चिरायु वृक्ष
चिरायु वृक्ष
डोंगराच्या कड्यावर सहसा कोणी घर बांधण्याचा विचार करणार नाही. आणि उंच डोंगरांवर तर नाहीच नाही. पण काही आल्प वृक्ष मात्र उंच डोंगरांच्या कड्यांवरच वाढतात. हिवाळ्यातील बर्फाळ गारठ्यात आणि उन्हाळ्यातील दुष्काळी वातावरणातही ते या डोंगरकड्याला प्राणपणाने चिकटून राहतात.
सहसा ही चिवट वृक्षे सखल प्रदेशांत राहणाऱ्या त्यांच्या जातीच्या वृक्षांइतकी उंच व भव्य नसतात. तर ती आडव्यातिडव्या, पीळदार बुंध्याची असतात व त्यांची वाढ काहीशी खुंटलेली असते. तीव्र हवामान आणि पुरेशी माती नसलेल्या खडकाळ जमिनीत वाढल्यामुळे या वृक्षांना एक विशिष्ट आकार येतो, काही तर नैसर्गिक बोन्साई वृक्षांप्रमाणे दिसतात.
जगातल्या अतिशय प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत वाढल्यामुळे कदाचित या वृक्षांचे आयुष्य फारसे नसावे असा कदाचित तुम्ही विचार करत असाल. पण हे साफ खोटे आहे. काहींचे असे मत आहे, की कॅलिफोर्निया येथे ३,००० मीटरच्या उंचीवर वाढणाऱ्या ब्रिसलकोन पाईन जातीचा मेतुसेलाह नावाचा वृक्ष ४,७०० वर्षांचा आहे. गिनिस जागतिक विक्रमांच्या १९९७ सालच्या इंग्रजी आवृत्तीत या वृक्षाला पृथ्वी ग्रहावरील सर्वात जुना वृक्ष म्हटले आहे. या जुन्या वृक्षांचा अभ्यास करणारे एड्मंड शूलमन यांनी याविषयी असा खुलासा केला, की “ब्रिसलकोन पाईन . . . कदाचित प्रतिकूल हवामानामुळेच टिकून राहिले असतील. व्हाईट माउन्टन्स या पर्वतांवरील सर्व जुनी [पाईन वृक्षे] जवळजवळ ३,००० मीटरच्या उंचीवर कोरड्या खडकाळ अरण्यातच पाहायला मिळतात.” इतर प्रकारच्या पाईन वृक्षांपैकी सर्वात जुनी वृक्षे देखील खडतर परिस्थितीतच वाढतात असे शूलमन यांना आढळले.
पण अशा खडतर परिस्थितीत वाढताना, चिकाटीची जणू जिवंत उदाहरणे असलेली ही वृक्षे दोन गोष्टींचा फायदा करून घेतात. एकतर, एकांत प्रदेशांत वाढल्यामुळे त्यांच्या आजूबाजूला इतर फारशी झाडे नसतात त्यामुळे या वृक्षांना वणव्यांचा धोका नसतो. सहसा इतर जुनी वृक्षे वणव्यांतच नष्ट होतात. शिवाय या वृक्षांची मुळे त्यांना डोंगरकड्यांवर इतकी पक्की बसवतात की फक्त भूकंपच त्यांना तेथून हलवू शकतो.
बायबलमध्ये देवाच्या विश्वासू सेवकांची तुलना वृक्षांशी करण्यात आली आहे. (स्तोत्र १:१-३; यिर्मया १७:७, ८) त्यांना देखील वेगवेगळ्या परिस्थितीमुळे कधीकधी खडतर समस्यांना तोंड द्यावे लागते. छळ, आजारपण, गरिबी यांसारख्या समस्यांमुळे त्यांच्या विश्वासाची भयंकर परीक्षा होते; आणि कधीकधी तर या समस्या वर्षानुवर्षे चालतच राहतात. तरीपण ज्या निर्मात्याने वृक्षांना इतक्या खडतर परिस्थितीत टिकून राहण्याचे सामर्थ्य दिले तो आपल्या सेवकांनाही शक्ती देण्याचे आश्वासन देतो. जे सर्व परिस्थितीत आपल्या विश्वासात टिकून राहतात त्यांना बायबल असे आश्वासन देते: ‘तो स्वतः तुम्हांस दृढ व सबळ करील.’—१ पेत्र ५:९, १०.
बायबलमध्ये “धीर धरणे” असे सहसा भाषांतर केलेल्या ग्रीक क्रियापदातील मूळ कल्पना ‘सर्व परिस्थितीत खंबीर राहणे, निश्चल किंवा कायम राहणे’ हीच आहे. आल्प वृक्षांप्रमाणेच कठीण परिस्थितीत धीर धरण्यासाठी मुळे पक्की असणे फार महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत पाहिल्यास, त्यांनी येशू ख्रिस्तामध्ये मुळावलेले असणे आवश्यक आहे; तरच ते टिकून राहू शकतील. पौलाने लिहिले: “ख्रिस्त येशू जो प्रभु, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.”—कलस्सैकर २:६, ७.
पक्क्या आध्यात्मिक मुळांचे महत्त्व पौलाला ठाऊक होते. त्याला देखील “शरीरात एका काटा” असल्यामुळे बराच संघर्ष करावा लागला; तसेच त्याच्या सेवाकार्यादरम्यान त्याला सतत भयंकर छळाला तोंड द्यावे लागले. (२ करिंथकर ११:२३-२७; १२:७) पण देवाच्या सामर्थ्याने या सर्व समस्यांना तोंड देणे शक्य आहे असे त्याला समजले. म्हणूनच त्याने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.
पौलाचे उदाहरण दाखवून देते त्याप्रमाणे ख्रिस्ती जीवनात विश्वासूपणे टिकून राहणे हे अनुकूल परिस्थितीवर अवलंबून नाही. शतकानुशतके वाऱ्यावादळात कायम टिकून राहणाऱ्या आल्प वृक्षांप्रमाणे, आपण जर ख्रिस्तामध्ये मुळावलेले असू आणि देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहात असू तर आपणही सर्व परिस्थितीत टिकून राहू शकतो. शिवाय, जर आपण शेवटपर्यंत टिकून राहिलो तर देवाच्या आणखी एका प्रतिज्ञेची पूर्णता आपल्याला अनुभवायला मिळेल: “वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल.”—यशया ६५:२२; मत्तय २४:१३.