व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेवटल्या विजयाकडे वाटचाल!

शेवटल्या विजयाकडे वाटचाल!

शेवटल्या विजयाकडे वाटचाल!

“मी पाहिले तो एक पांढरा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुगूट देण्यात आला; तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला.”—प्रकटीकरण ६:२.

१. योहानाने दृष्टान्तात भविष्यातील कोणत्या घटना पाहिल्या?

 देवाच्या प्रेरणेने प्रेषित योहानाने भविष्यात १,८०० वर्षांनंतरच्या घटना पाहून, ख्रिस्त राजा झाल्याचे व सिंहासनावर बसल्याचे वर्णन केले. योहानाला दृष्टान्तात जे काही पाहायला मिळाले ते खरे मानण्याकरता विश्‍वासाची गरज होती. आज आपल्याजवळ स्पष्ट पुरावा आहे की योहानाने भाकीत केलेली ती घटना १९१४ साली घडली. विश्‍वासाच्या डोळ्यांनी, ख्रिस्त ‘विजय मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून जात असल्याचे’ आपण पाहू शकतो.

२. राज्याचा जन्म झाल्यावर दियाबलाची काय प्रतिक्रिया होती आणि हा कशाचा पुरावा आहे?

राज्याचा जन्म झाल्यानंतर, सैतानाला स्वर्गातून बाहेर काढण्यात आले; त्यामुळे तो अधिकच जोराने व क्रोधाने यहोवाचा प्रतिकार करू लागला, पण तरीसुद्धा त्याचा पराभव निश्‍चित आहे. (प्रकटीकरण १२:७-१२) त्याच्या क्रोधामुळे जगाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. मानवी समाजाचा ऱ्‍हास होताना दिसत आहे. पण यहोवाच्या साक्षीदारांना पूर्ण खात्री आहे की त्यांचा राजा “विजयावर विजय” मिळवत असल्याचाच हा स्पष्ट पुरावा आहे.

नव्या जगाच्या समाजाला आकार दिला जात आहे

३, ४. (अ) राज्याचा जन्म झाल्यापासून ख्रिस्ती मंडळीत कोणते संघटनविषयक परिवर्तन घडून आले आणि हे का आवश्‍यक होते? (ब) यशयाने भाकीत केल्याप्रमाणे या परिवर्तनांमुळे काय फायदा झाला आहे?

राज्याचा जन्म झाल्यानंतर, पुनर्स्थापित ख्रिस्ती मंडळीला पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या एकवाक्यतेत आणणे आवश्‍यक होते कारण या मंडळीवर आता राज्याच्या अतिरिक्‍त जबाबदाऱ्‍या आल्या होत्या. म्हणूनच, टेहळणी बुरूजच्या जून १ व १५, १९३८ अंकांत ख्रिस्ती संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी परीक्षण करण्यात आले. नंतर डिसेंबर १५, १९७१ अंकात “नियमन मंडळ कायदेमंडळापासून वेगळे” या शीर्षकाखालील लेखात आधुनिक काळातील नियमन मंडळाची अधिक स्पष्टपणे ओळख करून देण्यात आली. १९७२ साली, स्थानिक मंडळ्यांना साहाय्य व निर्देशन देण्याकरता वडील वर्ग नेमण्यात आले.

योग्य ख्रिस्ती पर्यवेक्षकांच्या निर्देशनामुळे ख्रिस्ती मंडळी खूप बळकट झाली. तसेच, नियमन मंडळाने वडिलांना त्यांच्या जबाबदाऱ्‍यांविषयी व न्यायिक बाबींविषयी प्रशिक्षण देण्याची तरतूद केल्यामुळे याला आणखी हातभार लागला. देवाच्या पार्थिव संघटनेच्या व्यवस्थेत झालेल्या या क्रमिक सुधारणा आणि त्यांमुळे होणाऱ्‍या रचनात्मक परिणामांविषयी यशया ६०:१७ यात भाकीत करण्यात आले होते: “मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडाच्या जागी तांबे व दगडाच्या जागी लोखंड आणीन; तुजवर शांति सत्ता चालवील [“पर्यवेक्षक होईल,” NW] व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” या रचनात्मक परिवर्तनांवरून देवाच्या राज्याला आवेशाने पाठिंबा देणाऱ्‍यांविषयी तो संतुष्ट असल्याचे व त्यांच्यावर त्याचा आशीर्वाद असल्याचे सिद्ध झाले.

