व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही जे काही मानता ते का मानता?

तुम्ही जे काही मानता ते का मानता?

तुम्ही जे काही मानता ते का मानता?

मानणे या शब्दाची व्याख्या, एखादी गोष्ट “खरी, अस्सल किंवा वास्तविक म्हणून स्वीकारणे” अशी करण्यात आली आहे. संयुक्‍त राष्ट्रांच्या मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहिरनामा यात प्रत्येक व्यक्‍तीच्या ‘विचार, विवेक व धर्माच्या स्वातंत्र्याच्या हक्काचे’ संरक्षण करण्याची तरतूद आहे. या हक्कात प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार “धर्म किंवा विश्‍वास बदलण्याचे” स्वातंत्र्य समाविष्ट आहे.

पण कोणी आपला धर्म किंवा विश्‍वास बदलण्याचा का प्रयत्न करेल? सहसा लोक असेच म्हणतात, की “मला माझे स्वतःचे विश्‍वास आहेत आणि मी त्यांत संतुष्ट आहे.” चुकीच्या विश्‍वासांमुळेही कोणाचे नुकसान होत नाही असे बऱ्‍याच जणांना वाटते. उदाहरणार्थ, पृथ्वी सपाट आहे असे जर एखादी व्यक्‍ती मानत असेल तर त्यामुळे तिला किंवा इतर कोणाला काही नुकसान होणार नाही. म्हणून काही जण असे म्हणतात की “ज्याला जो विश्‍वास करायचा आहे त्याला तो करू द्यावा.” पण हे नेहमीच शहाणपणाचे ठरेल का? एखाद्या डॉक्टरचा सहकारी समजा असे मानत असेल की शवागारात शवांचे विच्छेदन केल्यावर थेट हॉस्पिटलच्या वार्डात जाऊन रुग्णांना तपासण्यात काही नुकसान नाही, तर मग त्या डॉक्टरने आपल्या सहकाऱ्‍याला त्याच्या मनाप्रमाणे वागू द्यावे का?

धर्माच्या संदर्भात पाहू जाता, चुकीच्या विश्‍वासांमुळे इतिहासात अनेकदा बरेच अनर्थ घडले आहेत. धार्मिक पुढाऱ्‍यांनी “ख्रिस्ती जहालमतवाद्यांना निर्घृण हिंसा करण्यास चेतवल्यामुळे” मध्य युगांतील तथाकथित धर्मयुद्धांत किती भयंकर रक्‍तपात झाला याचा विचार करा. किंवा आधुनिक काळातील “ख्रिस्ती” बंदूकधारी शिपायांचे उदाहरण घ्या ज्यांनी “तलवारीच्या मुठीवर संतांची नावे कोरणाऱ्‍या मध्ययुगांतील योद्धांप्रमाणेच आपल्या रायफलच्या बटवर मरियमची चित्रे चिकटवली होती.” या सर्व जहालमतवाद्यांचा असा विश्‍वास होता, की ते जे काही करत होते ते योग्य होते. पण हे धार्मिक संघर्ष आणि या लढाया योग्य नव्हत्या हे तर अगदीच स्पष्ट आहे.

जगात इतका गोंधळ व संघर्ष कशामुळे आहे? बायबल उत्तर देते, की आज दियाबल सैतान, ‘सर्व जगाला ठकवीत’ आहे. (प्रकटीकरण १२:९; २ करिंथकर ४:४; ११:३) प्रेषित पौलाने ताकीद दिली होती की “[सैतानाने] फसवण्याच्या उद्देशाने प्रगट केलेली खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्‌भुते” पाहून अनेक धार्मिक लोक फसतील, पण यामुळे “त्यांचा नाश ठरलेला आहे” ही मात्र दुःखाची गोष्ट आहे. पौलाने म्हटले की हे लोक “त्यांचे तारण करू शकणाऱ्‍या सत्याची आवड न धरता आपली मने बंद करतील” आणि अशारितीने ‘जे असत्य त्यावर विश्‍वास ठेवण्याकरता फसवले जातील.’ (२ थेस्सलनीकाकर २:९-१२, विल्यम बार्क्ले यांचे द न्यू टेस्टामेंट) असत्यावर विश्‍वास करण्याचे तुम्ही कसे टाळू शकता? आणि तुम्ही ज्या गोष्टींवर विश्‍वास ठेवता तो का ठेवता?

लहानपणचे संस्कार?

