व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘धार्मिकाला आशीर्वाद मिळतात’

‘धार्मिकाला आशीर्वाद मिळतात’

‘धार्मिकाला आशीर्वाद मिळतात’

“मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” आपल्या म्हातारपणात स्तोत्रकर्त्या दावीदाने हे शब्द उद्‌गारले. (स्तोत्र ३७:२५) नीतिमान लोकांवर यहोवा प्रेम करतो आणि तो त्यांची खूप काळजी घेतो. आपल्या वचनात अर्थात बायबलमध्ये, तो खऱ्‍या उपासकांना धार्मिकतेचे अवलंबन करण्यास सांगतो.—सफन्या २:३.

धार्मिक असणे म्हणजे देवाने योग्य-अयोग्य यांसंबंधी ठरवलेल्या दर्जांचे पालन करण्याद्वारे त्याच्या नजरेत सात्विक असणे. बायबलमधील नीतिसूत्राच्या पुस्तकातील १० व्या अध्यायात देवाच्या इच्छेचे पालन करण्याचे उत्तेजन देऊन असे करणाऱ्‍यांना कोणते समृद्ध आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होतात हे सांगितले आहे. यांपैकी काही आशीर्वाद म्हणजे, आध्यात्मिकरित्या पौष्टिक अन्‍नाचा विपुल साठा, फलदायी आणि समाधानकारक काम, आणि देवाबरोबर व मनुष्यांबरोबर चांगला नातेसंबंध. तर मग, आपण नीतिसूत्रे १०:१-१४ या वचनांवर मनन करू या.

जोरदार प्रेरणा

नीतिसूत्र पुस्तकाच्या पुढील भागाचा लेखक कोण आहे हे अध्यायाच्या सुरवातीच्या शब्दांवरून अगदी स्पष्ट होते. तेथे म्हटले आहे: “शलमोनाची नीतिसूत्रे.” सरळ मार्गावर चालण्याच्या प्रेरणेबद्दल प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन म्हणतो: “मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी.”—नीतिसूत्रे १०:१.

आपल्या एका अपत्याने खऱ्‍या आणि जिवंत देवाची उपासना करायचे सोडून दिले तर पालकांना किती दुःख वाटत असावे! सुज्ञ राजा येथे फक्‍त आईच्या दुःखाविषयी सांगतो; कदाचित तिला जास्त दुःख होते हे दाखवण्यासाठी. डॉरिस * यांना असाच अनुभव आला. त्या म्हणतात: “आमच्या २१ वर्षांच्या मुलानं सत्य सोडलं तेव्हा माझ्यावर आणि माझे पती फ्रँक यांच्यावर जणू आभाळ कोसळलं. पण फ्रँकपेक्षा मला खूप भावनिक वेदना झाल्या. आज या गोष्टीला १२ वर्षं होऊन गेलीत तरी ती जखम अजून भरलेली नाही.”

मुले आपल्या वडिलांना दुःखी करू शकतात आणि आपल्या आईचे मन मोडू शकतात. तेव्हा, आपण बुद्धीने चालून आपल्या पालकांना आनंदी करू या. शिवाय, आपला स्वर्गीय पिता, यहोवा याचे मन आपण आनंदी करू या.

‘धार्मिकाचा जीव समाधानी असतो’

राजा म्हणतो, “दुष्टाईने मिळविलेली संपत्ति हितकर नाही, पण धार्मिकता मरणापासून मुक्‍त करिते.” (नीतिसूत्रे १०:२) शेवटल्या काळाच्या अंत समयात जगणाऱ्‍या खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता हे शब्द खरोखर मौल्यवान आहेत. (दानीएल १२:४) अधार्मिकांचा नाश फार लवकर होणार आहे. येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटात’ भौतिक, आर्थिक किंवा लष्करी स्वरूपाची कोणतीही मानव-निर्मित सुरक्षा व्यवस्था आपल्याला वाचवू शकणार नाही. (प्रकटीकरण ७:९, १०, १३, १४) फक्‍त “सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील.” (नीतिसूत्रे २:२१) तर मग आपण ‘पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटू’ या.—मत्तय ६:३३.

