व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जो अदृश्‍य आहे त्याला पाहात असल्यासारखे धीर धरा

जो अदृश्‍य आहे त्याला पाहात असल्यासारखे धीर धरा

जो अदृश्‍य आहे त्याला पाहात असल्यासारखे धीर धरा

“जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा [मोशेने] धीर धरला.” —इब्री लोकांस ११:२७.

१. डोंगरावरील उपदेशात येशूने देवाबद्दल कोणते लक्षवेधक विधान केले?

 यहोवा अदृश्‍य देव आहे. मोशेने त्याचे तेज पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा यहोवाने त्याला उत्तर दिले: “तुला माझे मुख पाहवणार नाही; कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्गम ३३:२०) प्रेषित योहानाने लिहिले: “देवाला कोणीहि कधीच पाहिले नाही.” (योहान १:१८) येशू ख्रिस्त या पृथ्वीवर मानवाच्या रूपात होता तेव्हा तो देखील देवाला पाहू शकत नव्हता. पण डोंगरावरील त्याच्या उपदेशात त्याने म्हटले: “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.” (मत्तय ५:८) येशूच्या या शब्दांचे काय तात्पर्य होते?

२. आपण आपल्या डोळ्यांनी देवाला प्रत्यक्ष का पाहू शकत नाही?

शास्त्रवचनांत यहोवाची एक अदृश्‍य आत्मा म्हणून ओळख करून देण्यात आली आहे. (योहान ४:२४; कलस्सैकर १:१५; १ तीमथ्य १:१७) त्याअर्थी, मानव यहोवाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतील असे येशू सांगू इच्छित नव्हता. अभिषिक्‍त ख्रिस्ती आत्मिक प्राणी म्हणून स्वर्गात पुनरुत्थित झाल्यानंतर यहोवा देवाला पाहतील हे खरे आहे. पण, जे मानव “अंतःकरणाचे शुद्ध” आहेत आणि ज्यांना पृथ्वीवर सर्वदा जगण्याची आशा आहे, ते देखील देवाला ‘पाहू’ शकतात. कसे?

३. मानव देवाच्या काही गुणांविषयी कशाप्रकारे ज्ञान घेऊ शकतात?

यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टी आपण पाहतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल बरेच काही शिकतो. त्याच्या अद्‌भुत सामर्थ्याचा विचार करून आपण अचंबित होतो आणि तोच आपला निर्माता देव आहे हे कबूल करण्यास प्रवृत्त होतो. (इब्री लोकांस ११:३; प्रकटीकरण ४:११) याबाबतीत प्रेषित पौलाने लिहिले: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) तेव्हा देवाला पाहण्याविषयी येशूने जे सांगितले त्यात त्याच्या गुणांचे ज्ञान होणे सामील आहे. अशारितीने एक व्यक्‍ती अचूक ज्ञानाच्या आधारावर व ‘अंतःचक्षुंनी’ आध्यात्मिक दृष्ट्या देवाला पाहू शकते. (इफिसकर १:१८) येशूचे शब्द व त्याची कृत्ये देखील देवाबद्दल बरेच काही प्रकट करतात. म्हणूनच येशूने म्हटले: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) येशूने यहोवाचे व्यक्‍तिमत्त्व अगदी हुबेहूब प्रकट केले. तेव्हा येशूच्या जीवनाबद्दल आणि शिकवणुकींबद्दल ज्ञान घेतल्याने आपल्याला देवाचे काही गुण पाहण्यास किंवा त्यांविषयी ज्ञान घेण्यास मदत मिळते.

आध्यात्मिक प्रवृत्ती असणे महत्त्वाचे

४. आज बहुतेक लोकांत आध्यात्मिक वृत्तीचा अभाव कशाप्रकारे दिसून येतो?

आज विश्‍वास आणि खरी आध्यात्मिक वृत्ती अभावानेच पाहायला मिळते. पौलाने म्हटल्याप्रमाणे “सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) बहुतेक लोक आपलाच स्वार्थ साधण्यामागे लागले आहेत; त्यांना देवावर विश्‍वासच नाही. त्यांच्या पापी आचरणामुळे व आध्यात्मिक प्रवृत्तीच्या अभावामुळे ते अंतर्दृष्टीने देवाला पाहू शकत नाहीत; प्रेषित योहानाने लिहिले: “वाईट करणाऱ्‍याने देवाला पाहिलेले नाही.” (३ योहान ११) देवाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले नसल्यामुळे हे लोक असे वागतात जणू ते काय करतात हे तो पाहूच शकत नाही. (यहेज्केल ९:९) ते आध्यात्मिक गोष्टींना तुच्छ लेखतात आणि त्यामुळे ते “देवाविषयीचे ज्ञान” मिळवू शकत नाहीत. (नीतिसूत्रे २:५) या संदर्भात पौलाने लिहिलेले पुढील शब्द समर्पक आहेत: “स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.”—१ करिंथकर २:१४.

५. आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक कोणती जाणीव ठेवतात?

पण आपण आध्यात्मिक प्रवृत्तीचे असू, तर सतत या गोष्टीची जाणीव ठेवू की यहोवा जरी आपल्या चुका शोधण्यास उत्सुक नसला तरीसुद्धा आपण वाईट विचारांनुसार व इच्छांनुसार आचरण करतो तेव्हा त्याच्या नजरेतून हे सुटत नाही. खरोखर, “मनुष्याचे मार्ग परमेश्‍वराच्या दृष्टीसमोर आहेत, आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करितो.” (नीतिसूत्रे ५:२१) जर आपल्या हातून पाप झाले तरीसुद्धा आपण यहोवाची क्षमा मागण्यास प्रवृत्त होतो कारण आपले त्याच्यावर प्रेम आहे आणि आपण त्याचे मन दुखवू इच्छित नाही.—स्तोत्र ७८:४१; १३०:३.

आपण कशाप्रकारे धीर धरू शकतो?

६. धीर धरण्याचा काय अर्थ होतो?

आपण यहोवाला आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नसलो तरीसुद्धा आपण नेहमी हे आठवणीत ठेवले पाहिजे की तो आपल्याला पाहू शकतो. त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवल्यामुळे व त्याची मदत मागणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे हा विश्‍वास बाळगल्यामुळे आपल्याला धीर धरण्यास, अर्थात विश्‍वासात निश्‍चल व दृढ राहण्यास मदत मिळेल. (स्तोत्र १४५:१८) मग मोशेबद्दल पौलाने लिहिलेले पुढील शब्द आपल्या बाबतीतही खरे ठरतील: “त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्‍वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.”—इब्री लोकांस ११:२७.

७, ८. मोशेला फारोचा सामना करण्याचे धैर्य कशामुळे मिळाले?

इस्राएल लोकांना ईजिप्तच्या दास्यातून सोडवून बाहेर नेण्याचे काम देवाने मोशेवर सोपवले होते. त्यामुळे त्याला बऱ्‍याचदा जुलमी फारोसमोर व त्याच्या दरबारात मोठमोठ्या धर्माधिकाऱ्‍यांपुढे व सेनाधीशांपुढे जावे लागायचे. फारोच्या महालात कदाचित चहुकडे अनेक मूर्ती व प्रतिमा असतील. पण यहोवा मात्र अदृश्‍य असूनही मोशेकरता ईजिप्तच्या निर्जीव देवांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या प्रतिमांसारखा नव्हे तर अगदी वास्तविक होता. म्हणूनच तर मोशे फारोला अजिबात घाबरला नाही!

फारोचा सामना करण्याचे धैर्य मोशेला कोठून मिळाले? शास्त्रवचने आपल्याला सांगतात की “मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गणना १२:३) निश्‍चितच मोशेच्या सुदृढ आध्यात्मिक प्रवृत्तीने व देव आपल्या पाठीशी आहे या त्याच्या विश्‍वासाने ईजिप्तच्या निर्दय राजासमोर ‘अदृश्‍य’ देवाचे संदेश सांगण्याची शक्‍ती त्याला मिळाली असेल. आज अदृश्‍य देवाला ‘पाहणारे’ कोणत्या काही मार्गांनी त्याच्यावर आपला विश्‍वास प्रकट करू शकतात?

९. धीर धरण्याचा एक मार्ग कोणता आहे?

