व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शंकांमुळे आपला विश्‍वास कमकुवत होऊ देऊ नका

शंकांमुळे आपला विश्‍वास कमकुवत होऊ देऊ नका

शंकांमुळे आपला विश्‍वास कमकुवत होऊ देऊ नका

आज तुम्हाला वाटत असते की आपण अगदी निरोगी आहोत, पण दुसऱ्‍याच दिवशी तुम्ही आजारी पडता. अचानक तुम्हाला अगदी गळून गेल्यासारखे वाटते. तुमचे डोके आणि सबंध शरीर दुखू लागते. अचानक काय झाले असावे? अपायकारक जंतूंनी तुमच्या शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्‍तीवर मात करून शरीरातील महत्त्वाच्या अंगांवर आक्रमण केले आहे. वेळीच उपचार न केल्यास, हे आक्रमक जन्तू तुमच्या आरोग्याला कायमचे नुकसान करू शकतात, आणि कधीकधी तर तुमचा जीवही घेऊ शकतात.

अर्थात, शरीरावर जिवाणूंचा हल्ला होतो तेव्हा जर तुम्ही आधीच कमजोर असाल तर तुमच्या जिवाला अधिकच धोका असतो. उदाहरणार्थ, कुपोषणामुळे जर तुम्ही आधीच अशक्‍त झाला असाल तर वैद्यकीय लेखक पीटर विनगेट सांगतात त्याप्रमाणे, तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्‍ती “इतकी खालावते की सर्वसाधारण संसर्गही जीवघेणा ठरतो.”

हे माहीत असताना कोणी आपणहून उपाशी राहण्याचे निवडेल का? उलट तुम्ही उत्तम आहार घेण्याचा आणि निरोगी राहण्याचा शक्यतो प्रयत्न करत असाल. शिवाय, व्हायरस किंवा सूक्ष्मजंतूंचा संसर्ग होऊ नये या दृष्टीनेही तुम्ही काळजी घेत असाल. परंतु, ‘विश्‍वासामध्ये दृढ’ राहण्याच्या बाबतीतही तुम्ही इतकीच काळजी घेता का? (तीत २:२) उदाहरणार्थ, मनात अप्रत्यक्षपणे शिरकाव करणाऱ्‍या शंकांपासून तुम्ही सावध राहता का? या शंका तुमच्या मनात व हृदयात अगदी सहज शिरून तुमचा विश्‍वास व यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध कमकुवत करू शकतात. काहीजणांना या धोक्याची जाणीव नसते. आध्यात्मिकरित्या उपाशी राहून काही लोक स्वतःहून हा धोका पत्करतात. तुमच्या बाबतीतही कदाचित असे घडत असेल का?

शंका—नेहमीच वाईट?

निश्‍चितच नाही. कधीकधी एखादी गोष्ट खरी मानण्याआधी वस्तुस्थितीची नीट खात्री करून घेणे आवश्‍यक असते. जर धार्मिक उपदेशांतून असे सुचवले जात असेल की एखाद्याने कोणतीच शंका न घेता निमूटपणे सर्वकाही खरे मानावे तर हे धोकेदायक आणि फसवणूक करण्यासारखे आहे. प्रीती “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते,” असे बायबल म्हणते हे कबूल आहे. (१ करिंथकर १३:७) गतकाळात ज्याने स्वतःला भरवशालायक असल्याचे सिद्ध केले असेल त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यास एक प्रेमळ ख्रिस्ती व्यक्‍ती तयार असते. पण ‘प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवणे’ धोक्याचे असू शकते असेही देवाचे वचन आपल्याला सांगते. (नीतिसूत्रे १४:१५) कधीकधी एखाद्या व्यक्‍तीच्या गतकाळातील वर्तनामुळे तिच्यावर शंका घेणे अगदी रास्त असते. बायबल इशारा देते की, “[कपटी मनुष्य] गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्‍वास ठेवू नको.”—नीतिसूत्रे २६:२४, २५.

