाहिजे आणि ते निश्‍चित पूर्ण केले जाईल. गत शतकात देवाचे कार्य पूर्ण करण्यात यहोवाच्या साक्षीदारांपुढे अडथळा निर्माण करण्याचे जे काही प्रयत्न करण्यात आले ते शेवटी निष्फळ ठरले कारण यहोवाने ही प्रतिज्ञा केली आहे: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील. परमेश्‍वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळलेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्‍वर म्हणतो.”—यशया ५४:१७.

१९ जगभरात विरोधाला तोंड द्यावे लागत असूनही यहोवाचे साक्षीदार आज अधिक खंबीर आणि सक्रिय झाले आहेत; त्यांच्या कार्यामुळे यहोवा संतुष्ट आहे याचाच हा पुरावा आहे. राजा दाविदाने म्हटले: “माझा वैरी माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही, ह्‍यावरून तू माझ्यावर प्रसन्‍न आहेस असे मी समजतो.” (स्तोत्र ४१:११; ५६:९, ११) देवाचे वैरी यहोवाच्या लोकांवर कधीही जयोत्सव करू शकणार नाहीत कारण त्यांचा नेता, येशू ख्रिस्त शेवटल्या विजयाकडे वेगाने वाटचाल करत आहे!

तुम्ही उत्तर देऊ शकाल का?

• देवाचा पाठिंबा असलेल्या लोकांची प्राचीन काळातील काही उदाहरणे कोणती आहेत?

• खऱ्‍या धर्माची काही ओळख चिन्हे कोणती आहेत?

• यहोवाच्या साक्षीदारांना देवाचा पाठिंबा आहे याची तुम्हाला कशामुळे खात्री वाटते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

देवाचा पाठिंबा मिळवू इच्छिणाऱ्‍यांनी केवळ त्याच्या वचनावर आधारित असलेल्या शिकवणी द्याव्यात

[१५ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती वडील कळपापुढे आदर्श मांडतात