व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा!

कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा!

कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा!

“पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”मत्तय ९:३७, ३८.

१. देवाची इच्छा करत राहण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळते?

 ज्या दिवशी आपला बाप्तिस्मा झाला व आपण यहोवाचे सेवक बनलो तो दिवस, मग तो अनेक वर्षांआधीचा असो वा अलीकडचा, पुष्कळांना तो कालच्यासारखाच भासत असेल. त्या दिवसानंतर यहोवाची स्तुती करणे हे आपल्या समर्पित जीवनातले सर्वात महत्त्वाचे काम बनले. इतरांना राज्य संदेश ऐकण्यास आणि स्वीकारण्यास मदत करण्यासाठी आपण वेळ विकत घेत होतो आणि यहोवाच्या आनंदी सेवेत तल्लीन झालो होतो. (इफिसकर ५:१५, १६) आजही, आपण “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” किंवा व्यस्त राहतो तेव्हा वेळ कसा निघून जातो हे आपल्याला कळत देखील नाही. (१ करिंथकर १५:५८) आपल्यासमोर समस्या आल्या तरीसुद्धा, यहोवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे मिळणारा आनंद आपल्याला अधिकाधिक कार्य करत राहण्याचे प्रोत्साहन देतो.—नहेम्या ८:१०.

२. लाक्षणिक कापणीच्या कार्यात आपल्याला कोणत्या कारणांमुळे आनंद मिळतो?

ख्रिस्ती या नात्याने आपण लाक्षणिक कापणीचे कार्य करत आहोत. येशू ख्रिस्ताने सार्वकालिक जीवनाकरता लोकांना एकत्रित करण्याच्या कार्याची तुलना कापणीशी केली. (योहान ४:३५-३८) प्रारंभिक ख्रिस्ती कामकऱ्‍यांनी हे कापणीचे काम कशाप्रकारे आनंदाने केले याचे परीक्षण केल्यामुळे आपल्याला या कार्यात सहभागी होताना खूप प्रोत्साहन मिळू शकेल. यासाठी आपण आज सुरू असलेल्या कापणीच्या कार्यात आनंद देणाऱ्‍या तीन कारणांवर विचार करू या. ही कारणे आहेत, (१) आपला आशादायक संदेश, (२) आपल्याला मिळणारे यश, आणि (३) कापणीचे कामकरी या नात्याने आपली शांतीदायक मनोवृत्ती.

कापणीच्या कामकऱ्‍यांना पाठवले जाते

३. येशूच्या आरंभीच्या अनुयायांना कोणता आनंद अनुभवायला मिळाला?

पुनरुत्थित ख्रिस्ताला गालीलातील एका डोंगरावर भेटायला गेलेल्या कापणीच्या आरंभिक कामकऱ्‍यांचे जीवन सा.यु. ३३ च्या त्या दिवशी खूप बदलले असेल. खासकरून येशूच्या ११ विश्‍वासू प्रेषितांचे. (मत्तय २८:१६) त्या प्रसंगी ‘पाचशेपेक्षा अधिक बंधू’ उपस्थित असावेत. (१ करिंथकर १५:६) येशूने त्यांना दिलेली आज्ञा कदाचित त्यांच्या कानांत घुमत असेल. त्याने त्यांना सांगितले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) ख्रिस्ताच्या अनुयायांना क्रूर छळाला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा कापणीच्या कार्यात त्यांना खूप आनंद मिळाला कारण एकापाठोपाठ एक ठिकाणी त्यांच्या मंडळ्या स्थापन होत गेल्या. कालांतराने “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत [सुवार्तेची] घोषणा झाली.”—कलस्सैकर १:२३; प्रेषितांची कृत्ये १:८; १६:५.

४. ख्रिस्ताच्या शिष्यांना पाठवण्यात आले तेव्हा कशी परिस्थिती होती?

गालीलातील सेवाकार्याच्या सुरवातीला, येशूने १२ प्रेषितांना बोलावून त्यांना अशी घोषणा करण्यासाठी पाठवले की: “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय १०:१-७) तो स्वतः देखील “त्यांच्या सभास्थानांत शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत [गालीलमधील] नगरांतून व गावांतून फिरत होता.” लोकांच्या जमावाला पाहून येशूला त्यांचा कळवळा आला “कारण मेंढपाळ नसलेल्या मेढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३५, ३६) लोकांना या अवस्थेत पाहून येशूवर इतका परिणाम झाला की त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने [यहोवा देवाने] आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३७, ३८) आपल्या सेवाकार्याचे केवळ सहा महिने उरलेले असताना, यहुदीयात, येशूने पुन्हा एकदा कापणीच्या कामकऱ्‍यांची गरज असल्याचे सांगितले. (लूक १०:२) या दोन्ही प्रसंगी त्याने आपल्या अनुयायांना कापणीचे कामकरी म्हणून पाठवले.—मत्तय १०:५; लूक १०:३.

