व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कापणीच्या कार्यात तत्पर राहा!

कापणीच्या कार्यात तत्पर राहा!

कापणीच्या कार्यात तत्पर राहा!

“जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करितात ते हर्षाने कापणी करितील.”स्तोत्र १२६:५.

१. आज “पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना” करणे का आवश्‍यक आहे?

 गालीलात येशूचा तिसरा प्रचार दौरा संपल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.” (मत्तय ९:३७) यहुदीयातही परिस्थिती सारखीच होती. (लूक १०:२) पण हे २,००० वर्षांआधी घडले होते, आजची स्थिती कशी आहे? मागच्या सेवावर्षादरम्यान ६०,००,००० पेक्षा जास्त यहोवाच्या साक्षीदारांनी जगातल्या ६,००,००,००,००० लोकांमध्ये, ज्यांपैकी बहुतेकजण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे गांजलेले व पांगलेले’ होते, लाक्षणिक कापणीचे काम तत्परतेने केले. त्यामुळे “पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा” हे येशूचे आग्रहपूर्वक शब्द कित्येक शतकांआधी होते तितकेच आजही खरे आहेत.—मत्तय ९:३६, ३८.

२. लोकांचे लक्ष आपल्याकडे का वेधले जाते?

पिकाच्या धन्याने, अर्थात यहोवा देवाने अधिक कामकरी पाठवून देण्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या कापणीच्या कार्यात सहभाग घेणे खरोखर किती आनंददायक आहे! राष्ट्रांच्या तुलनेत आपण फार थोडे असलो तरीसुद्धा, राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने भाग घेतल्यामुळे आपल्याकडे जगाचे लक्ष वेधले जाते. बऱ्‍याच देशांत प्रसिद्धीमाध्यमांत आपल्याविषयी वारंवार उल्लेख केला जातो. कधीकधी टीव्हीवरील एखाद्या मालिकेत दारावरची घंटी वाजली की यहोवाचे साक्षीदार आले असतील असे म्हटले जाते. होय, लाक्षणिक कापणीचे आपले ख्रिस्ती कार्य २१ व्या शतकात सर्वज्ञात झाले आहे.

३. (अ) पहिल्या शतकातील राज्य प्रचाराच्या कार्याचीही लोकांकडून दखल घेतली गेली हे कशावरून म्हणता येईल? (ब) देवदूतही आपल्या सेवाकार्याला साहाय्य करतात असे आपण का म्हणू शकतो?

पहिल्या शतकातही राज्य प्रचाराच्या कार्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले होते आणि सुवार्तेच्या उद्‌घोषकांना यासाठी छळण्यातही आले. म्हणूनच प्रेषित पौलाने असे लिहिले: “मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही [प्रेषित] जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहो!” (१ करिंथकर ४:९) त्याचप्रकारे आजही छळाला तोंड देऊन राज्य घोषणेच्या कार्यात तत्पर राहिल्यामुळे जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि हे देवदूतांच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. प्रकटीकरण १४:६ यात म्हटले आहे: “मी [प्रेषित योहान] दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” होय आपल्या सेवेत, अर्थात कापणीच्या कार्यात देवदूतही आपले साहाय्य करतात!—इब्री लोकांस १:१३, १४.

“सर्व लोक तुमचा द्वेष करितील”

४, ५. (अ) येशूने आपल्या शिष्यांना कोणती ताकीद दिली? (ब) सध्याच्या काळातील देवाच्या सेवकांचा “द्वेष” का केला जातो?

येशूच्या प्रेषितांना कापणीच्या कामाकरता पाठवण्यात आले तेव्हा येशूच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी “सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी” राहून हे काम केले. येशूने असेही म्हटले: “माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानांत तुम्हाला फटके मारतील, आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्‍यांच्यापुढे नेण्यात येईल . . . आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.”—मत्तय १०:१६-२२.

