व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देण्यातून मिळणाऱ्‍या आनंदाचा आस्वाद घ्या!

देण्यातून मिळणाऱ्‍या आनंदाचा आस्वाद घ्या!

देण्यातून मिळणाऱ्‍या आनंदाचा आस्वाद घ्या!

“घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”प्रेषितांची कृत्ये २०:३५

१. देण्यात आनंद आहे हे यहोवाच्या उदाहरणावरून कसे दिसून येते?

 सत्याच्या ज्ञानाने मिळणारा आनंद आणि असंख्य आशीर्वाद देवाकडून मिळणाऱ्‍या मोलवान देणग्या आहेत. ज्यांना यहोवाची ओळख झाली आहे त्यांच्याजवळ आनंदित होण्याची अनेक कारणे आहेत. पण घेण्यात जसा आनंद आहे तसाच देण्यातही आनंद आहे. यहोवा ‘प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान’ देणारा आहे आणि बायबल त्याला ‘आनंदी देव’ म्हणते. (याकोब १:१७; १ तीमथ्य १:११, NW) जे कोणी ऐकतात त्यांच्या भल्याकरता तो त्यांना शिकवतो; आणि ज्याप्रकारे आईवडिलांना आपली मुले आपल्या प्रेमळ मार्गदर्शनानुसार वागताना पाहून आनंद वाटतो त्याचप्रकारे जे यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालतात त्यांना पाहून यहोवालाही आनंद होतो.—नीतिसूत्रे २७:११.

२. (अ) देण्याबद्दल येशूने काय म्हटले होते? (ब) आपण इतरांना बायबलचे सत्य शिकवतो तेव्हा आपल्याला कशाप्रकारे आनंद मिळतो?

येशू या पृथ्वीवर असताना त्याच्या शिकवणुकींना लोकांनी योग्य प्रतिसाद दिला तेव्हा त्याला देखील असाच आनंद वाटला. येशूचे शब्द उद्धृत करून प्रेषित पौलाने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) इतरांना आपण बायबलमधील सत्य शिकवतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो; एखादी व्यक्‍ती आपल्या धार्मिक विश्‍वासांशी सहमत आहे याचेच केवळ आपल्याला समाधान वाटते असे नाही. पण आपण त्या व्यक्‍तीला खऱ्‍या मोलाचे आणि कायमस्वरूपी लाभाचे काही देत आहोत याबद्दलही आपल्याला आनंद वाटतो. आध्यात्मिक रितीने इतरांना दिल्यामुळे आपण त्यांना आज आणि सर्वकाळपर्यंत स्वतःचा लाभ करून घेण्यास मदत करत असतो.—१ तीमथ्य ४:८.

देण्यामुळे मिळणारा आनंद

३. (अ) प्रेषित पौल व प्रेषित योहान यांनी इतरांना आध्यात्मिकरित्या मदत केल्यामुळे मिळालेला आनंद कशाप्रकारे व्यक्‍त केला? (ब) आपल्या मुलांना बायबलमधील सत्य शिकवणे त्यांच्याबद्दल प्रेम असण्याचे चिन्ह आहे असे का म्हणता येईल?

होय ज्याप्रकारे आध्यात्मिक देणग्या दिल्यामुळे यहोवाला व येशूला आनंद मिळतो, त्याचप्रकारे ख्रिस्ती लोकांनाही आध्यात्मिक रितीने दिल्यामुळे आनंद मिळतो. प्रेषित पौलाला इतरांना देवाच्या वचनातील सत्य शिकण्यास आपण मदत केल्याच्या जाणिवेने आनंद झाला. थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला लिहिताना त्याने असे म्हटले: “आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुगूट काय आहे? आपला प्रभु येशू ह्‍याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहा ना? कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहा.” (१ थेस्सलनीकाकर २:१९, २०) त्याचप्रमाणे प्रेषित योहानाने आपल्या आध्यात्मिक मुलांविषयी असे लिहिले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.” (३ योहान ४) आपल्या स्वतःच्या मुलांना आपली आध्यात्मिक मुले बनण्यास मदत करणे देखील किती आनंददायक आहे याचाही विचार करा! आपल्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवणारे आईवडील मुलांवर असलेले त्यांचे प्रेम दाखवत असतात. (इफिसकर ६:४) तसेच त्यांच्या कायमच्या कल्याणाची त्यांना आस्था असल्याचेही ते याद्वारे दाखवतात. आणि जेव्हा मुले त्यांच्या मार्गदर्शनानुसार वागतात तेव्हा साहजिकच आईवडिलांना आनंद व समाधान मिळते.