आपला आशादायक संदेश

५. आपण कशाप्रकारचा संदेश घोषित करत आहोत?

आज आपण, अर्थात सध्याच्या काळातले यहोवाचे सेवक अधिक कापणीच्या कामकऱ्‍यांसाठी दिल्या जात असलेल्या हाकेला आनंदाने प्रतिसाद देतो. आपल्याला या कार्यात आनंद मिळतो, कारण आपण निराश व खिन्‍न लोकांजवळ एक आशादायक संदेश घेऊन जातो. येशूच्या पहिल्या शतकातील शिष्यांप्रमाणे, आपल्यालाही ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारख्या गांजलेल्या व पांगलेल्या’ लोकांकडे सुवार्ता, अर्थात खऱ्‍या आशेचा संदेश नेण्याचा बहुमान मिळाला आहे!

६. पहिल्या शतकात प्रेषित कोणत्या कार्यात सहभागी झाले?

पहिल्या शतकाच्या मध्यापर्यंत प्रेषित पौल देखील सुवार्तेच्या प्रचारकार्यात मग्न होता. त्याचे हे कापणीचे कार्य निश्‍चितच परिणामकारक ठरले कारण सा.यु. ५५ च्या सुमारास करिंथ येथील ख्रिश्‍चनांना लिहिताना त्याने म्हटले: “बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरहि राहत आहा . . . तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो.” (१ करिंथकर १५:१) प्रेषित आणि सुरवातीचे इतर ख्रिस्ती अतिशय कष्टाळुपणे कापणीचे काम करत होते. सा.यु. ७० साली जेरूसलेमचा नाश होईपर्यंत ज्या ज्या विलक्षण घटना घडल्या त्या पाहण्याकरता किती प्रेषित जिवंत होते याविषयी बायबल आपल्याला सांगत नाही. पण या घटनेच्या २५ वर्षांनंतरही प्रेषित योहान प्रचार कार्य करतच होता हे मात्र आपल्याला माहीत आहे.—प्रकटीकरण १:९.

७, ८. यहोवाचे साक्षीदार पूर्वीपेक्षा अधिक तातडीने कोणता आशादायक संदेश घोषित करत आहेत?

यानंतर कित्येक शतकांपर्यंत ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाचे अर्थात, ‘अनीतिमान पुरुषाचे” प्रभुत्व राहिले. (२ थेस्सलनीकाकर २:३) १९ वे शतक संपत आले होते तेव्हा मात्र ज्यांनी सुरवातीच्या ख्रिस्ती धर्मानुसार जगण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुवार्तेच्या आशादायक संदेशाचा व राज्याचा प्रचार सुरू केला. किंबहुना या नियतकालिकाच्या पहिल्या अंकापासूनच (जुलै १८७९) याच्या शीर्षकात “ख्रिस्ताच्या उपस्थितीचा घोषक,” “ख्रिस्ताच्या राज्याचा घोषक” किंवा “यहोवाच्या राज्याचा प्रकाशक” हे शब्द पाहायला मिळतात.

देवाचे स्वर्गीय राज्य १९१४ साली येशू ख्रिस्ताच्या हाती देण्यात आले आणि आज आपण या राज्याचा आशादायक संदेश तातडीने सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करत आहोत. का? कारण या राज्याकरवी मिळणाऱ्‍या आशीर्वादांपैकी एक म्हणजे सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश फार लवकर घडून येईल. (दानीएल २:४४) यापेक्षा चांगला संदेश आणखी कोणता असू शकतो? आणि “मोठे संकट” सुरू होण्याआधी राज्याची घोषणा करण्यापेक्षा अधिक आनंद आपल्याला आणखी कोणत्या कार्यात मिळू शकतो?—मत्तय २४:२१; मार्क १३:१०.

यशस्वी शोधकार्य

९. येशूने आपल्या शिष्यांना कोणती सूचना दिली आणि लोकांनी राज्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला?

