व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचा अभ्यास का करावा?

बायबलचा अभ्यास का करावा?

बायबलचा अभ्यास का करावा?

बिल हा धडधाकट, सुशिक्षित आणि आर्थिकरित्या स्थिरस्थावर असलेला तरुण होता. तरीही, तो समाधानी नव्हता. आपल्या जीवनाला काही दिशा नाही ही जाणीव त्याला सतत अस्वस्थ करायची. जीवनाचा उद्देश शोधण्याच्या प्रयत्नात त्याने अनेक धर्मांचे परीक्षण करून पाहिले पण त्याच्या मनाचे काही समाधान झाले नाही. १९९१ साली, त्याला एक यहोवाचा साक्षीदार भेटला. त्याने त्याला एक पुस्तक दिले ज्यामध्ये बायबलनुसार जीवनाचा काय अर्थ आहे याविषयी चर्चा करण्यात आली होती. या विषयाबद्दल, तसेच इतरही विषयांबद्दल बिलला शिकता यावे म्हणून त्याच्यासोबत बायबल अभ्यास करण्याची व्यवस्था करण्यात आली.

बिल आठवून सांगतो: “आमचा पहिला अभ्यास झाला तेव्हा आम्ही इतक्यांदा बायबल उघडून पाहिले की मला अगदी खात्री पटली की मी इतक्या दिवसांपासून जे शोधत होतो ते हेच आहे. बायबलमधून मिळालेली उत्तरे पाहून तर माझ्या अंगावर शहारे आले. त्या अभ्यासानंतर मी माझ्या गाडीत बसून डोंगरावर गेलो, गाडीतून बाहेर उतरलो आणि आनंदाने अक्षरशः ओरडू लागलो. माझ्या प्रश्‍नांची मला अखेर उत्तरे मिळालीत यामुळे माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.”

अर्थात, बायबल सत्य मिळणारी प्रत्येक व्यक्‍ती आनंदाच्या भरात अशी मोठ्याने ओरडणार नाही. परंतु, जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे मिळणे हा अनेकांकरता आनंददायक अनुभव असतो. येशूने दिलेल्या दाखल्यात, शेतात लपवलेली ठेव मिळालेल्या मनुष्यासारख्याच त्यांच्याही भावना असतात. येशूने म्हटले: “आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.”—मत्तय १३:४४.

अर्थपूर्ण जीवनाचे रहस्य

बिलने एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नावर चिंतन केले होते; तो प्रश्‍न होता: जीवनाचा काय अर्थ आहे? तत्त्वज्ञानी, वेदान्ती आणि शास्त्रज्ञ यांनी कित्येक शतकांपासून या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रश्‍नाचे उत्तर देण्याच्या प्रयत्नात असंख्य पुस्तके लिहिण्यात आली आहेत. त्यांचे सगळे प्रयत्न वायफळ ठरले आहेत आणि पुष्कळांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की, याचे उत्तर मिळणे शक्य नाही. पण, याचे उत्तर आहे. ते उत्तर जरी गहन असले, तरी क्लिष्ट नाही. ते बायबलमध्ये समजावून सांगण्यात आले आहे. आनंदी, अर्थपूर्ण जीवनाचे रहस्य आहे: आपला निर्माणकर्ता आणि स्वर्गीय पिता यहोवा याच्यासोबत योग्य नातेसंबंध. हे आपण कसे साध्य करू शकतो?

देवासोबतचा नातेसंबंध वाढवण्यामध्ये दोन परस्परविरोधी गोष्टी गोवलेल्या आहेत असे वाटते. देवाशी घनिष्ट संबंध असलेल्यांना त्याचे भय आहे आणि त्यांचे त्याच्यावर प्रेमही आहे. या वाक्याला पुष्टी देणारी दोन शास्त्रवचने आपण पाहू या. बऱ्‍याच काळाआधी, सुज्ञ राजा शलमोनाने मानवजातीचा कसून अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष त्याने बायबलमधील उपदेशकाच्या पुस्तकात नमूद करून ठेवले आहेत. आपल्या निरीक्षणाचा सारांश त्याने असा मांडला: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (तिरपे वळण आमचे.) (उपदेशक १२:१३) अनेक शतकांनंतर, मोशेला देण्यात आलेल्या नियमशास्त्रात सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे असे येशूला विचारल्यावर त्याने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २२:३७) देवाचे भय बाळगायचे आणि त्याच्यावर प्रेमही करायचे हे तुम्हाला जरा विचित्र वाटते का? भय आणि प्रेम यांचे काय महत्त्व आहे आणि देवासोबत समाधानकारक नातेसंबंध निर्माण करायला या दोन्ही गोष्टी कशा आवश्‍यक आहेत त्याचे आपण परीक्षण करून पाहू या.

देवाचे भय धरण्याचा अर्थ

स्वीकारणीय पद्धतीने आपल्याला देवाची उपासना करायची असेल तर, त्याच्याविषयी आदरयुक्‍त भय बाळगणे सर्वात मूलभूत गोष्ट आहे. बायबल म्हणते: “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.” (स्तोत्र १११:१०) प्रेषित पौलाने लिहिले: “आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.” (इब्री लोकांस १२:२८) अशाचप्रकारे, प्रेषित योहानाने दृष्टान्तात अंतराळाच्या मध्यभागी एक देवदूत उडताना पाहिला; त्याने सुवार्तेची घोषणा या शब्दांनी सुरू केली: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा.”—प्रकटीकरण १४:६, ७.