४. आध्यात्मिक रितीने दिल्यामुळे आनंद मिळतो हे कोणत्या अनुभवावरून दिसून येते?

डेल नावाची पूर्ण वेळ पायनियर सेवा करणारी एक बहीण पाच मुलांची आई आहे. ती म्हणते: “प्रेषित योहानाच्या शब्दांतून व्यक्‍त होणारी भावना मी अगदी चांगली समजू शकते; माझी चार मुले ‘सत्यात चालत आहेत’ याबद्दल मी स्वतः अत्यंत कृतज्ञ आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एकतेने खरी उपासना करतात तेव्हा यामुळे यहोवाचे गौरव होते याची मला जाणीव आहे. आणि म्हणूनच माझ्या मुलांच्या मनात सत्य बिंबवण्याच्या माझ्या प्रयत्नांना तो आशीर्वादित करतो हे पाहून मला मनस्वी समाधान मिळते. नव्या जगात माझ्या कुटुंबासोबत सर्वकाळ जगण्याची अद्‌भुत आशा मला सर्व समस्यांना आणि अडचणींना तोंड देण्याची आणि विश्‍वासात टिकून राहण्याची प्रेरणा देते.” दुःखाची गोष्ट म्हणजे डेलच्या एका मुलीने ख्रिस्ती तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे तिला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. तरीसुद्धा डेल आशावादी मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, “कधी न कधी माझी मुलगी नम्र व प्रामाणिक होऊन यहोवाकडे परत येईल अशी मी आशा करते. पण माझी बाकीची मुले त्याची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत याबद्दल मी त्याचे आभार मानते. त्यांच्याबद्दल वाटणारा आनंद मला प्रेरणा व शक्‍ती देतो.”—नहेम्या ८:१०.

कायमची नाती जुळवणे

५. शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण आत्मत्यागी वृत्तीने सहभागी होतो तेव्हा कोणत्या जाणिवेने आपल्याला मनस्वी समाधान लाभते?

येशूने आपल्या अनुयायांना ख्रिस्ती शिष्य बनवण्याची आणि त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या नियमांबद्दल शिकवण्याची आज्ञा दिली. (मत्तय २८:१९, २०) यहोवा आणि येशू या दोघांनी निःस्वार्थ भावनेने लोकांना सत्याचे ज्ञान घेण्यास मदत केली आहे. आपणही शिष्य बनवण्याच्या कार्यात आत्मत्यागी वृत्तीने सहभाग घेतो तेव्हा प्रारंभिक ख्रिश्‍चनांप्रमाणे आपण यहोवाच्या आणि येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करत आहोत या जाणिवेने आपल्यालाही मनस्वी समाधान मिळते. (१ करिंथकर ११:१) अशारितीने आपण सर्वसमर्थ परमेश्‍वर आणि त्याच्या प्रिय पुत्राचे सहकारी बनतो आणि यामुळे आपले जीवन खरोखर अर्थपूर्ण बनते. देवाच्या ‘सहकाऱ्‍यांमध्ये’ गणले जाणे यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता असू शकतो? (१ करिंथकर ३:९) आणि सुवार्तेच्या या प्रचारकार्यात देवदूतही सहभागी आहेत हे जाणून आपल्याला आणखीनच आनंद होत नाही का?—प्रकटीकरण १४:६, ७.

६. आध्यात्मिक रितीने इतरांना देण्यात आपण सहभागी होतो तेव्हा कोण आपले मित्र बनतात?

खरे तर आध्यात्मिक रितीने इतरांना देण्याच्या या कार्यात आपण सहभागी होतो तेव्हा आपण देवाचे केवळ सहकारीच बनत नाही, तर त्याच्यासोबत कायमचे मैत्रीचे नाते निर्माण करू शकतो. अब्राहामच्या विश्‍वासामुळे त्याला यहोवाचा मित्र म्हणण्यात आले. (याकोब २:२३) देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केल्यास, आपणही त्याचे मित्र बनू शकतो. आणि असे केल्यामुळे आपण येशूचेही मित्र बनतो. त्याने आपल्या शिष्यांना एकदा असे म्हटले होते: “मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.” (योहान १५:१५) काही लोकांना प्रतिष्ठित किंवा अधिकारपदावर असलेल्या लोकांचे मित्र म्हणवून घ्यायला फारच आनंद वाटतो; पण आपण तर सबंध विश्‍वातील दोन सर्वात श्रेष्ठ व्यक्‍तींचे मित्र असण्याचा बहुमान मिळवू शकतो!

