व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अमूल्य आठवणींबद्दल कृतज्ञ!

अमूल्य आठवणींबद्दल कृतज्ञ!

जीवन कथा

अमूल्य आठवणींबद्दल कृतज्ञ!

ड्रुसिल्ला केन यांच्याद्वारे कथित

वर्ष १९३३. झनोआ केन यांच्याबरोबर नुकतंच माझं लग्न झालं होतं. माझ्याप्रमाणेच झनोआसुद्धा कॉलपोर्टर अर्थात पूर्ण वेळेचे सुवार्तिक होते. त्यांच्याबरोबर प्रचार कार्य करण्याची मलाही खूप उत्सुकता होती. त्यासाठी मला सायकल घ्यावी लागणार होती. पण, महामंदीचा काळ असल्यामुळे मला सायकल विकत घेता येत नव्हती. आता काय करावं?

माझी व्यथा ऐकून माझ्या दीरांनी भंगारातून सायकलींचे सुटे भाग गोळा करून माझ्यासाठी एक सायकल बनवायचं ठरवलं. आणि त्यांनी चक्कं एक सायकल बनवली सुद्धा! मग मी ती चालवायला शिकल्याबरोबर झनोआ व मी वूस्टर आणि हरफर्ड या इंग्लिश काऊन्टीझमध्ये जाऊन वाटेत भेटणाऱ्‍या प्रत्येकाला साक्ष देऊ लागलो.

तेव्हा मला थोडंसुद्धा वाटलं नव्हतं, की विश्‍वासाचं माझं हे लहानसं पाऊल मला समृद्ध आठवणींच्या मार्गावर नेत आहे. परंतु, माझ्या प्रिय आईबाबांनी खरं तर माझा आध्यात्मिक पाया घातला होता.

पहिल्या महायुद्धाची कठीण वर्षे

सन १९०९ च्या डिसेंबर महिन्यात माझा जन्म झाला होता. त्यानंतर काही काळानंतर आईला युगांची ईश्‍वरी योजना (इंग्रजी) या पुस्तकाची एक प्रत मिळाली. १९१४ मध्ये आईबाबांनी मला ओल्डहॅम, लँकाशायर येथे “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” पाहायला नेले. (या दोन्हींचे प्रकाशन आता ज्यांना यहोवाचे साक्षीदार म्हटले जाते त्यांनी केले होते.) मी त्या वेळेला खूप लहान होते; पण मला आठवतं, आम्ही तो फोटो ड्रामा पाहून घरी येत होतो तेव्हा मी आनंदाने उड्या मारत होते! आम्ही जिथं राहायचो तेथे, फ्रँक हिली नावाच्या एका बांधवाने एक बायबल अभ्यास गट बनवला. या अभ्यासामुळे आमच्या कुटुंबातल्या सर्वांना शास्त्रवचनांची समज मिळू लागली.

सर्व काही शांतीसुखात चाललं होतं आणि अचानक पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि पाहता पाहता सर्व शांती नाहीशी झाली. बाबांना सैन्यात भरती होण्यासाठी बोलावण्यात आलं. पण त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. कोर्टात त्यांच्याविषयी असे म्हणण्यात आले, की ते “अतिशय सभ्य गृहस्थ” आहेत. आणि स्थानीय बातमीपत्रातल्या वृत्तानुसार “शस्त्र घेण्यास नकार देण्यासाठी त्यांच्याजवळ योग्य कारण आहे, असा विश्‍वास बाळगणाऱ्‍या पुष्कळ लोकांनी” कोर्टाला अनेक पत्रं सादर केली होती.

