व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्यात अमर आत्मा आहे का?

तुमच्यात अमर आत्मा आहे का?

तुमच्यात अमर आत्मा आहे का?

प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) खरोखर, बायबल खरा देव यहोवा याच्याकडून आलेले सत्यवचन आहे.—स्तोत्र ८३:१८.

यहोवा सर्व सृष्टीचा, मानवांचाही, निर्माणकर्ता असल्यामुळे मृत्यूनंतर माणसाचे काय होते हे त्याला माहीत आहे. (इब्री लोकांस ३:४; प्रकटीकरण ४:११) आणि त्याच्या प्रेरित वचनात अर्थात बायबलमध्ये त्याने मृत्यूनंतर माणसांचे काय होते याविषयी निर्माण होणाऱ्‍या प्रश्‍नांची खरी आणि मनाला पटण्याजोगी उत्तरे दिली आहेत.

आत्मा म्हणजे काय?

बायबलमध्ये, “आत्मा” असे भाषांतर केलेल्या मूळ शब्दांचा अर्थ “श्‍वास” असा होतो. पण हा शब्द केवळ श्‍वास घेण्याच्या क्रियेला सूचित करत नाही. उदाहरणार्थ, बायबल लेखक याकोब म्हणतो: “शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे.” (याकोब २:२६) त्याअर्थी, शरीराला ज्यामुळे सजीवता प्राप्त होते त्याला आत्मा म्हणतात.

शरीराला सजीवता देणारी ही शक्‍ती केवळ फुफ्फुसांतून आत-बाहेर जाणारा श्‍वास, किंवा हवा नाही. का नाही? कारण श्‍वासोच्छ्‌वास थांबल्यानंतरही शरीरातल्या पेशी काही काळ जिवंत असतात. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात सांगितल्यानुसार “काही मिनिटांपर्यंत” त्या जिवंत असतात. यामुळे कधीकधी श्‍वासोच्छ्‌वास बंद झालेल्या व्यक्‍तीला पुन्हा शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न यशस्वी होतात. पण शरीरातल्या पेशींतून जीवन नाहीसे झाल्यावर मात्र, पुन्हा जिवंत करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. मग त्या पेशींत कितीही श्‍वास घालण्याचा प्रयत्न केला तरी एकही पेशी पुन्हा जिवंत करता येत नाही. त्याअर्थी आत्मा म्हणजे शरीरातल्या पेशींना आणि त्या व्यक्‍तीला जिवंत ठेवणारी अदृश्‍य जीवनशक्‍ती किंवा जीवनज्योत आहे. ही जीवनशक्‍ती श्‍वासोच्छ्‌वासाने टिकून राहते.—ईयोब ३४:१४, १५.

पण आत्मा केवळ मानवांमध्येच असतो का? या प्रश्‍नाचेही मनाला पटण्याजोगे उत्तर शोधण्यास बायबल मदत करते. बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिले: “मानवजातीचा प्राण [आत्मा] वर जातो आणि पशुजातीचा प्राण [आत्मा] खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक?” (उपदेशक ३:१९-२१, पं.र.भा.) अशारितीने, केवळ मनुष्यांनाच नव्हे तर प्राण्यांनाही आत्मा असल्याचे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. पण हे कसे शक्य आहे?

आत्म्याची किंवा जीवन शक्‍तीची तुलना एखाद्या यंत्रातून जाणाऱ्‍या विद्युत प्रवाहाशी करता येते. विद्युतशक्‍ती अदृश्‍य असली तरीही या शक्‍तीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांच्या साहाय्याने बरीच कार्ये साध्य होतात. उदाहरणार्थ, विद्युतशक्‍तीवर चालणाऱ्‍या स्टोव्हमधून उष्णता निर्माण करता येते, कंप्युटरवर माहितीचे संस्करण आणि बेरीज करता येते, टीव्हीवर चित्रे दाखवता येतात व ध्वनी निर्माण करता येतो. पण या सर्व यंत्रांना कार्य करायला लावणारी विद्युत शक्‍ती कधीही या यंत्रांचे गुण आत्मसात करत नाही. ती केवळ एक शक्‍तीच राहते. त्याप्रमाणे जीवनशक्‍ती देखील वेगवेगळ्या प्राण्यांना चैतन्य देत असली तरीही त्या प्राण्यांचे गुण तिच्यात येत नाहीत. तिच्याठायी व्यक्‍तिमत्त्व किंवा विचार करण्याची शक्‍ती नसते. मनुष्य व पशूपक्षी, “सर्वांचा प्राण [“आत्मा,” NW] सारखाच आहे.” (उपदेशक ३:१९) त्याअर्थी, एखादी व्यक्‍ती मेल्यावर तिचा आत्मा परलोकांत जाऊन आत्मिक प्राण्याच्या रूपात अस्तित्वात राहत नाही.