७. (अ) एका स्त्रीला एक जिवाभावाची मैत्रीण कशाप्रकारे मिळाली? (ब) तुम्हाला असा अनुभव आला आहे का?

शिवाय आपण देवाला ओळखण्यास लोकांना मदत करतो तेव्हा त्यांच्यासोबतही आपले मैत्रीचे नाते जुळते आणि यामुळे आपल्याला एक खासप्रकारचा आनंद मिळतो. अमेरिकेत राहणाऱ्‍या जोनने थेल्मा नावाच्या एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास सुरू केला. थेल्माला तिच्या कुटुंबाकडून विरोध होऊ लागला; पण तिने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि एका वर्षाने तिचा बाप्तिस्मा झाला. जोन लिहिते: “आमचा संबंध तिथेच संपला नाही; उलट आमच्या दोघींमध्ये जुळलेले मैत्रीचे नाते जवळजवळ ३५ वर्षे टिकून राहिले आहे. आम्ही दोघी कित्येकदा एकमेकींसोबत सेवाकार्यात आणि अधिवेशनांना जायचो. नंतर मला ८०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नवीन शहरात जावे लागले. पण अजूनही थेल्मा मला अतिशय प्रेमळ आणि प्रोत्साहनदायक पत्रे पाठवते; ती नेहमी माझी आठवण काढत असते आणि तिची मैत्रीण असण्याबद्दल, तिच्यासमोर एक चांगला आदर्श असण्याबद्दल तसेच बायबलमधील सत्य तिला शिकवल्याबद्दल आपण आभारी आहो असे ती सहसा लिहीत असते. तिला यहोवाबद्दल शिकवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे अतिशय अद्‌भुत प्रतिफळ म्हणजे एक जिवाभावाची मैत्रीण मला मिळाली आहे.”

८. कोणती आशावादी मनोवृत्ती बाळगल्याने आपल्याला सेवाकार्यात मदत मिळेल?

सत्याबद्दल शिकून घेण्यास उत्सुक असणारी निदान एखादी व्यक्‍ती आपल्याला भेटेल अशी आपण आशा बाळगली पाहिजे. मग बहुतेक लोकांनी यहोवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केले तरीसुद्धा ही आशा आपल्याला आपल्या कार्यात टिकून राहण्यास मदत करते. लोक राज्य संदेशाबद्दल उदासीन असतात तेव्हाही आपल्या विश्‍वासाची आणि सहनशीलतेची परीक्षा असते. पण आशावादी मनोवृत्ती ठेवल्यामुळे आपल्याला मदत मिळू शकते. ग्वातेमाला या देशातील फॉस्टो म्हणतो: “एखाद्या व्यक्‍तीला साक्ष देताना मी नेहमी असा विचार करतो की ही व्यक्‍ती एक आध्यात्मिक भाऊ किंवा बहीण बनली तर किती चांगले होईल. मी असेच धरून चालतो की मी भेट दिलेल्यांपैकी निदान एक व्यक्‍ती तरी निश्‍चित देवाच्या वचनातील सत्याचा स्वीकार करेल. असा विचार केल्यामुळे मला माझे कार्य सुरू ठेवण्यास मदत मिळते आणि मला त्यात खरा आनंद मिळतो.”

स्वर्गात संपत्ती साठवणे

९. स्वर्गातील संपत्तीविषयी येशूने काय म्हटले आणि यावरून आपण काय शिकू शकतो?

आपली स्वतःची मुले असोत किंवा इतर व्यक्‍ती असोत; शिष्य बनवणे हे काही सोपे काम नाही. बराच वेळ, सहनशक्‍ती आणि दृढ निश्‍चयाची यासाठी गरज आहे. बरेच लोक अशा भौतिक गोष्टींकरता कठोर मेहनत करायला तयार असतात, ज्या खरा आनंद देऊ शकत नाहीत आणि ज्या कायम टिकतही नाहीत. पण येशूने सांगितले, की आध्यात्मिक गोष्टींकरता मेहनत करणे अधिक चांगले आहे. त्याने म्हटले: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ति साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात, आणि चोर घर फोडून चोरी करितात; तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ति साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीहि करीत नाहीत.” (मत्तय ६:१९, २०) आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी मेहनत केल्यामुळे आपल्याला समाधान मिळते कारण आपल्याला ही जाणीव असते की आपण देवाची इच्छा पूर्ण करत आहोत आणि तो आपल्याला प्रतिफळ देईल. या आध्यात्मिक ध्येयांत शिष्य बनवण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याचा देखील समावेश आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

१०. (अ) येशूजवळ आध्यात्मिक संपत्ती का होती? (ब) येशूने इतरांकरता कशाप्रकारे निःस्वार्थपणे सेवा केली आणि यामुळे त्यांना कशाप्रकारे मोठा लाभ झाला?