आपले कापणीचे कार्य आणखी एका कारणामुळे आनंददायक ठरते, ते म्हणजे आपल्याला नवीन शिष्य शोधण्यात मिळणारे यश. कालांतराने हे शिष्य देखील आपल्यासोबत कापणीच्या कार्यात सहभागी होतात. सा.यु. ३१-३२ मध्ये, येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “ज्या ज्या नगरांत किंवा गावांत तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा.” (मत्तय १०:११) सगळेचजण योग्य नव्हते हे राज्य संदेशाला त्यांनी दाखवलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट दिसून यायचे. तरीसुद्धा येशूच्या शिष्यांनी जेथे कोठे लोक सापडतील तेथे सुवार्तेची आवेशाने घोषणा केली.

१०. पौलाने योग्य जणांचा शोध कसा घेतला?

१० येशूच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर, योग्य असलेल्यांचा शोध अद्यापही उत्साहीपणे केला जात होता. पौलाने यहुद्यांच्या सभास्थानात आणि अथेन्स शहरातील बाजारपेठेत भेटणाऱ्‍या लोकांसोबत शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद केला. याच शहरात जेव्हा त्याने एरिओपेगस येथे साक्ष दिली तेव्हा “काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्‍वास ठेवला; त्यात दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.” शिवाय पौल जेथे कोठे जायचा तेथे “चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात” त्याने उत्तम आदर्श मांडला.—प्रेषितांची कृत्ये १७:१७, ३४; २०:२०.

११. सेवाकार्य पार पाडण्यासाठी अनेक वर्षांआधी कोणत्या पद्धतींचा अवलंब केला जायचा?

११ एकोणीसाव्या शतकाच्या शेवटल्या काही दशकांत अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी योग्य जनांना शोधण्याच्या कार्यात मोठ्या निर्भयपणे सहभाग घेतला. झायन्स वॉचटावरच्या जुलै/ऑगस्ट १८८१ अंकात “प्रचार करण्याकरता अभिषिक्‍त” या शीर्षकाखालील लेखात असे म्हटले होते: “जे ऐकण्यास तयार आहेत, जे ऐकू शकतात अशा ‘नम्र जनांना’ सुवार्तेचा प्रचार केला जात आहे जेणेकरून त्यांच्यातूनच ख्रिस्ताचे शरीर, अर्थात त्याचे सहवारसदार निवडले जावेत.” देवाच्या कापणीच्या कार्यात सहभागी होणाऱ्‍यांना सहसा चर्चनंतर लोक बाहेर पडताना भेटायचे व योग्य जनांना अनुकूल प्रतिक्रिया दाखवता यावी म्हणून ते त्यांना शास्त्रवचनीय संदेशाच्या हस्तपत्रिका द्यायचे. साक्षकार्याची ही पद्धत कितपत परिणामकारक आहे याचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर टेहळणी बुरूज (इंग्रजी) मे १५, १९०३ या अंकात कामकऱ्‍यांना “रविवारी सकाळी घरोघरी जाऊन” हस्तपत्रिका वाटप करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले.

१२. आपण प्रचार कार्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी काय केले आहे? उदाहरण देऊन सांगा.

१२ अलीकडच्या वर्षांत, आपण लोकांच्या घरीच नव्हे तर इतर ठिकाणीही त्यांची भेट घेण्याद्वारे आपल्या सेवाकार्यात विस्तार केला आहे. काही देशांतील आर्थिक परिस्थितीमुळे किंवा सुटीच्या वेळी लोक आपल्याला विशिष्ट वेळी घरी सापडत नाहीत. अशा क्षेत्रांत इतर ठिकाणी लोकांची भेट घेणे अतिशय परिणामकारक ठरले आहे. इंग्लंडमध्ये एका साक्षीदार बहिणीला व तिच्यासोबत कार्य करणाऱ्‍या बहिणीला, दिवसभर समुद्रकिनाऱ्‍यावर मौजमजा करून बसने परतणारे अनेक पर्यटक नेहमी दिसायचे. त्यांनी मनाशी निश्‍चय केला आणि धैर्याने बसेसमध्ये जाऊन प्रवाशांना टेहळणी बुरूजसावध राहा! नियतकालिके दाखवली. एका महिन्यात त्यांनी २२९ अंक दिले. त्या सांगतात: “आम्हाला समुद्रकिनाऱ्‍यावर किंवा व्यापार क्षेत्रात प्रचार करणे किंवा इतर कोणत्याही आव्हानाची भीती वाटत नाही कारण आम्हाला माहीत आहे की यहोवा नेहमी आमच्या पाठीशी असतो.” त्यांनी एक मॅगझीन रूट आणि एक बायबल अभ्यास देखील सुरू केला आहे आणि त्या दोघींनी सहायक पायनियर सेवेत सहभाग घेतला आहे.