मग मृत व्यक्‍ती कोणत्या स्थितीत असतात? आणि व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे काय होते?

“तू . . . मातीला परत जाऊन मिळशील”

पहिला पुरुष आदाम याने जाणूनबुजून यहोवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यानंतर यहोवाने त्याला म्हटले: “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) यहोवाने आदामाला मातीपासून निर्माण करण्याआधी तो कोठे होता? अर्थातच, तो कोठेही नव्हता! तो अस्तित्वातच नव्हता. तू “मातीला परत जाऊन मिळशील” असे यहोवा देवाने आदामाला म्हटले तेव्हा तो दुसऱ्‍या शब्दांत असे म्हणत होता की आदामाचा मृत्यू होईल आणि तो मातीत विलीन होईल. आदाम या लोकांतून आत्मिक जगात जाणार नव्हता. तर, मृत्यू झाल्यावर तो पुन्हा एकदा अस्तित्वहीन होणार होता. त्याची शिक्षा, या जगातून दुसऱ्‍या जगात जाण्याची नव्हे तर मृत्यू, म्हणजेच जीवनापासून वंचित केले जाण्याची स्थिती होती.—रोमकर ६:२३.

जे इतरजण मरण पावले त्यांच्याविषयी काय म्हणता येईल? मृतांच्या स्थितीविषयी उपदेशक ९:५, १० येथे स्पष्टपणे असे सांगितले आहे: “मृतांस काहीच कळत नाही . . . कबरेत कोणतेही काम, कोणतीही योजना, कोणतेही ज्ञान किंवा विद्वत्ता नाही.” (मोफॅट) तेव्हा, मृत्यू म्हणजे अस्तित्वहीन स्थिती. स्तोत्रकर्त्याने लिहिले की मनुष्य मरतो तेव्हा “त्याचा प्राण [“आत्मा,” NW] जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.”—स्तोत्र १४६:४.

यावरून स्पष्ट होते, की मृत बेशुद्ध किंवा अक्रियाशील असतात. त्यांना कशाचीही जाणीव नसते. ते तुम्हाला पाहू शकत नाहीत, तुमचा आवाज ऐकू शकत नाहीत किंवा तुमच्याशी बोलू शकत नाहीत. ते तुम्हाला न मदत करू शकतात न तुमचे काही नुकसान करू शकतात. तेव्हा, मृतांची भीती वाटण्याचे काहीही कारण नाही. पण मग, व्यक्‍ती मरते तेव्हा तिचा आत्मा “जातो” असे का म्हटले आहे?

आत्मा “[खऱ्‍या देवाकडे] परत जाईल”

बायबल सांगते की एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा “देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.” (उपदेशक १२:७) याचा अर्थ एखादी आत्मिक वस्तू शब्दशः अर्थाने, अंतराळातून प्रवास करून देवाकडे जाते का? निश्‍चितच नाही! बायबलमध्ये “परत जाईल” हे शब्द ज्याप्रकारे वापरण्यात आले आहेत, त्यावरून या शब्दांचा अर्थ नेहमीच एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जाणे असा होत नाही. उदाहरणार्थ, अविश्‍वासी इस्राएल लोकांना असे सांगण्यात आले: “तुम्ही माझ्याकडे परत या म्हणजे मीही तुमच्याकडे माघारी येईन असे सेनाधीश प्रभू म्हणतो.” (मलाखी ३:७, मराठी कॉमन लँग्वेज) इस्राएलांनी यहोवाकडे ‘परत येण्याचा’ अर्थ, चुकीच्या मार्गावरून फिरून पुन्हा एकदा देवाच्या नीतिमान मार्गाचे अनुसरण करणे असा होता. आणि यहोवाने ‘माघारी येण्याचा’ अर्थ असा होता की तो पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे आपल्या लोकांवर कृपादृष्टी करेल. त्याअर्थी, ‘परत येण्याचा’ किंवा ‘माघारी येण्याचा’ अर्थ खरोखर एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जाणे असा नव्हे, तर मनोवृत्तीत बदल करणे असा होता.

त्याचप्रकारे, मृत्यू होतो तेव्हा आत्मा देवाकडे ‘परत जातो’ याचा अर्थ खरोखर पृथ्वीवरून काहीतरी स्वर्गात जाते असे नाही. व्यक्‍तीच्या शरीरातून जीवनशक्‍ती गेल्यावर, ती पुन्हा त्या व्यक्‍तीला देण्याचे सामर्थ्य केवळ देवाजवळ आहे. या अर्थाने, आत्मा “देवाकडे परत जाईल,” म्हणजेच त्या व्यक्‍तीला भविष्यात पुन्हा कधी जीवन मिळणे न मिळणे आता देवाच्या हातात असेल.

