व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगल्या सवयींनी तुमचे भले होऊ द्या

चांगल्या सवयींनी तुमचे भले होऊ द्या

चांगल्या सवयींनी तुमचे भले होऊ द्या

एक म ष्य अथेन्सच्या उपनगरात १२ वर्षे राहिला होता. दररोज, घरून कामाला जाताना तो नेहमी एकाच रस्त्याने जायचा. मग तो दुसऱ्‍या एका उपनगरात राहायला गेला. एकदा कामानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला. नंतर त्याला कळले की तो पूर्वीच्या म्हणजे त्याच्या जुन्या ठिकाणी आला होता. सवयीमुळे तो चुकीने त्याच्या जुन्या घरी गेला होता!

म्हणूनच की काय, सवयीला कधीकधी स्वभाव असेही म्हटले जाते. हा असा प्रभाव असतो जो आपल्या जीवनावर जबरदस्त परिणाम करत असतो. जर याचा असा अर्थ घेतला तर सवयीची तुलना अग्नीशी करता येऊ शकते. अंधारात अग्नीमुळे प्रकाश मिळतो, अग्नीमुळे आपल्याला उब मिळते, अग्नीवर आपण अन्‍न शिजवू शकतो. परंतु हीच अग्नी उग्र स्वरूप धारण करून जीवितहानी आणि मालमत्तेची राखरांगोळी करू शकते. सवयींच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे. चांगल्या सवयींमुळे लाभ होतो. परंतु सवयी घातक देखील ठरू शकतात.

लेखाच्या सुरवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्या मनुष्याला त्याच्या या सवयीमुळे निदान काही वेळ तरी वाहतुकीत अडकून राहावे लागले. परंतु महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबतीत, सवयींमुळे आपल्याला यश मिळू शकते किंवा आपले बरेवाईट होऊ शकते. बायबलमधील खरोखर घडलेल्या काही उदाहरणांचा आपण विचार करू. सवयी आपल्याला देवाची सेवा करण्यास व त्याच्याबरोबर निकटचा संबंध राखण्यास कशा मदत करू शकतात किंवा कशा रोखू शकतात ते या उदाहरणांवरून आपल्याला पाहायला मिळेल.

चांगल्या व वाईट सवयींची बायबलमधील उदाहरणे

नोहा, ईयोब, दानीएल या सर्व लोकांचा यहोवाबरोबर निकटचा संबंध असल्यामुळे त्यांच्यावर यहोवाचा भरपूर आशीर्वाद होता. ‘त्यांच्या धार्मिकतेमुळे’ बायबल त्यांची प्रशंसा करते. (यहेज्केल १४:१४) महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या तिन्ही विश्‍वासू पुरुषांच्या जीवनावरून आपल्याला दिसून येते की त्यांनी स्वतःला चांगल्या सवयी लावल्या होत्या.

नोहाला एक जहाज बांधण्यास सांगण्यात आले. फुटबॉल मैदानाइतके लांब आणि पाच मजली इमारतीपेक्षा उंच जहाज त्याला बांधायचे होते. प्राचीन काळच्या जहाज बांधणाऱ्‍या कोणालाही हा एक अजस्र प्रकल्प वाटला असता. कोणत्याही आधुनिक साधनसामुग्रीविना नोहा व त्याच्या कुटुंबाच्या सात सदस्यांनी हे जहाज बांधले. याशिवाय, नोहा त्याच्या दिवसांतील लोकांना प्रचार देखील करीत राहिला. त्याने आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक आणि शारीरिक गरजा देखील पूर्ण केल्या याची आपण खात्री बाळगू शकतो. (२ पेत्र २:५) चांगल्या सवयी असल्यामुळे नोहा हे सर्व करू शकला. शिवाय, बायबल इतिहासात नोहाविषयी असे म्हटले आहे, की तो “देवाबरोबर चालला. . . . देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ति ६:९, २२; ७:५) बायबलमध्ये त्याला “सात्विक” म्हटले आहे, याचा अर्थ जलप्रलय येऊन गेल्यानंतर व बाबेलमध्ये लोकांनी यहोवाविरुद्ध केलेल्या बंडाळीनंतरही तो देवाबरोबर चालत राहिला असावा. होय, आपल्या जीवनाच्या शेवटल्या श्‍वासापर्यंत म्हणजे ९५० वर्षांपर्यंत नोहा देवाबरोबर चालत राहिला.—उत्पत्ति ९:२९.

