व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवावरील तुमचा भरवसा भक्कम करा

यहोवावरील तुमचा भरवसा भक्कम करा

यहोवावरील तुमचा भरवसा भक्कम करा

एक भयंकर कट रचण्यात आला. देशातील सर्व अधिकाऱ्‍यांनी मिळून एक नवीन कायदा काढण्याचा प्रस्ताव मांडला. सरकारची मान्यता नसलेल्या पद्धतीने उपासना करणारे यापुढे देहदंडास पात्र मानले जावेत अशी त्यांची इच्छा आहे.

हावृत्तान्त ओळखीचा वाटतो का? कायद्याचा आधार घेऊन कटकारस्थाने रचली जाण्याची भरपूर उदाहरणे इतिहासात सापडतात. वरती वर्णन केलेली घटना संदेष्टा दानीएल याच्या काळात पर्शियन साम्राज्यात घडली होती. देशातील सर्व अधिकाऱ्‍यांच्या म्हणण्यावरून दारयावेश राजाने असा कायदा जारी केला, की “तीस दिवसपर्यंत [राजाशिवाय] कोणाहि देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे.”—दानीएल ६:७-९.

आता दानीएलच्या डोक्यावर टांगती तलवार होती. तो काय करेल? आपल्या देवावर, यहोवावर याही परिस्थितीत तो भरवसा ठेवेल का, की घाबरून राजाने सांगितल्याप्रमाणे करेल? वृत्तान्त आपल्याला सांगतो: “ह्‍या फर्मानावर सही झाली आहे असे दानीएलाने ऐकले तेव्हा तो [“लगेच,” NW] आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.” (दानीएल ६:१०) पुढे काय झाले हे तर सर्वांना माहीतच आहे. दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले पण यहोवाने “सिंहांची तोंडे बंद केली” आणि आपल्या विश्‍वासू सेवकाचे रक्षण केले.—इब्री लोकांस ११:३३; दानीएल ६:१६-२२.

आत्मपरीक्षण करण्याची वेळ

आज जगात सर्वत्र यहोवाच्या सेवकांचा द्वेष केला जातो; त्यांना अनेक शारीरिक व आध्यात्मिक धोक्यांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, काही देशांत जातीय द्वेषामुळे घडलेल्या हिंसाचारात कित्येक साक्षीदारांना जिवे मारण्यात आले. इतर ठिकाणी, यहोवाच्या सेवकांना दुष्काळ, आर्थिक अडचणी, नैसर्गिक विपत्ती, गंभीर आजारपण आणि इतर जीवघेण्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले. शिवाय, त्यांना छळाला तोंड द्यावे लागते, कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि अनुचित कृत्ये करण्याच्या मोहाचा त्यांना सामना करावा लागतो. या सर्व गोष्टी त्यांच्या आध्यात्मिकतेला धोकादायक ठरू शकतात. यहोवाच्या सेवकांचा सर्वात मोठा शत्रू सैतान कोणत्याही मार्गाने का होईना, पण त्यांचा नाश करण्याच्या प्रयत्नात आहे यात काही शंका नाही.—१ पेत्र ५:८.

यांपैकी एखाद्या परिस्थितीला आपल्याला कधी तोंड द्यावे लागले तर आपण काय करू शकतो? अर्थात जीव धोक्यात येतो तेव्हा कोणालाही भीती वाटणे साहजिक आहे. पण आपण पौलाचे हे आश्‍वासन देणारे शब्द आठवणीत ठेवू शकतो: “[देवाने] स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’ म्हणून आपण धैर्याने म्हणतो ‘प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?’” (इब्री लोकांस १३:५, ६) आजही यहोवा आपल्या सेवकांना हेच आश्‍वासन देतो याची आपण खात्री बाळगू शकतो. पण यहोवाचे हे आश्‍वासन माहीत असणे वेगळे आणि तो आपल्याला वैयक्‍तिकपणे मदत करेल याची खात्री बाळगणे वेगळे. म्हणूनच, आपण कोणत्या आधारावर यहोवावर पूर्ण भरवसा बाळगू शकतो याचे परीक्षण करणे आणि आपला त्याच्यावरचा भरवसा भक्कम करण्याचा हर तऱ्‍हेने प्रयत्न करून तो भरवसा टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण असे केल्यास, “देवाने दिलेली शांति [आपली] अंतःकरणे व [आपले] विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:७) मग आपल्यावर परीक्षा येतील तेव्हा स्पष्टपणे विचार करणे आणि सुज्ञपणे पावले उचलणे आपल्याला शक्य होईल.