यहोवाच्या सेवकांना त्याचे आशीर्वाद मिळण्यासाठी वचन दिलेल्या नवीन जगासाठी थांबून राहण्याची आवश्‍यकता नाही. “परमेश्‍वर धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करितो.” (नीतिसूत्रे १०:३) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ यहोवाने आध्यात्मिक अन्‍न विपुलतेत पुरवले आहे. (मत्तय २४:४५) धार्मिकाला ‘हर्षित चित्ताने जयजयकार करायला’ अनेक कारणे आहेत. (यशया ६५:१४) ज्ञान त्याला संतुष्ट करते. आध्यात्मिक खजिन्याचा शोध घेण्यात त्याला खूप आनंद मिळतो. पण दुष्ट व्यक्‍तीला असा कोणताही आनंद मिळत नाही.

‘उद्योगी व्यक्‍ती धनी होते’

धार्मिकाला आणखी दुसरा एक लाभ होतो. “सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवितो. उन्हाळ्यांत जमवाजमव करितो तो मुलगा शहाणा होय; जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद होय.”—नीतिसूत्रे १०:४, ५.

कापणी चालू असताना राजाने कामगारांना उद्देशून म्हटलेले शब्द विशेषतः अर्थपूर्ण आहेत. कापणीचा हंगाम आळस करण्याचा समय नसतो. तर उद्योगी राहून पुष्कळ काम करण्याचा हा समय असतो. निश्‍चितच, ही निकडीची वेळ आहे.

येशूने पीकांच्या कापणीविषयी नव्हे तर लोकांना एकत्र करण्याविषयी आपल्या शिष्यांना म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३५-३८) २००० साली, १.४ कोटी लोक म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांच्या संख्येच्या दुपटीहून अधिक लोक येशूच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित राहिले होते. त्यामुळे, ‘शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत’ हे कोण नाकारील? (योहान ४:३५) खरे उपासक धन्याकडे अधिक कामगार पाठवण्याची मागणी करतात. आणि आपल्या प्रार्थनांनुसार शिष्य बनवण्याच्या कामात मेहनत घेतात. (मत्तय २८:१९, २०) आणि यहोवाने त्यांच्या या प्रयत्नांवर समृद्ध आशीर्वाद दिला आहे! २००० या सेवा वर्षात, २,८०,००० पेक्षा अधिक नवीन जणांनी बाप्तिस्मा घेतला. ते देखील देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याचा प्रयत्न करत आहेत. शिष्य बनवण्याच्या कामात पूर्ण सहभाग घेऊन आपण या कापणीच्या हंगामात आनंद आणि समाधान अनुभवू या.

“धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात”

शलमोन पुढे म्हणतो: “धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात; दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते [दुर्जनांच्या शब्दामागे हिंसाचार दडलेला असतो].”—नीतिसूत्रे १०:६.

शुद्ध आणि धार्मिक अंतःकरणाची व्यक्‍ती धार्मिकतेचा भरपूर पुरावा देते. तिची भाषा कोमल आणि उत्तेजन देणारी असते; तिची कृत्ये उभारणीकारक आणि उदारतेची असतात. इतरजणांनाही ती आवडते. तिची ते प्रशंसा करतात अर्थात तिच्याविषयी चांगले बोलून तिला आशीर्वाद देतात.

परंतु, दुष्ट व्यक्‍ती द्वेषपूर्ण किंवा मत्सरी असते आणि नेहमी इतरांचे वाईट करायला पाहत असते. ती गोड गोड बोलून आपल्या अंतःकरणात दडलेला “हिंसाचार” लपवत असेल पण शेवटी शारीरिक किंवा शाब्दिक हल्ले करते. (मत्तय १२:३४, ३५) किंवा, “हिंसाचार दुर्जनाचे मुख व्यापतो [किंवा बंद करतो].” (नीतिसूत्रे १०:६, तळटीप, NW) यावरून स्पष्ट होते की, दुर्जन ज्या तऱ्‍हेने इतरांशी वागतात तशीच वागणूक अर्थात द्वेषपूर्ण वागणूक त्यांनाही मिळत असते. त्यामुळे, ही वागणूक जणू त्याचे मुख व्यापते किंवा बंद करते आणि त्याला शांत करते. अशा व्यक्‍तीला इतरांकडून कसे आशीर्वाद मिळतील?