१३. काही ठिकाणी आपल्या सेवाकार्यात कोणत्या प्रकारचे फेरबदल करणे आवश्‍यक झाले आहे?

१३ योग्य जनांचा शोध घेणे अद्यापही सुरू आहे. त्यामुळे आपल्या सेवाकार्याच्या काही बाबींसंबंधी नीट पुनर्विचार करणे आवश्‍यक आहे. बरेच साक्षीदार नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी घरोघरच्या प्रचार कार्यात सहभागी होत आले आहेत, पण काही क्षेत्रांत त्यांना असे आढळले की लोकांच्या घरी सकाळी लवकर गेल्यामुळे तितके चांगले परिणाम मिळत नाहीत कारण तेव्हा घरचे लोक अजूनही झोपेतून उठलेले नसतील. पण आपल्या वेळेत थोडा फेरबदल करून बरेच साक्षीदार आता सकाळच्या ऐवजी इतर वेळी प्रचार कार्याला जातात, उदाहरणार्थ ख्रिस्ती सभांनंतर. आणि त्यांचा हा शोध अतिशय फलदायी ठरला आहे. मागच्या वर्षी राज्य प्रचारकांच्या संख्येत सबंध जगात २.३ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे पिकाच्या धन्याला गौरव मिळते आणि आपल्याला मनापासून आनंद वाटतो.

कापणीच्या कार्यात शांती टिकवून ठेवा

१४. आपण आपला संदेश सादर करताना कशाप्रकारची मनोवृत्ती बाळगतो आणि का?

१४ आपल्याला आनंद मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे कापणीच्या कार्यात आपण शांतीदायक मनोवृत्ती दाखवतो. येशूने म्हटले: “घरात जाताना, तुम्हाला शांति असो, असे म्हणा; ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांति तुम्हाकडे परत येवो.” (मत्तय १०:१२, १३) हे मूळ इब्री भाषेतील अभिवादन आणि त्यासाठी बायबलमध्ये वापरलेली ग्रीक संज्ञा, “तुमचे भले होवो” या अर्थाची आहे. आज आपण प्रचार करायला लोकांकडे जातो तेव्हा याच भावनेने आपण त्यांना भेटले पाहिजे. आपल्याला हीच आशा असते की त्यांनी राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद द्यावा. जे चांगला प्रतिसाद देतात, त्यांना आपल्या पापांविषयी पश्‍चात्ताप करून, त्यांपासून मागे फिरून देवाची इच्छा करण्याद्वारे त्याच्यासोबत समेट करण्याची संधी आहे. आणि देवासोबत शांतीचे संबंध जोडणाऱ्‍या व्यक्‍तीला सार्वकालिक जीवन मिळेल.—योहान १७:३; प्रेषितांची कृत्ये ३:१९; १३:३८, ४८; २ करिंथकर ५:१८-२०.

१५. आपल्याला आपल्या प्रचार कार्यात प्रतिकूल प्रतिसाद मिळाला तरीसुद्धा आपण शांतीपूर्ण मनोवृत्ती कशी टिकवून ठेवू शकतो?

१५ आपल्याला अनुकूल प्रतिसाद मिळत नाही तेव्हा देखील आपण आपली शांती कशी टिकवून ठेवू शकतो? येशूने शिष्यांना अशी सूचना दिली: “ते [घर] योग्य नसले तर तुमची शांति तुम्हाकडे परत येवो.” (मत्तय १०:१३) ७० शिष्यांना प्रचाराकरता पाठवण्याविषयीच्या लूकच्या वृत्तान्तात येशूचे हे विधान आपल्याला आढळते: “तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांति त्याच्यावर राहील; नसला तर तुम्हाकडे ती परत येईल.” (लूक १०:६) आपण सुवार्ता घेऊन लोकांची भेट घेतो त्याअर्थी आपण साहजिकच आनंदी भावनेने आणि शांतीपूर्ण मनोवृत्तीने त्यांच्याशी बोलतो. कोणी आपल्या संदेशाची दखल घेतली नाही, किंवा आपल्याविषयी तक्रार केली किंवा रागाने आपल्याशी बोलले तर आपला शांतीदायक संदेश ‘आपल्याकडे परत येतो’. पण यापैकी कोणत्याही प्रतिक्रियेमुळे आपली शांती कमी होत नाही कारण यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या फळात तिचा समावेश होतो.—गलतीकर ५:२२, २३.

