तुमची प्रगती सर्वांस दिसून येऊ द्या
तुमची प्रगती सर्वांस दिसून येऊ द्या
“तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यांत गढून जा.”—१ तीमथ्य ४:१५.
१. एखादे फळ पिकलेले आहे व खाण्यासाठी तयार आहे हे तुम्ही कसे सांगू शकता?
आंबा, पेरू, अननस इत्यादी या फळांपैकी तुमच्या आवडत्या फळाचे चित्र डोळ्यापुढे उभे करा. ते पिकलेले आहे किंवा खाण्यासाठी तयार आहे की नाही हे तुम्ही सांगू शकता का? निश्चितच. त्याच्या विशिष्ट सुगंधावरून, रंगावरून, शिवाय हातात घेऊन पाहिल्यावरही तुम्हाला लगेच कळते की फळ तयार आहे. आपोआप तुमच्या तोंडाला पाणी सुटते. पहिला तुकडा तोंडात टाकताच तुम्ही सुखावता. आपल्या आवडत्या फळाचा रसाळ गोडवा तोंडात घोळवण्यात खरोखर एक आगळाच आनंद आहे!
२. परिपक्वता कशावरून दिसून येते आणि व्यक्तिगत नातेसंबंधांवर याचा कसा परिणाम होतो?
२ या साध्याशाच आनंददायक अनुभवाची जीवनातल्या इतर गोष्टींशीही तुलना करता येते. फळ तयार आहे किंवा नाही हे जसे आपण सांगू शकतो तसेच एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक परिपक्वता देखील बऱ्याच गोष्टींतून दिसून येते. ही परिपक्वता त्या व्यक्तीची निर्णयशक्ती, समज आणि सुबुद्धी पाहून आपण ठरवू शकतो. (ईयोब ३२:७-९) जे लोक आपल्या वृत्तीतून आणि कृतींतून हे गुण दाखवतात त्यांच्या सहवासात राहणे आणि त्यांच्यासोबत काम करणे खरोखर आनंददायक असते.—नीतिसूत्रे १३:२०.
३. आपल्या काळातील लोकांविषयी येशूने जे म्हटले त्यावरून परिपक्वतेविषयी आपल्याला काय कळते?
३ दुसरीकडे पाहता, एखाद्या व्यक्तीची कदाचित शारीरिक वाढ झालेली असेल पण तिच्या वागण्याबोलण्यावरून, भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या ती अजूनही अपरिपक्व आहे असे दिसून येईल. उदाहरणार्थ आपल्या काळातील बहकलेल्या पिढीला उद्देशून येशू ख्रिस्ताने म्हटले: “योहान खातपीत आला नाही, तर ‘त्याला भूत लागले’ असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र खातपीत आला, तर त्याच्याविषयी म्हणतात, ‘पाहा! खादाड व दारुबाज मनुष्य.’” हे लोक शारीरिक दृष्टीने प्रौढ असले तरीसुद्धा येशूने म्हटले की त्यांचे वागणे ‘मुलांसारखे’ होते, अर्थातच ते परिपक्व मुळीच नव्हते. म्हणूनच तो पुढे असे म्हणाला: “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.”—मत्तय ११:१६-१९.
४. प्रगती आणि परिपक्वता कोणत्या मार्गांद्वारे दिसून येते?
४ येशूच्या शब्दांवरून आपल्याला कळून येते की एखाद्या व्यक्तीजवळ खरी सुबुद्धी—परिपक्वतेचे एक खास ओळखचिन्ह—आहे किंवा नाही हे त्या व्यक्तीच्या कृत्यांवरून आणि त्यांमुळे होणाऱ्या परिणामांवरून दिसून येते. या संदर्भात, प्रेषित पौलाने तीमथ्याला दिलेला सल्ला लक्षात घ्या. तीमथ्याने कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत हे स्पष्ट केल्यानंतर पौलाने म्हटले: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव, ह्यांत गढून जा.” (१ तीमथ्य ४:१५) होय, परिपक्वतेच्या दिशेने होणारी ख्रिस्ती प्रगती ‘दिसून येते,’ किंवा स्पष्टपणे ओळखू येते. ख्रिस्ती परिपक्वता ही चमकत्या प्रकाशाप्रमाणे आहे, ती आंतरिक नसते, अर्थात ती लपून राहात नाही. (मत्तय ५:१४-१६) म्हणूनच, आपण आता अशा दोन प्रमुख मार्गांवर विचार करू या ज्यांद्वारे प्रगती आणि परिपक्वता दिसून येते: (१) अधिक ज्ञान, समज आणि सुबुद्धी मिळवणे; (२) आत्म्याचे फळ प्रगट करणे.
