व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पैसा प्रिय की जीव प्रिय?

पैसा प्रिय की जीव प्रिय?

पैसा प्रिय की जीव प्रिय?

“पैसा प्रिय का जीव प्रिय?” अशी मागणी बंदूक रोखणाऱ्‍या दरोडेखोरांनी केल्याचे तुम्ही कदाचित ऐकले असेल. आज हीच मागणी आपल्याकडून आणि विशेषतः संपन्‍न देशांत राहणाऱ्‍यांकडून केली आहे. पण ती कोणा लुबाडणाऱ्‍याने केलेली नाही तर समाजाने, पैसा आणि भौतिक यश यावर जोर देऊन केली आहे. त्यामुळे आपण पेचात पडलो आहोत.

म्हणूनच, नवीन प्रश्‍न आणि समस्या निर्माण झाल्या आहेत. पैसा व भौतिक वस्तू कोणत्या किंमतीवर प्राप्त कराव्यात? थोडक्यात समाधान मानणे आपल्याला शक्य आहे का? भौतिक जीवनासाठी लोक ‘खऱ्‍या जीवनाची’ आहुती देत आहेत का? पैशाने आनंदी जीवन विकत घेता येऊ शकते का?

पैशाचे वेड

मनुष्याला अनेक उचित अनुचित इच्छा-आकांशा असतात; त्यांपैकी त्याला सर्वात जास्त आकर्षण असते पैशाचे. पैशाचे वेड, शारीरिक भूक किंवा लैंगिक इच्छेसारखे नाही. पैशाचे वेड लागलेली व्यक्‍ती कधीच तृप्त होत नाही. म्हातारपण आल्यावरसुद्धा हे वेड उतरत नाही. उलट, पुष्कळांना म्हातारपणीच पैशाबद्दल आणि पैशाने खरेदी करू शकणाऱ्‍या वस्तूंबद्दल जास्त वेड लागते.

लोभीपणाची वृत्ती आज वाढत चालली आहे. एका प्रसिद्ध चित्रपटातील मुख्य अभिनेत्याने असे म्हटले: “लोभाने पुष्कळ काही साध्य होते. लोभ खरोखर फायद्याचा आहे.” पुष्कळांच्या मते, १९८० च्या दशकाला लोभिष्ट युग मानले जात होते; परंतु, त्या आधी आणि नंतर मानवांनी पैशाप्रती कशी प्रतिक्रिया दाखवली ते पाहिल्यास इतक्या वर्षांमध्ये फारसा फरक पडलेला नाही असे दिसून येते.

यात नवीन काही असेल तर इतकेच की, आज झटपट मार्गांनी जास्त भौतिक वस्तू प्राप्त करण्याची इच्छा तृप्त करायला संधी मिळते. जगातील बहुतांश लोक आपला सर्वाधिक वेळ आणि शक्‍ती अधिकाधिक भौतिक वस्तू निर्माण करण्यात आणि प्राप्त करण्यात घालवत आहेत. भौतिक वस्तू प्राप्त करणे आणि पैसा खर्च करणे हा आधुनिक जीवनातील छंद बनला आहे—आणि असे करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढले जातात.

पण त्यामुळे लोक अधिक आनंदी बनले आहेत का? त्या प्रश्‍नाचे उत्तर देताना सुज्ञ आणि धनसंपन्‍न राजा शलमोन याने ३,००० वर्षांआधी लिहिले: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही; हेहि व्यर्थ!” (उपदेशक ५:१०) आधुनिक काळातील सामाजिक परीक्षणातून देखील असेच काही रोचक निष्कर्ष निघाले आहेत.

पैसा व आनंद यांच्यातला संबंध

मानवी वर्तनासंबंधी एक सर्वात आश्‍चर्यकारक शोध असा आहे की, पैसा किंवा भौतिक वस्तू प्राप्त केल्याने अधिक समाधान आणि आनंद मिळतोच असे नाही. अनेक संशोधकांना हे कळाले आहे की, एका व्यक्‍तीने समृद्धीची एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर, आपल्याजवळ किती भौतिक वस्तू आहेत यावर तिची समाधानाची भावना अवलंबून नसते.

त्यामुळे, भौतिक वस्तुंच्या व पैशाच्या मागे सतत धावणाऱ्‍यांसमोर असा प्रश्‍न येतो की, ‘प्रत्येक नवीन वस्तू खरेदी केल्यावर मला आनंद होतो, तर मग या सुखचैनीच्या वस्तुंमुळे अधिक समाधान का प्राप्त होत नाही?’