ईयोबाच्या चांगल्या सवयींमुळे तो “सात्विक, सरळ” मनुष्य बनू शकला. (ईयोब १:१, ८; २:३) आपल्या मुलांनी, ‘न जाणो पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल’ म्हणून कुटुंबाचा याजक या नात्याने प्रत्येक भोजनसमारंभानंतर तो त्यांच्यासाठी बलींचे हवन करीत असे. “असा ईयोबाचा नित्यक्रम असे.” (तिरपे वळण आमचे.) (ईयोब १:५) ईयोबाच्या कुटुंबात, यहोवाच्या उपासनेवर केंद्रित असलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रथम स्थान दिले जायचे यात काहीच शंका नाही.

दानीएलाने आयुष्यभर देवाची “नित्य सेवा” केली. (दानीएल ६:१६, २०) दानीएलाला कोणत्या चांगल्या आध्यात्मिक सवयी होत्या? एक सवय म्हणजे तो अगदी नियमितरीत्या यहोवाला प्रार्थना करीत असे. या प्रथेविरुद्ध राजाज्ञा देण्यात आली असतानाही दानीएल ‘आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसांतून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना व आपल्या देवाचा धन्यवाद करीत असे.’ (दानीएल ६:१०) देवाला प्रार्थना करण्याच्या त्याच्या या प्रथेमुळे, त्याच्या जीवाला धोका असताना देखील त्याने घाबरून जाऊन ही प्रथा अथवा चांगली सवय सोडून दिली नाही. उलट प्रार्थना करण्याच्या याच सवयीमुळे त्याला देवाला एकनिष्ठ राहण्याचे धाडस मिळाले. दानीएलाला देवाच्या रोमांचकारी अभिवचनांचा अभ्यास करून त्यांच्यावर मनन करण्याची देखील चांगली सवय होती हे स्पष्ट दिसते. (यिर्मया २५:११, १२; दानीएल ९:२) या चांगल्या सवयींनीच तर त्याला शेवटपर्यंत टिकून राहायला, जीवनाच्या धावेवरून चरमसीमेपर्यंत धावत राहायला मदत केली.

परंतु, दीनाला तिच्या वाईट सवयीचे कडू फळ चाखावे लागले. यहोवाची उपासना न करणाऱ्‍या “स्त्रियांस ती भेटावयास जायची.” (उत्पत्ति ३४:१, NW) ही अनपायकारक वाटणारी सवय अपायकारक ठरली. पहिल्यांदा, ‘आपल्या बापाच्या घरातल्या सर्वांमध्ये मोठा मान’ असलेल्या एका तरुणाने अर्थात शखेमने तिला भ्रष्ट केले. मग, त्याचा सूड घेण्यासाठी तिच्या दोन भावांनी नगरातील सर्व पुरुषांची कत्तल केली. काय हा भयंकर परिणाम!—उत्पत्ति ३४:१९, २५-२९.

आपल्या सवयींमुळे आपल्याला हानी नव्हे तर फायदा होईल, याची आपण खात्री कशी करू शकतो?

सवयींचा उपयोग करणे

“आपल्या सवयी आपल्या नशिबात लिहिल्याप्रमाणे असतात” असे एका तत्त्वज्ञानीने लिहिले. पण तसे असण्याची गरज नाही. बायबल आपल्याला दाखवून देते, की आपण आपल्या वाईट सवयी बदलून स्वतःला चांगल्या सवयी लावण्याचा निर्णय घेऊ शकतो.

चांगल्या सवयी असल्यास, ख्रिस्ती कार्यात आपण अधिक कार्यक्षम असू, या कार्यांत नियमित राहण्यास आपल्याला जड जाणार नाही. अलेक्स नावाच्या ग्रीसमधील एका ख्रिश्‍चनाने म्हटले: “वेगवेगळी कामं आराखड्यानुसार करण्याच्या माझ्या सवयीमुळे माझ्या पुष्कळ बहुमूल्य वेळेची बचत होते.” ख्रिस्ती वडील या नात्याने सेवा करणारे थिओफिलिस यांच्या मते, योजना करण्याच्या सवयीमुळे ते आपले काम परिणामकारक पद्धतीने पार पाडू शकतात. ते म्हणतात: “चांगल्याप्रकारे योजना करण्याची मला सवय नसती तर मी माझ्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या यशस्वीपणे पूर्ण करू शकलो नसतो याची मला पूर्ण खात्री पटली आहे.”