इस्राएलचा राजा लिहितो, “धार्मिकांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.” (नीतिसूत्रे १०:७) धार्मिक व्यक्‍ती, एक चांगली व्यक्‍ती म्हणून इतरांच्या आणि खासकरून यहोवा देवाच्या आठवणीत राहते. मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहून येशूला देवदूतांपेक्षा “श्रेष्ठ नाव मिळाले आहे.” (इब्री लोकांस १:३, ४) आज खरे ख्रिस्ती, ख्रिस्तपूर्व काळातील विश्‍वासू स्त्री-पुरुषांची अनुकरणीय उदाहरणे म्हणून आठवण करतात. (इब्री लोकांस १२:१, २) दुर्जनांच्या नावापेक्षा हे किती वेगळे आहे; त्यांच्या नावाचा लोकांना तिरस्कार वाटतो, घृणा वाटते! होय, “चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्‍त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.” (नीतिसूत्रे २२:१) यहोवा आणि सहमानवांच्या नजरेत आपण चांगले नाव कमवू या.

सात्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो”

सुज्ञ आणि मूर्ख व्यक्‍तीमधील फरक दाखवून शलमोन म्हणतो: “सुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करितो; वाचाळ मूर्ख अधःपात पावतो.” (नीतिसूत्रे १०:८) सुज्ञ मनुष्याला चांगली कल्पना असते की, “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्याची गरज आहे हे त्याला कळते आणि तो देवाच्या आज्ञा लगेच स्वीकारतो. परंतु, मूर्ख हीच मुख्य गोष्ट समजून घेत नाही. त्याच्या अर्थहीन वाचाळतेने त्याचा नाश होतो.

शिवाय, धार्मिक व्यक्‍तीला मिळणारे संरक्षण दुर्जनाला मिळत नाही. “सात्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल. जो डोळे मिचकावितो तो दुःखास कारण होतो; वाचाळ मूर्ख अधःपात पावतो.”—नीतिसूत्रे १०:९, १०.

सात्विक मनुष्य आपल्या व्यवहारात प्रामाणिक असतो. लोक त्याचा आदर करतात, त्याच्यावर भरवसा करतात. प्रामाणिक व्यक्‍तीला मोलवान कामगार समजले जाते; अशा व्यक्‍तीला जास्त जबाबदाऱ्‍या दिल्या जातात. आणि नोकऱ्‍यांची टंचाई असतानाही अशा व्यक्‍तीला मात्र तिच्या प्रामाणिकपणामुळे काम मिळते. शिवाय, तिच्या प्रामाणिकतेमुळे घरामध्ये सुखाचे आणि शांतीचे वातावरण असते. (स्तोत्र ३४:१३, १४) आपल्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबरील नातेसंबंधांमुळे अशा व्यक्‍तीला सुरक्षित वाटते. निश्‍चितच, सुरक्षा हे एकनिष्ठ राहण्याचे फळ आहे.

परंतु, स्वार्थापोटी अप्रामाणिक होणाऱ्‍या व्यक्‍तीची गोष्ट मात्र वेगळी आहे. खोटारडी व्यक्‍ती उद्दामपणाच्या भाषणाने किंवा आपल्या हावभावांवरून आपले असत्य वागणे झाकण्याचा प्रयत्न करील. (नीतिसूत्रे ६:१२-१४) वाईट किंवा फसव्या हेतूने डोळे मिचकावणारा मनुष्य ज्यांना फसवतो त्यांना खूप मनःस्ताप होऊ शकतो. पण आज ना उद्या अशा व्यक्‍तीचा अप्रामाणिकपणा जाहीर होतोच. प्रेषित पौलाने लिहिले: “कित्येक माणसांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरिता जातात, आणि कित्येकांची मागून जातात. त्याचप्रमाणे काही चांगली कृत्येहि उघड आहेत, आणि जी गुप्त आहेत तीहि गुप्त राहू शकत नाहीत.” (१ तीमथ्य ५:२४, २५) अप्रामाणिकपणा कोणीही केला असला—पालकाने, मित्राने, विवाह सोबतीने किंवा ओळखीच्या व्यक्‍तीने तरी तो बाहेर आल्याशिवाय राहत नाही. नेहमीच अप्रामाणिक असलेल्या व्यक्‍तीवर कोण भरवसा ठेवील?

‘त्याचे मुख जीवनाचा झरा आहे’

“धार्मिकाचे मुख जीवनाचा झरा आहे; दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते.” (नीतिसूत्रे १०:११) मुखातील शब्दांनी एकतर घाव बरे केले जाऊ शकतात किंवा घाव केले जाऊ शकतात. ते एखाद्याला आनंदी बनवू शकतात किंवा निराश करू शकतात.