आनंदी लोक (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात, लेखक जॉनथन फ्रीडमन लिहितात: “एका व्यक्‍तीने विशिष्ट प्रमाणात पैसा प्राप्त केल्यावर आनंदी होण्याशी त्याचा फारसा संबंध राहत नाही. दारिद्र्‌य रेषेच्या वर, मिळकत आणि आनंद यांच्यातला संबंध नगण्य असतो.” अनेकांना हे कळून चुकले आहे की, आध्यात्मिक संपत्ती, जीवनातील अर्थपूर्ण ध्येये आणि नैतिक मूल्ये यांनी खरे तर एखाद्या व्यक्‍तीला आनंद मिळतो. लोकांसोबत चांगले नातेसंबंध असणे आणि आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा आनंद घेण्यामध्ये अडथळा आणणाऱ्‍या झगड्यांपासून किंवा मर्यादांपासून मुक्‍ती मिळणे या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत.

आज समाजात हेच दिसून येते की, लोक पैशाच्या जोरावर आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात; पण त्या समस्या खऱ्‍या तर मानसिक स्वरूपाच्या असतात. काही सामाजिक विवेचनकर्त्यांचे म्हणणे आहे, की लोकांची निराशावादी आणि असमाधानी मनोवृत्ती झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी याचेही निरीक्षण केले आहे की, समाजातील धनसंपन्‍न स्तरातील लोक उपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत किंवा गुरू, पंथ आणि उपचार देण्याचा दावा करणाऱ्‍या गटांकडून जीवनातला अर्थ आणि मनःशांती मिळवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत आहेत. यावरून, भौतिक वस्तू जीवनाला खरा अर्थ देण्यात उणे पडल्या आहेत हे सिद्ध होते.

पैशाचे सामर्थ्य आणि असमर्थता

हे खरे आहे की, पैशात सामर्थ्य आहे. पैशाने आलिशान घरे, महागडे कपडे आणि शानदार फर्निचर खरेदी करता येते. पैशाने लोकांची स्तुती, संमती किंवा खोटी प्रशंसा देखील खरेदी करता येते; शिवाय, तात्पुरते व काहीही करायला तयार असलेले मित्रसुद्धा विकत घेता येऊ शकतात. पण यापेक्षा आणखी सामर्थ्य त्यात नाही. आपल्याला ज्या गोष्टींची सर्वाधिक गरज आहे अर्थात कोणा खऱ्‍या मित्राचे प्रेम, मनःशांती, मरणाला टेकलेले असताना मिळणारे सांत्वन हे पैशाने विकत घेता येऊ शकत नाही. तसेच, ज्यांना निर्माणकर्त्याबरोबरील नातेसंबंध जास्त महत्त्वाचा वाटतो त्यांच्याकरता पैशाने देवाची संमती विकत घेता येऊ शकत नाही.

राजा शलमोनाकडे पैशाने विकत घेता येऊ शकतील अशा सर्व सुखचैनीच्या वस्तू होत्या; परंतु, भौतिक वस्तूंवर अवलंबून राहिल्याने चिरस्थायी आनंद मिळत नाही हे त्याने ओळखले. (उपदेशक ५:१२-१५) बँक बंद पडल्यामुळे किंवा चलनवाढीमुळे पैसा गमावला जाऊ शकतो. तीव्र वादळांमध्ये मालमत्तेचा नाश होऊ शकतो. विमा योजनांकरवी थोड्याफार प्रमाणात भौतिक नुकसानाची भरपाई करून घेता येते परंतु भावनिक नुकसानाची भरपाई मात्र होऊ शकत नाही. शेअरबाजार अचानक कोसळल्याने शेअर भाग आणि बंधपत्रे एका रात्रीत कवडीमोल ठरू शकतात. चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा आज असते तर उद्या नसू शकते.

मग, पैशाला आपण योग्य ते स्थान कसे देऊ शकतो? आपल्या जीवनात पैशाला किंवा भौतिक वस्तूंना काय महत्त्व असावे? “खरे जीवन” तुम्ही कसे प्राप्त करू शकता हे पाहण्यासाठी कृपया आणखी परीक्षण करा.

[४ पानांवरील चित्रे]

भौतिक वस्तूंनी चिरस्थायी आनंद प्राप्त होत नाही