१० आपण शिष्य बनवण्याकरता मेहनत घेतल्यास येशूने म्हटल्याप्रमाणे आपण ‘स्वर्गात संपत्ती’ साठवतो. यामुळे आपल्याला घेण्याचा आनंद मिळतो. आपण निःस्वार्थपणे देतो तेव्हा आपण स्वतः समृद्ध आशीर्वादांचे मानकरी होतो. स्वतः येशूने कोट्यवधी वर्षे यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली होती. त्याने स्वर्गात किती अमाप संपत्ती साठवली याची कल्पना करा! पण येशूने स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभु येशू ख्रिस्ताने तुमच्याआमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.” (तिरपे वळण आमचे.) (गलतीकर १:४) येशूने निःस्वार्थपणे सेवा तर केली पण इतरांनाही स्वर्गात संपत्ती साठवण्याची संधी मिळावी म्हणून त्याने आपले जीवन खंडणी म्हणून अर्पण केले.

११. भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक गोष्टी देणे अधिक चांगले का आहे?

११ लोकांना देवाबद्दल शिकवल्यामुळे, आपण त्यांना स्वर्गात कायम टिकणारी आध्यात्मिक संपत्ती साठवण्याचा मार्ग दाखवतो. यापेक्षा मोठी देणगी कोणती असू शकेल? तुम्ही एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला एखादे महागडे घड्याळ, गाडी किंवा घर बक्षीस म्हणून दिले तर ती व्यक्‍ती निश्‍चितच तुमचे आभार मानेल आणि आनंदित होईल आणि तुम्हालाही त्या व्यक्‍तीला काही दिल्याचा आनंद होईल. पण २० वर्षांनंतर त्या भेटवस्तूची काय स्थिती असेल? २०० वर्षांनंतर? किंवा २,००० वर्षांनंतर? पण जर तुम्ही एखाद्या व्यक्‍तीला यहोवाची सेवा करण्यास शिकवण्यासाठी मेहनत घेतली तर त्या व्यक्‍तीला तुम्ही दिलेल्या या आध्यात्मिक देणगीचा सर्वकाळ फायदा होऊ शकतो.

सत्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्‍यांना शोधून काढणे

१२. इतरांना आध्यात्मिक रितीने मदत करण्यासाठी काहींनी कशाप्रकारे आत्मत्यागी वृत्तीने मेहनत केली आहे?

१२ आध्यात्मिक रितीने इतरांना देण्याचा आनंद अनुभवण्याकरता यहोवाचे लोक पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोचले आहेत. हजारो लोक आपले घरदार सोडून नवीन देशात मिशनरी सेवा करण्यास गेले आहेत. तेथे त्यांना नवीन भाषा शिकाव्या लागल्या, नवीन संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागले. इतरांनी आपल्याच देशातील अशा ठिकाणी स्थलांतर केले आहे जेथे राज्य प्रचारकांची अधिक गरज आहे. असेही काही आहेत ज्यांनी इतर देशांतून येऊन स्थायिक झालेल्या आपल्याच क्षेत्रातील लोकांना त्यांच्या भाषेत प्रचार करता यावा म्हणून एखादी परदेशी भाषा शिकून घेतली आहे. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांतील न्यू जर्सी येथे राहणाऱ्‍या एका दांपत्याने त्यांची दोन मुले मोठी होऊन, त्यांचे शिक्षण इत्यादी पूर्ण झाल्यानंतर (दोघेही मुले आता यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा करत आहेत) पायनियर सेवा सुरू केली आणि चीनी भाषा शिकून घेतली. तीन वर्षांच्या काळात त्यांनी जवळच्याच एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्‍या ७४ चीनी व्यक्‍तींसोबत बायबल अभ्यास केला. तुम्ही शिष्य बनवण्याच्या कार्यात अधिक आनंद मिळवण्याकरता आपली सेवा वाढवू शकता का?

१३. तुमचे सेवाकार्य अधिक फलदायी व्हावे अशी इच्छा असल्यास तुम्ही काय करू शकता?

