व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या ज्ञानाने आनंदित व्हा

यहोवाच्या ज्ञानाने आनंदित व्हा

यहोवाच्या ज्ञानाने आनंदित व्हा

“जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.”—लूक ११:२८.

१. यहोवाने मानवांना आपली इच्छा व उद्देश कळवायला केव्हा सुरवात केली?

 यहोवाचे मानवांवर प्रेम आहे आणि त्यांच्या कल्याणाची त्याला मनापासून काळजी आहे. म्हणूनच, तो त्यांना आपली इच्छा व उद्देश कळवतो. पहिल्यांदा देव एदेन बगीच्यात मनुष्यांशी बोलला. उत्पत्ति ३:८ या वचनानुसार एकदा “शिळोप्याचा वारा सुटला असता” आदाम व हव्वा यांना “[देवाचा] आवाज . . . ऐकू आला.” काहींच्या मते, दिवसाच्या या वेळी बहुधा दररोज, यहोवा आदामाशी बोलत असावा. हे खरे असो वा नसो, पण बायबल एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगते. ती अशी, की यहोवा पहिल्या मानवाला वेळोवेळी सूचना देत होता; त्याच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी त्याला जे काही जाणून घेणे आवश्‍यक होते ते तो त्याला शिकवत होता.—उत्पत्ति १:२८-३०.

२. पहिल्या जोडप्याने स्वतःला यहोवाच्या मार्गदर्शनापासून कशाप्रकारे वंचित केले आणि याचा काय परिणाम झाला?

यहोवाने आदाम व हव्वा यांना जीवन दिले आणि सर्व पशूपक्षी आणि सबंध पृथ्वीवर त्यांना अधिकार दिला. त्यांना फक्‍त एका गोष्टीची मनाई करण्यात आली होती. बऱ्‍यावाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ नका असे त्यांना सांगण्यात आले होते. पण सैतानाच्या फसवणुकीला बळी पडून आदाम व हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडली. (उत्पत्ति २:१६, १७; ३:१-६) ते स्वतंत्र वृत्तीने वागले, अर्थात चांगले काय व वाईट काय हे स्वतःच्या मनाने ठरवण्याचे त्यांनी निवडले. अशारितीने त्यांनी आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याच्या मार्गदर्शनापासून स्वतःला वंचित करण्याचा मूर्खपणा केला. याचा, त्यांच्यावर आणि अद्याप जन्माला न आलेल्या त्यांच्या संततीवर अतिशय भयंकर परिणाम झाला. आदाम व हव्वा हळूहळू म्हातारे झाले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला; त्यांचे कधीच पुनरुत्थान होणार नाही. त्यांच्या वंशजालाही पापाचा आणि परिणामतः मृत्यूचा वारसा मिळाला.—रोमकर ५:१२.

३. यहोवा काईनाशी का बोलला आणि काईनाने त्याचा सल्ला स्वीकारला का?

एदेन बागेत आदाम व हव्वेने केलेल्या विद्रोहानंतरही, यहोवाने मानवांना त्याची इच्छा व उद्देश कळवण्याचे बंद केले नाही. आदाम व हव्वा यांना झालेला पहिला पुत्र काईन जेव्हा पापाच्या पाशात पडणार होता तेव्हा यहोवाने त्याला सावध केले आणि ‘बरे ते करण्याचा’ सल्ला दिला. पण काईनाने या प्रेमळ सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या भावाची हत्या केली. (उत्पत्ति ४:३-८) अशारितीने पृथ्वीवरील पहिल्या तीन मानवांनी, त्यांना जीवन देणाऱ्‍या व त्यांच्या भल्याकरता शिक्षण देणाऱ्‍या देवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर केला. (यशया ४८:१७) हे पाहून यहोवाची किती निराशा झाली असेल!

प्राचीन पुरुषांना यहोवा आपले विचार कळवतो

४. आदामाच्या वंशजांच्या संदर्भात यहोवाला कशाची खात्री होती आणि हे लक्षात घेऊन त्याने कोणता आशादायी संदेश घोषित केला?