देवावर विश्‍वास असल्याचे दाखवून जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा सतत धीर धरण्याचा एक मार्ग म्हणजे छळ होत असतानाही धैर्याने प्रचार कार्य करत राहणे. येशूने आपल्या शिष्यांना आधीच सावध केले होते: “माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करितील.” (लूक २१:१७) तसेच, त्याने त्यांना असेही सांगितले: “दास धन्यापेक्षा मोठा नाही . . . ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (योहान १५:२०) येशूचे शब्द खरे ठरले. त्याच्या मृत्यूनंतर काही काळातच त्याच्या अनुयायांचा छळ होऊ लागला; त्यांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या, बऱ्‍याच जणांना अटक करण्यात आली व मारहाण देखील त्यांना सहन करावी लागली. (प्रेषितांची कृत्ये ४:१-३, १८-२१; ५:१७, १८, ४०) छळाची लाट आली तरीसुद्धा येशूच्या प्रेषितांनी व इतर शिष्यांनी निर्भयपणे सुवार्तेचा प्रचार करण्याचे थांबवले नाही.—प्रेषितांची कृत्ये ४:२९-३१.

१०. यहोवा आपले संरक्षण करतो व काळजी घेतो याची सतत जाणीव ठेवल्यामुळे राज्य प्रचाराच्या कार्यात आपल्याला कशाप्रकारे मदत मिळते?

१० मोशेप्रमाणे येशूचे सुरवातीचे अनुयायी देखील त्यांच्या अनेक दृश्‍य शत्रूंना घाबरले नाहीत. येशूच्या शिष्यांना देवावर विश्‍वास होता आणि त्यामुळेच त्यांचा भयंकर छळ झाला तरीसुद्धा ते डगमगले नाहीत. होय, जो अदृश्‍य त्याला पाहत असल्यासारखा त्यांनी धीर धरला. आजही, यहोवा आपले संरक्षण करतो व काळजी घेतो याची सतत जाणीव ठेवल्यामुळे राज्य प्रचाराच्या कार्यात धैर्याने व निर्भयतेने टिकून राहण्यास मदत मिळते. देवाचे वचन सांगते, की “मनुष्याची भीति पाशरूप होते; पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” (नीतिसूत्रे २९:२५) त्यामुळे छळ होण्याच्या भीतीने आपण माघार घेत नाही; तसेच आपल्या सेवाकार्याची आपल्याला लाज वाटत नाही. आपला विश्‍वास आपल्याला शेजाऱ्‍यांना, सहकाऱ्‍यांना, शाळासोबत्यांना आणि इतरांना निर्भयपणे साक्ष देण्याची प्रेरणा देतो.—रोमकर १:१४-१६.

अदृश्‍य देव आपल्या लोकांचे मार्गदर्शन करतो

११. पेत्र आणि यहुदाने सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ती मंडळीतील काही जणांनी आध्यात्मिक प्रवृत्तीचा अभाव असल्याचे कशाप्रकारे दाखवले?

११ विश्‍वास आपल्याला हे पाहण्यास मदत करतो, की आज यहोवा त्याच्या पृथ्वीवरील संघटनेचे मार्गदर्शन करत आहे. यामुळे आपण मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेल्यांची टीका करण्याची प्रवृत्ती टाळतो. प्रेषित पेत्र व येशूचा सावत्र भाऊ यहुदा यानेही अशा काहीजणांबद्दल ताकीद दिली होती ज्यांच्यात आध्यात्मिक प्रवृत्तीचा अंशही नसेल आणि त्यामुळे ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांबद्दल ते अपमानास्पद रितीने बोलतील. (२ पेत्र २:९-१२; यहूदा ८) समजा यहोवाला आपण प्रत्यक्ष पाहू शकलो असतो, तर सतत चुका शोधण्याची प्रवृत्ती असलेले हे लोक त्याच्यासमोर अशाप्रकारे बोलायला धजले असते का? निश्‍चितच नाही! पण देव अदृश्‍य असल्यामुळे हे शारीरिक प्रवृत्तीचे लोक विसरले की सर्वांना देवाला जबाब द्यायचा आहे.

१२. मंडळीत नेतृत्व करणाऱ्‍यांबद्दल आपण कशी मनोवृत्ती बाळगावी?