विश्वासाचे आणि ज्ञानाचे एकत्व
५. परिपक्वतेची व्याख्या कशी करता येईल?
५ बहुतेक शब्दकोष परिपक्वतेची व्याख्या पूर्ण वाढ झालेली स्थिती, प्रौढता, शेवटली पायरी गाठणे किंवा अपेक्षित मर्यादेपर्यंत पोचणे अशी करतात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे एखादे फळ जेव्हा नैसर्गिक विकासाचे चक्र पूर्ण करते आणि त्याचा रंग, सुवास आणि चव एका अपेक्षित दर्जापर्यंत पोचते तेव्हा ते फळ पिकले आहे किंवा तयार आहे असे आपण म्हणतो. त्याअर्थी परिपक्वता म्हणजे उत्कृष्टता, पूर्णता किंवा, परिपूर्णता.—यशया १८:५; मत्तय ५:४५-४८; याकोब १:४.
६, ७. (अ) आपल्या सर्व उपासकांनी आध्यात्मिक परिपक्वतेपर्यंत पोचावे अशी यहोवाची मनस्वी इच्छा आहे हे कशावरून दिसून येते? (ब) आध्यात्मिक परिपक्वतेचा कशाशी जवळून संबंध आहे?
६ आपल्या सर्व उपासकांनी प्रगती करून आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व व्हावे अशी यहोवा देवाची मनस्वी इच्छा आहे. म्हणूनच त्याने ख्रिस्ती मंडळीत अनेक अद्भुत तरतुदी केल्या आहेत. एफसस येथील ख्रिश्चनांना प्रेषित पौलाने लिहिले: “त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहंचू तोपर्यंत दिले; ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धुर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.”—इफिसकर ४:११-१४.
७ या वचनांत, पौलाने स्पष्ट केले की देवाने मंडळीत इतक्या विपूल आध्यात्मिक तरतुदी यासाठी केल्या की सर्वांनी: “विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत” पोचावे, “प्रौढ मनुष्यपणाप्रत” पोचावे आणि “ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त” करावी. असे केले तरच आपण आध्यात्मिक बालकांप्रमाणे खोट्या कल्पना व शिकवणुकींमुळे हेलकावणारे व फिरणारे न होता त्यांपासून सुरक्षित राहू शकू. अशारितीने, ख्रिस्ती परिपक्वतेपर्यंत प्रगती करण्याचा आणि ‘देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत’ पोचण्याचा जवळून संबंध आहे. पौलाच्या या सल्ल्यातून अनेक लक्ष देण्याजोगे मुद्दे आपण वेगळे करू शकतो.
८. एखाद्या व्यक्तीला विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या ‘एकत्वापर्यंत’ कसे पोचता येईल?
८ सर्वप्रथम, ‘एकत्व’ असणे आवश्यक आहे, त्याअर्थी, विश्वास व ज्ञान यांबाबतीत परिपक्व ख्रिस्ती, सहविश्वासू बांधवांच्या सहमतात आणि पूर्ण एकवाक्यतेत असला पाहिजे. बायबलच्या शिकवणुकींसंबंधी तो वैयक्तिक मतांचा पुरस्कार करत नाही, आपलीच मते योग्य आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही आणि मनात काही वेगळीच वैयक्तिक मते बाळगत नाही. उलट यहोवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने प्रगट केलेल्या सत्यावर तो पूर्ण भरवसा ठेवतो. ख्रिस्ती प्रकाशने, सभा, संमेलने व अधिवेशने यांच्याद्वारे “यथाकाळी” पुरवले जाणारे आध्यात्मिक अन्न नियमित घेतल्यास आपण विश्वास व ज्ञानाच्या बाबतीत सहविश्वासू बांधवांसोबत नेहमी ‘एकत्वात’ राहू शकतो.—मत्तय २४:४५.
९. पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात ज्या ‘विश्वासाचा’ उल्लेख केला त्याचा अर्थ स्पष्ट करा.
९ दुसरे म्हणजे, ‘विश्वास’ या शब्दाचा अर्थ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला असणारी वैयक्तिक खात्री नव्हे तर एकंदरीत आपले सर्व विश्वास, अर्थात विश्वासाची “रुंदी, लांबी, उंची व खोली.” (इफिसकर ३:१८; ४:५; कलस्सैकर १:२३; २:७) एखादी ख्रिस्ती व्यक्ती केवळ विशिष्ट ‘विश्वास’ स्वीकारत असेल तर ती व्यक्ती सहविश्वासू बांधवांसोबत ‘एकत्वात’ कशी असू शकेल? याचा अर्थ आपण केवळ बायबलच्या मूलभूत शिकवणुकींचे ज्ञान घेऊन किंवा सत्याचे फक्त अस्पष्ट अथवा अर्धवट ज्ञान मिळवून समाधान मानू नये. उलट, यहोवाने त्याच्या संस्थेच्याद्वारे केलेल्या सर्व तरतुदींचा पुरेपूर फायदा घेऊन त्याच्या वचनाचे अधिकाधिक सखोल ज्ञान घेण्याची उत्सुकता आपण बाळगली पाहिजे. देवाच्या इच्छेसंबंधी व त्याच्या उद्देशासंबंधी जितके अचूक व जितके अधिक ज्ञान घेता येईल तितके घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यासाठी बायबल आणि बायबल प्रकाशनांचे वाचन व अभ्यास करण्यासाठी वेळ काढणे, मदत व मार्गदर्शनाकरता देवाकडे प्रार्थना करणे, ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहणे आणि राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात पुरेपूर सहभाग घेणे आवश्यक आहे.—नीतिसूत्रे २:१-५.
१०. इफिसकर ४:१३ येथे “आपण सर्व येऊन पोहंचू तोपर्यंत” असे म्हटले आहे त्याचा काय अर्थ होतो?
१० तिसरा मुद्दा असा, की वरती उल्लेखलेल्या तीन ध्येयांचे वर्णन केल्यानंतर, या मर्यादेप्रत “आपण सर्व येऊन पोहंचू तोपर्यंत” असे पौलाने म्हटले. “आपण सर्व” या संज्ञेचा एका बायबल मार्गदर्शक पुस्तकात असा अर्थ दिला आहे: “एकेक करून, वेगळेवेगळे नव्हे तर एकसाथ सर्व.” दुसऱ्या शब्दांत, आपल्यापैकी प्रत्येकाने सबंध बंधूवर्गासोबत ख्रिस्ती परिपक्वतेचे ध्येय गाठण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. दी इन्टरप्रेटर्स बायबल यात असे म्हटले आहे: “सबंध शरीराची निकोप वाढ झाल्याशिवाय शरीराच्या एकाच भागाची ज्याप्रमाणे पूर्ण वाढ होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक पूर्णता केवळ एका व्यक्तीला, एकट्याला संपादन करता येत नाही.” पौलाने इफिसकर ख्रिश्चनांना आठवण करून दिली की त्यांनी विश्वासाची रुंदी, लांबी, उंची व खोली, “सर्व पवित्र जनांसह” समजून घ्यावी.—इफिसकर ३:१९अ.
