तुम्ही ‘बऱ्यावाईटातला भेद ओळखू’ शकता का?
तुम्ही ‘बऱ्यावाईटातला भेद ओळखू’ शकता का?
“प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.”—इफिसकर ५:१०.
१. जीवन कशाप्रकारे बऱ्याचदा दुविधापूर्ण असू शकते आणि का?
“हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) यिर्मयाचे हे सुजाणतेचे निरीक्षण आज आपल्याकरता अधिकच अर्थभरीत आहे. का? कारण बायबलने भाकीत केल्याप्रमाणे आज आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ राहात आहोत. (२ तीमथ्य ३:१) दररोज आपल्यासमोर असे अनेक दुविधापूर्ण प्रसंग येतात जेव्हा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. हे मोठे निर्णय असोत वा क्षुल्लक, पण त्यांचा आपल्यावर—आपल्या शारीरिक, भावनिक व आध्यात्मिक आरोग्यावर खोलवर प्रभाव पडतो.
२. कोणते निर्णय सहसा क्षुल्लक समजले जातात पण समर्पित ख्रिस्ती लोकांचा त्यांबाबतीत कसा दृष्टिकोन आहे?
२ दररोजच्या जीवनात आपण जे निर्णय घेतो त्यातील बहुतेक निर्णय सर्वसामान्य असतात किंवा फार गंभीर स्वरूपाचे नसतात. उदाहरणार्थ, कोणते कपडे घालावेत, काय खावे, काय खाऊ नये, कोणाला भेटावे इत्यादी निर्णय आपण दररोज घेतो. हे निर्णय आपण अगदी सहज, फारसा विचार न करता घेतो. पण हे निर्णय खरोखरच क्षुल्लक आहेत का? समर्पित ख्रिस्ती लोकांकरता पेहराव, स्वरूप, खाणेपिणे आणि बोलणेचालणे यांसारख्या बाबी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत कारण आपण परात्पर देव यहोवा याचे सेवक आहोत हे नेहमी दाखवू इच्छितो. या संदर्भात आपल्याला प्रेषित पौलाच्या शब्दांची आठवण होते: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१; कलस्सैकर ४:६; १ तीमथ्य २:९, १०.
३. कोणते निर्णय खरोखरच गंभीर स्वरूपाचे आहेत?
३ पण याहूनही जास्त गंभीर स्वरूपाचे निर्णय देखील आहेत. उदाहरणार्थ, लग्न करावे किंवा अविवाहित राहावे हा निर्णय कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर फार मोठा आणि कायमस्वरूपी प्रभाव पाडू शकतो. तसेच, सुयोग्य जोडीदार किंवा जीवनसाथी निवडण्याचा निर्णय देखील एक सोपा निर्णय नाही. * (नीतिसूत्रे १८:२२) शिवाय, मित्र व सोबती निवडण्यासंबंधी, शिक्षण व व्यवसाय निवडण्यासंबंधी तसेच मनोरंजन व करमणुकीसंबंधी निर्णय देखील आपल्या आध्यात्मिकतेवर आणि पर्यायाने आपल्या सार्वकालिक कल्याणावर निर्णायक प्रभाव पाडू शकतात.—रोमकर १३:१३, १४; इफिसकर ५:३, ४.
४. (अ) कोणती क्षमता आपल्याजवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे? (ब) कोणत्या प्रश्नांचा विचार करणे आवश्यक आहे?
४ हे लक्षात घेऊन योग्य व अयोग्य यांत, किंवा जे वरवर योग्य भासते आणि जे खरोखरच योग्य आहे यांत भेद करण्याची क्षमता असणे खरोखरच महत्त्वाचे आहे. बायबल ताकीद देते, “मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.” (नीतिसूत्रे १४:१२) पण प्रश्न उद्भवतो, की ‘बऱ्यावाईटात भेद करण्याची क्षमता आपण कशाप्रकारे विकसित करू शकतो? योग्य निर्णय घेण्याकरता आवश्यक मार्गदर्शन आपण कोठून मिळवू शकतो? या बाबतीत गतकाळात आणि सध्याच्या काळात लोकांनी काय केले आणि याचा काय परिणाम झाला आहे?’
जगाचे “तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा”
५. प्रारंभीचे ख्रिश्चन कशा वातावरणात जगत होते?
५ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांच्या काळात ग्रीक-रोमी आचारविचारांचा खूप प्रभाव होता. एकीकडे, बहुतेकांना हवीहवीशी वाटणारी ऐषारामाची व चैनीची रोमी जीवनशैली होती. तर दुसरीकडे, बुद्धिजीवी वर्गात प्लेटो व ॲरिस्टोटल यांच्याच नव्हे तर नवनिर्मित एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी विचारधारांचे तत्त्वज्ञान देखील प्रचलित होते. प्रेषित पौल दुसऱ्या प्रचार यात्रेदरम्यान अथेन्सला आला तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्यापैकी कित्येक तत्त्वज्ञानी लोकांनी त्याला विरोध केला; “हा बडबड्या” पौल आपल्याला काय शिकवणार, अशी त्यांची मनोवृत्ती होती.—प्रेषितांची कृत्ये १७:१८.
६. (अ) काही प्रारंभिक ख्रिश्चनांना काय करण्याचा मोह झाला? (ब) पौलाने कोणती ताकीद दिली?
६ प्रारंभिक ख्रिश्चनांपैकी काही जणांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या दिखावटी जीवनशैलीचे आकर्षण का वाटत असावे, हे यावरून सहज लक्षात येते. (२ तीमथ्य ४:१०) त्या काळच्या जगात पूर्णपणे रमलेल्या लोकांना जीवनात अनेक फायदे आणि सुविधा आहेत असे कदाचित भासत असावे; आणि त्यांचे निर्णय देखील सहसा योग्यच वाटत असतील. समर्पित ख्रिस्ती जीवनात उपभोगता येणार नाही असे मोलवान काहीतरी बाहेरच्या जगात आहे असे काहींना भासले असावे. पण प्रेषित पौलाने ताकीद दिली: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८) पौलाने असे का म्हटले?
७. जगाच्या ज्ञानाचे वास्तवात काय मोल आहे?
७ पौलाने ही ताकीद देण्याचे कारण म्हणजे जगातल्या गोष्टींकडे आकर्षित झालेल्यांची विचारसरणी किती धोकेदायक आहे हे त्याने ओळखले होते. “तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा” असे जे त्याने म्हटले ते अतिशय अर्थपूर्ण आहे. “तत्त्वज्ञान” असे भाषांतर केलेल्या मूळ इंग्रजी शब्दाचा शब्दशः अर्थ “ज्ञानप्रियता आणि ज्ञानार्जन” असा होतो. तसे पाहिल्यास, हे फायदेकारक ठरू शकते. किंबहुना बायबल, खासकरून नीतिसूत्रांचे पुस्तक योग्य ज्ञान व सुबुद्धीचा शोध घेण्याचे प्रोत्साहनही देते. (नीतिसूत्रे १:१-७; ३:१३-१८) पण पौलाने ‘तत्त्वज्ञानाचा’ उल्लेख ‘पोकळ भुलथापांसोबत’ केला. दुसऱ्या शब्दांत, पौलाच्या मते जगात मिळणारे ज्ञान पोकळ आणि भुलवणारे होते. फुगलेल्या फुग्याप्रमाणे ते वरून पाहिल्यास भरीव दिसत असले तरीही ते मुळात पोकळच होते. जगाच्या उथळ ‘तत्त्वज्ञानाच्या व पोकळ भुलथापांच्या’ आधारावर बऱ्यावाईटात भेद करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ, आणि प्रसंगी अनर्थकारी देखील होते.
“वाईटाला बरे व बऱ्याला वाईट” म्हणणारे
८. (अ) लोक सल्ला घेण्याकरता कोणाकडे वळतात? (ब) त्यांना कशाप्रकारचा सल्ला दिला जातो?