यहोवावर भरवसा ठेवण्याचा आधार

आपला निर्माणकर्ता यहोवा याच्यावर पूर्ण भरवसा बाळगण्याची आपल्याकडे अनेक कारणे आहेत. यांपैकी पहिले कारण म्हणजे यहोवा एक प्रेमळ देव असून त्याला त्याच्या सेवकांची खरोखर काळजी आहे. यहोवा कशाप्रकारे आपल्या सेवकांची काळजी वाहतो हे दाखवणारी असंख्य उदाहरणे बायबलमध्ये आहेत. आपल्या निवडलेल्या इस्राएल लोकांसोबत यहोवाने कशाप्रकारे व्यवहार केला याविषयी मोशेने असे लिहिले: “तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणाऱ्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.” (अनुवाद ३२:१०) या आधुनिक काळातही यहोवा आपल्या सेवकांची सामूहिकरित्या आणि वैयक्‍तिकरित्या देखील चांगली काळजी घेत आहे. उदाहरणार्थ, बोस्निया येथील आंतरिक युद्धादरम्यान अन्‍नपदार्थांचा भयंकर तुटवडा झाल्यामुळे साक्षीदारांना अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. पण त्यांच्या बांधवांच्या निर्भय प्रयत्नांकरवी यहोवाने त्यांच्या गरजा पुरवल्या. क्रोएशिया व ऑस्ट्रियातील त्यांच्या बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून, अतिशय धोकेदायक क्षेत्रातून त्यांच्यासाठी साहाय्य सामुग्री आणली. *

यहोवा सर्वशक्‍तिमान आहे, त्याअर्थी तो कोणत्याही परिस्थितीत आपल्या सेवकांचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. (यशया ३३:२२; प्रकटीकरण ४:८) कधीकधी मात्र, यहोवा आपल्या काही सेवकांना मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहण्याची अनुमती देतो; पण, तेव्हा देखील तो त्यांची काळजी घेतो आणि त्यांना विश्‍वासू, खंबीर, आनंदी व शेवटपर्यंत शांत राहण्यास मदत करतो. म्हणून आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणेच खात्रीने असे म्हणू शकतो: “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले.”—स्तोत्र ४६:१, २.

बायबलवरून आपल्याला यहोवाविषयी आणखी एक गोष्ट कळून येते; तो सत्याचा परमेश्‍वर आहे. याचा अर्थ तो नेहमी आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करतो. किंबहुना, बायबल म्हणते की त्याच्याने “असत्य बोलवतच नाही.” (तीत १:२, पं.र.भा.) यहोवाने आपल्या सेवकांचे रक्षण करण्याची व त्यांना संकटातून सोडवण्याची उत्सुकता असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे आपण अगदी पूर्ण खात्री बाळगू शकतो की तो आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यास केवळ समर्थच नाही तर असे करण्याची त्याची खरोखर इच्छा आहे.—ईयोब ४२:२.

आपला भरवसा भक्कम करण्याचे मार्ग

यहोवावर भरवसा ठेवण्याची अनेक कारणे आपल्याजवळ असली तरीसुद्धा हे आपोआप घडेल असे आपण समजू नये. कारण या जगात अधिकांश लोकांचा देवावर विश्‍वास नाही आणि लोकांच्या अशा वृत्तीमुळे आपला यहोवावरचा भरवसा सहज कमकुवत होऊ शकतो. म्हणूनच हा भरवसा वाढवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. यहोवाला हे माहीत आहे आणि म्हणूनच तो असे करण्याचे मार्गही आपल्याला दाखवतो.