परंतु, बाबांना पूर्णपणे सूट देण्याऐवजी, “केवळ प्रत्यक्ष लढाईत भाग घेण्यापासून” सूट देण्यात आली होती. यामुळे सर्व लोक त्यांची, आईची आणि माझी थट्टा करू लागले. कालांतराने, त्यांची जी वर्गवारी करण्यात आली होती त्यावर फेरविचार करण्यात आला आणि मग त्यांना शेतीच्या कामावर नेमण्यात आले. पण काही शेतकऱ्‍यांनी बाबांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. ते त्यांना एकतर खूप कमी पगार द्यायचे नाहीतर पगार द्यायचेच नाहीत. कुटुंबाचा गाडा पुढे चालत राहावा म्हणून आई कामाला लागली. एका खासगी लॉन्ड्रीत ती कामाला जाऊ लागली; तिथेही पगार कमी आणि काम जास्त होतं. पण आता मला समजतं, की माझ्या जीवनाला आकार देणारी ती वर्षे अतिशय कठीण असल्यामुळे मला आणखी बळकटी मिळाली कारण सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक गोष्टींबद्दल कृतज्ञता बाळगायला त्या काळानं मला शिकवलं.

लहानशी सुरवात

आम्ही ओसवेस्ट्री येथे राहायला आलो होतो तेथून सुमारे २० किलोमीटर दूर रूबन नावाच्या एका गावात कोळशाची खाण होती. या खाणीत, डॅन्यल ह्‍यूझ काम करायचे. मी त्यांना डॅन अंकल म्हणायचे. डॅन अंकलना बायबलचं खूप ज्ञान होतं. आमची आणि त्यांची ओळख झाल्यापासून ते नेहमी आमच्या घरी येऊ लागले. आणि घरी आल्यावर त्यांना फालतू गप्पा मारायला आवडायचे नाही. ते नेहमी बायबलच्या विषयांवरच बोलायचे. १९२० साली ओसवेस्ट्रीत एक बायबल अभ्यास वर्ग सुरू करण्यात आला. १९२१ साली डॅन अंकलनी मला देवाची वीणा नावाचं इंग्रजी पुस्तक दिलं. मी ते पुस्तक खूप जपून ठेवायचे. कारण या पुस्तकात बायबल शिकवणुकींचं स्पष्टीकरण इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीत दिलं होतं, की ते मला देखील समजत होतं.

आणखी एक बंधू होते, बंधू प्राईस ह्‍यूझ. * हे बंधू नंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या लंडन शाखा दफ्तराचे अध्यक्षीय सेवक बनले. ते आपल्या कुटुंबासोबत वेल्श सीमेवर ब्रॉनीगार्थच्या जवळ राहायचे. त्यांची थोरली बहीण सिसी आणि माझी आई नंतर जिवलग मैत्रिणी बनल्या.

सन १९२२ मध्ये, ‘राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा’ करण्याचे आमंत्रण देण्यात आले तेव्हा सर्वांना झालेला आनंद अजूनही मला आठवतो. त्यानंतरच्या वर्षांमध्ये मी अद्याप शाळेत होते तरी खास पत्रिकांच्या वितरणात, विशेषकरून एक्लिसिॲस्टिक्स इंडिक्टेड नावाच्या पत्रिकेच्या वितरणात अगदी आवेशाने भाग घेतला. काळाआड झालेल्या दशकामध्ये मला, मॉड क्लार्क * आणि तिची सोबतीण मेरी ग्रॅण्ट, * एडगर क्ले, * रॉबर्ट हॅडलिंग्टन, केटी रॉबट्‌र्स, एडवीन स्कीनर, * यांच्याबरोबर पर्सी चॅपमन आणि जॅक नेथन, * (हे दोघे नंतर कॅनडात तेथील कामाला हातभार लावायला गेले.) यांच्यासारख्या अनेक विश्‍वासू बंधूभगिनींच्या सहवासाचा सुहक्क मिळाल्याचे आठवते.

“आता जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत” या बायबलवर आधारित भाषणामुळे आमच्या विस्तारित क्षेत्रात समयोचित साक्ष मिळाली. १९२२ सालच्या मे १४ तारखेला, प्राईस ह्‍यूझ यांच्या नात्यातले स्टॅनली रोजर्स, लिव्हरपूलहून चर्क येथे हे भाषण द्यायला आले होते. चर्क गाव आमच्या शहरापासून उत्तरेकडे होते. इथून मग संध्याकाळी ते, ओसवेस्ट्रीतील द पिक्चर प्लेहाऊस येथे तेच भाषण द्यायला गेले. या भाषणाची जाहिरात करण्यासाठी खास पत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्यातील एक पत्रिका मी आजही जपून ठेवली आहे. या सर्व वर्षांदरम्यान आमच्या लहानशा बायबल गटाला, तीन प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटींमुळे बरेच मजबूत करण्यात आले. या प्रवासी पर्यवेक्षकांना पूर्वी आम्ही पिलग्रीम्स म्हणायचो. हर्बर्ट सिनियर, अल्बर्ट लॉईड आणि जॉन ब्लेनी, हे ते तिघे बांधव होते ज्यांनी आम्हाला भेटी दिल्या.

