बायबल अभ्यास तुम्हीपण करू शकता का?
बायबल अभ्यास तुम्हीपण करू शकता का?
“पाळक समोर असतानाच वाचावे.” हे इशारावजा वाक्य कॅथलिकांच्या काही बायबलच्या पहिल्या पानावर लिहिलेले आहे. लॉस एंजेलीझ येथील कॅथलिक बायबल इन्स्टिट्यूटमधील के मर्डी असे म्हणाल्या: “आम्हा कॅथलिकांना पूर्वी बायबल वाचायची परवानगी नव्हती. परंतु आता जमाना बदलत चालला आहे.” त्या पुढे म्हणाल्या, की कॅथलिकांना पवित्र शास्त्रवचनांचा त्यांच्या जीवनावर किती प्रभाव पडू शकतो हे एकदा समजले की “मग बायबलमधील सत्यासाठी त्यांची तहानभूक वाढेल.”
या बदलाविषयी बोलताना, यु.एस. कॅथलिक मासिकाने एका धार्मिक संचालकाचा उल्लेख केला ज्यांनी म्हटले, की जे कॅथलिक लोक बायबल अभ्यास वर्गाला येऊ लागले त्यांना ही जाणीव झाली, की कॅथलिक या नात्याने त्यांना कितीतरी गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आले होते; आणि बायबल तर ज्ञानाचे भांडार आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी जितके गमावले होते त्यापैकी थोडेतरी ते पुन्हा प्राप्त करू इच्छितात.”
पण बायबलमध्ये असे कोणते समृद्ध ज्ञान आहे की जे प्राप्त करण्यासाठी एखादा बायबल विद्यार्थी इतका आतूर झालेला असतो? दररोजच्या जीवनातील चिंता व ताणतणाव यांना कसे तोंड द्यायचे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे का? तुमच्या कौटुंबिक वर्तुळात शांती कशी नांदू शकते? आज लोक इतके असभ्य व समाजकंटकांप्रमाणे का वागत आहेत? आजच्या तरुणांच्या हिंसक प्रवृत्तीमागचे कारण काय? यांसारख्या प्रश्नांची, किंबहुना याहूनही गोंधळून टाकणाऱ्या इतर प्रश्नांची विश्वसनीय उत्तरे देवाचे वचन बायबल यांत दिली आहेत. बायबलमधील हे समृद्ध ज्ञान केवळ कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट लोकांसाठीच नव्हे तर बौद्ध, हिंदू, मुस्लिम, शिंटो, इतकेच काय तर नास्तिक व अज्ञेयवादी लोकांसाठी देखील आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटले, की ‘देवाचे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.’ बायबलचा अभ्यास केल्यावर तुम्हाला देखील स्तोत्रकर्त्याप्रमाणे असेच वाटू लागेल.—स्तोत्र ११९:१०५.