१२ ख्रिस्ती मंडळीतील सदस्य अपरिपूर्ण आहेत हे खरे आहे. मंडळीतल्या वडिलांच्या हातून कधीकधी अशा चुका होतात ज्यांचा आपल्यावर परिणाम होतो. पण तरीसुद्धा यहोवा आपल्या कळपाची राखण करण्यासाठी त्यांचा उपयोग करत आहे. (१ पेत्र ५:१, २) आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्याचा हा यहोवाचा एक मार्ग आहे, हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे स्त्रीपुरुष ओळखतात. म्हणून ख्रिस्ती या नात्याने आपण चुका शोधण्याची किंवा कुरकूर करण्याची वृत्ती टाळतो आणि ईश्‍वरशासित तरतुदींबद्दल आदर दाखवतो. आपले नेतृत्व करणाऱ्‍यांना आज्ञाधारक राहण्याद्वारे आपण दाखवतो की जो अदृश्‍य आहे त्याला आपण पाहतो.—इब्री लोकांस १३:१७.

देवाला आपल्या महान शिक्षकाच्या रूपात पाहणे

१३, १४. यहोवाला आपल्या महान शिक्षकाच्या रूपात पाहण्याचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?

१३ आणखी एक असे क्षेत्र आहे ज्याकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहणे आवश्‍यक आहे. यशयाने अशी भविष्यवाणी केली होती: “तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील.” (यशया ३०:२०) पृथ्वीवरील आपल्या संघटनेच्या माध्यमाने स्वतः यहोवा आज आपल्याला शिकवत आहे हे ओळखण्यासाठी विश्‍वासाची गरज आहे. (मत्तय २४:४५-४७) देवाला आपल्या महान शिक्षकाच्या रूपात पाहण्याचा अर्थ केवळ बायबल अभ्यास नियमित करणे किंवा ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहणे एवढेच नाही. तर, देवाच्या आध्यात्मिक तरतुदींचा पुरेपूर फायदा करून घेणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, आपण आध्यात्मिकरित्या वाहवत जाऊ नये म्हणून येशूद्वारे यहोवा जे काही मार्गदर्शन पुरवतो त्याकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे.—इब्री लोकांस २:१.

१४ आध्यात्मिक अन्‍नाचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी कधीकधी आपल्याला एरवीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. उदाहरणार्थ बायबलमध्ये जे भाग समजायला कठीण वाटतात ते केवळ वरवर वाचण्याची कदाचित आपल्याला सवय असेल. किंवा टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यात आपल्याला खास आवड नसलेल्या विषयांवरील लेख कदाचित आपण वाचतच नसू. किंवा ख्रिस्ती सभांमध्ये कदाचित आपण आपले लक्ष भरकटू देत असू. पण जर चर्चेतल्या मुद्द्‌यांवर आपण लक्षपूर्वक विचार केल्यास आपले लक्ष भरकटणार नाही. आपल्याला मिळणाऱ्‍या आध्यात्मिक ज्ञानाविषयी आपण मनापासून कदर दाखवतो तेव्हा यहोवाच आपला महान शिक्षक असल्याचे आपण स्वीकारतो हे दिसून येते.

आपल्याला हिशेब द्यायचा आहे

१५. आपल्याला यहोवा देव पाहू शकत नाही असा विचार करून काहीजण कशाप्रकारे वागले आहेत?

१५ या ‘अंतसमयात’ दुष्टाई अतिशय फोफावली असल्यामुळे अदृश्‍य देवावर विश्‍वास ठेवणे आणखीनच महत्त्वाचे आहे. (दानीएल १२:४) अप्रामाणिकता आणि लैंगिक अनैतिकता सर्वत्र पसरली आहे. अर्थात, इतर कोणी आपल्याला पाहू शकत नसले तरीसुद्धा यहोवा आपल्या कृत्यांकडे लक्ष देतो हे आठवणीत ठेवणे सुज्ञतेचे आहे. काहीजणांना मात्र या गोष्टीची जाणीव राहिलेली नाही. इतर लोक त्यांना पाहात नाहीत तेव्हा ते बायबलच्या विरोधात आचरण करतात. उदाहरणार्थ, इंटरनेट, टीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतर माध्यमांतून आध्यात्मिकरित्या नुकसानकारक मनोरंजन साहित्य व अश्‍लील चित्रे पाहण्याच्या मोहाचा काही जणांनी प्रतिकार केला नाही. या गोष्टी एकांतात करता येत असल्यामुळे काही जणांनी जणू यहोवा देव त्यांची कृत्ये पाहू शकत नाही, अशारितीने वर्तन केले.

१६. यहोवाच्या उच्च आदर्शांनुसार वागण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत मिळू शकते?