आज आपला “द्वेष” केला जाण्याचे कारण म्हणजे “सगळे जग त्या दुष्टाला” म्हणजेच देवाचा आणि त्याच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू दियाबल सैतान याला “वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) आपली आध्यात्मिक भरभराट आपल्या शत्रूंच्या नजरेतून सुटत नाही, पण हे यहोवाच्या आशीर्वादामुळे घडत आहे हे मानण्यास ते तयार नाहीत. कापणीच्या कामात आपण आनंदाने सहभाग घेतो तेव्हा विरोधक आपले हसमुख चेहरे पाहतात. आपले ऐक्य पाहून त्यांना आश्‍चर्य वाटते! खरे तर यहोवाच्या साक्षीदारांना त्यांनी आपल्या देशात जे काम करताना पाहिले होते तेच कार्य करताना एखाद्या परदेशात गेल्यावर ते पाहतात तेव्हा कधीकधी अनिच्छेनेच का होईना पण ते आपले आश्‍चर्य व्यक्‍तही करतात. अर्थात आपल्याला माहीत आहे की योग्य वेळ आल्यावर आपल्या शत्रूंना देखील, आपल्याला पाठिंबा देणाऱ्‍या आणि आपल्या ऐक्याचा उगम असलेल्या यहोवाला ओळखावेच लागेल.—यहेज्केल ३८:१०-१२, २३.

६. कापणीच्या कार्यात सहभाग घेताना आपल्याला कोणते आश्‍वासन आहे, पण यासंबंधी कोणता प्रश्‍न उभा राहतो?

पिकाच्या धन्याने आपल्या पुत्राला, अर्थात येशू ख्रिस्ताला “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” दिला आहे. (मत्तय २८:१८) त्याअर्थी, स्वर्गीय देवदूतांच्या आणि पृथ्वीवरील ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने कापणीच्या कार्याचे नेतृत्व करण्यासाठी यहोवा येशूचा उपयोग करत आहे. (मत्तय २४:४५-४७; प्रकटीकरण १४:६, ७) पण शत्रूंच्या विरोधाला तोंड देऊनही आपण कापणीच्या कार्यात आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो?

७. आपला विरोध किंवा छळ केला जातो तेव्हा आपण कशी मनोवृत्ती बाळगली पाहिजे?

आपल्याला विरोध किंवा छळ सहन करावा लागतो तेव्हा आपण देवाची मदत मागितली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पौलासारखी मनोवृत्ती बाळगता येईल. त्याने लिहिले: “आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करितो; आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करितो.” (१ करिंथकर ४:१२, १३) अशी मनोवृत्ती बाळगून, विचारशीलपणे प्रचार कार्य केल्यामुळे कधीकधी आपला विरोध करणाऱ्‍यांचीही मनोवृत्ती बदलू शकते.

८. मत्तय १०:२८ येथे दिलेल्या येशूच्या शब्दांवरून तुम्हाला कोणता दिलासा मिळतो?

मृत्यूचा धाक दाखवला तरीही कापणीच्या कार्यातील आपला आवेश कमी होत नाही. आपण राज्याच्या संदेशाची घोषणा अगदी उघडपणे आणि निर्भयपणे करतो. येशूचे शब्द आपल्याला सतत धैर्य व दिलासा देतात: “जे शरीराचा घात करितात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्‍या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.” (मत्तय १०:२८) आपल्याला माहीत आहे की आपला स्वर्गीय पिता जीवन देणारा आहे. जे आपला खरेपणा टिकवून ठेवतात आणि विश्‍वासूपणे कापणीच्या कार्यात तत्पर राहतात त्यांना तो याचे प्रतिफळ देतो.

जीवनरक्षक संदेश

९. काहींनी यहेज्केलच्या शब्दांना कसा प्रतिसाद दिला आणि आज देखील काय घडत आहे?

यहेज्केल भविष्यवक्‍त्‌याने इस्राएल व यहुदा या ‘फितुरी राष्ट्रांत’ निर्भयपणे यहोवाचे संदेश घोषित केले तेव्हा काही जणांना हे संदेश ऐकून आनंद वाटला. (यहेज्केल २:३) यहोवाने म्हटले: “पाहा! एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजविणारा प्रेमगीत गातो तसा तू त्यांस वाटतोस.” (यहेज्केल ३३:३२) त्यांना यहेज्केलचे संदेश आवडत होते पण ते त्यानुसार वागले नाहीत. आज आपण काय पाहतो? अभिषिक्‍त शेषजन आणि त्यांचे साथीदार यहोवाचे संदेश निर्भयपणे घोषित करतात तेव्हा काहीजणांना देवाच्या राज्याच्या आशीर्वादांबद्दल ऐकायला आवडते पण ते आपल्या संदेशाची मनापासून कदर करून त्यानुसार वागत नाहीत, आणि शिष्य बनून कापणीच्या कामात सहभागी होत नाहीत.