१३ एखाद्या व्यक्‍तीचा बायबल अभ्यास घेण्याची खूप इच्छा असूनही कदाचित तुम्ही अद्याप असे करू शकला नसाल. काही देशांत अभ्यास करण्याची इच्छा असलेले लोक क्वचितच भेटतात. कदाचित तुम्हाला भेटणाऱ्‍या लोकांनाही बायबलविषयी काहीच आस्था नसेल. असे असल्यास नेहमी आठवणीत ठेवा की यहोवा आणि येशू ख्रिस्त या दोघांनाही प्रचाराच्या कार्याविषयी मनस्वी आस्था आहे आणि ते तुम्हाला एखाद्या मेंढरासमान व्यक्‍तीकडे मार्गदर्शित करू शकतात; तेव्हा, तुम्ही वारंवार आपली इच्छा प्रार्थनेत व्यक्‍त करू शकता. मंडळीत ज्यांना जास्त अनुभव आहे किंवा ज्यांना सेवाकार्यात अधिक फळ मिळते अशांकडूनही तुम्ही काही उपयोगी सूचना व सल्ला घेऊ शकता. ख्रिस्ती सभेत दिल्या जाणाऱ्‍या प्रशिक्षणाचा आणि सूचनांचा पुरेपूर फायदा करून घ्या. प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचाही लाभ घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निराश होऊन प्रयत्न करण्याचे सोडू नका. एका बुद्धिमान मनुष्याने लिहिले: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” (उपदेशक ११:६) शिवाय, नोहा व यिर्मया यांसारख्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. त्यांच्या प्रचाराला बहुतेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला नाही पण काहींनी दिला आणि त्यांचे सेवाकार्य यशस्वी ठरले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या सेवेमुळे यहोवाला आनंद झाला.

आपल्या परीने होईल तितके करा

१४. यहोवा त्याच्या सेवेत जीवन व्यतीत केलेल्या वृद्धजनांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

१४ कदाचित तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला सेवाकार्यात हवा तितका सहभाग घेणे शक्य नसेल. उदाहरणार्थ, म्हातारपणाच्या अडचणींनी तुमच्यावर मर्यादा घातल्या असतील. तरीसुद्धा बुद्धिमान मनुष्याने काय म्हटले त्याची आठवण करा: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे १६:३१) यहोवाच्या दृष्टिकोनात, त्याच्या सेवेत व्यतीत केलेले जीवन संतोषदायक आहे. शिवाय बायबल म्हणते: “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतहि मीच [यहोवा] तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे, मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन.” (यशया ४६:४) आपला प्रेमळ स्वर्गीय पिता त्याच्या एकनिष्ठ सेवकांची काळजी घेण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे वचन देतो.

१५. यहोवा तुमची परिस्थिती समजून घेतो यावर तुमचा विश्‍वास आहे का? असा विश्‍वास तुम्ही का बाळगता?

१५ कदाचित तुम्ही आजारपणाला, विश्‍वासात नसलेल्या वैवाहिक जोडीदाराच्या विरोधाला, मोठमोठ्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांना किंवा इतर कठीण समस्येला तोंड देत असाल. यहोवाला आपल्या मर्यादांची आणि परिस्थितीची जाणीव आहे आणि आपण त्याची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा तो यासाठी आपल्यावर प्रेम करतो. इतरांपेक्षा आपण कमी सेवा करत असलो तरीही यहोवा आपल्यावर प्रेम करतो. (गलतीकर ६:४) आपण अपरिपूर्ण आहोत हे यहोवाला माहीत आहे आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (स्तोत्र १४७:११) आपण आपल्या परीने होईल तितके केले तर आपण निश्‍चिंत राहू शकतो कारण यहोवा आपली कदर करतो आणि तो आपली विश्‍वासू कृत्ये विसरणार नाही.—लूक २१:१-४.

१६. एक शिष्य बनवण्यात कशाप्रकारे पूर्ण मंडळीचा सहभाग असतो?

