व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत्यूनंतरही मनुष्याचे अस्तित्व राहते का?

मृत्यूनंतरही मनुष्याचे अस्तित्व राहते का?

मृत्यूनंतरही मनुष्याचे अस्तित्व राहते का?

ईयोब नावाच्या एका पुरातन काळातील माणसाने जवळजवळ ३,५०० वर्षांआधी असा प्रश्‍न केला: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” (ईयोब १४:१४) हजारो वर्षांपासून मानवांसमोर हे गूढ आहे. काळाच्या ओघात प्रत्येक समाजातल्या लोकांनी या विषयावर सखोल विचार करून निरनिराळ्या विचारधारांना जन्म दिला आहे.

बरेच नामधारी ख्रिस्ती लोक स्वर्ग आणि नरकाच्या संकल्पनेवर विश्‍वास ठेवतात. दुसरीकडे पाहता हिंदू धर्मात पुनर्जन्माची शिकवण दिली जाते. मुस्लिम लोकांच्या दृष्टिकोनाविषयी इस्लामी धार्मिक केंद्रात मदतनीस असणारे अमीर मुवय्याह म्हणतात: “आमचा असा विश्‍वास आहे की मृत्यूनंतर एक न्यायाचा दिवस असेल. तेव्हा आपल्याला देवासमोर, अल्लाहसमोर जणू त्याच्या न्यायालयात हजर व्हावे लागेल.” इस्लामी विश्‍वासानुसार अल्लाह प्रत्येकाच्या जीवनातील कृत्यांच्या आधारावर त्याला एकतर फिरदौसात किंवा नरकात पाठवेल.

श्रीलंकेत बौद्ध आणि कॅथलिक या दोन्ही धर्मांचे लोक, घरात कोणाचा मृत्यू झाल्यास दारे व खिडक्या उघडून ठेवतात. एक लहानसा दिवा लावला जातो आणि शवपेटीत मृत व्यक्‍तीचे पाय मुख्य द्वाराकडे ठेवले जातात. असे केल्यामुळे मृत व्यक्‍तीचा आत्मा सहज बाहेर पडू शकेल अशी त्यांची समजूत आहे.

पश्‍चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे रोनाल्ड एम. बर्न्ट यांच्या मते ऑस्ट्रेलियाच्या ॲबोरिजीन लोकांचा असा समज आहे की “आत्मिकदृष्ट्या मानव अविनाशी आहेत.” काही आफ्रिकी जमातींचा असा विश्‍वास आहे की मृत्यूनंतर सर्वसाधारण लोक भूत बनतात तर खास किंवा प्रमुख लोक पूर्वज-आत्मे बनतात; यांना समाजाचे अदृश्‍य नेते समजून खूप आदर दिला जातो आणि त्यांना प्रार्थना देखील केली जाते.

काही देशांत, मृतांच्या स्थितीविषयी वेगवेगळे समज स्थानिक परंपरा आणि नाममात्र ख्रिस्ती धर्मातून आले आहेत. उदाहरणार्थ, पश्‍चिम आफ्रिकेतील अनेक कॅथलिक आणि प्रोटेस्टंट धर्मियांमध्ये एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर कोणी त्या व्यक्‍तीचा आत्मा पाहू नये म्हणून आरसे झाकून टाकण्याची पद्धत आहे.

अशाप्रकारे, ‘मृत्यूनंतर आपले काय होते?’ या प्रश्‍नाची उत्तरे फार वेगवेगळी आहेत. पण एक मूलभूत कल्पना अशी आहे की: प्रत्येक व्यक्‍तीच्या आत काहीतरी असते जे अमर असून मृत्यूनंतरही जिवंत राहते. काही लोकांची अशी समजूत आहे की हे “काहीतरी” म्हणजे आत्मा होय. उदाहरणार्थ आफ्रिकेतील आणि आशियातील काही भागांत आणि प्रशांत महासागराच्या पॉलिनेशिया, मेलनेशिया आणि मायक्रोनिशिया या सबंध प्रदेशात आत्मा अमर असतो असे मानले जाते.

जिवंत व्यक्‍तीत खरोखरच आत्मा असतो का? व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा हा आत्मा खरोखरच शरीरातून बाहेर पडतो का? मग पुढे त्याचे काय होते? मृतांकरता काय आशा आहे? या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण नाही. तुमची सांस्कृतिक किंवा धार्मिक पार्श्‍वभूमी कोणतीही असो, मृत्यू एक वास्तविकता आहे आणि तिला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा हे प्रश्‍न खरे तर तुमच्याआमच्या जीवनाशी फार जवळून संबंधित आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला या प्रश्‍नांचे परीक्षण करण्याचे प्रोत्साहन देतो.