व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या प्रगतीत बाधा आणणाऱ्‍या अडथळ्यांवर मात करा!

तुमच्या प्रगतीत बाधा आणणाऱ्‍या अडथळ्यांवर मात करा!

तुमच्या प्रगतीत बाधा आणणाऱ्‍या अडथळ्यांवर मात करा!

समजा तुमची गाडी सुरू आहे व गिअरमध्ये आहे पण ती काही केल्या पुढे जात नाही. गाडीच्या यंत्रात काही बिघाड झाला आहे का? नाही, समोरच्या चाकापुढे मोठा दगड ठेवला आहे. फक्‍त तो दगड काढण्याची गरज आहे, मग गाडी आपोआप पुढे जाईल.

अशाचप्रकारे, यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या काहीजणांसमोर अडथळे आहेत ज्यामुळे ते आध्यात्मिक प्रगती करू शकत नाहीत. जसे की, येशूने इशारा दिला होता, “संसाराची चिंता व द्रव्याचा मोह” यांच्यामुळे सत्याच्या ‘वचनाची वाढ खुंटून’ प्रगतीला आळा बसू शकतो.—मत्तय १३:२२.

इतरांच्या बाबतीत, मुळावलेल्या सवयींमुळे किंवा कमजोरींमुळे प्रगतीत अडथळा निर्माण होतो. युटाका नावाच्या एका जपानी इसमाला बायबलच्या संदेशाबद्दल आवड होती; परंतु त्याला जुगार खेळण्याची सवय होती. त्याने पुष्कळदा ही वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला यश आले नाही. जुगाराच्या नादात त्याचे पैसे, त्याची तीन घरे तो गमावून बसला; शिवाय, तो स्वतःच्या कुटुंबाच्या नजरेतून उतरला, आणि स्वतःचा आत्म-सन्मानही तो गमावून बसला होता. हा अडथळा दूर करून ख्रिस्ती बनणे त्याला शक्य होते का?

किंवा केको या स्त्रीचे उदाहरण घ्या. बायबलच्या मदतीने तिने मूर्तिपूजा, अनैतिक संबंध आणि भविष्य कथन या वाईट गोष्टी सोडून दिल्या होत्या. परंतु, केको कबूल करते की, “माझ्यासमोर सर्वात मोठी समस्या होती धूम्रपानाची. मी पुष्कळदा ही सवय सोडण्याचा प्रयत्न केला पण मला जमत नव्हतं.”

कदाचित तुम्हालाही तुमच्या प्रगतीच्या मार्गात असाच एखादा मोठा अडथळा जाणवत असेल. पण, देवाच्या मदतीने या अडथळ्यावर मात करता येऊ शकते याची खात्री बाळगा.

येशूच्या शिष्यांना फेपऱ्‍याचा रोग असलेल्या मनुष्यामधून भूत घालवता आले नाही तेव्हा येशू त्यांना काय म्हणाला होता हे आठवा. त्याच्या शिष्यांना न जमलेले काम करून दाखवल्यावर येशू त्यांना म्हणाला: “जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्‍वास असला तर ह्‍या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.” (मत्तय १७:१४-२०; मार्क ९:१७-२९) होय, आपल्याला मोठ्या डोंगरासारखी वाटणारी समस्या सर्वशक्‍तिमान निर्माणकर्त्यासाठी काहीच नाही; त्याच्यासाठी ती अगदी क्षुल्लक आहे.—उत्पत्ति १८:१४; मार्क १०:२७.

प्रगती पथातील अडथळे ओळखणे

अडथळ्यांवर मात करण्याआधी, हे अडथळे कोणते आहेत ते ओळखले पाहिजे. हे कसे करता येईल? काही वेळा मंडळीतला सदस्य, जसे की, कोणी वडील किंवा तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करणारे तुमच्या लक्षात एखादी गोष्ट आणून देतील. त्यांच्याकडून मिळणारा प्रेमळ सल्ला धुडकावून लावण्याऐवजी नम्रपणे “बोध ऐकून शहाणे” होणे आवश्‍यक आहे. (नीतिसूत्रे ८:३३) इतर वेळी, बायबलचा अभ्यास करताना तुम्हाला तुमच्या उणीवांची जाणीव होईल. होय, देवाचे वचन “सजीव [आणि] सक्रिय” आहे. (इब्री लोकांस ४:१२) बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने वाचल्याने तुमचे गहन विचार, भावना आणि हेतू काय आहेत ते स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला यहोवाच्या उच्च दर्जांनुरूप राहण्यास मदत मिळू शकते. तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्‍या गोष्टी तुम्हाला दिसतील व तुम्ही त्यांना ओळखू शकाल.—याकोब १:२३-२५.