प्रेषित योहानानेही ख्रिश्‍चनांना अंधळेपणाने प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवण्याच्या प्रवृत्तीविषयी सावध केले होते. त्याने लिहिले “प्रत्येक आत्म्याचा [आत्म्याच्या वचनाचा] विश्‍वास धरू नका, तर ते आत्मे [आत्म्याची वचने] देवापासून आहेत किंवा नाहीत ह्‍याविषयी त्यांची परीक्षा करा.” (१ योहान ४:१) या ठिकाणी “वचन” म्हणजेच एखादी शिकवणूक किंवा मत देवापासून आले आहे असे भासू शकते. पण ते खरोखर देवापासून आहे का? ते लगेच खरे मानण्यापेक्षा त्याकडे थोड्याफार साशंकतेने पाहणे एका अर्थाने आपल्याकरता संरक्षण ठरेल कारण प्रेषित योहान म्हणतो त्याप्रमाणे, “फसवणूक करणारी . . . पुष्कळ माणसे जगात उठली आहेत.”—२ योहान ७.

विनाकारण शंका घेणे

सत्याची खात्री करण्यासाठी वस्तुस्थितीचे प्रामाणिकपणे आणि नम्रपणे परीक्षण करणे सहसा योग्यच असते. पण आधार नसताना मनात शंका बाळगणे अपायकारक ठरू शकते कारण या शंका मुळावलेल्या विश्‍वासाचा व नातेसंबंधांचा नाश करू शकतात. या प्रकारच्या शंकेची व्याख्या अशाप्रकारे करण्यात आली आहे, की “एखाद्या समजुतीविषयी किंवा मताविषयीची वाटणारी अनिश्‍चितता, जी सहसा निर्णय घेण्यात बाधा आणते.” सैतानाने हव्वेच्या मनात यहोवाविषयी कशाप्रकारे शंका निर्माण केल्या ते तुम्हाला आठवते का? त्याने तिला विचारले “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” (उत्पत्ति ३:१) अगदी साळसूदपणे विचारलेल्या त्या प्रश्‍नामुळे हव्वेच्या मनात एक अनिश्‍चितता निर्माण झाली आणि ही अनिश्‍चितता, योग्य निर्णय घेण्यात बाधा बनली. हे सैतानाचे वैशिष्ट्य आहे. निनावी निंदात्मक पत्रे लिहिणाऱ्‍याप्रमाणे सैतान अप्रत्यक्षपणे टीका करण्यात, अर्धसत्ये सांगण्यात आणि धडधडीत खोटी माहिती पसरवण्यात तरबेज आहे. या कावेबाज मार्गांनी शंकाकुशंका निर्माण करून त्याने आजवर कितीतरी चांगले व भरवशाचे नातेसंबंध बिघडवले आहेत.—गलतीकर ५:७-९.

अशाप्रकारच्या शंका किती नुकसानकारक ठरू शकतात याची शिष्य याकोबाला जाणीव होती. परीक्षांना तोंड देत असताना आपण देवाला मदतीकरता मोकळेपणाने विनंती करू शकतो असे त्याने लिहिले. पण पुढे तो म्हणतो की आपण “काही संशय न धरता विश्‍वासाने मागावे.” देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधात, शंकांना थारा दिल्यास आपण ‘वाऱ्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारख्या, द्विबुद्धीच्या आणि आपल्या सर्व कार्यांत चंचल असणाऱ्‍या माणसासारखे’ होऊ. (याकोब १:६, ८) आपल्या विश्‍वासांबद्दल अनिश्‍चितता निर्माण झाल्यामुळे आपण स्थैर्य गमावून बसू. आणि यामुळे, हव्वेच्या बाबतीत झाल्याप्रमाणेच सर्व प्रकारच्या दुरात्मिक शिकवणुकींना आणि तर्कवितर्कांना सहज बळी पडू.

उत्तम आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवणे

मग अशा या नुकसानकारक शंकाकुशंकांपासून आपण कशाप्रकारे सांभाळून राहू शकतो? या प्रश्‍नाचे उत्तर अगदी सोपे आहे: सैतानाकडून पसरवल्या जाणाऱ्‍या सर्व माहितीचा खंबीरपणे धिक्कार करून आपल्याला “विश्‍वासात दृढ” करण्यासाठी यहोवाच्या सर्व तरतुदींचा पुरेपूर फायदा घेण्याद्वारे.—१ पेत्र ५:८-१०.

अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित वैयक्‍तिक आध्यात्मिक आहार घेणे. याआधी उल्लेख केलेले लेखक विनगेट म्हणतात: “आपण विश्रांती घेत असतो तेव्हा देखील शरीरातील रासायनिक प्रक्रिया आणि मुख्य इंद्रियांचे कार्य सुरू राहण्यासाठी ऊर्जेचा सतत पुरवठा आवश्‍यक असतो; तसेच अनेक उतींचे देखील सतत नविनीकरण होणे आवश्‍यक असते.” आध्यात्मिक आरोग्याच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. शरीराला अन्‍न न मिळाल्यास ज्याप्रमाणे माणसाचे आरोग्य हळूहळू खालावून शेवटी त्याचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे सतत आध्यात्मिक आहार न घेतल्यास, आपला विश्‍वास हळूहळू कमकुवत होऊन शेवटी त्याचा पूर्णपणे नाश होऊ शकतो. हेच स्पष्ट करण्यासाठी येशूने असे म्हटले होते, की “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.”—मत्तय ४:४.

यावर जरा विचार करा. आपण मुळात दृढ विश्‍वास कशाप्रकारे संपादन केला? प्रेषित पौलाने लिहिले ‘विश्‍वास वार्तेने होतो.’ (रोमकर १०:१७) त्याच्या म्हणण्याचे तात्पर्य असे होते, की आपण यहोवावर, त्याच्या प्रतिज्ञांवर व त्याच्या संघटनेवर आपला विश्‍वास व भरवसा, त्याच्या वचनातील ज्ञान ग्रहण करण्याद्वारे दृढ केला. निश्‍चितच आपण जे काही ऐकले त्यावर अंधळेपणाने विश्‍वास ठेवला नाही. बिरुया शहरातील लोकांनी जे केले होते त्याप्रमाणेच आपणही केले. अर्थात, ‘या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी आपण शास्त्रात दररोज शोध करीत गेलो.’ (प्रेषितांची कृत्ये १७:११) आपण ‘देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घेतले’ आणि आपण ऐकलेल्या गोष्टी खऱ्‍या आहेत किंवा नाहीत याची पारख केली. (रोमकर १२:२; १ थेस्सलनीकाकर ५:२१) तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला हे अधिकाधिक स्पष्टपणे पाहायला मिळाले आहे की देवाचे वचन व त्याच्या प्रतिज्ञा कधीही खोट्या ठरत नाहीत आणि यामुळे आपल्या विश्‍वासाला साहजिकच पुष्टी मिळाली असेल.—यहोशवा २३:१४; यशया ५५:१०, ११.

आध्यात्मिकरित्या उपाशी राहू नका

पण आता आपल्यासमोर एक आव्हान आहे. अर्थात, आपण संपादन केलेला विश्‍वास टिकवून ठेवणे आणि यहोवावर व त्याच्या संघटनेवर असलेला आपला भरवसा कोणत्याही परिस्थितीत कमकुवत होऊ नये म्हणून आपल्या विश्‍वासासंबंधी सर्व प्रकारची अनिश्‍चितता टाळणे. हे करण्यासाठी आपण दररोज शास्त्रवचनांचे परीक्षण केले पाहिजे. प्रेषित पौलाने ताकीद दिली होती, की ‘पुढील काळी कित्येक लोक [ज्यांचा विश्‍वास सुरवातीला दृढ असल्याचे भासले असेल] भ्रष्ट होतील. ते खोटे बोलणाऱ्‍या माणसांच्या ढोंगाने, फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.’ (१ तीमथ्य ४:१, २) या फुसलावणाऱ्‍या शिकवणुकींमुळे काहींच्या मनात शंका उत्पन्‍न होतात आणि ते देवापासून दूर जातात. हे आपण कसे टाळू शकतो? ‘विश्‍वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला आपण अनुसरलो त्याच्या वचनांनी पोषण करून घेण्याद्वारे.’—१ तीमथ्य ४:६.

पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आज आध्यात्मिक अन्‍न इतके मुबलक असूनही काहीजण ‘विश्‍वासाच्या वचनांनी पोषण करून घेण्यास’ तयार नाहीत. नीतिसूत्रे पुस्तकाच्या एका लेखकाने सूचित केल्याप्रमाणे चांगले आध्यात्मिक अन्‍न, किंबहुना आध्यात्मिक मेजवानी आपल्यासमोर असूनही ते चांगले अन्‍न न खाणारे व न पचवणारे लोक आहेत.—नीतिसूत्रे १९:२४; २६:१५.