कापणीच्या कामकऱ्‍यांनी ठेवण्याजोगे उत्तम ध्येय

१६, १७. (अ) पुनर्भेटी करताना आपले ध्येय काय असते? (ब) ज्यांना बायबलसंबंधी प्रश्‍न आहेत, त्यांना आपण कशी मदत करू शकतो?

१६ कापणीच्या कार्यात सहभागी होण्याद्वारे सार्वकालिक जीवनाकरता लोकांना एकत्रित करण्यात आपल्याला आनंद वाटतो. आणि जेव्हा आपण प्रचार केलेली एखादी व्यक्‍ती चांगला प्रतिसाद देते, अधिक शिकून घेण्याची इच्छा व्यक्‍त करते आणि “शांतिप्रिय” असल्याचे दाखवून देते तेव्हा तर आपल्याला अवर्णनीय आनंद होतो! कदाचित या व्यक्‍तीला बायबलविषयी असंख्य प्रश्‍न असतील आणि एका भेटीत त्या सर्व प्रश्‍नांचे उत्तर देणे अशक्य असते. पहिल्या भेटीत त्या व्यक्‍तीचा खूप वेळ घेणे योग्य नाही. मग आपण काय करू शकतो? या संदर्भात जवळजवळ ६० वर्षांआधी सुचवलेले एक ध्येय ठेवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो.

१७ “सर्व यहोवाच्या साक्षीदारांनी आदर्श बायबल अभ्यास चालवण्यास तयार असले पाहिजे.” हे विधान १९३७ पासून १९४१ पर्यंत आदर्श अभ्यास (इंग्रजी) नावाच्या मार्गदर्शक पुस्तिकांच्या मालिकेतील तिसऱ्‍या पुस्तिकेत होते. या पुस्तिकेत पुढे असे म्हटले होते: “सर्व [राज्य] प्रचारकांनी राज्याच्या संदेशाविषयी आस्था दाखवणाऱ्‍या चांगल्या मनोवृत्तीच्या लोकांना हरप्रकारे मदत करण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. या लोकांना पुनर्भेट देऊन त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्‍नांची उत्तरे दिली जावीत . . . आणि मग लवकरात लवकर . . . आदर्श बायबल अभ्यास सुरू करण्यात यावा.” होय, पुनर्भेटी देण्याचा आपला उद्देश गृह बायबल अभ्यास सुरू करून तो नियमितपणे चालवण्याचा आहे. * आस्था दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल मैत्रीची भावना आणि प्रेमळ काळजी बाळगल्यास आपल्याला अभ्यासाची चांगली तयारी करून जाण्याची आणि परिणामकारक पद्धतीने अभ्यास चालवण्याची आपोआपच प्रेरणा मिळेल.

१८. आपण नवीन लोकांना येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यास कशी मदत करू शकतो?

१८ सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाच्या आणि देव आपल्याकडून काय अपेक्षितो? यांसारख्या माहितीपत्रकाच्या साहाय्याने आपण परिणामकारक गृह बायबल अभ्यास चालवू शकतो आणि अशारितीने नव्यानेच आस्था दाखवू लागलेल्यांना शिष्य बनण्यास मदत करण्याच्या कार्यात सहभाग घेऊ शकतो. थोर शिक्षक येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्याचा आपण जसजसा प्रयत्न करू तसतसे बायबल विद्यार्थी देखील आपल्या शांतीपूर्ण, आनंदी मनोवृत्तीवरून, आपल्या प्रामाणिकतेवरून आणि यहोवाच्या नियमांबद्दल व सूचनांबद्दल आपल्या आदरावरून बरेच काही शिकतील. त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करताना, त्यांना कोणी हेच प्रश्‍न विचारल्यास कशी उत्तरे द्यावीत हे शिकवण्याचाही आपण शक्यतो प्रयत्न केला पाहिजे. (२ तीमथ्य २:१, २; १ पेत्र २:२१) लाक्षणिक कापणीचे कामकरी या नात्याने आपण आनंदी होऊ शकतो कारण मागच्या सेवा वर्षादरम्यान जगभरात सरासरी ४७,६६,६३१ गृह बायबल अभ्यास चालवण्यात आले. बायबल अभ्यास घेण्याच्या कार्यात आपण वैयक्‍तिक सहभाग घेतला असेल तर आपण अधिकच आनंदी होऊ शकतो.