११. (अ) आध्यात्मिक प्रगती करण्याचा काय अर्थ होत नाही? (ब) प्रगती करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
११ पौलाच्या शब्दांवरून हे स्पष्ट आहे की आध्यात्मिक प्रगती करण्याचा अर्थ केवळ खूपसे ज्ञान घेणे किंवा विद्यार्जन करणे नाही. परिपक्व ख्रिस्ती आपले ज्ञान मिरवण्याचा किंवा इतरांसमोर चमकण्याचा प्रयत्न करत नाही. उलट बायबल म्हणते: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.” (नीतिसूत्रे ४:१८) होय, ती व्यक्ती नव्हे तर “मार्ग,” “उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.” यहोवा आपल्या लोकांना त्याच्या वचनाची उत्तरोत्तर वाढणारी समज देत आहे; देवाकडून मिळणारे हे ज्ञान ग्रहण करण्याचा सतत प्रयत्न केल्यास आपली आध्यात्मिक प्रगती होईल. या दिशेने प्रयत्न सुरू ठेवणे म्हणजेच प्रगती करणे आणि असे करणे आपल्या सर्वांना शक्य आहे.—स्तोत्र ९७:११; ११९:१०५.
“आत्म्याचे फळ” प्रकट करणे
१२. आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करताना आत्म्याचे फळ प्रकट करणे का महत्त्वाचे आहे?
१२ ‘विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वापर्यंत पोचणे,’ महत्त्वाचे आहे पण आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबतीत देवाच्या आत्म्याचे फळ प्रगट करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. का? कारण आपण आधी पाहिल्याप्रमाणे परिपक्वता ही आंतरिक किंवा लपून राहणारी नसते, तर ती स्पष्टपणे दिसून येते आणि यामुळे इतरांनाही फायदा होतो आणि प्रोत्साहन मिळते. अर्थात, आपण सभ्य दिसण्याच्या किंवा दिखावा करण्याच्या उद्देशाने आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट आपण आध्यात्मिकरित्या अधिकाधिक परिपक्व होत जाऊ आणि देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न करत राहू तसतसा आपल्या वृत्तींत आणि वागण्यात एक अद्भुत बदल घडून येईल. प्रेषित पौलाने म्हटले: “आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.”—गलतीकर ५:१६.
१३. कोणता बदल प्रगती होत असल्याचे स्पष्टपणे सूचित करतो?
१३ यानंतर पौलाने वेगवेगळ्या ‘देहाच्या कर्मांचा’ उल्लेख केला जी बहुविध आणि “उघड” आहेत. एखाद्या व्यक्तीला देवाच्या अपेक्षांचे महत्त्व कळण्याआधी त्या व्यक्तीचे जीवन जगिक रितीप्रमाणे असते; कदाचित पौलाने उल्लेख केलेल्या काही गोष्टी तो करतही असेल: “जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मुर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी.” (गलतीकर ५:१९-२१) पण जशीजशी ती व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करते तसतशी ती या नको असलेल्या ‘देहाच्या कर्मांवर’ ताबा मिळवते आणि आपल्या जीवनात ‘आत्म्याच्या फळाला’ जागा देते. हा बदल तिच्या वागण्याबोलण्यातून सर्वांना दिसून येतो आणि स्पष्टपणे सूचित करतो की ही व्यक्ती ख्रिस्ती परिपक्वतेच्या दिशेने प्रगती करत आहे.—गलतीकर ५:२२.
१४. “देहाची कर्मे” आणि “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” या दोन संज्ञांचा अर्थ स्पष्ट करा.