५. (अ) यहोवाने त्याच्या लोकांना आशीर्वादित केल्यानंतर सैतानाची काय प्रतिक्रिया होती? (ब) फिलिप्पैकर १:७ या वचनाच्या एकवाक्यतेत यहोवाच्या लोकांनी सैतानाच्या क्रोधाला कसे प्रत्युत्तर दिले आहे?

राज्याच्या जन्मानंतर देवाने आपल्या लोकांकडे प्रेमळपणे लक्ष दिल्याचे व त्यांचे मार्गदर्शन केल्याचे सैतानाच्या नजरेतून सुटले नाही. उदाहरणार्थ, १९३१ साली ख्रिश्‍चनांच्या या लहानशा गटाने जाहीर केले की ते केवळ बायबल विद्यार्थी नव्हते. यशया ४३:१० या वचनानुसार ते यहोवाचे साक्षीदार होते! आणि नेमक्या त्याच वेळी संयोगाने म्हणा किंवा आणखी कशामुळे पण सबंध जगात कधी झाला नव्हता इतक्या प्रमाणात त्यांचा छळ होऊ लागला. अमेरिका, कॅनडा आणि जर्मनी यांसारख्या धार्मिक स्वातंत्र्याकरता नावाजलेल्या देशांतही साक्षीदारांना धार्मिक स्वातंत्र्याकरता वारंवार कायदेशीर लढाया कराव्या लागल्या. १९८८ सालापर्यंत यु.एस. सर्वोच्च न्यायालयाने यहोवाच्या साक्षीदारांना गोवणाऱ्‍या ७१ प्रकरणांची पाहणी केली होती आणि यांपैकी दोन तृतियांश खटल्यांत त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. पहिल्या शतकाप्रमाणे, ‘सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर दिले जावे व तिचे कायदेशीर समर्थन केले जावे,’ म्हणून आज सबंध जगात कायदेशीर लढाया अजूनही लढल्या जात आहेत.—फिलिप्पैकर १:७, NW.

६. बंदी व प्रतिबंध यांमुळे यहोवाच्या लोकांची वाटचाल थांबली का? उदाहरण द्या.

दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या बेतात असताना, १९३० च्या दशकात बऱ्‍याच देशांतील हुकूमशाही सरकारांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आणली; जर्मनी, स्पेन व जपान ही त्यांपैकी केवळ तीन उदाहरणे आहेत. पण २००० सालात मात्र या तीन देशांतच देवाच्या राज्याचे जवळजवळ ५,००,००० सक्रिय प्रचारक होते. १९३६ साली सबंध जगात जितके साक्षीदार होते त्याच्या दहा पटीने ही संख्या जास्त होती! स्पष्टपणे, बंदी किंवा प्रतिबंध यहोवाच्या लोकांना त्यांच्या विजयी नेत्याच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली प्रगतीशील वाटचाल करण्यापासून रोखू शकत नाहीत.

७. सन १९५८ मध्ये कोणती अभूतपूर्व घटना घडली आणि तेव्हापासून कोणते लक्षणीय परिवर्तन झाले आहे?

या प्रगतीशील वाटचालीचा एक पुरावा म्हणजे १९५८ साली न्यू यॉर्क सिटी येथे भरवण्यात आलेले ईश्‍वरी इच्छा आंतरराष्ट्रीय संमेलन होय. २,५३,९२२ इतकी उपस्थिती असलेले हे अधिवेशन, तेव्हापर्यंत यहोवाच्या साक्षीदारांनी भरवलेले सर्वात भव्य अधिवेशन होते. १९७० पर्यंत, वरती उल्लेख केलेल्या तिन्ही देशांत, तेव्हाच्या पूर्व जर्मनीचा अपवाद सोडता, साक्षीदारांचे कार्य पुन्हा सुरू करण्यात आले होते. पण सोव्हिएत संघराज्य आणि वॉरसा तहांतर्गत त्याच्या मित्र राष्ट्रांचा समावेश असलेल्या विस्तारित क्षेत्रात अजूनही साक्षीदारांवर बंदी होती. आज या पूर्वीच्या कम्युनिस्ट देशांत पाच लाख पेक्षा जास्त सक्रिय साक्षीदार आहेत.