ख्रिस्ती या नात्याने आपल्याला “आपण ज्या नियमाने एथवर पोहचलो त्या नियमाने” चालण्यास आर्जवण्यात आले आहे. (तिरपे वळण आमचे.) (फिलिप्पैकर ३:१६, पं.र.भा.) नियम म्हणजे “सवयीनुसार . . . ठराविक पद्धतीचे कार्य.” चांगल्या सवयींमुळे आपल्याला नेहमीच फायदा होतो. कारण, प्रत्येक पाऊल उचलताना मग आपल्याला विचार करावा लागत नाही—आपण आधीच एक चांगला नमुना ठरवलेला असतो जो आपण सवयीने अनुसरत राहतो. मुळावलेल्या सवयी असल्यास आपण आपोआप कार्य करू लागतो. सुरक्षितपणे वाहन चालवण्याची सवय असलेला चालक जसे, रस्त्यावर धोका उत्पन्‍न होतो तेव्हा लगेचच जीवनरक्षक निर्णय घेऊ शकतो तसेच चांगल्या सवयी आपल्याला, ख्रिस्ती मार्गावर चालत असताना तत्परतेने उचित निर्णय घ्यायला मदत करू शकतात.

जेरमी टेलर या इंग्रज लेखकाने म्हटले: “कार्यांतून सवयी उत्पन्‍न होतात.” आपल्या सवयी चांगल्या असतील तर आपण सहजरीत्या चांगल्या गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ, ख्रिस्ती सेवक या नात्याने आपल्याला नियमितरीत्या प्रचार कार्यात जाण्याची सवय असेल तर क्षेत्र सेवेत जाणे आपल्याला कठीण वाटणार नाही; उलट आपल्याला आनंदच वाटेल. प्रेषितांविषयी आपण असे वाचतो: “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (तिरपे वळण आमचे.) (प्रेषितांची कृत्ये ५:४२; १७:२) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आपण फक्‍त अधूनमधून सेवेत जात असू तर आपला आत्मविश्‍वास कमी होईल, ख्रिस्ती सेवेच्या या महत्त्वपूर्ण पैलूत रुळण्याकरता आपल्याला खूप वेळ लागेल.

ख्रिस्ती मार्गाक्रमणातील इतर पैलूंच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. चांगली सवय आपल्याला ‘रात्रंदिवस देवाचे वचन’ वाचण्यास मदत करू शकते. (यहोशवा १:८; स्तोत्र १:२) एका ख्रिस्ती बांधवाला दररोज रात्री निजण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे बायबल वाचण्याची सवय आहे. तो कितीही थकलेला असला तरी बायबल न वाचता तो झोपू शकत नाही. त्याला उठून आपली ही आध्यात्मिक गरज पूर्ण करावीच लागते. या चांगल्या सवयीमुळे त्याला अनेकदा एक वर्षात संपूर्ण बायबल वाचून काढता आले आहे.

आपला आदर्श अर्थात येशू ख्रिस्त याला, बायबलची चर्चा केल्या जाणाऱ्‍या सभांना उपस्थित राहण्याची सवय होती. “आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन [तो] वाचावयास उभा राहिला.” (लूक ४:१६) ज्यो नावाचे एक बंधू ख्रिस्ती मंडळीत वडील या नात्याने सेवा करतात. त्यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांना उशिरापर्यंत काम करावे लागते. परंतु, त्यांच्या सवयीने त्यांच्यामध्ये सभांना नियमितरीत्या उपस्थित राहण्याची गरज व इच्छा उत्पन्‍न करण्यास मदत केली. ते म्हणतात: “या सवयीमुळेच मी आतापर्यंत तग धरून राहू शकलोय. जीवनातल्या आव्हानांना व समस्यांना यशस्वीरीत्या तोंड द्यायला मला या सवयीमुळेच आध्यात्मिक शक्‍ती मिळते.”—इब्री लोकांस १०:२४, २५.

जीवनाच्या ख्रिस्ती शर्यतीत धावणाऱ्‍यांना अशा सवयी असणे अतिशय महत्त्वाचे आहे. यहोवाच्या लोकांचा छळ केला जात असलेल्या एका देशातून आलेल्या अहवालात असे म्हटले होते: “चांगल्या आध्यात्मिक सवयी असलेल्यांना व सत्याबद्दल कृतज्ञता असलेल्यांना, परीक्षा येतात तेव्हा सत्यात टिकून राहायला जड जात नाही. परंतु जे लोक ‘सुवेळी’ सभा चुकवतात, क्षेत्र सेवेत अनियमित असतात आणि लहानसहान गोष्टींतही हातमिळवणी करतात ते, कठीणातल्या ‘कठीण’ परीक्षेत सहज बळी पडतात.”—२ तीमथ्य ४:२.

