व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा आपल्या पापांची क्षमा करण्यास तयार असताना, ख्रिश्‍चनांनी मंडळीतील वडिलांसमोर त्यांच्या पापांची कबूली देण्याची काय आवश्‍यकता आहे?

दावीद आणि बथशेबाच्या बाबतीत पाहिल्यास यहोवाने दावीदाच्या पापांची क्षमा केली, हे आपल्याला दिसून येते. दावीदाने अतिशय घोर पाप केले होते तरीसुद्धा त्याने अगदी मनापासून त्याबद्दल पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला क्षमा केली. संदेष्टा नाथान त्याच्याकडे आला तेव्हा दावीदाने उघडपणे कबूल केले: “मी परमेश्‍वराविरुद्ध पातक केले आहे.”—२ शमुवेल १२:१३.

परंतु, एखाद्याने पाप केल्यानंतर मनापासून पश्‍चात्ताप केल्यास यहोवा फक्‍त त्याला क्षमा करून सोडून देत नाही तर या व्यक्‍तीने आध्यात्मिकरीत्या बरे व्हावे म्हणून त्याला मदत करण्याकरता प्रेमळ तरतूदी देखील करतो. दावीदाच्या बाबतीत, संदेष्टा नाथानाने त्याला ही मदत दिली. आज, ख्रिस्ती मंडळीत आध्यात्मिक प्रौढ पुरूष अर्थात वडील आहेत. शिष्य याकोब असे म्हणतो: “तुम्हांपैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्‍वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.”—याकोब ५:१४, १५.

अनुभवी वडील, पातक्याची भावनिक वेदना शमवण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न करतात. त्याच्याबरोबर व्यवहार करताना ते होता होईल तितके यहोवाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. पातक्याला शिक्षा द्यावी लागत असतानाही ते कठोर होऊ इच्छित नाहीत. तर, त्याला लागणारी मदत ते दयाळुपणे देतात. देवाच्या वचनाचा उपयोग करून अगदी धीराने ते चूक करणाऱ्‍याला आपल्या विचारसरणीत सुधारणा करण्यास मदत करतात. (गलतीकर ६:१) दावीदाने जशी नाथानाच्या प्रेमळ सल्ल्यानंतर आपली चूक कबूल केली त्याचप्रमाणे एखादी व्यक्‍ती स्वतःहून आपल्या पापांची कबूली देत नाही तेव्हा वडील जन त्या व्यक्‍तीबरोबर बोलल्यानंतर ती व्यक्‍ती कबूली देण्यास प्रवृत्त होऊ शकते. वडिलांच्या या मदतीमुळे पाप करणारी व्यक्‍ती पुन्हा ते पाप करण्याचा धोका पत्करणार नाही आणि पाप करण्यात निर्ढावून गंभीर परिणाम भोगणार नाही.—इब्री लोकांस १०:२६-३१.

हे खरे आहे, की आपल्या पापाची कबूली देऊन क्षमा मिळवण्यास पातक्याला जरा जडच जाते. यासाठी त्याला आंतरिक शक्‍तीची गरज आहे. पण समजा एखाद्याने असे केले नाही तर? पुढील अनुभवावर विचार करा. एका मनुष्याने मंडळीतील वडिलांकडे त्याच्या पापांची कबूली दिली नव्हती. तेव्हा त्याला कसे वाटत होते त्याविषयी तो म्हणतो: “माझा विवेक मला सतत बोचत होता. त्यामुळे मी प्रचार कार्यात जास्तीतजास्त भाग घेऊ लागलो, तरीपण ती अपराधीपणाची भावना काही केल्या जात नव्हती.” या मनुष्याला असे वाटत होते, की त्याने केलेल्या गंभीर पापाची त्याने देवाजवळ जी कबुली दिली होती ती पुरे होती. परंतु तेवढेच पुरेसे नव्हते हे स्पष्टच आहे. राजा दावीदाप्रमाणेच त्याचेही मन त्याला आतल्या आत खात होते. (स्तोत्र ५१:८, ११) तेव्हा, वडिलांकरवी यहोवा पुरवत असलेले प्रेमळ साहाय्य स्वीकारण्यात किती शहाणपण आहे!