८. यहोवाचा आशीर्वाद त्याच्या लोकांवर असल्यामुळे काय घडून आले आहे आणि १९५० साली टेहळणी बुरूज यात या संदर्भात काय म्हणण्यात आले होते?

यहोवाचे साक्षीदार ‘पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटत असल्यामुळे’ यहोवाने त्यांना आशीर्वादित केले व त्यांच्या संख्येत इतकी वाढ होऊ शकली. (मत्तय ६:३३) यशयाच्या पुढील भविष्यवाणीची शब्दशः पूर्णता झाली आहे: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यशया ६०:२२) पण हे एवढ्यावरच थांबणार नाही. मागच्या दशकातच राज्य शासनाच्या सक्रिय समर्थकांच्या संख्येत १७,५०,००० पेक्षा अधिक जणांची भर पडली. हे लोक स्वेच्छेने एका अशा गटात सामील झाले आहेत ज्याविषयी १९५० सालच्या टेहळणी बुरूज नियतकालिकात असे म्हणण्यात आले: “देव आज एका नवीन जागतिक समाजाला आकार देत आहे. . . . नवीन जगातील समाजाचे प्राथमिक सदस्य असणारे हे लोक हर्मगिदोनातून पार होऊन . . . ‘नवीन पृथ्वीवर’ पाऊल ठेवणारे पहिले असतील . . . ; ईश्‍वरशासित पद्धतीने संघटित असलेले हे लोक संघटनेच्या कार्यपद्धतींशी परिचित असतील.” शेवटी या लेखात असे म्हटले होते: “चला तर मग, एक नवीन जागतिक समाज या नात्याने खांद्याला खांदा लावून पुढे वाटचाल करू या!”

९. यहोवाच्या साक्षीदारांनी गत वर्षांत मिळवलेले ज्ञान त्यांना कशाप्रकारे उपयोगी पडले आहे?

आजपर्यंत या सतत वाढत असलेल्या नवीन जागतिक समाजाच्या सदस्यांनी बरेच व्यावहारिक ज्ञान मिळवले आहे. हे ज्ञान त्यांना आज तर उपयोगी पडलेच आहे पण हर्मगिदोनानंतर पृथ्वीच्या पुनर्स्थापनेच्या कार्यातही हे ज्ञान कदाचित त्यांना अतिशय उपयोगी ठरेल. उदाहणार्थ, मोठमोठ्या अधिवेशनांचे आयोजन, कमीत कमी वेळात तातडीची मदत आणि इमारतींचे जलद बांधकाम यांत साक्षीदारांना बराच अनुभव मिळाला आहे. आणि या कार्यासाठी बरेच जण यहोवाच्या साक्षीदारांची प्रशंसा आणि आदर करू लागले आहेत.

गैरसमज दूर करणे

१०, ११. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेले गैरसमज कशाप्रकारे दूर झाले आहेत हे उदाहरणासहित सांगा.

१० तरीसुद्धा काही लोक मात्र यहोवाच्या साक्षीदारांवर असा आरोप लावतात की ते सामाजिक प्रवाहाच्या विरोधात कार्य करतात. रक्‍त संक्रमणे, तटस्थता, धूम्रपान आणि नैतिकता यांविषयी साक्षीदारांच्या बायबल आधारित विश्‍वासांमुळेच अधिकांश लोक त्यांच्यावर असा आरोप लावतात. पण सामान्य जनता अलीकडे हे मान्य करू लागली आहे की साक्षीदारांचे विश्‍वास दखल घेण्याजोगे आहेत. उदाहरणार्थ, पोलंडमध्ये एका डॉक्टरने यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रशासकीय कार्यालयाला फोन करून सांगितले की नुकतेच त्यांच्या इस्पितळात तिच्या काही सहकाऱ्‍यांसोबत रक्‍त संक्रमणे या विषयावर बरेच तास वादविवाद झाला. झायननिक झकोदनी या पोलिश दैनिकात प्रकाशित झालेल्या एका लेखावरून हा वादविवाद सुरू झाला होता. या महिला डॉक्टरने कबूल केले, “वैद्यकीय क्षेत्रात बऱ्‍याचदा रक्‍ताचा अनावश्‍यक उपयोग केला जातो, याची मला स्वतःला खंत वाटते. हे बदलायलाच हवे आणि निदान कोणीतरी सुरवात केली याचा मला आनंद वाटतो. मला या संदर्भात आणखी माहिती घेण्याची इच्छा आहे.”

