मानक बदलणे म्हणजे विश्वासघात!
मानक बदलणे म्हणजे विश्वासघात!
इंग्लंडचा हेन्री राजा पहिला याच्या दिवसांत (११००-११३५), “राजाच्या नाकाच्या टोकापासून हाताच्या अंगठ्यापर्यंतचे अंतर” म्हणजे एक वार असे समजले जात असे. पण हेन्री राजाच्या प्रजेची ही मापन पद्धत अचूक होती का? अचूक मोजमापासाठी सम्राटाची भेट घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
आज, प्रमाणभूत मोजमाप अचूक समजले जाते. त्यामुळे एक मीटरची व्याख्या अशाप्रकारे केली आहे: निर्वातावस्थेत, २९,९७,९२,४५८ ने भागाकारलेल्या एका सेकंदात पडणाऱ्या प्रकाशाचे अंतर. यापेक्षाही अचूक व्याख्या द्यायची असेल तर, हा प्रकाश ठराविक तरंगलांबीचा असतो आणि एका खास प्रकारच्या लेसरने उत्सर्जित होतो. हेच मानक देणारे साधन असल्यास कोणत्याही ठिकाणी लांबीचे मोजमाप घेता येईल आणि हे मोजमाप सारखेच असेल.
परंतु, मोजमापाच्या प्रमाणात अथवा मानकात थोडा जरी बदल झाला, तरी पुढचे सर्व काही अनिश्चित होऊन जाते. त्यामुळे मानक जतन करण्याचा बराच प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये, प्लॅटिनियम आणि इरिडियम या मिश्रधातूंचा एक ठोकळा वजन मोजण्याचे मानक आहे. हा ठोकळा एक किलो वजनाचा आहे. तो नॅशनल फिजिकल लबॉरेटरी येथे ठेवलेला आहे. वाहनांमुळे व वरून जाणाऱ्या विमानांमुळे होणाऱ्या हवेच्या प्रदुषणामुळे त्या एक किलोग्रॅम वजनाच्या मानक ठोकळ्याचे वजन दररोज वाढते. परंतु हा ठोकळा किंवा सिलिंडर, फ्रान्सच्या सेव्हर्स येथील इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स ॲण्ड मेजर्स येथे एका भूमिगत घुमटात समकेंद्री असलेल्या तीन घंटापात्रांच्या खाली ठेवलेल्या जागतिक मानकाची केवळ एक नक्कल आहे. याच्याही वजनात अतिसूक्ष्म दूषणामुळे फरक होत राहतो. त्यामुळे जगातील मापनवैज्ञानिकांना अद्याप तरी स्थायी मानकाचा शोध लावता आलेला नाही.
वजनांतील सूक्ष्म बदल सामान्य लोकांना इतका महत्त्वाचा वाटत नसला तरी, मानकांत होणाऱ्या बदलामुळे बराच गोंधळ होऊ शकतो. ब्रिटनमध्ये, सुरवातीला पौंड आणि औंस ही मापन पद्धत होती. नंतर ती किलोग्रॅम व ग्रॅम अशी झाली. या बदलामुळे बऱ्याच प्रमाणावर फसवेगिरी सुरू झाली. फसवेगिरी करणारे लोक काहीअंशी कायद्याच्या चौकटीत राहून फसवेगिरी करायचे. पुष्कळशा लोकांना, झालेला हा बदल माहीत नव्हता. त्यामुळे काही चलाख दुकानदारांनी याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गिऱ्हाईकांना लुबाडले.
कुटुंब व नैतिक दर्जे
कुटुंबात आणि नैतिक दर्जांत होणाऱ्या बदलाविषयी काय? या बदलामुळे होणारे परिणाम जास्त भयंकर असू शकतात. कौटुंबिक संस्थेचे मोडकळीस येणे, स्वैर लैंगिक वर्तन, बालकांशी मोठ्या प्रमाणावर केला जाणारा दुर्व्यवहार यांबद्दलचे किस्से आपण सर्रास ऐकतो. अर्थातच हे सर्व ऐकून आपण निराश होतो. पण हे सर्व पाहिल्यावर आपल्याला खात्री पटते, की आपण अशा एका काळात जगत आहोत जेथे लोकांचे दर्जे रसातळाला जात आहेत. एक-पालक कुटुंबे, समलिंगी ‘पालकांनी’ वाढवलेली मुले आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असलेल्या मुलांवर होणारा भयानक लैंगिक अत्याचार या सर्व गोष्टी, सर्वमान्य दर्जांकडे लोक दुर्लक्ष करत असल्याचा परिणाम आहेत. ‘स्वार्थी, ममताहीन, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणाऱ्या, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणाऱ्या’ २ तीमथ्य ३:१-४.
माणसांची संख्या दिवसेंदिवस फोफावत चालली आहे. याचे भाकीत बायबलने सुमारे दोन हजार वर्षांआधीच केले होते.—नैतिक दर्जांचे खालावणे आणि बेधडक विश्वासघात या दोन्ही गोष्टींचा अगदी जवळून संबंध आहे. अलीकडेच, वैद्यकीय क्षेत्रातील उच्च दर्जे बेधडकपणे झुगारल्याची एक ताजी घटना उत्तर इंग्लंडमधील एका शहरात अर्थात हाईड येथे घडली. या शहरातील लोकांचा त्यांच्या “आदरणीय व भरवशालायक” फॅमिली डॉक्टरांवर विश्वास होता. पण या सर्व लोकांचा विश्वासघात झाला. तो कसा? उलट तपासणीच्या अहवालांतून स्पष्ट झाले, की एक डॉक्टर, जवळजवळ १५ महिला रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत होता. खरे तर, १३० पेक्षा अधिक इतर मृत्यू घटनांमध्ये हा डॉक्टर गोवलेला असल्यामुळे पोलिसांना या घटनांची देखील तपासणी करावी लागली. या डॉक्टरला दोषी ठरवून तुरुंगात डांबण्यात आले तेव्हा त्याने अनेकांचा विश्वासघात कसा केला होता हे ठळकपणे दिसून आले. या डॉक्टरला ज्या तुरुंगात टाकण्यात आले होते तेथील दोन तुरुंग अधिकाऱ्यांना, या कुख्यात डॉक्टरची काळजी घेण्याऐवजी दुसरे काम देण्यात आले. कारण या दोन तुरूंग अधिकाऱ्यांच्या आईला ठार मारण्यात या डॉक्टरचा हात असावा. त्यामुळे, द डेली टेलिग्राफ नावाच्या वृत्तपत्राने या प्रकरणातील दोषी डॉक्टरला “डॉक्टर ‘यमदूत’” असे संबोधले.
आजकाल, जीवनातल्या जवळजवळ सर्वच क्षेत्रात आपण सतत बदलत राहणारे व खालावत जाणारे दर्जे पाहतो. मग, आपण कोणावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो? एखाद्या खात्रीलायक अधिकाराने ठरवलेले कधीही न बदलणारे दर्जे आपल्याला कोठे सापडतील? पुढच्या लेखात या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत.