व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ओरिजेन याच्या शिकवणींचा चर्चवर प्रभाव कसा पडला?

ओरिजेन याच्या शिकवणींचा चर्चवर प्रभाव कसा पडला?

ओरिजेन याच्या शिकवणींचा चर्चवर प्रभाव कसा पडला?

“प्रेषितांनंतर चर्चचा सर्वात महान गुरू.” या शब्दात, लॅटिन व्हल्गेट बायबलचे भाषांतर करणाऱ्‍या जेरोमने तिसऱ्‍या शतकातील वेदान्तीचे अर्थात ओरिजेनचे कौतुक केले. परंतु ओरिजेनविषयी सर्वांच्याच तोंडून असे कौतुकास्पद शब्द निघाले नाहीत. काहींना ओरिजेन, पाखंड्यांचा जनक वाटत होता. १७ व्या शतकातील एका लेखकानुसार ओरिजेनच्या टीकाकारांनी असे म्हटले: “त्याच्या बहुतेक शिकवणी विचित्र आणि हानीकारक आहेत. त्या सर्पाच्या विषाप्रमाणे आहेत ज्या त्याने संपूर्ण जगात ओकल्या आहेत.” खरे तर, ओरिजेनचा मृत्यू झाल्यावर सुमारे तीन शतकांनंतर त्याला पाखंडी म्हणून घोषित करण्यात आले.

लोकांनी ओरिजेनचे कौतुकही केले आणि त्याचा द्वेषही केला. असे का? चर्च शिकवणींच्या विकासावर त्याचा किती प्रमाणावर प्रभाव पडला होता?

चर्चसाठी आवेशी

अलेक्झॅन्ड्रियाच्या ईजिप्शियन शहरात सा.यु. १८५ च्या सुमारास ओरिजेनचा जन्म झाला होता. ग्रीक साहित्याचा त्याने पुष्कळ अभ्यास केला होता. पण त्याचे वडील लिओनायडस यांनी जबरदस्तीने त्याला बायबलचाही तितकाच अभ्यास करायला लावला. ओरिजेन १७ वर्षांचा होता तेव्हा रोमी सम्राटाने एक हुकूम जारी करून धर्म बदलणे हा एक गुन्हा ठरवला. ओरिजेनचे वडील ख्रिस्ती झाल्यामुळे त्यांना तुरूंगात टाकण्यात आले. तारुण्याचा आवेश असलेल्या ओरिजेननेही आपल्या वडिलांबरोबर तुरुंगात जाऊन हुतात्मा व्हायचे ठरवले. हे पाहून त्याची आई घाबरली. तो घराबाहेर पडू नये या उद्देशाने तिने त्याचे कपडे लपवून ठेवले. ओरिजेनने आपल्या पित्याला एका पत्रात अशी विनंती केली: “आमचा विचार करून तुम्ही तुमचे मन मुळीच बदलू नका.” लिओनायडस ठाम राहिले. त्यांना मरणदंडाची शिक्षा झाली. कुटुंबावरून पित्याचे छत्र नाहीसे झाले. पण या वेळेपर्यंत ओरिजेनने आपल्या अभ्यासात बरीच प्रगती केल्यामुळे ग्रीक साहित्याच्या शिकवणी देऊन तो आपल्या आईचे आणि त्याच्या पाठच्या सहा लहान भावांचे पालनपोषण करू शकला.

ख्रिस्ती धर्माचे नामोनिशाण मिटवण्याचा रोमी सम्राटाचा हेतू होता. त्याने काढलेल्या हुकूमाचा रोख फक्‍त विद्यार्थ्यांवरच नव्हे तर शिक्षकांवरही असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचे सर्व शिक्षक अलेक्झॅन्ड्रियातून पळून गेले. ख्रिस्ती नसलेली मुले जेव्हा तरुण ओरिजेनकडे शास्त्रवचनांच्या शिकवणीसाठी येऊ लागली तेव्हा त्याने त्यांना, हे देवाने दिलेले काम आहे असे समजून शिकवणी दिल्या. त्याच्या अनेक विद्यार्थ्यांना हुतात्मिक मरण आले; यांतील काही विद्यार्थ्यांचे तर शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. ओरिजेन स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून न्यायाधिशासमोर असलेल्या, तुरुंगात असलेल्या अथवा मृत्यूदंड मिळण्याच्या बेतात असलेल्या विद्यार्थ्यांना खुले आम उत्तेजन देत असे. चवथ्या शतकातील इतिहासकार युसिबियसने असा अहवाल दिला की त्याच्या विद्यार्थ्यांना मृत्यूदंड देण्यासाठी नेले जात असताना ओरिजेन “धैर्याने त्यांचे चुंबन घेऊन सलामी देत असे.”