१६ शिवाय, शिष्य बनवण्याचे कार्य हे सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून असते हे देखील आठवणीत असू द्या. पावसाचा एक थेंब ज्याप्रकारे एखादे रोप वाढायला कारणीभूत नसतो त्याप्रकारे कोणाही एका व्यक्‍तीच्या प्रयत्नाने शिष्य बनत नाही. कदाचित एखादा साक्षीदार त्या व्यक्‍तीला भेटतो आणि तिच्यासोबत बायबल अभ्यास करतो. पण ती नवीन व्यक्‍ती राज्य सभागृहात आल्यानंतर त्या व्यक्‍तीला सत्याची खात्री पटवून देण्यात सबंध मंडळीचा हातभार लागतो. मंडळीतील बांधवांचे प्रेम पाहून देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करतो हे त्या व्यक्‍तीला दिसून येते. (१ करिंथकर १४:२४, २५) अगदी लहान लहान आणि किशोरवयीन मुले देखील उत्साही उत्तरे देतात हे पाहून, जगातल्या तरुणांपेक्षा मंडळीतील ही लहान मुले किती वेगळी आहेत हे त्या नवीन व्यक्‍तीला पाहायला मिळते. मंडळीत जे बांधव आजारापणाला, अपंगत्वाला किंवा वाढत्या वयाच्या समस्यांना तोंड देत आहेत ते नवीन लोकांसमोर धीर धरण्याविषयी फार प्रभावी आदर्श मांडतात. तेव्हा, आपले वय किंवा परिस्थिती कशीही असो आपण सर्वजण नवीन व्यक्‍तींना कोणत्या न कोणत्या प्रकारे बायबल सत्याविषयीचे प्रेम विकसित करण्यासाठी आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी मदत करत असतो. सेवाकार्यात आपण खर्च केलेला प्रत्येक तास, आपण दिलेली प्रत्येक पुनर्भेट, राज्य सभागृहात नवीन आस्थेवाईक व्यक्‍तीशी आपण केलेले प्रत्येक संभाषण कदाचित आपल्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसेल पण यहोवाच्या आत्म्याने साध्य होत असलेल्या एका फार प्रचंड कार्यात या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

१७, १८. (अ) शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभागी होण्यासोबतच आपण कोणत्या इतर मार्गांनी देण्याच्या आनंदात सहभागी होऊ शकतो? (ब) देण्याच्या आनंदात सहभागी झाल्यामुळे आपण कोणाचे अनुकरण करतो?

१७ अर्थात शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभागी होण्यासोबतच ख्रिस्ती या नात्याने आपण इतर मार्गांनीही देण्याच्या आनंदाचा आस्वाद घेऊ शकतो. शुद्ध उपासनेला हातभार लावण्यासाठी तसेच गरजू बांधवांना मदत करण्यासाठी आपण काही पैसे वेगळे ठेवू शकतो. (लूक १६:९; १ करिंथकर १६:१, २) इतरांना आतिथ्य दाखवण्याची आपण संधी शोधू शकतो. (रोमकर १२:१३) तसेच ‘सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करण्याचा’ आपण प्रयत्न करू शकतो. (गलतीकर ६:१०) एक साधेसे पत्र, फोन कॉल, व्यवहारिक मदत किंवा प्रोत्साहनदायक शब्द यांसारख्या साध्याच पण अर्थपूर्ण मार्गांनी आपण इतरांना देण्यात सहभागी होऊ शकतो.

१८ या सर्व मार्गांनी आपण इतरांना देतो तेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करत असतो. तसेच आपण आपले बंधूप्रेम देखील प्रदर्शित करत असतो आणि यामुळे आपली खरे ख्रिस्ती म्हणून ओळख पटते. (योहान १३:३५) या गोष्टी आठवणीत ठेवल्यामुळे देण्याच्या आनंदात आपल्या सर्वांना सहभागी होण्यास मदत होईल.

तुम्ही समजावू शकता का?

• आध्यात्मिक रितीने देण्याच्या बाबतीत यहोवाने व येशूने कशाप्रकारे आपल्यासमोर आदर्श मांडला आहे?

• आपण कायम टिकणारी मैत्रीची नाती कशी जुळवू शकतो?

• आपले सेवाकार्य अधिक फलदायी होण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?

• मंडळीतले सर्वजण देण्याच्या आनंदात कशाप्रकारे सहभागी होऊ शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्रे]

लहान मुले दिलेल्या मार्गदर्शनानुसार वागतात तेव्हा आईवडिलांना खूप आनंद व समाधान मिळते

[१५ पानांवरील चित्र]

शिष्य बनवल्यामुळे आपण खरे मित्र बनवू शकतो

[१६ पानांवरील चित्र]

वाढत्या वयातही यहोवा आपली काळजी वाहतो

[१७ पानांवरील चित्रे]

साध्याच पण अर्थपूर्ण मार्गांनी, आपण देण्याच्या आनंदात सहभागी होऊ शकतो