१६ पौलाचे पुढील शब्द आपण आठवणीत ठेवले पाहिजेत: “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.” (रोमकर १४:१२) आपण ही जाणीव ठेवली पाहिजे, की आपण जितक्या वेळा पाप करतो तितक्या वेळा यहोवाच्या विरुद्ध पाप करतो. ही जाणीव आपल्याला त्याच्या उच्च आदर्शांनुसार वागायला आणि अशुद्ध आचरण टाळायला मदत करेल. बायबल आपल्याला आठवण करून देते: “त्याच्या दृष्टीला अदृश्‍य अशी कोणतीहि निर्मिति नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्री लोकांस ४:१३) आपल्याला देवाला हिशेब द्यायचा आहे हे जरी खरे असले तरीसुद्धा त्याच्या इच्छेनुसार व आदर्शांनुसार वागण्याचे हे सर्वात मुख्य कारण नाही. सर्वात मुख्य कारण म्हणजे आपले त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. तेव्हा, मनोरंजन निवडण्यासंबंधी असो अथवा विरुद्धलिंगी व्यक्‍तीशी वागण्यासंबंधी असो, आपण नेहमी विवेकपूर्ण निर्णय घेतले पाहिजेत.

१७. यहोवा आपल्याकडे कोणत्या भावनेने लक्ष देतो?

१७ यहोवाचे आपल्याकडे सतत लक्ष असते. पण याचा अर्थ असा होत नाही, की तो सतत आपल्या पाळतीवर असतो. आपण केव्हा चूक करू आणि केव्हा तो आपल्याला शिक्षा देऊ शकेल अशी तो वाट पाहात नाही. उलट आपल्या आज्ञाधारक मुलांना बक्षीस देण्यास उत्सुक असलेल्या पित्याप्रमाणे तो आपल्याकडे मोठ्या प्रेमाने लक्ष देतो. आपला दृढ विश्‍वास पाहून आपल्या स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो आणि तो ‘त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ देतो,’ हे जाणणे खरोखर किती सांत्वनदायक आहे! (इब्री लोकांस ११:६) आपण यहोवावर पूर्ण विश्‍वास ठेवून ‘मनोभावे त्याची सेवा करू या.’—१ इतिहास २८:९.

१८. यहोवा आपल्याकडे लक्ष देतो आणि आपल्या विश्‍वासूपणाची दखल घेतो यामुळे शास्त्रवचनांत आपल्याला काय आश्‍वासन दिले आहे?

१८ नीतिसूत्रे १५:३ म्हणते: “परमेश्‍वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.” होय, देव वाईट लोकांनाही पाहात असतो आणि त्यांना त्यांच्या आचरणानुसार तो फळ देतो. पण जर आपण ‘बरे’ करणाऱ्‍यांपैकी असू तर मग यहोवा आपल्या विश्‍वासू आचरणाची दखल घेईल याची आपण खात्री बाळगू शकतो. ‘प्रभूमध्ये आपले श्रम व्यर्थ नाहीत’ आणि अदृश्‍य देव आपले ‘कार्य व आपण त्याच्यावर दाखवलेली प्रीती विसरून जाणार नाही’ हे जाणल्यामुळे आपला विश्‍वास खरोखर किती बळकट होतो!—१ करिंथकर १५:५८; इब्री लोकांस ६:१०.

आपल्याला कसोटीस लावण्याची यहोवाला विनंती करणे

१९. यहोवावर दृढ विश्‍वास ठेवल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येतात?

१९ यहोवाचे विश्‍वासू सेवक या नात्याने तो आपल्याला मोलवान समजतो. (मत्तय १०:२९-३१) तो अदृश्‍य असला तरीसुद्धा तो आपल्याकरता वास्तविक असू शकतो; त्याच्यासोबत असलेल्या आपल्या मोलवान नातेसंबंधाची आपण मनापासून कदर करू शकतो. आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल अशी मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळू शकतात. आपला दृढ विश्‍वास आपल्याला यहोवासमोर आपले मन व विवेक शुद्ध राखण्यास मदत करेल. तसेच निष्कपट विश्‍वासामुळे आपल्याला दुटप्पी जीवन जगण्याचे टाळता येते. (१ तीमथ्य १:५, १८, १९) आपला देवावर न डगमगणारा विश्‍वास असेल तर यामुळे आपल्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांवर आपल्या चांगल्या उदाहरणाचा सकारात्मक प्रभाव पडेल. (१ तीमथ्य ४:१२) शिवाय असा विश्‍वास चांगल्या आचरणाला प्रोत्साहन देतो आणि यामुळे यहोवाचे हृदय आनंदित होते.—नीतिसूत्रे २७:११.