मानवांशी सर्व संपर्क तोडून टाकण्याचा यहोवाला पूर्ण हक्क असूनही त्याने असे केले नाही. त्याला खात्री होती, की आदामाच्या वंशजांतील निदान काहीजण तरी सुज्ञपणे त्याच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करतील. उदाहरणार्थ, आदाम व हव्वा यांना शिक्षा सुनावताना यहोवाने एका ‘संततिबद्दल’ भाकीत केले; ही संतती सर्पाच्या अर्थात दियाबल सैतानाच्या विरोधात उभी राहील असे त्याने सांगितले. कालांतराने, सैतानाच्या डोक्यावर प्राणघातक वार केला जाणार होता. (उत्पत्ति ३:१५) “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात” त्यांच्याकरता ही भविष्यवाणी एका आनंदी संदेशासारखी होती.—लूक ११:२८.

५, ६. सा.यु. पहिल्या शतकाआधी यहोवाने आपली इच्छा व उद्देश कशाप्रकारे आपल्या लोकांना कळवले आणि याचा त्यांना कशाप्रकारे फायदा झाला?

यहोवाने प्राचीन काळातील, नोहा, अब्राहाम, इसहाक, याकोब आणि ईयोब यांच्यासारख्या विश्‍वासू कुलपित्यांना आपली इच्छा कळवली. (उत्पत्ति ६:१३; निर्गम ३३:१; ईयोब ३८:१-३) नंतर, मोशेद्वारे त्याने इस्राएल राष्ट्राला अनेक आज्ञा असलेली एक सबंध कायदेसंहिता दिली. मोशेच्याद्वारे दिलेले हे नियमशास्त्र अनेक मार्गांनी फायदेकारक ठरले. या नियमशास्त्राचे पालन केल्यामुळे इस्राएल देवाचे खास लोक म्हणून इतर सर्व राष्ट्रांपासून वेगळे राहू शकले. देवाने इस्राएली लोकांना आश्‍वासन दिले की त्यांनी त्याच्या नियमशास्त्राचे पालन केल्यास तो त्यांना केवळ भौतिकरित्याच नव्हे तर आध्यात्मिकरित्या देखील आशीर्वादित करेल आणि ते त्याच्याकरता एक याजकराज्य, व पवित्र राष्ट्र होतील. नियमशास्त्रात चांगल्या आरोग्याला पोषक असणारे आहारविषयक व स्वच्छताविषयक नियम देखील होते. पण या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यास कोणते दुःखद परिणाम होतील हे देखील त्याने सांगितले होते.—निर्गम १९:५, ६; अनुवाद २८:१-६८.

कालांतराने बायबलच्या प्रेरित पुस्तकांच्या यादीत, इतर प्रेरित पुस्तकांचाही समावेश करण्यात आला. ऐतिहासिक वृत्तान्तांत यहोवाने वेगवेगळ्या राष्ट्रांसोबत कशाप्रकारे व्यवहार केला याविषयी सांगण्यात आले. काव्यात्मक शैलीत लिहिलेल्या पुस्तकांत यहोवाच्या गुणांचे सुरेख वर्णन करण्यात आले. भविष्यसूचक पुस्तकांत यहोवाचा उद्देश कशाप्रकारे भविष्यात पूर्ण होईल यांविषयी भाकीत करण्यात आले. प्राचीन काळातील देवाच्या विश्‍वासू सेवकांनी या प्रेरित लिखाणांचा लक्षपूर्वक अभ्यास केला आणि त्यांचे पालन केले. त्यांपैकी एकाने असे लिहिले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.” (स्तोत्र ११९:१०५) ज्यांनी ऐकण्याची तयारी दाखवली त्यांना यहोवाने शिक्षण आणि ज्ञानाचा प्रकाश दिला.

प्रकाश आणखी तेजोमय होतो

७. येशूने अनेक चमत्कार केले तरीसुद्धा तो कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध होता आणि का?