निर्णय घेण्याचा समय

सन १९२९ मध्ये मी बाप्तिस्मा घ्यायचं ठरवलं. मी तेव्हा १९ वर्षांची होते. पण माझी खरी परीक्षा तेव्हाच होती. माझी एका तरुणाबरोबर ओळख झाली ज्याचे वडील राजकारणात होते. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि त्यानं मला लग्नाची मागणी देखील घातली. त्या आधीच्या वर्षी, सरकार (इंग्रजी) नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. मी त्या पुस्तकाची एक प्रत त्याला दिली. पण त्याला मात्र, या पुस्तकाचे शीर्षक असलेल्या स्वर्गीय सरकाराविषयी जाणून घेण्यात कसलाही रस नव्हता हे स्पष्ट दिसून आलं. माझ्या बायबल अभ्यासातून मी शिकले होते, की यहोवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांबरोबर विवाह करून संबंध जोडू नका अशी इस्राएली लोकांना यहोवानं स्पष्ट आज्ञा दिली होती व हेच तत्त्व आजच्या ख्रिश्‍चनांनाही लागू होतं. म्हणून या तरुणाला नकार कळवणं इतकं सोप नसताना देखील मी तो कळवला.—अनुवाद ७:३; २ करिंथकर ६:१४.

पण प्रेषित पौलाच्या शब्दांतून मला मानसिक बळ मिळालं. तो म्हणतो: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलतीकर ६:९) माझ्या प्रिय डॅन अंकलनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी मला एका पत्रात असं लिहिलं: “लहान मोठ्या कसोटीस, अंतःकरणी घे, रोमकर आठ अठ्ठावीस,” ज्यात म्हटले आहे: “देवावर प्रीति करणाऱ्‍यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” हे सर्व काही इतकं सोपं नव्हतं. पण मी घेतलेला निर्णय उचित निर्णय होता हे मला नंतर समजलं. त्याच वर्षी मी कॉलपोर्टर म्हणजे सुवार्तिक म्हणून सेवा करू लागले.

आव्हान स्वीकारणे

१९३१ साली आपण सर्वांनी यहोवाचे साक्षीदार हे नवीन नाव धारण केले. आणि त्याच वर्षी, आम्ही सर्वांनी जगाची आशा, राज्य (इंग्रजी) या पुस्तिकेच्या जोरदार वितरण मोहिमेत भाग घेतला. प्रत्येक राजकर्त्याला, पाळकाला, व्यापाऱ्‍याला या पुस्तिकेची एक एक प्रत देण्यात आली. उत्तरेकडे सुमारे २५ किलोमीटर म्हणजे ओसवेस्ट्री ते व्रेक्सहॅम हे माझं क्षेत्र होतं. इतकं मोठं क्षेत्र पूर्ण करणं म्हणजे तोंडची गोष्ट नव्हती.

पुढील वर्षी बर्मिंगहॅम येथे झालेल्या एका अधिवेशनात, २४ स्वयंसेवकांची गरज असल्याचं सांगण्यात आलं. आम्ही २४ जणांनी सेवेच्या या पैलूसाठी आमची नावं अगदी आनंदानं दिली. पण हा नवीन पैलू काय आहे हे मात्र आमच्यापैकी कुणालाच माहीत नव्हतं. पण नंतर जेव्हा आम्हाला त्या पैलूविषयी कळलं तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटलं. आम्हाला जगाची आशा, राज्य या पुस्तिकेचे वितरण करायचे होते! त्यासाठी दोघा-दोघांच्या जोडीने आम्हाला नेमण्यात आले. तेव्हा आम्ही सर्वांनी मोठे प्लाकाड्‌र्स लावून राज्याची घोषणा केली व पुस्तिका वाटल्या.