अर्थपूर्ण जीवनाला अत्यावश्‍यक असलेली ही देवाची भीती म्हणजे अंगात कापरे भरवणारी भीती नाही. कोणा क्रूर, भयंकर गुन्हेगाराने आपल्याला धमकी दिली तर आपल्याला अशी कापरे भरवणारी भीती वाटते. पण देवाची भीती किंवा दैवी भय ही निर्माणकर्त्याबद्दल आदरयुक्‍त भीती आणि गाढ श्रद्धा आहे. शिवाय, त्याला असंतुष्ट करण्याचे हे उचित भय आहे. कारण तो सर्वोच्च न्यायाधीश आणि सर्वशक्‍तिमान देव असल्यामुळे त्याची अवज्ञा करणाऱ्‍यांना शिक्षा देण्याचे सामर्थ्य आणि अधिकार त्याच्याजवळ आहे.

भीती आणि प्रीतीचे एकत्र कार्य

तरीपण, लोकांना आपले भय वाटते म्हणून त्यांनी आपली सेवा करावी अशी यहोवाची इच्छा नाही. यहोवा प्रामुख्याने प्रीतीचा देव आहे. प्रेषित योहान असे लिहिण्यास प्रवृत्त झाला: “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) यहोवा देवाने मानवजातीसोबत फार प्रेमळपणे व्यवहार केला आहे आणि लोकांनीही त्याच्यावर तसेच प्रेम करावे अशी त्याची इच्छा आहे. परंतु, प्रीती आणि ईश्‍वरी भय या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा बसतो? खरे तर, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्‍वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्‍याशी असते.”—स्तोत्र २५:१४.

लहान मुलाला आपल्या बलवान व बुद्धिमान पित्याबद्दल कसा आदर आणि भय वाटते याचा विचार करा. तरीसुद्धा, ते मूल पित्याच्या प्रेमाला प्रतिसाद देते. पित्यावर त्याचा पूर्ण भरवसा असतो आणि मार्गदर्शनासाठीही ते पित्याकडेच जाते; त्याला पूर्ण आत्मविश्‍वास असतो की, त्या मार्गदर्शनाने त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे, आपण यहोवावर प्रीती केली आणि त्याचे भय धरले तर आपण त्याच्या आज्ञा मानू आणि हे आपल्याकरता फायद्याचे असेल. इस्राएलांबद्दल यहोवाने काय म्हटले ते पाहा: “त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल! तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल.”—अनुवाद ५:२९.

होय, ईश्‍वरी भय, दास्यत्वास नव्हे तर स्वातंत्र्यास, दुःखाला नव्हे तर आनंदाला कारणीभूत ठरते. यशयाने येशूविषयी अशी भविष्यवाणी केली: “परमेश्‍वराचे भय त्याला सुगंधमय होईल.” (यशया ११:३) शिवाय, स्तोत्रकर्त्याने लिहिले: “जो मनुष्य परमेश्‍वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!”—स्तोत्र ११२:१.

पण आपल्याला जर देवाची ओळखच नसेल तर आपण त्याचे भय धरू शकत नाही आणि त्याच्यावर प्रीतीसुद्धा करू शकत नाही. म्हणूनच बायबलचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. अशा अभ्यासामुळे देवाचे व्यक्‍तिमत्त्व समजून घेण्यात व त्याचे मार्गदर्शन पाळण्यात सुज्ञता आहे याची कदर बाळगण्यास आपल्याला मदत मिळते. देवाशी आपला नातेसंबंध जितका घनिष्ठ होईल तितकेच त्याच्या इच्छेनुसार आपल्याला चालावेसे वाटेल आणि त्याच्या आज्ञा आपल्या फायद्याच्या आहेत हे जाणल्यामुळे त्या पाळण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल.—१ योहान ५:३.

आपण योग्य मार्गावर चालत आहोत हे जाणल्याने आपल्याला खूप आनंद मिळतो. बिललाही (सुरवातीला ज्याचा उल्लेख केला आहे) असाच आनंद झाला. अलीकडेच तो असे म्हणाला: “माझा बायबल अभ्यास होऊन आता नऊ वर्षं झालीत; या काळादरम्यान, यहोवासोबतचा माझा नातेसंबंध अधिक दृढ झाला आहे. मला सुरवातीला जो आनंद झाला होता तो आता आनंदी जीवनात परिणीत झाला आहे. जीवनाबद्दल माझा दृष्टिकोन सातत्याने सकारात्मक झाला आहे. आता माझ्या जीवनाला अर्थ लाभला आहे; सुखचैनीचे निरर्थक जीवन मिळवण्याच्या मागे मी लागलेलो नाही. यहोवा मला एक खरी व्यक्‍ती वाटू लागली आहे आणि माझ्या कल्याणाची त्याला चिंता आहे हे मला ठाऊक झालंय.”

पुढील लेखात, यहोवाचे ज्ञान घेऊन आपल्या जीवनात ते लागू करणाऱ्‍यांना कशाप्रकारे आनंद आणि फायदा मिळतो ते आपण पाहणार आहोत.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाशी घनिष्ठ नातेसंबंध असणे म्हणजे त्याच्यावर प्रेम असणे आणि त्याचे भयही असणे

[६ पानांवरील चित्र]

यहोवाचे भय मानणे येशूला आनंददायक होते