पहिल्या शतकापर्यंत यहुदी धार्मिक गटांनी नियमशास्त्रात अनेक मानवी पारंपरिक शिकवणुकी जोडल्या होत्या. अशारितीने नियमशास्त्राचा गैर अर्थ लावण्यात आला आणि त्यामुळे लोकांना बोधपर ठरण्याऐवजी या परंपरांमुळे तो त्यांना कठीण वाटू लागला. (मत्तय २३:२-४) पण, सा.यु. २९ साली येशू मशीहा म्हणून प्रकट झाला. तो या पृथ्वीवर केवळ मानवजातीकरता आपले जीवन देण्यासाठीच नव्हे तर “सत्याविषयी साक्ष” देण्यासाठीही आला होता. त्याने अनेक चमत्कार केले तरीसुद्धा त्याला “गुरुजी,” अर्थात शिक्षक याच नावाने ओळखले जाई. त्याच्या शिकवणुकी लोकांच्या मनातील आध्यात्मिक अंधकारातून चमकणाऱ्‍या प्रकाश किरणांसारख्या होत्या. म्हणूनच येशूने असे म्हटले: “मीच जगाचा प्रकाश आहे.”—योहान ८:१२; ११:२८; १८:३७.

८. सा.यु. पहिल्या शतकात कोणती प्रेरित पुस्तके लिहिण्यात आली आणि या पुस्तकांचा आरंभिक ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे फायदा झाला?

प्रेरित लिखाणांत नंतर शुभवर्तमानांची, अर्थात येशूच्या जीवनाच्या चार लिखित अहवालांची आणि येशूच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचा इतिहास सांगणाऱ्‍या, प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचीही भर पडली. यासोबत येशूच्या शिष्यांनी लिहिलेली प्रेरित पत्रे व प्रकटीकरणाचे भविष्यसूचक पुस्तक देखील लिहिण्यात आले. ही लिखाणे व इब्री शास्त्रवचने मिळून बायबलच्या प्रेरित पुस्तकांची यादी पूर्ण झाली. या प्रेरित ग्रंथसंचयाच्या मदतीने ख्रिस्ती व्यक्‍तीला सत्याची ‘रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे समजून घेणे’ शक्य झाले. (इफिसकर ३:१४-१८) ते “ख्रिस्ताचे मन” संपादन करू शकत होते. (१ करिंथकर २:१६) पण या आरंभिक ख्रिश्‍चनांना यहोवाच्या उद्देशांबद्दल अद्याप पूर्ण समज नव्हती. प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बांधवांना असे लिहिले: “हल्ली आपल्याला [“धातूच्या,” NW] आरशात अस्पष्ट असे दिसते.” (१ करिंथकर १३:१२) या आरशात केवळ रूपरेषा दिसायची, बारीकसारीक गोष्टी नाहीत. तात्पर्य असे, की देवाच्या वचनाविषयी पूर्ण समज भविष्यात मिळणार होती.

९. ‘शेवटल्या काळात’ कशाप्रकारे ज्ञानवृद्धी झाली आहे?

आज आपण ‘शेवटला काळ’ म्हटलेल्या युगात राहात आहोत; एक असे युग ज्यात अतिशय ‘कठीण दिवस’ आहेत. (२ तीमथ्य ३:१) भविष्यद्वक्‍ता दानीएल याने असे भाकीत केले होते की या काळादरम्यान ‘[खऱ्‍या] ज्ञानाची वृद्धी होईल.’ (दानीएल १२:४, NW) म्हणूनच मानवांना अद्‌भुतरित्या आपली इच्छा व उद्देश कळवणाऱ्‍या यहोवा देवाने प्रामाणिक हृदयाच्या लोकांना त्याच्या वचनाचा अर्थ समजून घेण्यास मदत केली आहे. आज लाखो लोकांना हे समजले आहे की ख्रिस्त येशू १९१४ साली सिंहासनाधिष्ट झाला. तसेच तो लवकरच दुष्टाईचा अंत करून या पृथ्वीचे एका रम्य परादीसात रूपांतर करेल हे देखील त्यांना माहीत आहे. राज्याच्या सुवार्तेविषयी ही महत्त्वाची गोष्ट आज सबंध पृथ्वीवर घोषित केली जात आहे.—मत्तय २४:१४.

१०. आजवर अनेक शतकांदरम्यान लोकांनी यहोवाच्या सल्ल्याबद्दल कशाप्रकारची मनोवृत्ती दाखवली आहे?