असे करणे त्यांच्यासाठी धोकेदायक ठरू शकते. लेखक विनगेट म्हणतात: “शरीर जेव्हा आपल्याच प्रथिनांचा वापर करण्यास सुरवात करते तेव्हा माणसाचे आरोग्य हळूहळू ढासळू लागते.” बऱ्‍याच काळापर्यंत उपासमार झाल्यास, तुमचे शरीर, शरीरात साठवून ठेवलेली पोषक तत्त्वे वापरण्यास सुरवात करते. ही साठवून ठेवलेली पोषक तत्त्वेही संपल्यावर, शरीराची वाढ होण्याकरता आणि उतींची डागडुजी करण्यासाठी आवश्‍यक असलेली प्रथिने झिजू लागतात. तुमच्या शरीरातील मुख्य इंद्रिये नष्ट होऊ लागतात. यानंतर तुमचे आरोग्य झपाट्याने ढासळते.

आरंभिक ख्रिस्ती मंडळीत काहींच्या बाबतीत आध्यात्मिकरित्या असेच घडले. आध्यात्मिक दृष्टीने त्यांनी, साठवून ठेवलेल्या पोषक तत्त्वांवर काम भागवण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांनी आपल्या वैयक्‍तिक अभ्यासाकडे दुर्लक्ष केले असेल; परिणामतः ते आध्यात्मिकरित्या कमजोर झाले. (इब्री लोकांस ५:१२) असे करणे किती धोक्याचे असू शकते याविषयी प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिले: “ऐकलल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ.” त्याला माहीत होते, की “एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास” आपण सहजासहजी वाईट सवयींकडे वाहवत जाऊ शकतो.—इब्री लोकांस २:१,.

विशेष म्हणजे, कुपोषित व्यक्‍ती नेहमीच आजारी किंवा अशक्‍त दिसत नाही. त्याचप्रकारे, एखादी व्यक्‍ती आध्यात्मिकरित्या कुपोषित आहे हे देखील लगेच दिसून येत नाही. नीट पोषण मिळत नसतानाही तुम्ही आध्यात्मिकरित्या अगदी ठीकठाक आहात असे भासू शकते—पण फार कमी काळ! काही काळाने तुम्ही निश्‍चितच आध्यात्मिकरित्या कमजोर व्हाल आणि निराधार शंकांचा प्रतिकार करण्यास व विश्‍वासाची लढाई लढण्यास असमर्थ ठराल. (यहुदा ३) इतर कोणालाही माहीत नसले तरीसुद्धा, तुमच्या वैयक्‍तिक आध्यात्मिक आहाराविषयी तुम्हाला निश्‍चितच माहीत असते.

तेव्हा आपला वैयक्‍तिक अभ्यास सुरू ठेवा. शंकांचा त्वेषाने प्रतिकार करा. साध्याशा वाटणाऱ्‍या संसर्गाकडे दुर्लक्ष करणे किंवा सतत अस्वस्थ करणाऱ्‍या शंका दूर करण्यासाठी काहीही न करणे जिवघेणे ठरू शकते. (२ करिंथकर ११:३) ‘आपण खरोखरच शेवटल्या काळात जगत आहोत का? बायबलमध्ये सांगितलेल्या सर्वच गोष्टींवर आपण विश्‍वास ठेवू शकतो का? ही खरोखरच यहोवाची संघटना आहे का?’ अशाचप्रकारच्या शंकांचे बीज सैतान तुमच्या मनात पेरू इच्छितो. तेव्हा, आध्यात्मिक आहार घेण्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या फसव्या शिकवणुकींना बळी पडू नका. (कलस्सैकर २:४-७) तीमथ्याला देण्यात आलेल्या सल्ल्याचे पालन करा. ‘पवित्र शास्त्राचा’ नेमाने अभ्यास करा. असे केल्यास ‘ज्या गोष्टी तुम्ही शिकलात व ज्यांविषयी तुमची खातरी झाली आहे त्या तुम्ही धरून राहू शकाल.’—२ तीमथ्य ३:१३-१५.

