“मित्राने केलेले घाय”
“मित्राने केलेले घाय”
प्रेषित पौलाला एकदा पहिल्या शतकात गलतीया येथील ख्रिश्चनांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना सल्ला देण्याची गरज भासली. पण हा सल्ला दिल्यामुळे त्यांना पौलाचा राग येऊ नये म्हणून त्याने त्यांना असे विचारले: “मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?”—गलतीकर ४:१६.
निश्चितच, ‘खरे सांगितल्यामुळे’ पौल काही त्यांचा वैरी झाला नाही. उलट त्याने बायबलच्या या तत्त्वाचे पालन केले: “मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत.” (नीतिसूत्रे २७:६) चूक करणाऱ्याचा दोष त्याच्या लक्षात आणून दिला जातो तेव्हा साहजिकच त्याचा अहं दुखावला जातो याची पौलाला जाणीव होती. पण, पाप करणाऱ्याला त्याच्या पापाची शिक्षा न देणे हे त्याला यहोवा देवाच्या प्रेमाच्या एका अभिव्यक्तीपासून वंचित ठेवण्यासारखे आहे, हे देखील पौलाला माहीत होते. (इब्री लोकांस १२:५-७) एका विश्वासू मित्राप्रमाणे, गलतीया येथील मंडळीतील बांधवांच्या कायमच्या कल्याणाची काळजी असल्यामुळेच, पौल त्यांना सुधारणुकीचा सल्ला देण्यापासून मागे हटला नाही.
आज, यहोवाचे साक्षीदार त्यांच्यावर सोपवलेले कार्य अर्थात, ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करण्याचे व जे काही येशू ख्रिस्ताने आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवण्याचे’ कार्य करत आहेत. हे कार्य करताना ते कोणत्याही प्रकारे तडजोड न करता, चुकीच्या सिद्धान्तांचे व गैरख्रिस्ती वर्तणुकीचे खंडन करतात व या गोष्टींचा धिक्कार करतात. (मत्तय १५:९; २३:९; २८:१९, २०; १ करिंथकर ६:९, १०) वैरी समजून झिडकारले जाण्यासाठी नव्हे तर विश्वासू मित्रांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते असे करतात.
देवाच्या प्रेरणेने मिळालेल्या बुद्धीमुळे स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही.”—स्तोत्र १४१:५.