१० होय, सबंध इतिहासात यहोवाने पृथ्वीवरील लोकांना आपली इच्छा व उद्देश यांविषयी कळवले आहे. बायबल अहवालात अशा बऱ्‍याच लोकांविषयी सांगितले आहे ज्यांनी त्याचे ऐकले, त्याच्या सुज्ञ सल्ल्याचे पालन केले आणि त्यामुळे त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले. तसेच बायबल अशाही लोकांविषयी सांगते ज्यांनी देवाच्या प्रेमळ सल्ल्याचा अव्हेर केला आणि आदाम व हव्वा यांच्याप्रमाणेच स्वतःवर नाश ओढवून घेतला. येशूने दोन लाक्षणिक मार्गांचा दृष्टान्त देऊन ही परिस्थिती समजावून सांगितली. एक मार्ग नाशाकडे नेतो. तो अतिशय रुंद आणि ऐसपैस आहे व त्यावर देवाच्या वचनाचा अव्हेर करणारे बहुतेक लोक चालत आहेत. दुसरा मार्ग सार्वकालिक जीवनाकडे नेतो. हा मार्ग अरुंद असूनही, जे लोक बायबल देवाचे वचन आहे ही वस्तूस्थिती स्वीकारतात आणि त्यानुसार वागतात ते थोडके लोक या मार्गावर चालत आहेत.—मत्तय ७:१३, १४.

आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांची कदर करणे

११. आपल्याला बायबलचे ज्ञान आहे आणि त्यावर आपण विश्‍वास ठेवतो हा कशाचा पुरावा आहे?

११ ज्यांनी जीवनाचा मार्ग निवडला आहे त्यांच्यापैकी तुम्ही आहात का? जर असाल, तर निश्‍चितच तुम्हाला याच मार्गावर शेवटपर्यंत चालत राहण्याची इच्छा असेल. हे तुम्ही कशाप्रकारे करू शकता? बायबलमधील सत्यांचे ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला जीवनात कोणकोणते आशीर्वाद मिळाले आहेत यावर नियमितपणे, कृतज्ञ मनोवृत्तीने मनन करा. तुम्ही सुवार्तेचा स्वीकार केला हाच देवाच्या आशीर्वादाचा एक पुरावा आहे. येशूने आपल्या पित्याला प्रार्थना करताना हे सूचित केले होते; त्याने म्हटले: “हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करितो, कारण ज्ञानी व विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या.” (मत्तय ११:२५) कोळी व जकातदार यांना येशूच्या शिकवणुकींचा खरा अर्थ उमगला पण सुशिक्षित धर्मपुढाऱ्‍यांना मात्र तो कळला नाही. येशूने असेही म्हटले होते: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) तुम्ही बायबलचे ज्ञान घेऊन त्यातील शिकवणुकींवर विश्‍वास ठेवत असाल व त्यांचे पालन करत असाल तर यहोवाने तुम्हाला आकर्षिले आहे याचा हा पुरावा आहे. हे खरोखर आनंदित होण्याचे कारण आहे.

१२. बायबल कशाप्रकारे आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देते?

१२ देवाच्या वचनात बंधमुक्‍त करणारी सत्ये आणि ज्ञानाचा प्रकाश आहे. बायबलच्या ज्ञानानुसार जगणाऱ्‍यांना अंधविश्‍वासांपासून व खोट्या शिकवणुकींपासून मुक्‍ती मिळते आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनात असलेला आध्यात्मिक अंधकार या ज्ञानामुळे दूर होतो. उदाहरणार्थ, मृतांच्या स्थितीविषयी सत्य जाणून घेतल्यामुळे मृतजन आपल्याला काही अपाय करतील किंवा आपले मृत प्रियजन यातना सहन करत असतील ही भीती राहात नाही. (यहेज्केल १८:४) दुरात्म्यांविषयी सत्य जाणून घेतल्यामुळे आपण भूतविद्येपासून दूर राहू शकतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमवले आहे त्यांना पुनरुत्थानाच्या शिकवणुकीमुळे सांत्वन मिळते. (योहान ११:२५) बायबलमधील भविष्यवाण्या आपल्याला हे दाखवून देतात की काळाच्या ओघात आपण आज कोठे आहोत आणि देवाच्या भविष्याबद्दलच्या प्रतिज्ञांवरही त्या आपला विश्‍वास बळकट करतात. तसेच या भविष्यावाण्या सार्वकालिक जीवनाची आपली आशा अधिक दृढ करतात.