२०, २१. (अ) यहोवा आपल्याकडे लक्ष देतो हे आपल्याकरता का चांगले आहे? (ब) आपण स्तोत्र १३९:२३, २४ या वचनांना स्वतःच्या संदर्भात कसे लागू करू शकतो?

२० आपण खरोखर सूज्ञ असू तर यहोवा आपल्याकडे लक्ष देतो याचा आपल्याला आनंदच वाटतो. आणि त्याने आपल्याला केवळ पाहूच नये तर आपल्या विचारांचे आणि कृत्यांचे बारकाईने परीक्षण करावे अशी आपली इच्छा आहे. म्हणूनच आपल्या मनांचे परीक्षण करून आपल्यात काही अयोग्य प्रवृत्ती आहे का हे पाहण्याची आपण यहोवाला प्रार्थनेत विनंती केली पाहिजे. आपल्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आवश्‍यक बदल करण्यास तो निश्‍चितच आपल्याला मदत करू शकतो. स्तोत्रकर्त्या दाविदाने एका स्तोत्रात यहोवाला म्हटले: “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.”—स्तोत्र १३९:२३, २४.

२१ दाविदाने त्याची झडती घेऊन त्याच्या ठायी “दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति” असेल तर ती पाहण्यास यहोवाला विनंती केली. यहोवाने आपल्या हृदयाचीही झडती घ्यावी आणि आपल्या मनात काही अयोग्य हेतू असल्यास ते आपल्या निदर्शनास आणून द्यावेत अशी स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्यालाही इच्छा नाही का? तर मग आपण पूर्ण विश्‍वासाने यहोवाला प्रार्थना केली पाहिजे की त्याने आपल्याला कसोटीस लावावे. पण जर आपल्या हातून काही अयोग्य घडल्यामुळे किंवा आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील एखाद्या वाईट प्रवृत्तीची जाणीव झाल्यामुळे आपण दुःखी किंवा चिंताक्रांत झालेले असू, तर आपण काय करावे? आपण आपला प्रेमळ देव यहोवा याला मनापासून प्रार्थना करत राहिली पाहिजे आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या व त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाला नम्रपणे अधीन राहिले पाहिजे. मग आपण ही खात्री बाळगू शकतो की तो आपल्याला अवश्‍य साहाय्य करेल आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे नीतिमान जीवन जगण्यासाठी मदत करेल.—स्तोत्र ४०:११-१३.

२२. अदृश्‍य देवाच्या संदर्भात आपण कोणता संकल्प केला पाहिजे?

२२ होय, आपण यहोवाच्या अपेक्षांनुसार आचरण केले तर तो आपल्याला सार्वकालिक जीवन देईल. पौलाने लिहिले: “जो सनातन, अविनाशी, अदृश्‍य राजा, असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.” पौलाच्या या शब्दांप्रमाणे आपण यहोवाचे सामर्थ्य व अधिकार स्वीकारला पाहिजे. (१ तीमथ्य १:१७) आपण नेहमी यहोवाबद्दल असाच मनःपूर्वक आदर बाळगला पाहिजे. आणि जो अदृश्‍य त्याला पाहत असल्यासारखे धीर धरण्याच्या आपल्या संकल्पापासून कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेऊ नये.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मानव कशाप्रकारे देवाला पाहू शकतात?

• यहोवा आपल्याकरता वास्तविक असेल तर छळ झाल्यास आपण कसे वागू?

• यहोवाला आपल्या महान शिक्षकाच्या रूपात पाहायचा काय अर्थ होतो?

• यहोवाने आपल्याला कसोटीस लावावे अशी इच्छा आपण का बाळगावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

मोशे फारोला घाबरला नाही, उलट अदृश्‍य असणाऱ्‍या यहोवा देवाला प्रत्यक्ष पाहात असल्यासारखा तो वागला

[२१ पानांवरील चित्र]

आपण काय करतो ते यहोवा पाहू शकत नाही अशा अविर्भावात आपण कोणतेच कृत्य करू नये

[२३ पानांवरील चित्र]

देवच आपला महान शिक्षक आहे हे ओळखून आपण त्याचे ज्ञान मिळवण्याचा उत्सुकतेने प्रयत्न करतो