चर्चच्या क्षेत्रात काम करत असताना, मला जरा लाज वाटू लागली. पण या शहरात मला कोणी ओळखत नाही, म्हणून मग मला जरा हायसं वाटलं. आणि अचानक माझ्यासमोर आलेली पहिली व्यक्‍ती माझ्या शाळेतली मैत्रीण! ती माझ्याकडे पाहतच उभी राहिली आणि म्हणाली: “हा काय अवतार केलायस?” या अनुभवानंतर मात्र माझ्या मनातून, होतं नव्हतं ते मनुष्याचं भय निघून गेलं!

दूरच्या क्षेत्रात जाणे

१९३३ साली मी झनोआबरोबर लग्न केलं. झनोआ माझ्यापेक्षा २५ वर्षानं मोठे होते. ते विधूर होते. त्यांची पहिली पत्नी आवेशी बायबल विद्यार्थिनी होती. तिचा मृत्यू झाल्यानंतरही झनोआ विश्‍वासूपणे आपली नेमणूक पूर्ण करीत राहिले होते. आमचं लग्न झाल्यावर आम्ही इंग्लंडहून जवळजवळ ५० किलोमीटर दूर नॉर्थ वेल्स येथील आमच्या नवीन क्षेत्रात राहायला आलो. आमच्या सायकलींच्या हॅण्डलवर, हॅण्डल आणि सीटच्या मधल्या दांड्यावर, सायकलीच्या कॅरियरमध्ये आम्ही आमचे काही कार्टन, सूटकेस आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या, काही बांधल्या, काही लटकवल्या. आणि शेवटी आमच्या इष्ट स्थळी सुखरूप पोहंचलो! आमच्या या नेमणुकीत आमच्या सायकलींनी आम्हाला खूप चांगली साथ दिली—सायकलीनं आम्ही कुठं कुठं जात होतो! जवळजवळ ९०० मीटर उंच असलेल्या कॅडर आयड्रीस नावाच्या एका डोंगराच्या माथ्यापर्यंत आम्ही या सायकलींवर गेलो! पण, “राज्याची सुवार्ता” ऐकण्यास आतुर असलेल्या लोकांना भेटल्यावर आम्हाला आमच्या परिश्रमांचे चीज झाल्यासारखे वाटायचे.—मत्तय २४:१४.

आमच्या या नवीन क्षेत्रात जाऊन आम्हाला जास्त दिवसही झाले नव्हते; तेथील लोकांनी आम्हाला सांगितले, की टॉम प्राईस नावाचा कोणी एक मनुष्य आमच्यासारखाच त्यांना प्रचार करतो. आम्ही टॉमला शेवटी शोधून काढले. वेल्शपूल जवळच्या लाँग माऊन्टन येथे तो राहत होता—त्याला भेटून किती आश्‍चर्य वाटलं. खूप वर्षांपूर्वी, म्हणजे मी जेव्हा साक्ष द्यायला नुकतीच सुरवात केली होती तेव्हा मी या टॉमला समेट (इंग्रजी) नावाचे बायबल अभ्यासासाठी तयार केलेले पुस्तक दिले होते. त्याने या पुस्तकाचा स्वतःहूनच अभ्यास केला होता व आणखी साहित्य पाठवावे म्हणून त्यानं लंडन शाखेला पत्र पाठवलं आणि तेव्हापासून तो त्याला मिळालेल्या नवीन विश्‍वासाची साक्ष सर्वांना देत होता. टॉमबरोबर ओळख झाल्यानंतर, आम्ही दोघं पतीपत्नी आणि टॉम असे तिघं मिळून बहुतेकदा तासन्‌तास अभ्यास करून एकमेकांना उत्तेजन द्यायचो; खरोखर, तो काळ मनाला तजेला देणारा होता.