वाईट सवयी टाळा, चांगल्या सवयी लावा

असे म्हटले जाते, की ‘तुम्हाला ज्या सवयी मंजूर आहेत फक्‍त त्याच सवयी स्वतःला लावून घ्याव्यात.’ वाईट सवयी जाचक व प्रबळ होऊ शकतात. तरीपण तुम्ही त्या सोडू शकता.

स्टेल्ला नामक एका स्त्रीला एकेकाळी टीव्ही पाहण्याचे जणू वेडच लागले होते. ती म्हणते: “मी ज्या ज्या वाईट सवयीला बळी पडले त्याच्या मागे नेहमी एक ‘खरं’ कारण असायचं.” तिच्या टीव्ही पाहण्याच्या सवयीबाबतीतही असेच होते. “थोडा विरंगुळा” म्हणून किंवा “बदल” म्हणून आपण टीव्ही पाहतो अशी ती स्वतःची समजूत घालायची. पण टीव्ही पाहण्यावर तिचे काही नियंत्रण राहिले नाही; तासन्‌तास ती टीव्हीपुढे बसू लागली. ती म्हणते: “या वाईट सवयीमुळे माझी आध्यात्मिक प्रगती मात्र मंदावली.” तिने मनाशी ठाम निश्‍चय केल्यामुळे ती टीव्ही पाहण्याचे कमी करू लागली. शिवाय ती निवडक कार्यक्रम पाहू लागली. ती म्हणते: “मला टीव्ही पाहण्याचा कधी मोह होतो तेव्हा, मी ही सवय का मोडली ते सतत आठवण्याचा प्रयत्न करते. आणि केलेल्या निश्‍चयाशी जडून राहण्यास मदत मिळावी म्हणून यहोवावर विसंबून राहते.”

खॉरॉलॉमबस नावाचा एक ख्रिस्ती बांधव त्याच्या एका वाईट सवयीविषयी सांगतो जी त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधा होती. दिरंगाई करण्याची त्याला वाईट सवय होती. तो म्हणतो: “माझी ही सवय चांगली नाही याची मला जाणीव झाल्यानंतर मी माझ्या जीवनात सुधारणा करू लागलो. ध्येये गाठण्याचा प्रयत्न करताना ती मला केव्हा आणि कशी पूर्ण करता येतील याबाबतीत मी निश्‍चित योजना देखील करू लागलो. माझे निर्णय व योजना यांनुसार नियमितरीत्या कार्य करणे हेच माझ्या सवयीवरचे औषध होते. ही चांगली सवय मी आजवर टिकवून ठेवली आहे.” खरेच, वाईट सवयींऐवजी चांगल्या सवयी लावणे किती उत्तम!

आपल्या सोबत्यांमुळेसुद्धा आपल्याला चांगल्या अथवा वाईट सवयी लागू शकतात. वाईट लोकांबरोबर मैत्री केल्याने जशा आपल्याला वाईट सवयी लागू शकतात त्याचप्रमाणे चांगल्या लोकांबरोबर मैत्री केल्याने आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. ज्याप्रकारे “दुष्ट संगतीने चांगल्या रीतीभाती बिघडतात” त्याप्रकारे चांगल्या संगतीमुळे आपल्याला चांगल्या सवयींचे अनुकरण करायला उदाहरणे मिळू शकतात. (१ करिंथकर १५:३३, पं.र.भा.) याहूनही महत्त्वाचे म्हणजे, आपल्या सवयींमुळे देवाबरोबरचा आपला नातेसंबंध एकतर मजबूत होऊ शकतो किंवा कमजोर होऊ शकतो. स्टेल्ला म्हणते: “आपल्या सवयी चांगल्या असल्या तर, यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्याला करावे लागणारे प्रयत्न कठीण वाटत नाहीत. वाईट सवयी असल्या तर या प्रयत्नांत अडथळा येत राहतो.”

तेव्हा, स्वतःला चांगल्या सवयी लावा व अशा सवयींचे मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहो. त्या तुमच्या जीवनात जबरदस्त व लाभदायक प्रभाव ठरू शकतात.

[१९ पानांवरील चित्र]

अग्नीप्रमाणेच, सवयी देखील लाभदायक असू शकतात किंवा हानीकारक असू शकतात

[२१ पानांवरील चित्र]

शब्बाथाच्या दिवशी सभास्थानात जाऊन देवाचे वचन वाचण्याची येशूची सवय होती

[२२ पानांवरील चित्रे]

चांगल्या आध्यात्मिक सवयींमुळे यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध मजबूत होतो