कदाचित तुमच्या कुटुंबाच्या विश्‍वासांनुसार चालण्याचे लहानपणापासून तुमच्यावर संस्कार करण्यात आले असतील. आणि हे अतिशय चांगले आहे. कारण आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवावे ही स्वतः देवाची इच्छा आहे. (अनुवाद ६:४-९; ११:१८-२१) उदाहरणार्थ तीमथ्याला त्याच्या आईच्या व आजीच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला. (२ तीमथ्य १:५; ३:१४, १५) बायबल मुलांना आईवडिलांच्या मार्गदर्शनाचा आदर करण्यास प्रोत्साहन देते. (नीतिसूत्रे १:८; इफिसकर ६:१) पण केवळ आईवडील विश्‍वास ठेवतात म्हणून विशिष्ट गोष्टींवर तुम्हीही विश्‍वास ठेवावा अशी निर्माणकर्त्याची इच्छा होती का? जुन्या पिढीच्या विश्‍वासांचे विचार न करता डोळे मिटून पालन करणे घातक ठरू शकते.—स्तोत्र ७८:८; आमोस २:४.

येशूला भेटलेल्या एका शोमरोनी स्त्रीवर लहानपणापासून शोमरोनी धर्माचे संस्कार होते. (योहान ४:२०) कशावर विश्‍वास ठेवावा व ठेवू नये हे निवडण्याच्या तिच्या स्वातंत्र्याचा येशूने आदर केला पण त्याने तिला असेही सांगितले: “तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता.” तिचे बरेच धार्मिक विश्‍वास खरोखरच चुकीचे होते आणि त्याने तिला स्पष्टपणे सांगितले, की देवाची स्वीकारयोग्य पद्धतीने उपासना करण्यासाठी, अर्थात “आत्म्याने व खरेपणाने” उपासना करण्यासाठी तिला आपल्या विश्‍वासांत फेरबदल करावे लागतील. तिचे विश्‍वास साहजिकच तिला प्रिय होते पण या विश्‍वासांना धरून राहण्याऐवजी तिला व तिच्यासारख्या इतरांनाही कालांतराने येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केलेल्या “विश्‍वासाला मान्यता” देणे आवश्‍यक होते.—योहान ४:२१-२४, ३९-४१; प्रेषितांची कृत्ये ६:७.

शिक्षणाच्या आधारावर?

ज्ञानार्जनाच्या क्षेत्रातील प्रतिभावंत शिक्षक आणि इतर अधिकारी आदरास पात्र आहेत यात शंका नाही. पण इतिहासात अशा कितीतरी नावाजलेल्या शिक्षकांची उदाहरणे आहेत ज्यांनी अगदीच चुकीचे शिक्षण दिले. उदाहरणार्थ, ग्रीक तत्त्वज्ञानी ॲरिस्टोटल याने लिहिलेल्या दोन विज्ञानविषयक ग्रंथांविषयी इतिहासकार बर्ट्रंड रस्सलने म्हटले की “या दोन्ही ग्रंथात आधुनिक विज्ञानाच्या आधारावर स्वीकारता येईल असे एक वाक्यसुद्धा सापडत नाही.” आधुनिक काळातही कित्येकजण अगदीच चुकीचे दावे करतात. १८९५ साली ब्रिटिश वैज्ञानिक लॉर्ड केल्व्हिन यांनी अगदी आत्मविश्‍वासाने म्हटले होते की “हवेपेक्षा जड असलेली उड्डाण यंत्रे तयार करणे शक्यच नाही.” म्हणूनच, केवळ अधिकारपदावर असलेली व्यक्‍ती शिकवते म्हणून एखादी सुजाण व्यक्‍ती कोणतीही गोष्ट डोळे मिटून खरी मानत नाही.—स्तोत्र १४६:३.

धार्मिक शिकवणुकींच्या बाबतीत हीच सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाला त्याच्या धार्मिक शिक्षकांकडून बरेच शिक्षण मिळाले होते आणि आपल्या “पूर्वजांच्या संप्रदायांविषयी [तो] विशेष आवेशी” होता. पूर्वजांच्या या पारंपरिक विश्‍वासांमुळे त्याचे नुकसान झाले. कारण याच विश्‍वासांमुळे त्याने ‘देवाच्या मंडळीचा पराकाष्टेचा छळ व नाश’ करण्याचा प्रयत्न केला. (गलतीकर १:१३, १४; योहान १६:२, ३) त्याहूनही वाईट म्हणजे कितीतरी काळापर्यंत तो ‘पराणीवर लाथ मारत’ राहिला, अर्थात येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्यास प्रोत्साहित करणाऱ्‍या प्रभावांचा प्रतिकार करत राहिला. स्वतः येशूने पौलाच्या जीवनात एक नाटकीय घटना घडवून आणली तेव्हा कोठे त्याने आपल्या विश्‍वासांत फेरबदल केले.—प्रेषितांची कृत्ये ९:१-६; २६:१४.

प्रसार माध्यमांचा प्रभाव?