शब्दांमागील हेतूंविषयी इस्राएलचा राजा म्हणतो: “द्वेष कलह उत्पन्‍न करितो; प्रीति सर्व अपराधांवर झाकण घालिते.” (नीतिसूत्रे १०:१२) द्वेषामुळे मानवा-मानवांमध्ये मतभेद होऊन कलह होतात. यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांनी आपला द्वेषभाव पूर्णतः काढून टाकला पाहिजे. कशाप्रकारे? प्रेम विकसित करण्याद्वारे. “प्रीति पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) प्रीती “सर्व काही सहन करिते” अर्थात “सर्व गोष्टींना ती झाकते.” (१ करिंथकर १३:७; किंग्डम इंटरलिनियर) ईश्‍वरी प्रेम अपरिपूर्ण व्यक्‍तींकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. इतरांच्या चुकांची दवंडी पिटवण्याऐवजी काही गंभीर अपराध घडला नसल्यास प्रेम त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. ही प्रीती क्षेत्र सेवेत, कामाच्या ठिकाणी किंवा शाळेमध्ये होणारी गैरवागणूक देखील सहन करते.

सुज्ञ राजा पुढे म्हणतो: “विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.” (नीतिसूत्रे १०:१३) समजूतदार व्यक्‍तीची बुद्धी त्याच्या पावलांना मार्गदर्शित करते. त्याच्या मुखातून निघणाऱ्‍या शब्दांनी इतरांना धार्मिकतेच्या मार्गात चालायला मदत मिळते. मग त्याला किंवा त्याच्या ऐकणाऱ्‍यांनाही योग्य मार्गावर चालण्यासाठी जबरदस्ती करावी लागत नाही अर्थात शिस्तीच्या काठीचा वापर करावा लागत नाही.

‘ज्ञानाचा संग्रह करा’

आपले शब्द अर्थहीन गोष्टींनी खळखळणाऱ्‍या ओढ्यासारखे होण्याऐवजी “ज्ञानाचा झरा” कसे होऊ शकतात? (नीतिसूत्रे १८:४) शलमोन याचे उत्तर देतो: “शहाणे जन ज्ञानसंग्रह करितात, परंतु मूर्खाचे तोंड म्हटले म्हणजे साक्षात अरिष्ट होय.”—नीतिसूत्रे १०:१४.

पहिली आवश्‍यकता ही आहे की, आपले मन देवाच्या उभारणीकारक ज्ञानाने भरलेले असावे. या ज्ञानाचा केवळ एक स्रोत आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) आपण ज्ञानाचा संग्रह केला पाहिजे आणि गुप्त धनाप्रमाणे देवाच्या वचनात त्याचा शोध केला पाहिजे. असा शोध किती आनंददायक आणि फलदायी ठरतो!

आपल्या मुखातून बुद्धीचे शब्द निघण्यासाठी आपल्या अंतःकरणात शास्त्रवचनातले ज्ञानही पोचले पाहिजे. येशूने आपल्या ऐकणाऱ्‍यांना म्हटले: “चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो; तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) त्यामुळे, शिकत असलेल्या गोष्टींवर मनन करण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे. अभ्यास आणि मनन करायला प्रयास करावा लागतो एवढे खरे पण त्याने किती आध्यात्मिक वृद्धी होते! अर्थहीन बडबड करणाऱ्‍या व्यक्‍तीचा नाशाकडे जाणारा मार्ग अनुसरण्याचे काहीही कारण नाही.

होय, सुज्ञ व्यक्‍ती देवाच्या नजरेत जे योग्य ते करते आणि इतरांवर तिचा चांगला प्रभाव पडतो. ती आध्यात्मिक अन्‍नाचा विपुल प्रमाणात आस्वाद घेत असते आणि प्रभूच्या प्रतिफलदायी कार्यात व्यस्त असते. (१ करिंथकर १५:५८) विश्‍वासू असल्यामुळे ती निर्भय असते आणि तिच्यावर देवाची कृपा असते. होय, धार्मिक व्यक्‍तीला अनेक आशीर्वाद प्राप्त होतात. योग्य-अयोग्य यांसंबंधी देवाने ठरवलेल्या दर्जांनुरूप राहून आपण धार्मिकतेचा शोध घेऊ या.

[तळटीप]

^ नाव बदलण्यात आले आहे.

[२५ पानांवरील चित्र]

विश्‍वासूपणा आनंदी कौटुंबिक जीवनाला कारणीभूत ठरतो

[२६ पानांवरील चित्र]

‘सुज्ञ व्यक्‍ती ज्ञानाचा संग्रह करतात’