ओरिजेनने ख्रिस्ती नसलेल्या अनेकांचा रोष ओढवून घेतला. ते त्याला त्यांच्या मित्रांच्या धर्मपरिवर्तनासाठी व मृत्यूसाठी जबाबदार धरत होते. लोकांचा जमाव त्याच्यावर हल्ला करायला आला तेव्हा पुष्कळदा तो त्यांच्या हातून आणि एकदा तर मृत्यूच्या तावडीतूनही सुटला. त्याचा पाठलाग करणाऱ्‍यांपासून जीव वाचवण्यासाठी तो कधीच एका ठिकाणी नव्हता तरीपण त्याच्या शिकवण्याचे काम त्याने चालूच ठेवले. ओरिजेनची निर्भीड मनोवृत्ती आणि समर्पण पाहून अलेक्झॅन्ड्रियाचा बिशप डिमिट्रियस खूप प्रभावीत झाला. म्हणूनच, अवघ्या १८ वर्षांच्या ओरिजेनला त्याने अलेक्झॅन्ड्रियात धार्मिक प्रशिक्षण शाळेत प्रमुख म्हणून नियुक्‍त केले.

कालांतराने, ओरिजेन एक प्रसिद्ध विद्वान बनला व त्याने अनेक विषयांवर उदंड लेखन केले. काहींच्या मते, त्याने ६,००० पुस्तके लिहिले; ही कदाचित अतिशयोक्‍ती असावी. हेक्झॅप्ला नावाचे त्याचे पुस्तक सर्वात जास्त प्रसिद्ध होते. इब्री शास्त्रवचनांची ही ५० खंडांची प्रचंड मोठी आवृत्ती आहे. ओरिजेनने सहा रकान्यांत हेक्झॅप्लाची मांडणी केली: (१) इब्री आणि अरेमिक शास्त्रवचने, (२) ग्रीक लिपीत हीच शास्त्रवचने, (३) अक्वीलाचे ग्रीक भाषांतर, (४) सिमकसचे ग्रीक भाषांतर, (५) इब्री वचनांशी होता होईल तितके मिळतेजुळते करण्याकरता ओरिजेनने पुनरावृत्ती केलेले ग्रीक सेप्टुआजिंट आणि (६) थिओडोशनचे ग्रीक भाषांतर. बायबल विद्वान जॉन हॉर्ट यांनी लिहिले: “या सहा खंडांद्वारे ओरिजेनने बायबलच्या अनेक उताऱ्‍यांचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण एखाद्या ग्रीक मनुष्याकडे फक्‍त सेप्टुआजिंट असते तर तो एकतर गोंधळून गेला असता नाहीतर त्याने चुकीचा अर्थ लावला असता.”

‘शास्त्रलेखापलीकडे जाणे’

पण, तिसऱ्‍या शतकातील संभ्रमित धार्मिक वातावरणाचा, ओरिजेनच्या बायबल शिकवण्याच्या पद्धतीवर गहिरा प्रभाव पडला. ख्रिस्ती धर्मजगताची तेव्हा नुकतीच सुरवात झाली होती तरीपण ते अनेक अशास्त्रवचनीय विश्‍वासांनी भ्रष्ट झाले होते आणि ठिकठिकाणी विखुरलेल्या त्याच्या चर्चेसमध्ये पुष्कळ वेगवेगळ्या शिकवणी दिल्या जात होत्या.

यांतल्या काही अशास्त्रवचनीय शिकवणी प्रेषितांच्या आहेत असे समजून ओरिजेनने त्या स्वीकारल्या. पण इतर गोष्टींच्या बाबतीत त्याने अनेक प्रश्‍न विचारले. त्याच्या अनेक विद्यार्थ्यांना त्या काळातील तत्त्वज्ञानी विषयांविरुद्ध लढा द्यावा लागत होता. त्यांना मदत करण्याच्या हेतूने, ओरिजेनने त्याच्या विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनांना आकार देणाऱ्‍या तत्त्वज्ञानाच्या अनेक पंथांचा कसून अभ्यास केला. तत्त्वज्ञानाविषयी त्यांच्या मनात असलेल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देण्याचा ओरिजेनने प्रयत्न केला.