१४ “देहाची कर्मे” आणि “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” या दोन्ही शब्दप्रयोगांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. “कर्मे” म्हणजे एखाद्याने केलेल्या कृत्यांमुळे घडून येणारे परिणाम. दुसऱ्या शब्दांत, पौलाने देहाची कर्मे म्हणून ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या जाणीवपूर्वक प्रयत्नामुळे किंवा पापी मानवी शरीराच्या प्रभावामुळे घडून आलेले परिणाम असू शकतात. (रोमकर १:२४, २८; ७:२१-२५) दुसरीकडे पाहता, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” ही संज्ञा असे सूचित करते की ते विशिष्ट गुण, एखाद्याने नैतिकता धारण करण्याच्या किंवा व्यक्तित्त्व विकासाच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम नसून त्या व्यक्तीवर देवाचा आत्मा कार्य करीत असल्यामुळे घडून येणारे परिणाम असतात. एखाद्या झाडाची योग्य निगा घेतल्यास ज्याप्रमाणे ते फळ उत्पन्न करते त्याचप्रमाणे पवित्र आत्मा एखाद्याच्या जीवनात मुक्तपणे संचार करतो तेव्हा ती व्यक्ती देखील आत्म्याचे फळ प्रकट करेल.—स्तोत्र १:१-३.
१५. ‘आत्म्याच्या फळाच्या’ सर्व पैलूंकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?
१५ आणखी एक विचारात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे, त्याने उल्लेख केलेल्या सर्व चांगल्या गुणांना “फळ” या एका शब्दाखाली सूचित केले. पवित्र आत्मा आपल्याला आपल्या आवडीचे फळ निवडता येईल अशाप्रकारे अनेक वेगवेगळी फळे उत्पन्न करत नाही. पौलाने सूचित केलेले सर्व गुण, अर्थात, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, आणि इंद्रियदमन तितकेच महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व गुण मिळून नवीन ख्रिस्ती मनुष्य बनतो. (इफिसकर ४:२४; कलस्सैकर ३:१०) कदाचित या गुणांपैकी काही गुण आपल्या उपजत स्वभावामुळे किंवा प्रवृत्तीमुळे आपल्या जीवनात जास्त प्रमाणात दिसून येत असतील, पण असे असले तरीसुद्धा आपण पौलाने उल्लेख केलेल्या सर्व पैलूंकडे लक्ष दिले पाहिजे. असे केल्यामुळे आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताचे व्यक्तिमत्त्व अधिक पूर्णपणे प्रतिबिंबित करू शकतो.—१ पेत्र २:१२, २१.
१६. ख्रिस्ती परिपक्वता संपादन करण्यामागचा आपला उद्देश काय असावा आणि हा उद्देश कसा साध्य करता येईल?
१६ पौलाच्या चर्चेतून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. तो असा की ख्रिस्ती परिपक्वता संपादन करण्याचा प्रयत्न करताना आपला उद्देश हा खूप ज्ञान मिळवण्याचाही नाही आणि सभ्यता आत्मसात करण्याचाही नाही. आपला उद्देश देवाच्या आत्म्याने आपल्या जीवनात मुक्तपणे संचार करावा हा आहे. विचारांत आणि कृतींत आपण देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाला जितका प्रतिसाद देऊ तितकेच आपण आध्यात्मिकरित्या परिपक्व होत जाऊ. पण हे कसे साध्य करता येईल? यासाठी आपण आपले मन आणि अंतःकरण देवाच्या आत्म्याचा प्रभाव होऊ देण्यासाठी खुले केले पाहिजे. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती सभांना विश्वासूपणे उपस्थित राहून त्यांत सहभाग घेणे. तसेच आपण देवाच्या वचनाचाही नियमित अभ्यास व त्यावर मनन केले पाहिजे आणि इतरांशी व्यवहार करताना आणि जीवनात वेगवेगळे निर्णय घेताना त्यातील तत्त्वांचा अवलंब केला पाहिजे. असे केल्यास निश्चितच आपली प्रगती स्पष्टपणे दिसून येईल.
देवाच्या गौरवासाठी प्रगती करणे
१७. प्रगती करण्याचा आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करण्याशी कशाप्रकारे संबंध आहे?