सर्वप्रथम त्याने आपले लिखित वचन, अर्थात बायबल पुरवले आहे. बायबलमध्ये यहोवाने आपल्या सेवकांसाठी केलेली असंख्य महत्कृत्ये नमूद आहेत. जरा विचार करा, एखाद्या व्यक्‍तीचे केवळ नाव तुम्हाला माहीत असल्यास तुम्ही तिच्यावर कितपत भरवसा ठेवाल? साहजिकच, अशा व्यक्‍तीवर तुम्ही सहजासहजी भरवसा ठेवणार नाही. भरवसा ठेवण्यासाठी तुम्हाला या व्यक्‍तीचा स्वभाव, गुण आणि तिचा आजवरचा इतिहास जाणून घ्यावा लागेल, नाही का? त्याचप्रकारे आपण बायबलमधील वृत्तान्त वाचतो तेव्हा यहोवाबद्दल व त्याच्या अद्‌भुत गुणांबद्दल, व्यवहाराबद्दल आपले ज्ञान वाढते आणि तो किती भरवसालायक आहे याची हळूहळू आपल्याला जाणीव होऊ लागते. अशारितीने आपला त्याच्यावरचा विश्‍वास वाढत जातो. यहोवाच्या महत्कृत्यांवर मनन करण्यासंबंधी आपल्यापुढे स्तोत्रकर्त्याचा उत्तम आदर्श आहे; त्याने यहोवाला कळकळीने प्रार्थना करून म्हटले: “मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्‌भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.”—स्तोत्र ७७:११, १२.

बायबलच्या सोबतच आपल्याजवळ यहोवाच्या संघटनेने तयार केलेल्या बायबल प्रकाशनांच्या रूपात अत्यंत पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न आहे. या प्रकाशनांत बरीच माहिती आहे, खासकरून आधुनिक काळात देवाच्या सेवकांचे हृदयस्पर्शी अनुभव यांत आपल्याला वाचायला मिळतात; यहोवाचे हे सेवक अतिशय असहाय परिस्थितीत आले तेव्हासुद्धा यहोवाने कशाप्रकारे त्यांना साहाय्य व मदत पुरवली हे या वृत्तान्तांवरून दिसून येते. उदाहरणार्थ, मार्टिन पोएटझिंगर जे कालांतराने यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बनले, ते युरोपमध्ये पायनियर सेवा करत असताना एकदा अतिशय आजारी पडले. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि ते आपल्या मायदेशापासून दूर एका परक्या देशात होते. त्यांच्याजवळ काहीच पैसे नव्हते आणि कोणताच डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यास तयार नव्हता. पण यहोवाने त्यांना सोडले नाही. स्थानिक इस्पितळात अनुभवी तज्ज्ञ असलेल्या एका डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. हे दयाळू डॉक्टर स्वतः बायबलचे कट्टर अनुयायी असल्यामुळे त्यांनी बंधू पोएटझिंगर यांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली आणि तेसुद्धा पैसे न घेता. असे वैयक्‍तिक अनुभव वाचल्यामुळे निश्‍चितच आपल्या स्वर्गीय पित्यावर आपला भरवसा वाढतो.

आपला भरवसा वाढवण्यास यहोवा आणखी एका महत्त्वाच्या मार्गाने मदत पुरवतो; अर्थात त्याला प्रार्थना करण्याचा बहुमान. प्रेषित पौल प्रेमळपणे आपल्याला असा सल्ला देतो: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पैकर ४:६) ‘सर्व गोष्टींत’ आपल्या भावना, गरजा, भीती आणि चिंता यांचा समावेश असू शकतो. आपण जितक्या वेळा आणि जितक्या कळकळीने यहोवाला प्रार्थना करू तितकाच त्याच्यावर आपला भरवसा वाढेल.

येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा आपल्या प्रार्थनेत कसलाही व्यत्यय येऊ नये म्हणून तो कधीकधी एकांतात जाऊन प्रार्थना करत असे. (मत्तय १४:२३; मार्क १:३५) महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी त्याने रात्रभर आपल्या पित्याला प्रार्थना केली. (लूक ६:१२, १३) म्हणूनच येशूचा यहोवावर इतका भरवसा होता की आजपर्यंत कोणावरही आली नसेल इतकी भयंकर परीक्षा त्याच्यावर आली असतानाही तो ती सहन करू शकला. वधस्तंभावर येशूचे शेवटले शब्द होते: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” येशूच्या या शब्दांवरून हे दिसून आले की यहोवाने त्याला त्या परीक्षेतून सोडवण्यासाठी हस्तक्षेप केला नाही तरीसुद्धा येशूचा आपल्या पित्यावर असलेला भरवसा शेवटपर्यंत थोडाही कमी झालेला नव्हता.—लूक २३:४६.

यहोवावर आपला भरवसा वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याच्यावर मनापासून भरवसा ठेवणाऱ्‍यांसोबत नियमितपणे संगती करणे. यहोवाने आपल्या लोकांना त्याच्याविषयी अधिक शिकून घेण्यासाठी आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमितपणे एकत्र येण्याची आज्ञा दिली होती. (अनुवाद ३१:१२; इब्री लोकांस १०:२४, २५) अशा संगतीमुळे त्यांचा यहोवावरचा भरवसा भक्कम होत गेला आणि यामुळे ते विश्‍वासाच्या भयंकर परीक्षांना तोंड देण्यास समर्थ झाले. आफ्रिकेतील एका देशात प्रचार कार्यावर बंदी होती; यहोवाच्या साक्षीदारांना पोलिस संरक्षण, प्रवासाची कागदपत्रे, विवाहाची सर्टिफिकेट्‌स, वैद्यकीय उपचार आणि रोजगार यांपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्या भागात आंतरिक युद्ध सुरू झाले तेव्हा एका जवळच्या मंडळीतील मुलांसहित ३९ सदस्य, शहरात चाललेल्या बॉम्बवर्षावापासून संरक्षणासाठी जवळजवळ चार महिने वाळवंटातील एका लहानशा पुलाखाली राहिले. अशा भयंकर परिस्थितीतही ते दररोज बायबल वचनावर चर्चा करायचे आणि इतर सभा देखील घ्यायचे; यामुळे त्यांना खूप आध्यात्मिक बळ मिळाले. या कठीण परिस्थितीला तोंड देतानाही त्यांचे आध्यात्मिक आरोग्य टिकून राहिले. यहोवाच्या लोकांसोबत नियमित संगती करणे किती महत्त्वाचे आहे हे या अनुभवावरून स्पष्टपणे दिसून येते.

शेवटी, यहोवावर आपला भरवसा भक्कम करण्याचा मार्ग म्हणजे राज्यप्रचाराच्या कार्यात सक्रिय राहणे, अर्थात इतरांना सुवार्ता सांगण्यास सदैव तयार राहणे. कॅनडाच्या एका तरुण मुलीच्या हृदयस्पर्शी अनुभवावरून हे दिसून येते. एक आवेशी राज्य प्रचारक असलेल्या या मुलीला लुकेमिया हा असाध्य कर्करोग झाला होता. या गंभीर आजारपणातही तिला एक सामान्य पायनियर अर्थात एक पूर्ण वेळची सेविका होण्याची इच्छा होती. काही काळ तिला थोडे बरे वाटू लागले तेव्हा तिने एक महिना सहायक पायनियर सेवा केली. पण यानंतर तिची प्रकृती खालावू लागली आणि काही महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. पण ती शेवटपर्यंत आध्यात्मिकरित्या खंबीर राहिली, यहोवावरचा तिचा भरवसा क्षणभरही डगमगला नाही. तिची आई सांगते: “शेवटपर्यंत तिला स्वतःपेक्षा इतरांची काळजी होती. ती सर्वांना बायबलचा अभ्यास करण्याचे प्रोत्साहन द्यायची आणि त्यांना म्हणायची, ‘नव्या जगात आपण पुन्हा भेटू.’”