कदाचित प्रसार माध्यमांचा तुमच्या विश्‍वासांवर बराच प्रभाव असेल. प्रसार माध्यमांत वक्‍तृत्वाचे स्वातंत्र्य असण्याबद्दल बरेचजण आनंदी आहेत. या माध्यमांतून त्यांना बरीच उपयोगी माहिती मिळते. पण या माध्यमांना कह्‍यात ठेवणारे बरेच शक्‍तिशाली प्रभाव असू शकतात, व आहेत. सहसा त्यांतून पूर्वग्रहदूषित माहिती सादर केली जाते जी अगदी बेमालूमपणे तुमच्या विचारसरणीवर परिणाम करू शकते.

जास्तीतजास्त लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सहसा प्रसार माध्यमे खळबळजनक आणि नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टींना किंवा घटनांना प्रसिद्धी देतात. काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी चारचौघांमध्ये उल्लेख करण्यालायक किंवा छापण्यालायक समजल्या जात नव्हत्या त्याच आता अगदी सर्वसामान्य झाल्या आहेत. हळूहळू, आचारविचारांच्या प्रस्थापित आदर्शांना आव्हान देऊन ते कालबाह्‍य ठरवले जात आहेत. लोकांची विचारसरणी हळूहळू भ्रष्ट होत चालली आहे. ते “वाईटाला बरे व बऱ्‍याला वाईट” समजू लागले आहेत.—यशया ५:२०; १ करिंथकर ६:९, १०.

विश्‍वासाचा भक्कम आधार शोधणे

मनुष्यांच्या कल्पनांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या आधारावर विशिष्ट गोष्टींवर विश्‍वास ठेवणे हे वाळुवर बांधकाम करण्यासारखे आहे. (मत्तय ७:२६; १ करिंथकर १:१९, २०) मग तुम्ही पूर्ण खात्रीने आपल्या विश्‍वासांना कशाचा भक्कम आधार देऊ शकता? आपल्या भोवतालच्या जगाचे निरीक्षण करण्याची आणि आध्यात्मिक गोष्टींसंबंधी प्रश्‍न विचारण्याची क्षमता देवाने प्रत्येकाला दिली आहे. त्याअर्थी तो तुमच्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे देखील पुरवेल अशी अपेक्षा करणे रास्तच ठरणार नाही का? (१ योहान ५:२०) निश्‍चितच! पण उपासनेच्या बाबतीत काय खरे आहे, विश्‍वासार्ह किंवा सत्य आहे हे तुम्ही कसे सिद्ध करू शकता? हे करण्याचा एकमेव आधार म्हणजे देवाचे वचन बायबल आहे असे म्हणताना आम्हाला कोणतीही आशंका नाही.—योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७.

पण कोणी म्हणेल, “बायबल मानणाऱ्‍या लोकांनीच या जगात सर्वात जास्त संघर्ष आणि गोंधळ माजवला आहे हे खरे नाही का?” हो, बायबलचे अनुसरण करण्याचा दावा करणाऱ्‍या धर्मपुढाऱ्‍यांनी बऱ्‍याच गोंधळून टाकणाऱ्‍या आणि परस्परविरोधी मतांना जन्म दिला आहे हे खरे आहे. याचे कारण म्हणजे खरे पाहता त्यांचे विश्‍वास बायबलवर आधारित नाहीत. अशा लोकांचे वर्णन प्रेषित पेत्र “खोटे संदेष्टे” आणि “खोटे शिक्षक” असे करतो आणि “त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल” असेही सांगतो. (२ पेत्र २:१, २) तरीसुद्धा पेत्र लिहितो, की “अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्‍या दिव्याप्रमाणे आहे; . . . तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.”—२ पेत्र १:१९; स्तोत्र ११९:१०५.

बायबल आपल्याला त्यातील माहितीशी आपले विश्‍वास पडताळून पाहण्याचे प्रोत्साहन देते. (१ योहान ४:१) या नियतकालिकाचे लाखो वाचक कबूल करतील की असे केल्यामुळे त्यांच्या जीवनात एक उद्देश आणि स्थैर्य आले आहे. म्हणूनच तुम्ही देखील बिरुया येथील मोठ्या मनाच्या लोकांसारखे व्हा. कशावर विश्‍वास ठेवावा अगर ठेवू नये हे ठरवण्याआधी ‘शास्त्रात दररोज शोध करा.’ (प्रेषितांची कृत्ये १७:११) यासाठी तुम्हाला मदत करण्यास यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल. अर्थात कशावर विश्‍वास ठेवावा हे ठरवण्याचा निर्णय शेवटी तुमचा आहे. पण आपले विश्‍वास मानवांच्या बुद्धीवर किंवा इच्छांवर आधारित नसून देवाच्या प्रकट सत्य वचनावर आधारित आहेत याची खात्री करून घेणे सुज्ञतेचे ठरेल.—१ थेस्सलनीकाकर २:१३; ५:२१.

[६ पानांवरील चित्रे]

तुम्ही आपल्या विश्‍वासांसाठी पूर्ण खात्रीने बायबलचा आधार घेऊ शकता