१०, ११. विसाव्या शतकाच्या सुरवातीला आपला जीवनरक्षक संदेश सर्वत्र घोषित करण्यासाठी काय करण्यात आले आणि याचा काय परिणाम झाला?

१० पण दुसरीकडे पाहता, बऱ्‍याचजणांनी कापणीच्या कार्याला अनुकूल प्रतिसाद दिला आहे आणि देवाचे संदेश घोषित करण्यात ते देखील सहभागी झाले आहेत. उदाहरणार्थ, १९२२ ते १९२८ पर्यंत झालेल्या ख्रिस्ती अधिवेशनांत सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाविरुद्ध यहोवाचे न्यायसंदेश अगदी स्पष्टपणे घोषित करण्यात आले. त्या अधिवेशनांत घोषित करण्यात आलेले हे न्यायसंदेश आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित करण्यात आले. त्यानंतर देवाच्या लोकांनी याच संदेशांच्या कोट्यवधी छापील पत्रिका लोकांना दिल्या.

११ एकोणीसशे तीसच्या दशकाच्या उत्तरार्धात एका अभिनव मार्गाने साक्षकार्य करण्यास सुरवात करण्यात आली—इनफर्मेशन मार्च. सुरवातीला यहोवाचे लोक जाहीर भाषणाची जाहिरात लिहिलेले प्लाकार्ड घालून रस्त्यांवरून फिरायचे. नंतर, ते वेगवेगळे नारे लिहिलेले प्लाकार्ड घालू लागले, उदाहरणार्थ “धर्म पाश आहे, थोतांड आहे” आणि “देवाची आणि ख्रिस्त राजाची सेवा करा.” हे प्लॅकार्ड घालून ते रस्त्यांवरून फिरायचे तेव्हा साहजिकच रस्त्यांवरील लोकांचे लक्ष आकर्षित व्हायचे. इंग्लंडच्या लंडन शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर नियमितपणे या कार्यात सहभागी होणाऱ्‍या एका बांधवाने म्हटल्याप्रमाणे, ‘या कार्यामुळे सर्वांचे लक्ष यहोवाच्या साक्षीदारांकडे गेले आणि त्यांना अधिक धैर्य मिळाले.’

१२. देवाच्या न्यायसंदेशांसोबत आपण सेवाकार्यात आणखी कशाविषयी सांगतो आणि आज कोण एकजुटीने सुवार्तेच्या प्रचार कार्यात सहभाग घेत आहेत?

१२ देवाच्या न्यायसंदेशांची घोषणा करत असतानाच आपण राज्य संदेशाच्या आशादायी पैलूंविषयीही लोकांना सांगतो. जगात निर्भयपणे साक्ष दिल्यामुळे योग्य जनांना शोधून काढणे आपल्याला शक्य होते. (मत्तय १०:११) अभिषिक्‍त वर्गाच्या शेवटल्या सदस्यांपैकी बहुतेकांनी १९२० व १९३० च्या दशकांत कापणीच्या कार्यात सहभागी होण्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. मग १९३५ साली झालेल्या एका अधिवेशनात “मोठा लोकसमुदाय” किंवा “दुसरी मेंढरे” यांना परादीस पृथ्वीवर आशीर्वादित भवितव्य लाभेल ही अद्‌भुत सुवार्ता सांगण्यात आली. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) ते देखील देवाच्या न्याय संदेशांकडे लक्ष देऊन अभिषिक्‍तांसोबत एकजुटीने जीवनरक्षक सुवार्तेच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

१३, १४. (अ) स्तोत्र १२६:५, ६ या वचनांतून आपल्याला कोणते सांत्वन मिळते? (ब) आपण पेरणी करण्याचे व पाणी घालण्याचे काम करत राहिलो तर काय घडेल?