कापणीच्या कार्यात सतत आनंदी राहा

१९. येशूच्या सेवाकार्यादरम्यान आणि काही काळानंतर, कापणीच्या कार्यात आनंद करण्याजोगी कोणकोणती कारणे होती?

१९ येशूच्या सेवाकार्यादरम्यान आणि त्यानंतर काही काळापर्यंत कापणीच्या कार्यात आनंद करण्याजोगी अनेक कारणे होती. त्या काळात बऱ्‍याच जणांनी सुवार्तेला चांगला प्रतिसाद दिला. खासकरून, सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्यांचा आनंद शिगेला पोचला कारण त्या दिवशी पेत्राच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून जवळजवळ ३,००० लोकांना यहोवाचा पवित्र आत्मा मिळाला आणि देवाच्या आध्यात्मिक इस्राएल राष्ट्राचे ते भाग बनले. त्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांचा आनंद देखील वाढत गेला कारण “प्रभु तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.”—प्रेषितांची कृत्ये २:३७-४१, ४६, ४७; गलतीकर ६:१६; १ पेत्र २:९.

२०. कापणीच्या कार्यात आपल्याला विपुल आनंद का मिळतो?

२० त्या काळी यशयाची भविष्यवाणी खरी ठरत होती: “तू राष्ट्राची वृद्धि केली आहे; त्याला महानंदप्राप्ति करून दिली आहे, हंगामाच्या उत्सवसमयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्‍या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुजसमोर आनंद करितात.” (यशया ९:३) अभिषिक्‍तांच्या ‘वृद्धिंगत झालेल्या राष्ट्रातील’ सदस्यांची संख्या आज पूर्ण झाल्याची आपल्याला दिसत असली तरीसुद्धा कापणीच्या इतर कामकऱ्‍यांची संख्या दर वर्षी वाढत असल्याचे पाहून निश्‍चितच आपल्याला खूप आनंद वाटतो.—स्तोत्र ४:७; जखऱ्‍या ८:२३; योहान १०:१६.

२१. पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२१ कापणीच्या कार्यात आनंदी राहण्याची आपल्याजवळ खरोखर अर्थपूर्ण कारणे आहेत. आपला आशादायक संदेश, योग्य जनांना शोधण्यात आपल्याला मिळणारे यश, आणि कापणीचे कामकरी या नात्याने आपली शांतीदायक मनोवृत्ती—यांसारख्या कारणांमुळे कापणीचे कार्य करताना आपल्याला आनंद मिळतो. पण बरेचजण आपल्याला प्रतिकूल प्रतिसाद देतात. प्रेषित योहानालाही या अनुभवाला तोंड द्यावे लागले होते. “देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्‍यांखातर” त्याला पात्म नावाच्या बेटावर बंदी बनवून ठेवण्यात आले होते. (प्रकटीकरण १:९) मग छळ आणि विरोध सहन करत असताना देखील आपण आपला आनंद कशाप्रकारे टिकवून ठेवू शकतो? आपण आज ज्यांना प्रचार करतो त्यांच्यापैकी बहुतेकांची मनोवृत्ती कठोर होत चालली आहे, तेव्हा या परिस्थितीला आपण कशाप्रकारे तोंड देऊ शकतो? पुढचा लेख या प्रश्‍नांची शास्त्रवचनांच्या आधारावर उत्तरे देईल.

[तळटीप]

^ पूर्वी आस्थेवाईक लोकांचे गट तयार करून एखाद्या ठिकाणी त्यांचा एकत्र अभ्यास घेतला जायचा. पण लवकरच काही व्यक्‍तींसोबत किंवा कुटुंबांसोबतही अभ्यास चालवण्यात येऊ लागले.—यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक, (इंग्रजी), पृष्ठ ५७४ पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२, १३ पानांवरील चित्रे]

पहिल्या आणि विसाव्या शतकातले प्रचार कार्य

[१३ पानांवरील चित्रे]

पौलाप्रमाणे या काळातले कापणीचे कामकरी देखील जेथे कोठे लोक भेटतील तेथे त्यांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतात

[१३ पानांवरील चित्र]

आनंदी मनोवृत्तीने सुवार्तेची घोषणा करा