असे करण्यासाठी कदाचित तुम्हाला कोणाची मदत घ्यावी लागेल. आधी उल्लेख केलेल्या लेखकाने असे म्हटले: “पुरेशा काळापर्यंत उपासमार झाल्यानंतर आवश्‍यक जीवनसत्त्वे व इतर पोषक तत्त्वे न मिळाल्यामुळे शरीरातील पाचनसंस्था इतकी कमजोर होते की ती व्यक्‍ती सर्वसाधारण खाद्यपदार्थ देखील पचवू शकत नाही. या अवस्थेत काही काळ त्या व्यक्‍तीला अगदी सहज पचवता येतील असे हलके पदार्थ द्यावे लागतात.” उपासमारीमुळे शरीराला झालेली हानी भरून काढण्यासाठी खास काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे, ज्या व्यक्‍तीने बायबलच्या वैयक्‍तिक अभ्यासाकडे बराच काळ दुर्लक्ष केले असेल अशा व्यक्‍तीमध्ये आध्यात्मिक भूक पुन्हा निर्माण करण्यासाठी तिला कदाचित बरीच मदत व प्रोत्साहन द्यावे लागेल. तुमची अशी स्थिती झाली असेल तर आपले आध्यात्मिक आरोग्य व शक्‍ती पुन्हा मिळवण्यासाठी मदत मागा आणि जी काही मदत दिली जाईल तिचा आनंदाने स्वीकार करा.—याकोब ५:१४, १५.

‘अविश्‍वासामुळे डळमळू नका’

अब्राहामाच्या परिस्थितीचा विचार केल्यावर काही जणांना कदाचित असे वाटेल, की यहोवाच्या प्रतिज्ञेवर त्याने शंका घेणे साहजिक होते. देवाने प्रतिज्ञा दिली असली तरीसुद्धा ‘[अब्राहामने] बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नव्हती;’ असा निष्कर्ष काढणे कदाचित अगदी रास्त आहे असे वाटेल. का? कारण, पूर्णपणे मानवी दृष्टीकोनाने विचार केल्यास, त्याची परिस्थिती फारशी आशादायक नव्हतीच. “आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली,” असे बायबल सांगते. तरीसुद्धा त्याने देवाबद्दल व त्याच्या प्रतिज्ञांबद्दल आपल्या मनात व हृदयात शंका उत्पन्‍न होऊच दिल्या नाहीत. प्रेषित पौल लिहितो: ‘तो विश्‍वासाने दुर्बळ झाला नाही’ किंवा “अविश्‍वासामुळे डळमळला नाही.” “देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासहि समर्थ आहे अशी [अब्राहामाची] पक्की खातरी होती.” (रोमकर ४:१८-२१) त्याने अनेक वर्षांपासून यहोवासोबत एक मजबूत, घनिष्ट व भरवशाचा नातेसंबंध बांधला होता. त्या नातेसंबंधाला ज्यांमुळे तडा जाईल अशा कोणत्याही शंकांना त्याने कधीही थारा दिला नाही.

‘सुवचनांचा नमुना दृढपणे राखण्याद्वारे’ अर्थात उत्तम आध्यात्मिक आहार घेत राहण्याद्वारे तुम्ही देखील अब्राहामाचे अनुकरण करू शकता. (२ तीमथ्य १:१३) शंकांच्या धोक्याकडे दुर्लक्ष करू नका. सैतान आज आपल्यावर आध्यात्मिक जिवाणू शस्त्रांचा हल्ला करत आहे. बायबलच्या वैयक्‍तिक अभ्यासाद्वारे आणि ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहण्याद्वारे उत्तम आध्यात्मिक आहार घेण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्ही हे हल्ले स्वतःहून ओढवून घ्याल. तेव्हा, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने पुरवल्या जाणाऱ्‍या समयोचित आणि विपुल आध्यात्मिक अन्‍नाचा पुरेपूर फायदा करून घ्या. (मत्तय २४:४५) “सुवचने” सदोदीत ‘मान्य करीत राहा,’ आणि पर्यायाने ‘विश्‍वासात दृढ [निरोगी]’ राहा. (१ तीमथ्य ६:३; तीत २:२) शंकांमुळे आपला विश्‍वास कमकुवत होऊ देऊ नका.

[२१ पानांवरील चित्रे]

तुम्ही उत्तम आध्यात्मिक आहार घेत आहात का?