बायबल आणि तत्त्वज्ञानाचा मिलाफ करण्याच्या प्रयत्नात, ओरिजेनने शास्त्रवचने समजून सांगण्यासाठी रूपकात्मक पद्धतीचा उपयोग केला. शास्त्रवचनांचा आध्यात्मिक अर्थ असतो यात शंका नाही पण शब्दशः अर्थ असतोच असे नाही असे तो गृहीत धरत होता. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे, यामुळे ओरिजेन, “त्याच्या स्वतःच्या तात्त्विक शिकवणीला जुळणाऱ्‍या अशास्त्रीय कल्पनांनुसार बायबलचा अर्थ लावू शकला. पण तो असा दावा करत होता (आणि त्याला असे अगदी प्रामाणिकपणे वाटत होते) की, तो बायबलचा फार आवेशाने आणि विश्‍वासूपणे अर्थ सांगणारा होता.”

ओरिजेनने आपल्या एका विद्यार्थ्याला लिहिलेल्या पत्रातून आपल्याला त्याची विचारसरणी कळू शकते. ओरिजेनने म्हटले की, इस्राएली लोकांनी ईजिप्त येथून आणलेल्या सोन्यातून यहोवाच्या मंदिराकरता पात्र बनवले. यामध्ये त्याला ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आधारे ख्रिस्ती विश्‍वास शिकवण्यासाठी रूपकात्मक आधार मिळाला. ग्रीक तत्त्वज्ञानाद्वारे त्याने ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्याचा प्रयत्न केला. त्याने लिहिले: “ईजिप्तहून आणलेल्या वस्तू इस्राएलच्या पुत्रांना कितीतरी उपयोगी पडल्या. ईजिप्तच्या लोकांनी या वस्तुंचा योग्य उपयोग केला नव्हता. पण इब्री लोकांनी देवाच्या बुद्धीच्या मार्गदर्शनानुसार त्या वस्तुंचा देवाच्या सेवेसाठी उपयोग केला.” अशाप्रकारे, ओरिजेनने त्याच्या विद्यार्थ्यांना “अभ्यासाचा विषय म्हणून किंवा ख्रिस्ती विश्‍वासासाठी तयारी म्हणून ग्रीक तत्त्वज्ञानातून काही गोष्टी घ्यायचे” उत्तेजन दिले.

अशातऱ्‍हेने, बायबलचा मनाला वाटेल तसा अर्थ लावल्यामुळे बायबलमधील ख्रिस्ती शिकवणी आणि ग्रीक तत्त्वज्ञान यातील फरक दिसेनासा झाला. उदाहरणार्थ, ऑन फर्स्ट प्रिन्सिपल्स असे शीर्षक असलेल्या पुस्तकात ओरिजेनने येशू ख्रिस्ताचे वर्णन ‘एकुलता एक पुत्र, जो जन्मास आला पण त्याला सुरवात नव्हती,’ असे केले. त्याने पुढे म्हटले: ‘त्याची उत्पत्ती सनातन व अनंतकालाची आहे. जीवनाचा श्‍वास मिळाल्यामुळे तो पुत्र बनवण्यात आला नाही किंवा कोणत्याही बाह्‍य कृतीमुळे नाही तर देवाचाच तो एक भाग आहे.’

ओरिजेननी दिलेली ही शिकवण बायबलमध्ये नाही. कारण शास्त्रवचनांमध्ये अशी शिकवण आहे, की यहोवाचा एकुलता एक पुत्र “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” व “देवाच्या सृष्टीचे आदिकरण” आहे. (कलस्सैकर १:१५; प्रकटीकरण ३:१४) धर्माचे इतिहासकार ऑगस्टस निॲन्डर यांच्या मते, “प्लॅटोनिक पंथातील तत्त्वज्ञानाच्या शिक्षणावरून” ओरिजेनने “सनातन उत्पत्ती” ही कल्पना सुरू केली. अशाप्रकारे, ओरिजेनने “शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये” या शास्त्रवचनांतील मूळ तत्त्वाचाच भंग केला.—१ करिंथकर ४:६.

पाखंडी म्हणून धिक्कारलेला

शिक्षक होऊन त्याला जास्त दिवस झाले नव्हते तोच अलेक्झॅन्ड्रियाच्या एका धर्मसभेत ओरिजेननकडून त्याचे पाळकपद काढून घेण्यात आले. कदाचित, बिशप डिमिट्रियसला ओरिजेनची प्रसिद्धी होत असलेली खपत नव्हती. ओरिजेन पॅलेस्टाईनला गेला. ख्रिस्ती विश्‍वासाचा प्रसिद्ध समर्थक म्हणून लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. तेथे तो पाळक म्हणून काम करू लागला. खरे तर, पूर्वेत जेव्हा काही पाळक “पाखंडी” बनले तेव्हा चूक करणाऱ्‍या पाळकांना पुन्हा कर्मठवादाकडे आणण्यासाठी ओरिजेनची मदत घेतली जात असे. सा.यु. २५४ मध्ये ओरिजेनचा मृत्यू झाल्यानंतर विशेषकरून त्याच्या नावाबद्दल मोठे वादळ उठले. का?