संकटामुळे आशीर्वाद मिळतात

१९३४ साली नॉर्थ वेल्सच्या जवळपासच्या सर्व कॉलपोर्टर्सना धार्मिक शासक (इंग्रजी) नावाच्या पुस्तिकेच्या वितरणात हातभार लावण्यासाठी व्रेक्सहॅम शहरात जायचे आमंत्रण मिळाले. ही खास मोहीम आम्ही ज्या दिवशी सुरू करणार होतो त्याच्या आदल्याच दिवशी तेथे एक दुर्घटना घडली होती. व्रेक्सहॅमच्या उत्तरेकडे तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ग्रेसफोर्ड येथील एका कोळशाच्या खाणीत स्फोट झाला होता. या स्फोटात २६६ कामगार मृत्यूमुखी पडले होते. २०० पेक्षा अधिक मुलं अनाथ झाली होती आणि १६० स्त्रिया विधवा झाल्या होत्या.

मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांची यादी करून आम्हाला त्यांना व्यक्‍तिशः भेट देऊन पुस्तिका द्यायची होती. मला देण्यात आलेल्या नावांच्या यादीत, मिसेस. चॅडवीक यांचे नाव होते. त्यांचा १९ वर्षांचा मुलगा या दुर्घटनेत बळी पडला होता. मी त्यांच्या घरी त्यांना भेट द्यायला गेले तेव्हा मिसेस. चॅडवीक यांचा थोरला मुलगा जॅक आपल्या आईचे सांत्वन करायला आला होता. या तरुणाने, म्हणजे जॅकनं मला ओळखलं. पण तसं बोलून दाखवलं नाही. त्यानं मी दिलेली पुस्तिका वाचून काढली आणि काही वर्षांआधी मी त्याला दिलेली आणखी एक पुस्तिका, शेवटले युद्ध (इंग्रजी) ही देखील वाचून काढली.

नंतर जॅक व त्याची बायको मे, माझ्या घरचा पत्ता शोधत शोधत, आणखी साहित्य घेण्यासाठी घरी आले. १९३६ साली त्यांनी व्रेक्सहॅम येथील त्यांच्या घरात सभा चालवण्यास परवानगी दिली. सहा महिन्यांनंतर बंधू अल्बर्ट लॉईड यांच्या भेटीनंतर त्या ठिकाणी एक मंडळी स्थापन करण्यात आली व जॅक चॅडवीकला अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त करण्यात आले. व्रेक्सहॅममध्ये आता तीन मंडळ्या आहेत.

जिप्सी ट्रेलरमध्ये जीवन

आतापर्यंत, एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी आम्ही जायचो तेव्हा, मिळेल त्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो. पण झनोआने शेवटी ठरवले, की आपल्याजवळ स्वतःचे घर असावे जे आम्ही आमच्यासोबतच सगळीकडे नेऊ शकू. झनोआ एक हुशार जिप्सी सुतार असल्यामुळे त्यानं आमच्यासाठी जिप्सी पद्धतीचं एक ट्रेलर बनवलं. आम्ही ट्रेलरचं नाव एलिझाबेथ ठेवलं. बायबलमधील या नावाचा अर्थ “विपुलतेचा देव” असा होतो.

एकदा, एका ओढ्याजवळच्या फळबागेत मुक्काम केल्याचं मला विशेष आठवतं. मला तर हे परादीसच वाटतं होतं! आमचं हे ट्रेलर लहान होतं, त्यात इतक्या काही सुखसोयी नव्हत्या तरी आम्ही दोघंही त्यात अत्यंत सुखी होतो. थंडीच्या दिवसांत, आमचा बिछाना गारठून जायचा आणि ट्रेलरच्या खिडक्या वगैरे सर्व काही बंद असल्यामुळे आतमधील दमट वातावरणामुळे ट्रेलरच्या छतावर पाणी जमून थेंबथेंब खाली पडायचं. शिवाय, आम्हाला नेहमी पाणी बाहेरून आणावं लागायचं, कधीकधी तर दूरवरून पाणी आणावं लागायचं. पण या सर्व अडीअडचणींना आम्ही दोघांनी मिळून तोंड दिलं.