उदाहरणार्थ, येशूच्या मृत्यूविषयी बायबलमध्ये काय सांगितले आहे त्यावर विचार करा. शुभवर्तमान लिहिणाऱ्‍या लूकने असे सांगितले: “येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला: ‘हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो;’ असे बोलून त्याने प्राण सोडला.” (लूक २३:४६) येशूचा आत्मा त्याच्यातून निघाला तेव्हा येशू काही शब्दशः अर्थाने स्वर्गात जाण्याच्या मार्गावर नव्हता. कारण तिसऱ्‍या दिवसापर्यंत त्याचे पुनरुत्थान करण्यात आले नाही. आणि त्यानंतर तब्बल ४० दिवसांनी तो स्वर्गात गेला. (प्रेषितांची कृत्ये १:३, ९) पण येशूचा मृत्यू झाला तेव्हा त्याने पूर्ण खात्रीने आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती सोपवला कारण त्याला विश्‍वास होता की यहोवा त्याला पुन्हा जिवंत करण्यास समर्थ आहे.

होय, केवळ देवच एका व्यक्‍तीला पुन्हा जिवंत करू शकतो. (स्तोत्र १०४:३०) यामुळे आपल्याला किती अद्‌भुत आशा प्राप्त होते!

निश्‍चित आशा

बायबल म्हणते: “कबरेतील [“स्मृती कबरेतील,” NW] सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) होय, येशू ख्रिस्ताने वचन दिले आहे, की यहोवाच्या स्मृतीतील सर्वांचे पुनरुत्थान होईल अर्थात त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल. यांत नीतिमत्तेने चाललेले यहोवाचे सेवक निश्‍चितच असतील. पण असेही कोट्यवधी लोक आहेत ज्यांना मृत्यू होण्याआधी देवाच्या नीतिमान नियमांनुसार चालण्याची संधी मिळाली नाही. एकतर त्यांना यहोवाच्या नियमांविषयी माहीतच नसेल, किंवा आपल्या जीवनात आवश्‍यक बदल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असेल. हे लोक देखील देवाच्या स्मरणात आहेत आणि त्यांचेही पुनरुत्थान होईल कारण बायबल म्हणते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

आज जगात सर्वत्र द्वेष व संघर्ष, हिंसाचार व रक्‍तपात, प्रदूषण व रोगराई पसरली आहे. अशा या जगात मृतांचे पुनरुत्थान झाल्यास त्याचा आनंद फार काळ टिकणार नाही. पण निर्माणकर्त्या देवाने वचन दिले आहे की तो दियाबल सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सध्याच्या जागतिक समाजाचा लवकरच नाश करेल. (नीतिसूत्रे २:२१, २२; दानीएल २:४४; १ योहान ५:१९) त्यानंतर एका नीतिमान मानवी समाजाचे—‘एका नव्या पृथ्वीचे’ स्वप्न साकार होईल.—२ पेत्र ३:१३.

तेव्हा “‘मी रोगी आहे’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) मृत्यूमुळे लोकांच्या जीवनात येणारे दुःखही नाहीसे होईल कारण देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:४) ‘स्मृती कबरांत’ असलेल्यांकरता ही किती अद्‌भुत आशा आहे!

यहोवा या पृथ्वीवरून दुष्टाईचा नाश करेल तेव्हा दुष्टांच्यासोबत तो सात्विक लोकांचा नाश करणार नाही. (स्तोत्र ३७:१०, ११; १४५:२०) किंबहुना, ‘मोठ्या संकटात’ सध्याच्या दुष्ट जगाचा नाश होईल तेव्हा “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या बोलणारे ह्‍यांच्यापैकी . . . मोठा लोकसमुदाय” जिवंत बचावेल. (प्रकटीकरण ७:९-१४) त्यामुळे, मृतांचे पुनरुत्थान होईल तेव्हा एक मोठा जनसमुदाय त्यांचे स्वागत करेल.

तुमच्या प्रिय जनांना पुन्हा पाहण्याची तुम्हाला उत्कंठा आहे का? एका रम्य परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची तुम्हाला इच्छा आहे का? असल्यास, तुम्ही देवाच्या इच्छेविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी ज्ञान घेतले पाहिजे. (योहान १७:३) यहोवाची अशी इच्छा आहे की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.”—१ तीमथ्य २:३, ४.

[४ पानांवरील चित्र]

“तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील”

[५ पानांवरील चित्र]

आत्म्याची तुलना विद्युतप्रवाहाशी करता येते

[७ पानांवरील चित्र]

पुनरुत्थानामुळे सार्वकालिक आनंद मिळेल