उदाहरणार्थ, एखाद्या बायबल विद्यार्थ्याला अनैतिक गोष्टींवर विचार करायची सवय असल्यास काय? त्याला वाटेल की, फक्‍त विचार केल्याने काही नुकसान होणार नाही कारण तो चुकीचे काही करत नाही. अभ्यासाच्या दरम्यान याकोब १:१४, १५ येथील शब्द तो वाचतो; तेथे म्हटले आहे: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” आता त्याच्या लक्षात येते की, वाईट मार्गाने चालल्यामुळे प्रगती कशी खुंटू शकते! हा अडथळा तो कसा दूर करू शकतो?—मार्क ७:२१-२३.

अडथळ्यांवर मात

कदाचित कोणा प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तीची मदत घेऊन वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स * याचा वापर करून विद्यार्थी देवाच्या वचनातून अधिक संशोधन करू शकतो. उदाहरणार्थ, “थॉट्‌स” या उपशीर्षकाखाली हानीकारक कल्पनांवर मात करण्यासंबंधी प्रकाशित झालेल्या अनेक लेखांची माहिती त्याला मिळेल. या लेखांमध्ये फिलिप्पैकर ४:८ सारखी मदतदायी वचने दिली आहेत; त्यात म्हटले आहे: “बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.” होय, अनैतिक विचारांऐवजी शुद्ध, उभारणीकारक विचार मनात भरले पाहिजेत!

विद्यार्थ्याला त्याच्या संशोधनात इतरही बायबलची तत्त्वे पाहायला मिळतील ज्यांच्या आधारे तो आपल्या समस्येवर मात करू शकेल. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे ६:२७ आणि मत्तय ५:२८ येथे कामोत्तेजक गोष्टींनी आपले मन भरण्याविरुद्ध इशारा दिला आहे. “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव,” अशी स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केली. (स्तोत्र ११९:३७) अर्थात, बायबलची ही वचने फक्‍त वाचणे पुरेसे नाही. सुज्ञ मनुष्याने म्हटले: ‘धार्मिक मनुष्य विचार करतो.’ (नीतिसूत्रे १५:२८) देवाने कोणत्या आज्ञा दिल्या आहेत याचाच फक्‍त विचार करून नव्हे तर त्याने या आज्ञा का दिल्या आहेत याचा विचार करून विद्यार्थ्याला यहोवाच्या मार्गांची सुज्ञता आणि समंजसपणाबद्दल खोल समज प्राप्त होऊ शकते.

शेवटी, आपल्या प्रगतीमधील अडथळा दूर करू इच्छिणाऱ्‍याने, मनमोकळेपणाने यहोवाची मदत मागावी. कारण आपण अपरिपूर्ण आहोत, मातीचे आहोत याची देवाला चांगली कल्पना आहे. (स्तोत्र १०३:१४) मदतीसाठी देवाला सातत्याने प्रार्थना केल्याने आणि अनैतिक गोष्टींबद्दलचे विचार टाळायचा आटोकाट प्रयत्न केल्याने चांगला परिणाम होईल अर्थात आपला विवेक शुद्ध होईल आणि आपल्याला हलके वाटेल.—इब्री लोकांस ९:१४.