१३. देवाच्या वचनाचे पालन केल्यामुळे शारीरिक दृष्ट्या आपला कशाप्रकारे फायदा होतो?

१३ बायबलमधील नीतिमान तत्त्वे आपल्याला शारीरिक दृष्टीने श्रेयस्कर जीवनशैली अवलंबण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, तंबाखू किंवा इतर नशेचे पदार्थ घेणे यांसारख्या शरीरास दूषित करणाऱ्‍या वाईट सवयी टाळण्यास बायबल आपल्याला शिकवते. आपण मद्याच्या आहारी जाण्याचे टाळतो. (२ करिंथकर ७:१) देवाच्या नैतिक कायद्यांचे पालन केल्यामुळे लैंगिकरित्या संक्रमित होणाऱ्‍या रोगांपासूनही आपले संरक्षण होते. (१ करिंथकर ६:१८) धनसंपत्तीच्या मागे लागून बरेच लोक आपली मनःशांती गमवून बसतात पण पैशाच्या लोभाविषयी बायबलच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे आपण आपली मनःशांती टिकवून ठेवू शकतो. (१ तीमथ्य ६:१०) देवाच्या वचनाचे पालन केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात शारीरिक दृष्टीने कोणते फायदे झाले आहेत?

१४. पवित्र आत्म्याचा आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडतो?

१४ आपण देवाच्या वचनाप्रमाणे चाललो तर आपल्याला यहोवाचा पवित्र आत्मा मिळतो. आपण ख्रिस्तासारखे व्यक्‍तिमत्त्व विकसित करू शकतो आणि दया व सहानुभूती यांसारखे त्याचे मनमोहक गुण आपणही संपादन करू शकतो. (इफिसकर ४:२४, ३२) देवाचा आत्मा आपल्यामध्ये त्याचे फळ अर्थात प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, आणि इंद्रियदमन यांसारखे गुणही निर्माण करतो. (गलतीकर ५:२२, २३) हे गुण आपल्याला आपल्या कौटुंबिक सदस्यासोबतच इतरांसोबतही आनंदी व अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करतात. तसेच, आपल्याला एक प्रकारची आंतरिक ताकद मिळते, व यामुळे आपण कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देण्यास समर्थ होतो. पवित्र आत्म्याने तुमच्या जीवनावर कशाप्रकारे चांगला प्रभाव पाडला आहे याची तुम्हाला जाणीव होते का?

१५. आपण देवाच्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला कोणते फायदे होतात?

१५ आपण देवाच्या इच्छेनुसार जगण्याचा जसजसा प्रयत्न करतो, तसतसा आपला त्याच्यासोबतचा नातेसंबंध अधिकाधिक घनिष्ट होत जातो. तो आपल्या भावना समजून घेतो आणि आपल्यावर प्रेम करतो याची आपल्याला अधिकाधिक खात्री पटू लागते. जीवनातील कठीण वळणांवर तो आपल्या पाठीशी असतो हे आपल्याला अनुभवाने कळून येते. (स्तोत्र १८:१८) तो खरोखर आपल्या प्रार्थना ऐकतो याची आपल्याला जाणीव होते. (स्तोत्र ६५:२) आपण त्याच्या मार्गदर्शनावर विसंबून राहू लागतो आणि आपल्याला ही खात्री असते की त्याचे मार्गदर्शन आपल्या भल्याकरताच आहे. तसेच आपण ही अद्‌भुत आशा बाळगतो की देव त्याच्या नियुक्‍त वेळी त्याच्या विश्‍वासू सेवकांना परिपूर्णता देईल आणि त्यांना सार्वकालिक जीवनाचे वरदान देईल. (रोमकर ६:२३) शिष्य याकोबाने लिहिले: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) तुम्ही देवाजवळ येण्याचा प्रयत्न केल्यामुळे हळूहळू तुमचा त्याच्यासोबतचा नातेसंबंध अधिक घनिष्ट झाल्याचे तुम्हाला जाणवले आहे का?

सर्वाधिक मोलाची संपत्ती

१६. पहिल्या शतकातील काही ख्रिश्‍चनांनी कोणते बदल केले?