एका हिवाळ्यात मला बरं वाटतं नव्हतं. आमच्याजवळ खायला खूप थोडं होतं शिवाय खिशात पैसे नव्हते. झनोआ माझ्या शेजारी बिछान्यावर बसले, माझे हात स्वतःच्या हातात घेऊन त्यांनी मला स्तोत्र ३७:२५ वाचून दाखवलं. तिथं म्हटलं आहे: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान्‌ निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” मग माझ्याकडे बघत ते म्हणाले, “आपल्याला लवकरात लवकर काही मदत मिळाली नाही तर रस्त्यावर भीक मागावं लागेल. पण यहोवा हे आपल्याबाबतीत होऊ देणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे!” त्यानंतर ते आमच्या शेजारपाजारच्या लोकांना साक्ष द्यायला निघून गेले.

झनोआ दुपारी मला काही तरी प्यायला म्हणून देण्यासाठी घरी आले तर त्यांना एक पाकीट दिसलं. त्या पाकिटात त्यांच्या वडिलांनी ५० पाऊण्ड पाठवले होते. काही वर्षांआधी झनोआवर पैशाची अफरातफर केल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता आणि अलिकडेच त्यांना निर्दोष ठरवण्यात आले होते. हे पैसे, भरपाई म्हणून पाठवण्यात आले होते. किती वेळेवर आम्हाला हे पैसे मिळाले होते!

एक कटू धडा

कधीकधी, एखादी घटना घडून अनेक वर्षे उलटतात पण त्या घटनेतून आपण धडाही शिकतो. जसे की, १९२७ मध्ये माझी शाळा संपायच्या आधी, मी माझ्या सर्व वर्गमित्र/मैत्रिणींना आणि सर्व शिक्षकांना साक्ष दिली—मात्र लव्हिन्या फरक्लो या शिक्षिकेला दिली नाही. मी पुढे काय करणार आहे, हे जाणून घेण्यात कुणाला इतकी आस्था नसल्यामुळे शिवाय मिस फरक्लोबरोबर माझं इतकं काही पटत नसल्यामुळे मी तिला काहीही सांगायचं नाही असं ठरवलं. पण २० वर्षांनंतर, याच शिक्षिका यहोवाची साक्षीदार बनल्याचे आपल्या सर्व जुन्या मित्र-मैत्रिणींना व विद्यार्थ्यांना सांगायला पुन्हा आल्या आहेत, असं माझ्या आईनं मला सांगितलं तेव्हा मला केवढं आश्‍चर्य आणि आनंद झाला असेल याची कल्पना करा!

आम्ही एकमेकींना भेटलो तेव्हा मी तिला, माझ्या विश्‍वासाबद्दल आणि पुढे काय करणार आहे याबद्दल काहीच का सांगितलं नव्हतं त्याचं कारण सांगितलं. तिनं माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग म्हणाली: “खरं तर मी पहिल्यापासून सत्याच्या शोधात होते. माझ्या आयुष्याचं तेच एक ध्येय होतं!” या घटनेवरून मला एक कटू धडा मिळाला होता—आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या सर्वांना साक्ष द्यायला कधीही विसरू नये आणि एखादी व्यक्‍ती कसा प्रतिसाद देईल याविषयी आधीच स्वतःचं मत बनवू नये.

आणखी एक युद्ध—आणि मग पुढे

१९३० चे दशक संपायच्या बेतात असताना युद्धाचे ढग पुन्हा एकदा जमू लागले होते. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेला माझा भाऊ डेनिस याला सैनिकी सेवेतून फक्‍त एका अटीवर सूट मिळाली होती. अट अशी होती की त्याने त्याची प्रापंचिक नोकरी चालू ठेवावी. त्यानं पूर्वी सत्यामध्ये इतकी आवड दाखवली नव्हती. त्यामुळे झनोआ आणि मी, स्थानीय पायनियरांना म्हणजे रुपर्ट ब्रॅडबरी आणि त्याचा भाऊ डेवीड यांना माझ्या भावाला भेट देण्याची विनंती केली. त्यांनी डेनिसला भेटी दिल्या व त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास देखील केला. १९४२ साली डेनिसचा बाप्तिस्मा झाला. त्यानंतर त्याने पायनियरींग सुरू केली व १९५७ मध्ये त्याला प्रवासी पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले.