१३ “जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करितात ते हर्षाने कापणी करितील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” स्तोत्र १२६:५, ६ येथील हे शब्द देवाच्या कार्यात सहभागी होणाऱ्‍या कापणीच्या कामकऱ्‍यांकरता आणि विशेषतः छळ सहन करत असलेल्यांना अतिशय सांत्वनदायक आहेत. पेरणी आणि कापणीविषयी स्तोत्रकर्त्याने लिहिलेले हे शब्द प्राचीन बॅबिलोनहून परत आलेल्या शेषजनांची यहोवाने कशाप्रकारे काळजी घेतली व त्यांना आशीर्वादित केले हे दाखवतात. त्यांची सुटका झाली तेव्हा ते अतिशय आनंदी होते पण ते ७० वर्षांच्या बंदिवासात असताना नापीक झालेल्या ओसाड जमिनीत पेरणी करताना त्यांना अक्षरशः रडून कष्ट उपसावे लागले असतील. पण जे या पेरणीच्या कामात आणि बांधकामात तत्पर राहिले त्यांना शेवटी त्यांच्या मेहनतीचे फळ आणि समाधान मिळाले.

१४ आपल्यावरही परीक्षा येतात किंवा धार्मिकतेमुळे आपल्याला किंवा आपल्या बांधवांना छळ सहन करावा लागतो तेव्हा कदाचित आपल्यावरही अश्रू गाळण्याची वेळ येऊ शकते. (१ पेत्र ३:१४) कापणीच्या कार्यात सुरवातीला कदाचित आपल्याला खूप कठीण जाईल कारण सेवाकार्यात आपल्या मेहनतीच्या मानाने फळ मिळत नसेल. पण जर आपण पेरणी करण्याचे व पाणी घालण्याचे काम करत राहिलो तर देव, आपण अपेक्षाही केली नसेल इतक्या प्रमाणात त्या रोपांना वाढवेल. (१ करिंथकर ३:६) बायबल व शास्त्रवचनीय प्रकाशनांचा वाटप केल्यानंतर मिळणाऱ्‍या परिणामांवरून हे स्पष्ट दिसून येते.

१५. कापणीच्या कार्यात ख्रिस्ती प्रकाशने कशी उपयोगी ठरू शकतात याचे उदाहरण द्या.

१५ जिम नावाच्या एका माणसाचे उदाहरण लक्षात घ्या. त्याच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या वस्तूंमध्ये त्याला जीवन अस्तित्वात कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? * (इंग्रजी) हे पुस्तक सापडले. त्याने ते वाचून काढले आणि त्याला ते खूप आवडले. यानंतर एका साक्षीदार बहिणीने रस्त्यावर त्याला साक्ष दिली तेव्हा त्यांची चर्चा झाली आणि जिमने त्या बहिणीला पुन्हा भेटण्याची तयारी दाखवली. यामुळे बायबल अभ्यास सुरू झाला. जिमने पाहता पाहता आध्यात्मिक प्रगती केली, यहोवाला आपले जीवन समर्पित केले आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. त्याला जे ज्ञान मिळाले होते त्याविषयी त्याने आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितले. यामुळे त्याची बहीण आणि भाऊ देखील यहोवाचे साक्षीदार बनले. नंतर जिमला लंडन येथील बेथेलगृहात पूर्णवेळेचा स्वयंसेवक म्हणून सेवा करण्याची सुसंधी देखील मिळाली.

छळ होऊनही आनंदी

१६. (अ) कापणीच्या कार्यात यश मिळण्याचे काय कारण आहे? (ब) सुवार्तेमुळे घडून येणाऱ्‍या परिणामाच्या संबंधात येशूने कोणती ताकीद दिली होती पण आपण कोणत्या मनोवृत्तीने लोकांची भेट घेतो?

१६ कापणीच्या कार्यात इतके यश मिळण्याचे कारण काय? कारण असे की अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांच्या साथीदारांनी येशूच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्य केले आहे: “जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून घोषित करा.” (मत्तय १०:२७) पण आपल्याला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागेल कारण येशूने ताकीद दिली होती: “भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यास ठार करितील.” येशूने पुढे म्हटले: “मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो आहे.” (मत्तय १०:२१, ३४) येशूने काही मुद्दामहून कुटुंबांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला नाही. पण सुवार्तेमुळे कधीकधी हा परिणाम घडून येत होता. आजही देवाच्या सेवकांविषयी हेच म्हणता येते. आपण एखाद्या कुटुंबात जातो तेव्हा त्या कुटुंबात फूट पडावी असा आपला मुळीच उद्देश नसतो. उलट त्या सर्वांनी सुवार्तेचा स्वीकार करावा अशी आपली इच्छा असते. म्हणूनच आपण कुटुंबातल्या सर्वांशी प्रेमाने व सहानुभूतीने बोलतो जेणेकरून ‘सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती असलेल्यांना’ आपला संदेश लगेच भावेल.—प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW

१७. देवाच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण करणारे कशाप्रकारे वेगळे ठरतात आणि याचे एक उदाहरण कोणते आहे?

