व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

नवे जग भाषांतर यात २ पेत्र ३:१३ येथे “नवे आकाश [अनेकवचन] व नवी पृथ्वी” तर प्रकटीकरण २१:१ येथे “नवे आकाश [एकवचन] व नवी पृथ्वी” असे भाषांतर का करण्यात आले आहे?

हा मूळ भाषांतील व्याकरणसंबंधी एक बारकावा आहे. पण या वचनांतील मजकुराच्या अर्थबोधावर यामुळे फारसा फरक पडतो असे वाटत नाही.

आधी इब्री शास्त्रवचनांचा विचार करा. मूळ भाषेतील लिखाणांत, “आकाश” असे भाषांतर केलेला हिब्रू शब्द, शामायिम हा नेहमी अनेकवचनी रूपात आढळतो. पण हे अनेकवचन श्रेष्ठत्व सूचित करण्यासाठी वापरलेले नसून एखाद्या गोष्टीचे अनेक भाग, काळात किंवा अंतराळात दूरपर्यंत पसरलेले आहेत हे सूचित करण्यासाठी वापरले आहे. आणि हे योग्यच आहे कारण आकाश पृथ्वीपासून मोठ्या अंतरावर सर्व दिशांना पसरलेले असून त्यात कोट्यवधी तारे आहेत. शामायिम या शब्दापुढे जेव्हा जेव्हा निश्‍चित उपपद येते तेव्हा नवे जग भाषांतर यात जवळजवळ सर्व ठिकाणी “आकाश” अनेकवचनी रूपात दिले आहे; याचे एक उदाहरण आहे यशया ६६:२२. शामायिम या शब्दापुढे जेव्हा निश्‍चित उपपद येत नाही तेव्हा ते एकवचनात (उदाहरणार्थ, उत्पत्ति १:८; १४:१९, २२; स्तोत्र ६९:३४) किंवा अनेकवचनात (उदाहरणार्थ, उत्पत्ति ४९:२५; शास्ते ५:४; ईयोब ९:८; यशया ६५:१७) वापरले जाऊ शकते.

यशया ६५:१७ तसेच ६६:२२ या दोन्ही वचनांत आकाश असे भाषांतर केलेले मूळ इब्री शब्द अनेकवचनी रूपात आहेत आणि त्यानुसार त्यांचे भाषांतरही अनेकवचनात करण्यात आले आहे.

ग्रीक भाषेत ऊरानोस म्हणजे आकाश (एकवचन) आणि ऊरानोई म्हणजे आकाश (अनेकवचन). पण ग्रीक सेप्टुअजिन्टच्या अनुवादकांनी यशया ६५:१७ आणि ६६:२२ या दोन्ही ठिकाणी एकवचनी रूपच वापरले आहे.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात ज्या दोन ठिकाणी “नवे आकाश व नवी पृथ्वी” असे म्हटले आहे तेथे कशाप्रकारे भाषांतर करण्यात आले आहे?

प्रेषित पेत्राने २ पेत्र ३:१३ या ठिकाणी, ग्रीक अनेकवचन वापरले. त्या वचनाआधी (७, १०, १२ या वचनांत) त्याने सध्याचे दुष्ट “आकाश” असा अनेकवचनात उल्लेख केला. त्यानुसार १३ व्या वचनातही त्याने अनेकवचनच वापरले. शिवाय, ज्याप्रकारे २ पेत्र २:२२ या वचनातील शब्द त्याने नीतिसूत्रे २६:११ येथून उद्धृत केले होते त्याप्रमाणेच सदर वचनात तो यशया ६५:१७ येथील मूळ शब्द उद्धृत करत असावा. म्हणून पेत्राने असे लिहिले की “नवे आकाश [अनेकवचन] व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.”

पण प्रकटीकरण २१:१ या ठिकाणी मात्र, किंचित फरक आढळतो. प्रेषित योहान सेप्टुअजिन्ट यातून यशया ६५:१७ येथील भाषांतराचे अनुकरण करत होता, ज्यात, आधी उल्लेख केल्याप्रमाणे “आकाश” यासाठी असलेला ग्रीक शब्द एकवचनी रूपात आहे. त्यामुळे योहानाने असे लिहिले: “मी नवे आकाश [एकवचन] व नवी पृथ्वी ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती.”

हे भाषांतरावर परिणाम करणारे व्याकरणसंबंधी बारकावे आहेत. पुन्हा एकदा उल्लेख केला पाहिजे की “नवे आकाश” ही संज्ञा एकवचनी रूपात असो किंवा अनेकवचनी, त्यामुळे अर्थावर काहीही परिणाम होत नाही; अर्थ तोच राहतो.

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

तारे: फ्रँक झलो