११ मागच्या वर्षी एका परिषदेदरम्यान अमेरिका, इस्राएल, कॅनडा व युरोप येथील वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी रक्‍ताविना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना मदत करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या माहितीवर चर्चा केली. स्वित्झर्लंड येथे भरवण्यात आलेल्या या परिषदेत असे सांगण्यात आले की बहुतांश लोकांच्या समजुतीच्या अगदी उलट, रक्‍त संक्रमणे दिलेल्या रुग्णांतील मृत्यूचे प्रमाण रक्‍त न दिलेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. रक्‍तासह उपचार केलेल्या रुग्णांच्या तुलनेत साक्षीदार रुग्णांना सहसा लवकर घरी जाता येते आणि यामुळे उपचाराचा खर्चही सहसा कमी होतो.

१२. राजकीय तटस्थतेच्या संबंधात यहोवाच्या साक्षीदारांच्या भूमिकेविषयी प्रतिष्ठित लोकांनीही कशी प्रशंसा केली याचे उदाहरण द्या.

१२ यहोवाच्या साक्षीदारांनी दुसऱ्‍या महायुद्धाआधी आणि दरम्यान नात्सी शक्‍तीच्या क्रूर छळाला तोंड देताना घेतलेल्या तटस्थ भूमिकेविषयीही बऱ्‍याच लोकांनी चांगले मत व्यक्‍त केले आहे. जेहोवाज विटनेसेस स्टॅन्ड फर्म अगेन्स्ट नात्सी असॉल्ट या यहोवाच्या साक्षीदारांनी तयार केलेल्या आणि अगदी उचितपणे रॅवेन्सब्रुक छळ छावणीत नोव्हेंबर ६, १९९६ रोजी पहिल्यांदा प्रसारित केलेल्या व्हिडिओविषयीही बऱ्‍याच लोकांनी चांगली मते व्यक्‍त केली. एप्रिल १८, १९९८ साली बर्गन-बेल्सन येथील कुप्रसिद्ध छळछावणीत या व्हिडियो प्रसारणाच्या उद्‌घाटन प्रसंगी लोअर सॅक्सनी येथील राजनैतिक शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. वोल्फगँग शील यांनी कबूल केले की “राष्ट्रीय समाजवादाला ख्रिस्ती चर्चेसच्या तुलनेत यहोवाच्या साक्षीदारांनी कितीतरी जास्त ठामपणे धिक्कारले; ही इतिहासातील एक लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. . . . यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणुकींविषयी व त्यांच्या धार्मिक वर्तनाविषयी आपले वैयक्‍तिक मत काहीही असो, पण नात्सी शासनादरम्यान त्यांनी दाखवलेल्या खंबीरतेमुळे ते निश्‍चितच आदरास पात्र आहेत.”

१३, १४. (अ) एका अनपेक्षित व्यक्‍तीने सुरवातीच्या ख्रिश्‍चनांबद्दल कोणते विचारशील मत व्यक्‍त केले? (ब) आधुनिक काळात देवाच्या लोकांचे कशाप्रकारे समर्थन करण्यात आले याची काही उदाहरणे द्या.

१३ वादग्रस्त विषयांवर जेव्हा प्रतिष्ठित व्यक्‍ती यहोवाच्या साक्षीदारांचे समर्थन करतात किंवा न्यायालयाचे निर्णय त्यांच्या बाजूने दिले जातात तेव्हा आपोआपच त्यांच्याविरुद्ध लोकांना असलेले पूर्वग्रह दूर होतात आणि लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारतो. सहसा यामुळे पूर्वी त्यांचे ऐकून घ्यायला अजिबात तयार नसलेल्या लोकांशी बोलण्याची त्यांना नव्याने संधी मिळते. त्यामुळे या प्रतिष्ठित लोकांच्या किंवा न्यायालयाच्या समर्थनाचे यहोवाचे साक्षीदार नेहमीच स्वागत करतात व त्यांची मनापासून कदर बाळगतात. यावरून जेरूसलेममध्ये पहिल्या शतकात घडलेल्या एका घटनेची आठवण होते. सन्हेद्रिन अर्थात यहुदी न्यायसभा, ख्रिस्ती लोकांच्या आवेशी प्रचार कार्यामुळे त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकण्याचा विचार करत होती. तेव्हा ‘सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेल्या, गमलियेल नावाच्या एका परूशी शास्त्राध्यापकाने’ त्यांना अशी ताकीद दिली, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्‍या माणसांचे काय करणार ह्‍याविषयी जपून असा. . . . ह्‍या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल; परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”—प्रेषितांची कृत्ये ५:३३-३९.