नाममात्र ख्रिस्ती धर्म नावारूपास आल्यानंतर, चर्चने स्वीकारलेली कर्मठ शिकवण आणखी काटेकोर करण्यात आली. म्हणून पुढील वेदान्तींनी ओरिजेनची अनेक काल्पनिक व कधीकधी अस्पष्ट तात्त्विक मते स्वीकारली नाहीत. त्याच्या शिकवणींमुळे चर्चमध्ये बरेच कटू वादविवाद झाले. हे वाद मिटवण्यासाठी व ऐक्य टिकवण्यासाठी चर्चने रीतसर ओरिजेनला पाखंडी घोषित केले.

अशा चुका करण्यात ओरिजेन एकटाच नव्हता. खरे तर, ख्रिस्ताच्या शुद्ध शिकवणींपासून लोक दूर जातील याविषयी बायबलमध्ये आधीच भाकीत केले होते. हा धर्मत्याग, येशूच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर म्हणजे पहिल्या शतकाच्या शेवटी वाढू लागला. (२ थेस्सलनीकाकर २:६, ७) काही काळानंतर, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या काहींनी स्वतःला “कर्मठ” आणि इतर सर्वांना “पाखंडी” घोषित केले. पण वस्तुस्थिती अशी होती, की ख्रिस्ती धर्मजगतच खऱ्‍या ख्रिस्ती धर्मापासून खूप दूर गेले होते.

“जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले”

ओरिजेनने अनेक काल्पनिक गोष्टी रचल्या असल्या तरी, त्या पुस्तकात काही फायद्याच्या गोष्टी देखील आहेत. जसे की, हेक्झॅप्लामध्ये टेट्राग्रमॅटन अर्थात मूळ इब्री भाषेतील चार वर्णांचे देवाचे नाव जसे का तसेच ठेवण्यात आले. यावरून हा महत्त्वाचा पुरावा मिळतो, की आरंभीच्या ख्रिश्‍चनांना यहोवा हे देवाचे व्यक्‍तिगत नाव माहीत होते आणि ते त्या नावाचा उपयोगही करीत होते. तरीपण, पाचव्या शतकातील थिओफलस या चर्च कुलपित्याने एकदा अशी ताकीद दिली: “ओरिजेनची पुस्तके, कुरणासारखी आहेत ज्यामध्ये विविध फुले आहेत. मला एखादे सुंदर फूल दिसले की मी ते तोडतो; पण मला काहीतरी काटेरी दिसले की ते टोचेल म्हणून मी त्यापासून दूर राहतो.”

बायबल शिकवणींमध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाचे मिश्रण केल्यामुळे ओरिजेनच्या वेदान्तात चुकाच चुका झाल्या. ख्रिस्ती धर्मजगताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागले. उदाहरणार्थ, ओरिजेनच्या अनेक काल्पनिक शिकवणी कालांतराने नाकारण्यात आल्या असल्या तरीसुद्धा, ख्रिस्ताच्या “चिरकालिक संततीची” शिकवण त्रैक्याच्या अशास्त्रीय शिकवणीचा पाया ठरली. पहिल्या तीन शतकांतले चर्च (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “[ओरिजेनने सुरवात केलेल्या] तत्त्वज्ञानाची आवड इतक्या लवकर नाहीशी होणार नव्हती.” याचा परिणाम काय झाला? “ख्रिस्ती विश्‍वासाचा साधेपणा बिघडवून टाकण्यात आला आणि चर्चमध्ये अगणित चुकीच्या शिकवणी शिरल्या.”

ओरिजेन, प्रेषित पौलाच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन “अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर” जाऊन या धर्मत्यागात भर घालायचे टाळू शकला असता. पण, अशा विरोधी ‘विद्येवर’ आधारित पुष्कळशा शिकवणी देऊन तो “विश्‍वासापासून ढळला.”—१ तीमथ्य ६:२०, २१; कलस्सैकर २:८.

[३१ पानांवरील चित्र]

ओरिजेनच्या हेक्झॅप्लावरून दिसून येते की, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये देवाच्या नावाचा उपयोग केला होता

[चित्राचे श्रेय]

Published by permission of the Syndics of Cambridge University Library, T-S १२.१८२

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

Culver Pictures