१९३८ साली आमच्या पहिल्या मुलीचा, एलिझाबेथचा जन्म झाला. आमचं कुटुंब वाढू लागल्यामुळे झनोआनं आमच्या ट्रेलरचा आकार वाढवला. १९४२ मध्ये आमची दुसरी मुलगी युनिस हिचा जन्म झाला तेव्हा आम्हाला एक कायमचे घर बांधण्याची गरज पडली. त्यामुळे झनोआनं काही वर्षांसाठी पायनियरींग सोडून दिली आणि आम्ही व्रेक्सहॅम इथं एका लहानशा घरात राहायला गेलो. नंतर आम्ही चेसशायर विभागाजवळच्या मिडलीज येथे स्थायिक झालो. तिथंच माझ्या प्रिय झनोआचा १९५६ मध्ये मृत्यू झाला.

आमच्या दोन्ही मुली पुढे पूर्ण वेळेच्या सुवार्तिक झाल्या. दोघींची लग्नं होऊन त्या आता सुखात आहेत. युनिस आणि मंडळीत वडील म्हणून सेवा करत असलेला तिचा पती हे दोघं अजूनही लंडनमध्ये खास पायनियर म्हणून सेवा करतात. एलिझाबेथचा पतीसुद्धा मंडळीत वडील आहे. ते दोघं, त्यांची मुलं, त्यांची नातवंड म्हणजे माझी चार पतवंडं, हे सर्व माझ्या जवळपासच, प्रिस्टन, लँकाशायर येथे राहतात. त्यामुळे मला आनंद वाटतो.

माझ्या घरासमोरील रस्त्याच्या पलिकडेच राज्य सभागृह असल्यामुळे मी तेथपर्यंत चालत जाऊ शकते याचा मला आनंद वाटतो. अलिकडील काही वर्षांपासून मी एका गुजराती मंडळीत जाऊ लागले आहे. हा गटसुद्धा याच सभागृहात जमतो. ही नवीन भाषा शिकायला मला जरा त्रास होतो कारण आता मला पहिल्यासारखं ऐकू येत नाही. कधीकधी काही शब्द मला तरुणांप्रमाणे चटकन कळत नाहीत. पण तरीसुद्धा मला यात आनंद मिळतो.

मी अद्यापही घरोघरच्या प्रचार कार्यात जाऊ शकते व माझ्या घरी बायबल अभ्यास घेऊ शकते. मित्रजन मला भेटायला येतात तेव्हा जुन्या आठवणी सांगायला मला खूप आवडते. जवळजवळ ९० वर्षांपासून यहोवाच्या लोकांबरोबर सहवास राखल्यामुळे मला मिळालेल्या अमूल्य आशीर्वादांच्या आठवणींबद्दल मी खूप कृतज्ञ आहे!

[तळटीपा]

^ टेहळणी बुरूज (इंग्रजी), एप्रिल १, १९६३ च्या अंकात प्राईस ह्‍यूझ यांची जीवन कथा प्रकाशित करण्यात आली आहे. “विश्‍वासू संघटनेसोबत वाटचाल” असे तिचे शीर्षक आहे.

^ यहोवाच्या या सर्व विश्‍वासू सेवकांचे अनुभव टेहळणी बुरूजच्या आधीच्या अंकांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

^ यहोवाच्या या सर्व विश्‍वासू सेवकांचे अनुभव टेहळणी बुरूजच्या आधीच्या अंकांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

^ यहोवाच्या या सर्व विश्‍वासू सेवकांचे अनुभव टेहळणी बुरूजच्या आधीच्या अंकांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

^ यहोवाच्या या सर्व विश्‍वासू सेवकांचे अनुभव टेहळणी बुरूजच्या आधीच्या अंकांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

^ यहोवाच्या या सर्व विश्‍वासू सेवकांचे अनुभव टेहळणी बुरूजच्या आधीच्या अंकांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

[२५ पानांवरील चित्र]

“आता जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत” या, मे १४, १९२२ रोजी मी ऐकलेल्या भाषणाची जाहिरात पत्रिका

[२६ पानांवरील चित्र]

१९३३ साली झानोबरोबर माझं लग्न झाल्यानंतरच्या काही दिवसांनी

[२६ पानांवरील चित्र]

माझ्या पतीनं तयार केलेल्या “एलिझाबेथ” ट्रेलरशेजारी