१४ गमलियेलाप्रमाणेच अलीकडे अनेक प्रतिष्ठित व्यक्‍तींनी धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात यहोवाच्या साक्षीदारांच्या समर्थनार्थ मत व्यक्‍त केले आहे. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य व धार्मिक विश्‍वास अकादमीच्या भूतपूर्व अध्यक्षांनी असा तर्कवाद मांडला: “केवळ समाजाला एखाद्या धर्माचे विश्‍वास अमान्य असल्यामुळे किंवा परंपरेविरुद्ध वाटत असल्यामुळे त्या धर्माच्या सदस्यांना त्यांच्या धार्मिक हक्कांपासून वंचित केले जाऊ नये.” तथाकथित धर्मपंथांची कसून चौकशी करण्यासाठी जर्मन सरकारने नेमलेल्या चौकशी मंडळाविषयी लिपझीग विद्यापीठातील धार्मिक शास्त्रांच्या एका प्राध्यापकांनी असा समर्पक प्रश्‍न केला: “केवळ अल्पसंख्याक धर्म गटांचीच चौकशी का म्हणून, दोन मोठ्या चर्चेसची [रोमन कॅथलिक चर्च आणि लूथरन चर्च] चौकशी का होऊ नये?” या प्रश्‍नाचे उत्तर एका माजी जर्मन अधिकाऱ्‍याच्या पुढील शब्दांवरून मिळते; त्यांनी असे लिहिले: “पडद्याच्या मागे पाहिल्यास, या सरकारी चौकशी मंडळाने घेतलेल्या राजकीय भूमिकेवर कट्टर चर्च अधिकाऱ्‍यांचाच प्रभाव होता.”

आपली सुटका कोण करील?

१५, १६. (अ) गमलियेलने जे काही केले त्याचा परिणाम मर्यादित का होता? (ब) इतर तीन व्यक्‍तींनी येशूला मदत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कशाप्रकारे पूर्णपणे यश आले नाही?

१५ गमलियेलने जे म्हटले ते केवळ या वस्तुस्थितीला पुष्टी देते की देवाचा पाठिंबा असलेले कार्य विफल होणे शक्य नाही. त्याने सन्हेद्रिनाला दिलेल्या सल्ल्यामुळे निश्‍चितच सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना फायदा झाला असेल पण आपल्या अनुयायांचा छळ केला जाईल हे येशूने आधीच सांगितले होते याचा त्यांनी स्वतःला विसर पडू दिला नाही. धर्मपुढारी, ख्रिश्‍चनांचे नामोनिशाण मिटवून टाकायला निघाले होते, तेव्हा गमलियेलने त्यांना रोखले हे खरे; पण यामुळे ख्रिश्‍चनांचा छळ पूर्णपणे थांबला नाही. कारण बायबल आपल्याला पुढे सांगते: “तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.”—प्रेषितांची कृत्ये ५:४०.