यहोवावर आपला भरवसा असल्याचे सिद्ध करणे

“जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्‍वासहि क्रियांवांचून निर्जीव आहे.” (याकोब २:२६) देवावरील विश्‍वासाबद्दल याकोबाने जे म्हटले तेच त्याच्यावर असलेल्या आपल्या भरवशाबद्दलही म्हणता येते. मला देवावर भरवसा आहे असे आपण कितीही म्हटले तरीसुद्धा जर आपल्या कृतींवरून हा भरवसा दिसून आला नाही तर मग आपल्या बोलण्याला काही अर्थ राहणार नाही. अब्राहामने यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला आणि कधीही मागेपुढे न पाहता त्याच्या सर्व आज्ञांचे पालन करण्याद्वारे त्याने आपला भरवसा सिद्ध केला; आपला पुत्र, इसहाक याचा बळी देण्यासही तो कचरला नाही. या अतुलनीय भरवशामुळे आणि आज्ञापालनामुळे अब्राहामला यहोवाचा मित्र म्हणण्यात आले.—इब्री लोकांस ११:८-१०, १७-१९; याकोब २:२३.

यहोवावरील भरवसा सिद्ध करण्यासाठी आपल्यावर भयंकर परीक्षा येण्याची आपण वाट पाहू नये. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्काळाविषयीहि विश्‍वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.” (लूक १६:१०) आपल्या दररोजच्या लहानमोठ्या कार्यांतही यहोवावर भरवसा ठेवण्यास आपण शिकले पाहिजे; अगदी क्षुल्लक वाटणाऱ्‍या गोष्टींतही आपण त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. आणि असे करणे किती लाभदायक आहे हे आपण पाहतो तेव्हा आपोआपच आपल्या स्वर्गीय पित्यावरचा आपला भरवसा वाढत जातो आणि मोठ्या किंवा जास्त कठीण परीक्षांना तोंड देण्यास आपण समर्थ होतो.

हे जग सर्वनाशाकडे वाटचाल करत आहे आणि साहजिकच हा नाश होण्याआधी यहोवाच्या लोकांवर अधिक परीक्षा व संकटे येतील. (प्रेषितांची कृत्ये १४:२२; २ तीमथ्य ३:१२) म्हणून, जर आपण आजच यहोवावर पूर्णपणे भरवसा बाळगण्यास शिकलो तर आपण—एकतर मोठ्या संकटातून जिवंत बचावून किंवा पुनरुत्थान होऊन—त्याच्या प्रतीज्ञेनुसार एका नव्या जगात राहण्याची आशा बाळगू शकतो. (२ पेत्र ३:१३) यहोवावरचा आपला भरवसा कमी झाल्यास त्याच्यासोबतचा आपला मोलवान नातेसंबंध बिघडू शकतो; आपण हे कधीही घडू देता कामा नये. मग, दानीएलला सिंहांच्या गुहेतून सोडवण्यात आल्यावर त्याच्याविषयी जे म्हणण्यात आले तेच आपल्याविषयी म्हटले जाईल: “त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.”—दानीएल ६:२३.

[तळटीप]

^ टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १, १९९४ अंकातील पृष्ठे २३-७ वर अधिक माहिती सापडेल.

[९ पानांवरील चित्र]

मार्टिन पोएटझिंगर यांच्यासारख्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांचे अनुभव वाचल्याने आपला विश्‍वास मजबूत होतो