१७ शेवटी, आपली प्रगती सर्वांना दिसून आल्यास गौरव व महिमा आपला नव्हे, तर ज्याच्यामुळे ही आध्यात्मिक परिपक्वता संपादन करणे शक्य झाले आहे त्या स्वर्गीय पित्याचा अर्थात, यहोवाचा होतो. येशूला जिवे मारण्यात आले त्याच्या आदल्या रात्री त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही विपूल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.” (योहान १५:८) येशूच्या शिष्यांनी आत्म्याचे फळ आणि त्यासोबतच आपल्या सेवाकार्याद्वारे राज्याचे फळ उत्पन्न केल्यामुळे यहोवाचे गौरव झाले.—प्रेषितांची कृत्ये ११:४, १८; १३:४८.
१८. (अ) आज कोणते आनंददायक कापणीचे कार्य सुरू आहे? (ब) या कापणीच्या कार्यामुळे आपल्यापुढे कोणते आव्हान आले आहे?
१८ आज यहोवाचे लोक सबंध जगात आध्यात्मिक कापणीचे कार्य करत आहेत आणि यहोवाचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून, दर वर्षी जवळजवळ ३,००,००० नवीन लोक स्वतःचे जीवन यहोवाला समर्पित करून, पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे आपले समर्पण जाहीर करतात. हे पाहून आपल्याला तर आनंद होतोच पण निश्चितच यामुळे यहोवाचे मनही आनंदित होत असेल. (नीतिसूत्रे २७:११) तथापि पुढेही यहोवाला अशाचप्रकारे सतत आनंद व गौरव मिळत राहावे म्हणून या सर्व नवीन लोकांनी ‘ख्रिस्तामध्ये चालत राहणे, त्याच्यामध्ये मुळावणे, रचले जाणे आणि विश्वासात दृढ होत जाणे’ आवश्यक आहे. (कलस्सैकर २:६, ७) यामुळे देवाच्या लोकांसमोर दुहेरी आव्हान उभे राहते. जर तुमचा अलीकडेच बाप्तिस्मा झाला असेल तर तुम्ही ‘तुमची प्रगती सर्व लोकांस दिसून यावी’ म्हणून कसोशीने प्रयत्न करण्याचे आव्हान स्वीकारायला तयार आहात का? दुसरीकडे पाहता, जर तुम्ही बऱ्याच काळापासून सत्यात असाल तर मग नवीन लोकांची आध्यात्मिक रितीने काळजी घेण्याकरता हातभार लावण्याचे आव्हान तुम्ही स्वीकाराल का? दोन्ही परिस्थितींत परिपक्वता मिळवण्यासाठी झटणे किती आवश्यक आहे हे स्पष्टपणे दिसून येते.—फिलिप्पैकर ३:१६; इब्री लोकांस ६:१.
१९. तुम्ही आपली प्रगती सर्वांस दिसू दिल्यास कोणता बहुमान आणि कोणते आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतील?
१९ आपली प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून प्रामाणिकपणे झटणाऱ्यांकरता अद्भुत आशीर्वाद राखून ठेवले आहेत. तीमथ्याला प्रगती करण्याचे प्रोत्साहन दिल्यानंतर पौलाने काय म्हटले याची आठवण करा: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेहि तारण साधिशील.” (१ तीमथ्य ४:१६) आपली प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून परिश्रम घेतल्यास देवाच्या नावाचे गौरव करण्यात आणि त्याचे अद्भुत आशीर्वाद उपभोगण्यात तुमचाही वाटा असेल.
तुम्हाला आठवते का?
• आध्यात्मिक प्रगती कोणकोणत्या मार्गांनी दिसून येते?
• कोणत्याप्रकारचे ज्ञान व समज यांतून परिपक्वता दिसून येते?
• ‘आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ’ प्रकट केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती कशाप्रकारे दिसून येते?
• परिपक्वतेकडे वाटचाल करत असताना आपण कोणते आव्हान स्वीकारले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
परिपक्वता किंवा प्रौढता स्पष्टपणे दिसून येते
[१५ पानांवरील चित्र]
देवाने प्रकट केलेले सत्य ग्रहण करत राहण्याद्वारे आपण आध्यात्मिक प्रगती करतो
[१७ पानांवरील चित्र]
प्रार्थनेमुळे आपल्याला “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” प्रकट करण्यास मदत होते