१६ पौलाने पहिल्या शतकातील अभिषिक्‍त ख्रिचनांना आठवण करून दिली की एकेकाळी त्यांच्यापैकी काहीजण जारकर्मी, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे होते. (१ करिंथकर ६:९-११) बायबल सत्याने त्यांना जीवनात लक्षणीय बदल करायला लावले; त्यांना ‘धुऊन पवित्र’ करण्यात आले. बायबलमधील बंधमुक्‍त करणारे सत्य शिकायला मिळाले नसते तर आज तुमचे जीवन कसे असते याची कल्पना करा. निश्‍चितच सत्याच्या रूपात आपल्याला सर्वाधिक मोलाची संपत्ती मिळाली आहे. यहोवा आपल्याला त्याचे ज्ञान देतो हे खरोखर किती आनंददायक आहे!

१७. यहोवाच्या साक्षीदारांना ख्रिस्ती सभांतून कशाप्रकारे आध्यात्मिक पोषण मिळाले आहे?

१७ शिवाय, सर्व जगभरातील वेगवेगळ्या जातींतून आलेल्या आपल्या भाऊबहिणींच्या रूपातही आपल्याला एक अद्‌भुत आशीर्वाद मिळाला आहे. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आज यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न आपल्यापर्यंत पोचते करत आहे; अनेक भाषांतून उपलब्ध असलेले बायबल, नियतकालिके, आणि इतर प्रकाशनांचा यात समावेश आहे. (मत्तय २४:४५-४७) सन २००० दरम्यान बऱ्‍याच देशांत यहोवाच्या साक्षीदारांनी इब्री शास्त्रवचनांतील आठ मुख्य पुस्तकांतील ठळक मुद्द्‌यांचा अभ्यास केला. शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), यातून त्यांनी ४० बायबल व्यक्‍तिरेखांवर मनन केले. तसेच त्यांनी सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाच्या जवळजवळ एक चतुर्थांश भागाचा आणि दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी), या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास केला. टेहळणी बुरूज नियतकालिकातील ५२ अभ्यास लेखांव्यतिरिक्‍त छत्तीस उपलेखांवरही चर्चा करण्यात आली. याशिवाय, यहोवाच्या लोकांना आमची राज्य सेवा याच्या १२ अंकांतून आणि बायबलच्या विविध विषयांवर आधारित असलेल्या साप्ताहिक जाहीर भाषणांतूनही आध्यात्मिक पोषण प्राप्त झाले. खरोखर आध्यात्मिक अन्‍नाचा किती मुबलक साठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे!

१८. ख्रिस्ती मंडळीत आपल्याला कोणत्या मार्गांनी मदत मिळते?

१८ सबंध जगात ९१,००० पेक्षा अधिक मंडळ्यांतून, सभांच्या व प्रेमळ सहवासाच्या माध्यमाने बांधवांना बरेच साहाय्य व प्रोत्साहन मिळते. तसेच, मदत करायला नेहमी तयार असलेल्या मंडळ्यांतील अनुभवी ख्रिस्ती बांधवांचेही साहाय्य आपल्याला प्राप्त होते. (इफिसकर ४:११-१३) होय, सत्याच्या ज्ञानामुळे आपल्याला असंख्य आशीर्वाद मिळाले आहेत. यहोवाला ओळखणे व त्याची सेवा करणे खरोखर आनंददायक आहे. “ज्या लोकांचा देव परमेश्‍वर आहे ते धन्य!” असे लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याचे शब्द किती खरे आहेत.—स्तोत्र १४४:१५.

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्तपूर्व काळात यहोवाने कोणाला आपली इच्छा व उद्देश कळवले?

• पहिल्या शतकात आणि आधुनिक काळात आध्यात्मिक प्रकाश कशाप्रकारे अधिक तेजोमय झाला?

• यहोवाच्या ज्ञानानुसार जगल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

• देवाचे ज्ञान मिळाल्यामुळे आपण का आनंदित होतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८, ९ पानांवरील चित्रे]

यहोवाने आपली इच्छा मोशे, नोहा व अब्राहाम यांना कळवली

[९ पानांवरील चित्र]

आपल्या काळात, यहोवाने त्याच्या वचनावर प्रकाश टाकला आहे

[१० पानांवरील चित्रे]

आपल्या बहुजातीय बंधुसमाजाच्या रूपात आपल्याला किती अद्‌भुत आशीर्वाद मिळाला आहे याचा विचार करा!