१७ राज्याच्या संदेशाने देवाच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण करणाऱ्‍यांना या जगापासून वेगळे केले आहे. उदाहरणार्थ, जर्मनीत राष्ट्रीय समाजवादाच्या काळात आपल्या बांधवांनी ‘कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला दिल्यामुळे’ ते कशाप्रकारे इतरांपेक्षा वेगळे दिसून आले याचे उदाहरण विचारात घ्या. (लूक २०:२५) यहोवाचे सेवक धार्मिक पुढाऱ्‍यांप्रमाणे किंवा ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसमधील नामधारी ख्रिश्‍चनांप्रमाणे वागले नाहीत, उलट ते खंबीर राहिले आणि बायबल तत्त्वांचे उल्लंघन करण्यास तयार झाले नाहीत. (यशया २:४; मत्तय ४:१०; योहान १७:१६) नात्सी राष्ट्र आणि नवीन धर्म या पुस्तकाच्या लेखिका क्रिस्टीन किंग यांनी म्हटले: “[नात्सी] सरकार फक्‍त साक्षीदारांच्या विरोधात यशस्वी ठरले नाहीत कारण त्यांनी हजारो साक्षीदारांना ठार मारले तरीसुद्धा काम सुरूच राहिले आणि १९४५ सालच्या मे महिन्यात यहोवाच्या साक्षीदारांची संस्था अद्यापही कार्यशील होती, पण राष्ट्रीय समाजवाद मात्र नामशेष झाला होता.”

१८. छळ होत असतानाही यहोवाचे लोक कशी मनोवृत्ती दाखवतात?

१८ छळ होत असताना यहोवाचे लोक कशी मनोवृत्ती बाळगतात हे खरोखरच महत्त्वाचे आहे. कारण आपला विश्‍वास पाहून लौकिक अधिकारी प्रभावित होतात, पण इतका छळ सहन करूनही आपण कोणाबद्दलही सूडभावना किंवा द्वेष बाळगत नाहीत हे पाहून त्यांना अचंबा वाटतो. उदाहरणार्थ, नात्सींच्या काळातील भयंकर छळवणुकीतून जिवंत बचावलेले साक्षीदार बऱ्‍याचदा त्या अनुभवांकडे मागे वळून पाहताना आनंद आणि समाधान व्यक्‍त करतात. त्यांना माहीत आहे की यहोवानेच त्यांना ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले. (२ करिंथकर ४:७) आपल्यातील अभिषिक्‍त जनांना असे आश्‍वासन देण्यात आले आहे की त्यांची “नावे स्वर्गात लिहिलेली आहेत.” (लूक १०:२०) त्यांनी धीर धरल्यामुळे एक आशा निर्माण होते जी खात्रीने पूर्ण होईल आणि पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणाऱ्‍या कापणीच्या विश्‍वासू कामकऱ्‍यांना देखील अशी खात्री वाटते.—रोमकर ५:४, ५.

कापणीच्या कार्यात टिकून राहा

१९. ख्रिस्ती सेवाकार्यात कोणकोणत्या परिणामकारक पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे?