हार मानू नका

तुम्ही कोणत्याही समस्येला तोंड देत असला तरीही त्या समस्येला तुम्ही वारंवार बळी पडत राहाल हे लक्षात ठेवा. असे घडते तेव्हा हताश किंवा निराश होणे स्वाभाविक आहे. परंतु, गलतीकर ६:९ मधील शब्द लक्षात घ्या: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” दावीद आणि पेत्र यांसारखे काही समर्पित सेवकही काही वेळा उणे पडले आणि या गोष्टी त्यांच्यासाठी लाजिरवाण्या होत्या. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी नम्रपणे सल्ला स्वीकारला, आवश्‍यक बदल केले आणि स्वतःला देवाचे उल्लेखनीय सेवक असल्याचे सिद्ध करून दाखवले. (नीतिसूत्रे २४:१६) दावीदाने चुका केल्या तरीही, यहोवाने त्याच्याविषयी म्हटले की, तो “मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.” (प्रेषितांची कृत्ये १३:२२) पेत्राने देखील आपल्या चुका सुधारल्या आणि ख्रिस्ती मंडळीत एक आधारस्तंभ बनला.

आज अनेकांना आपल्या अडथळ्यांवर मात करण्यात असेच यश मिळाले आहे. आधी ज्यांचा उल्लेख केला आहे, अर्थात युटाका बायबलचा अभ्यास करू लागले. ते म्हणतात: “माझ्या प्रगतीच्या प्रत्येक पावलावर यहोवाच्या आधाराचा आणि आशीर्वादाचा प्रत्यय आल्यामुळे जुगाराच्या सवयीवर मात करायला मला मदत मिळाली. माझ्या बाबतीत येशूचे शब्द खरे ठरलेत याचा मला आनंद होतो की, विश्‍वासाने ‘पर्वतही’ हलवता येऊ शकतात.” कालांतराने, युटाका हे मंडळीत सेवा सेवक बनले.

तंबाखूचे व्यसन असलेल्या केकोचे काय झाले? तिचा अभ्यास घेणाऱ्‍या बहिणीने तिला सावध राहा! मासिकातील तंबाखूच्या व्यसनासंबंधीचे विविध लेख वाचायला सांगितले. केकोने आपल्या गाडीमध्ये २ करिंथकर ७:१ मधील शब्द देखील लावले ज्यामुळे यहोवाच्या नजरेत शुद्ध राहण्यासाठी तिला दररोज आठवण होत राहील. तरीपण, तिची ही सवय सुटेना. केको म्हणते, “मला स्वतःवरच खूप राग येत होता. म्हणून मी स्वतःला विचारले: ‘मला नेमकं काय हवंय? मला यहोवाची सेवा करायची की सैतानाची?’” आपल्याला यहोवाचीच सेवा करायची आहे असा निर्णय घेतल्यावर तिने कळकळीने मदतीसाठी प्रार्थना केली. ती आठवून सांगते, “मला आश्‍चर्य वाटलं की, माझी सवय सोडताना मला फार त्रास झाला नाही. उलट, मी हे आधी केलं नाही त्याचाच मला पस्तावा होतोय.”

तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळ्यांवर तुम्ही देखील मात करू शकता. तुमचे विचार, इच्छा, शब्द आणि कृती बायबलच्या दर्जांच्या जितक्या एकमतात असतील तितकाच आत्म-सन्मान आणि आत्मविश्‍वास तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या सहवासात तुमच्या आध्यात्मिक बंधू-बहिणींना तसेच कौटुंबिक सदस्यांना तजेला आणि उत्तेजन प्राप्त होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवा देवासोबतचा तुमचा नातेसंबंध अधिक दृढ होईल. त्याने असे वचन दिले आहे की, सैतानाच्या प्रभावाचा प्रतिकार करणाऱ्‍या ‘त्याच्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोगे जे असेल ते तो काढून टाकील.’ (यशया ५७:१४) तसेच तुम्ही याची शाश्‍वती बाळगू शकता की, तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमधील अडथळे काढून टाकण्याचा किंवा त्यांच्यावर मात करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर यहोवा तुम्हाला समृद्ध आशीर्वाद देईल.

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक भाषांमध्ये हे प्रकाशित केले आहे.

[२८ पानांवरील चित्र]

येशूने असे वचन दिले की, विश्‍वासाद्वारे पर्वतासमान अडथळ्यांवर मात करता येऊ शकते

[३० पानांवरील चित्र]

बायबल वाचल्याने आध्यात्मिक उणीवांवर मात करायला आपल्याला आणखी बळकटी मिळते