१६ येशूची चौकशी केली जात असताना पंतय पिलाताला त्याच्यात कोणत्याही प्रकारचा दोष आढळला नाही आणि यामुळे त्याने त्याची सुटका करण्याचा प्रयत्न देखील केला. पण तो असे करू शकला नाही. (योहान १८:३८, ३९; १९:४, ६, १२-१६) सन्हेद्रिनचे सदस्य असणारे निकदेम व अरिमथयाचा योसेफ हे देखील येशूच्या बाजूने होते पण येशूविरुद्ध कारवाई करण्यापासून त्या न्यायसभेला परावृत्त करणे त्यांच्या हातात नव्हते. (लूक २३:५०-५२; योहान ७:४५-५२; १९:३८-४०) त्याअर्थी, यहोवाच्या लोकांच्या समर्थनासाठी उभे राहणारे, त्यांची सुटका करू इच्छित असले तरीसुद्धा, शेवटी ते मानवच आहेत; आणि कोणत्याही कारणामुळे का होईना, पण त्यांना मिळणारे यश मर्यादित आहे. या जगाने ज्याप्रमाणे ख्रिस्ताचा द्वेष केला त्याचप्रमाणे ते ख्रिस्ताच्या खऱ्‍या अनुयायांचाही द्वेष करतच राहील. आपली पूर्णपणे सुटका केवळ यहोवा करू शकतो.—प्रेषितांची कृत्ये २:२४.

१७. यहोवाचे साक्षीदार कोणता वास्तविक दृष्टिकोन बाळगतात, पण सुवार्तेचा प्रचार करत राहण्याच्या त्यांचा निर्धारापासून ते मागे का हटत नाहीत?

१७ तेव्हा वास्तविक दृष्टिकोन बाळगून यहोवाचे साक्षीदार पुढेही छळ होण्याची अपेक्षा करतात. त्यांना होणारा विरोध सैतानाचे व्यवस्थीकरण पूर्णपणे पराभूत झाल्यावरच थांबेल. पण हा छळ, दुःखदायक असला तरीसुद्धा राज्याचा प्रचार करण्याचे त्यांच्यावर सोपवलेले कार्य थांबवण्यास तो त्यांना भाग पाडू शकत नाही. आणि कसे पाडू शकेल, कारण त्यांना तर देवाचा पाठिंबा आहे. ते आपला निर्भय नेता येशू ख्रिस्त याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवतात.—प्रेषितांची कृत्ये ५:१७-२१, २७-३२.

१८. यहोवाच्या लोकांना अद्याप कोणत्या कठीण परीक्षेला तोंड द्यायचे आहे पण कोणत्या परिणामाची त्यांना पूर्ण खात्री आहे?

१८ खऱ्‍या धर्माची सुरवात झाल्यापासूनच त्याला कडव्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. लवकरच त्याच्यावर गोगचा, अर्थात स्वर्गातून बाहेर काढल्यानंतर पतित झालेल्या सैतानाचा सर्वात मोठा हल्ला होईल. पण खऱ्‍या धर्माचा नाश होणार नाही. (यहेज्केल ३८:१४-१६) ‘संपूर्ण जगातील राजे,’ सैतानाच्या नेतृत्वाखाली “कोकऱ्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा आहे.” (प्रकटीकरण १६:१४; १७:१४) होय, आपला राजा त्याच्या शेवटल्या विजयाकडे वाटचाल करत आहे आणि लवकरच तो “विजयावर विजय” मिळवेल. लवकरच अशी वेळ येईल जेव्हा यहोवाचे साक्षीदार बेधडक असे म्हणू शकतील की ‘देव आम्हाला अनुकूल आहे;’ त्या वेळी त्यांना विरोध करणारा कोणीही उरणार नाही. हे जाणून आपल्या राजासोबत वाटचाल करणे हा आपल्याला मिळालेला बहुमानच नव्हे का?—रोमकर ८:३१; फिलिप्पैकर १:२७, २८.

तुम्ही समजावून सांगू शकता का?

• राज्याचा जन्म झाल्यापासून यहोवाने ख्रिस्ती मंडळीला बळकट करण्यासाठी काय केले आहे?

• ख्रिस्ताला विजय न मिळू देण्याच्या प्रयत्नात सैतानाने काय केले आहे आणि याचा काय परिणाम झाला आहे?

• गैर साक्षीदार व्यक्‍ती आपल्या समर्थनार्थ काही करतात तेव्हा आपण कोणता संतुलित दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

• लवकरच सैतान काय करेल आणि त्याचा काय परिणाम होईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

अधिवेशने यहोवाच्या लोकांच्या प्रगतीशील वाटचालीचा पुरावा आहेत

[२० पानांवरील चित्रे]

दुसऱ्‍या महायुद्धात साक्षीदारांच्या तटस्थ भूमिकेमुळे अजूनही यहोवाची स्तुती केली जात आहे