१९ यहोवा आपल्याला आणखी किती काळ लाक्षणिक कापणीच्या कार्यात सहभाग घेऊ देईल हे येणारा काळच सांगेल. पण तोपर्यंत आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की कापणी करणारे विशिष्ट पद्धतीने कार्य करतात. त्याचप्रकारे आपणही ही खात्री बाळगू शकतो, की अनेक वर्षांपासून वापरलेल्या व परिणामकारक ठरलेल्या पद्धतींनीच विश्‍वासूपणे प्रचार करत राहिल्यास आपल्यालाही यश मिळेल. पौलाने सहविश्‍वासू ख्रिस्ती बांधवांना म्हटले: “मी तुम्हास विनंती करितो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ४:१६) मिलेतास येथे पौलाने इफिसकर वडिलांची भेट घेतली तेव्हा त्याने आठवण करून दिली की त्याने त्यांना “चार लोकांत व घरोघरी” शिकवण्यात कसूर केली नाही. (प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१) पौलाचा सोबती तीमथ्य याने पौलाच्या प्रचार कार्याच्या पद्धती शिकून घेतल्या होत्या आणि त्यामुळे तो करिंथकरांना त्या शिकवू शकला. (१ करिंथकर ४:१७) देवाने पौलाच्या शिकवण्याच्या पद्धतींवर आशीर्वाद दिला. आपणही घरोघरी जाऊन, पुनर्भेटी देताना, बायबल अभ्यास चालवताना आणि जेथे कोठे लोक भेटतील तेथे सुवार्तेचा जाहीर प्रचार करत राहिलो तर तो आपल्यालाही आशीर्वाद देईल.—प्रेषितांची कृत्ये १७:१७.

२०. मोठी आध्यात्मिक कापणी सुरू होण्याच्या बेतात आहे हे येशूने कशाप्रकारे सूचित केले होते आणि अलीकडील वर्षांत हे कशाप्रकारे खरे ठरले आहे?

२० सा.यु. ३० साली सूखार येथे एका शोमरोनी स्त्रीला साक्ष दिल्यानंतर येशूने आध्यात्मिक कापणीविषयी सांगितले. त्यांने आपल्या शिष्यांना म्हटले: “आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करितो; ह्‍यासाठी की, पेरणाऱ्‍याने व कापणाऱ्‍यानेहि एकत्र आनंद करावा.” (योहान ४:३४-३६) शोमरोनी स्त्रीसोबत झालेल्या भेटीचा परिणाम कदाचित येशूने पाहिला असेल कारण तिच्या बोलण्यावरून पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. (योहान ४:३९) अलीकडील वर्षांत, कित्येक राष्ट्रांनी यहोवाच्या साक्षीदारांवर लावलेली बंदी काढून टाकली आहे किंवा त्यांना कायदेशीर संमती दिली आहे आणि अशारितीने कापणीकरता नवी शेते उपलब्ध करून दिली आहेत. परिणामस्वरूप आज मोठी आध्यात्मिक कापणी सुरू आहे. सबंध जगात आपण आनंदाने आध्यात्मिक कापणीच्या कार्यात सहभागी होत असताना समृद्ध आशीर्वाद अनुभवायला मिळत आहेत.

२१. आनंदी कामकरी या नात्याने आपण तत्पर राहण्याचे काय कारण आहे?

२१ पीक कापणीसाठी तयार झाल्यावर कामकऱ्‍यांना तातडीने काम करावे लागते. उशीर न करता त्यांना परिश्रम घ्यावे लागतात. आज आपण ‘अंतसमयात’ राहात आहोत, त्याअर्थी, आपणही तातडीच्या भावनेने परिश्रम केले पाहिजेत. (दानीएल १२:४) आपल्याला परीक्षांना तोंड द्यावे लागते हे खरे आहे, पण यहोवाच्या उपासकांच्या रूपात अभूतपूर्व प्रमाणात पीकाची कापणी केली जात आहे. म्हणूनच हा आनंद करण्याचा दिवस आहे. (यशया ९:३) आनंदी कामकऱ्‍यांसारखे आपणही कापणीच्या कार्यात तत्पर राहू या!

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित व वितरीत करण्यात आले आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

पिकाच्या धन्याने अधिक कामकऱ्‍यांच्या विनंतीला कशाप्रकारे उत्तर दिले आहे?

आपला “द्वेष” केला जातो तरीसुद्धा आपण कशी मनोवृत्ती बाळगतो?

आपला छळ होतो तरीसुद्धा आपण आनंदी का राहतो?

कापणीच्या कार्यात आपण तातडीच्या भावनेने तत्पर का राहिले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चित्रे]

आध्यात्मिक कापणीत सहभागी होणाऱ्‍यांना देवदूतांचा पाठिंबा आहे

[१८ पानांवरील चित्र]

इनफर्मेशन मार्चेसमुळे बऱ्‍याच लोकांचे लक्ष राज्य संदेशाकडे आकर्षित झाले

[१८ पानांवरील चित्र]

आपण पेरतो आणि पाणी घालतो पण वाढवणारा देव आहे