८ आजही परिस्थिती फारशी बदलेली नाही. मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञांची कमी नाही. वैवाहिक आणि कौटुंबिक सल्लागार, वृत्तलेखक, स्वयंघोषित उपचारतज्ज्ञ, ज्योतिषी, मांत्रिक आणि इतर अनेकजण सल्ला देण्यास तयार आहेत—अर्थात मोबदला घेऊन. पण कशाप्रकारचा सल्ला दिला जात आहे? सहसा, आधुनिक नैतिकतेला थारा देण्यासाठी बायबलच्या नैतिक आदर्शांना बाजूला सारले जात आहे. उदाहरणार्थ, “समलिंगी विवाहांना” अधिकृत संमती देण्यास सरकारने दिलेल्या नकाराविषयी भाष्य करताना द ग्लोब ॲन्ड मेल या कॅनडाच्या प्रमुख दैनिकातील अग्रलेखात असे म्हणण्यात आले: “सन २००० मध्ये, एकमेकांवर नितान्त प्रेम करणाऱ्या आणि एकमेकांना वचनबद्ध असलेल्या जोडप्याला त्यांचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करण्यापासून वंचित केले जाते, का तर ते समलिंगी आहेत; ही बाब हास्यास्पद आहे.” सध्याची सामान्य प्रवृत्ती कशाचीही टीका न करता सर्वकाही खपवून घेण्याची आहे. सर्वकाही सापेक्ष बनले आहे; चांगल्यावाईटात स्पष्ट असा भेद उरलेलाच नाही.—स्तोत्र १०:३, ४.
९. समाजात ज्यांना आदर दिला जातो त्यांचे वर्तन सहसा कशाप्रकारचे असते?
९ इतर लोक निर्णय घेताना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या यशस्वी झालेल्यांचा—समाजातल्या धनिक आणि सुप्रसिद्ध लोकांचा आदर्श अनुसरतात. धनिक आणि सुप्रसिद्ध लोकांना आजच्या समाजात आदर दिला जात असला तरीसुद्धा हे लोक प्रामाणिकपणा आणि भरवसा यांसारख्या सद्गुणांची फक्त वरपांगी स्तुती करतात. सत्ता आणि फायदा मिळवण्यासाठी ते नैतिक तत्त्वांकडे डोळेझाक करून खुशाल अनैतिक कामे करतात. प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीजण सहजासहजी सुस्थापित नैतिक दर्जांना व आदर्शांचा त्याग करून विक्षिप्त आणि धक्केदायक वर्तनाचे समर्थन करतात. परिणामतः आज समाजात फक्त फायदा पाहण्याची, अनैतिक प्रकार चालू देण्याची प्रवृत्ती दिसून येते; “सबकुछ चलता है” हे जणू त्यांचे ब्रीदवाक्य बनले आहे. अशा अनैतिक वातावरणात, लोकांना चांगल्यावाईटात भेद करता येत नाही यात आश्चर्य ते काय?—लूक ६:३९.
१०. बरे व वाईट याविषयी यशयाने जे म्हटले ते आज कशाप्रकारे खरे ठरले आहे?
१० अयोग्य मार्गदर्शनाच्या आधारावर घेतलेल्या अयोग्य निर्णयांचे दुःखद दुष्परिणाम आपल्याला पदोपदी पाहायला मिळतात—उद्ध्वस्त झालेले विवाह आणि कुटुंबे, ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेलेले लोक, हिंसाचार करणाऱ्या कोवळ्या मुलामुलींच्या टोळ्या, अनैतिकता, लैंगिकसंबंधांतून पसरणारे रोग हे त्यांपैकी केवळ काही दुष्परिणाम आहेत. साहजिकच, बऱ्यावाईटात भेद करण्याच्या संदर्भात सर्व आदर्शांना झुगारून लावल्यास आणखी काय घडण्याची आपण अपेक्षा करू शकतो? (रोमकर १:२८-३२) संदेष्ट्या यशयाने अशाचप्रकारच्या परिस्थितीचे वर्णन केले होते: “जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानितात त्यांस धिक्कार असो. जे आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्या मते समंजस त्यांस धिक्कार असो!”—यशया ५:२०, २१.
११. चांगले काय व वाईट काय हे ठरवताना स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहणे का योग्य नाही?
११ “आपल्या दृष्टीने ज्ञानी” झालेल्या प्राचीन काळातील त्या यहुद्यांकडून यहोवाने त्यांच्या कृत्यांचा जाब मागितला. म्हणूनच, चांगले काय व वाईट काय हे ठरवताना आपण स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याचे आवर्जून टाळले पाहिजे. बऱ्याच लोकांचे आज असे मत आहे की “मन म्हणेल ते मानावे” किंवा “तुम्हाला योग्य वाटेल तसेच वागावे.” अशी वृत्ती योग्य आहे का? बायबलनुसार ती योग्य नाही कारण बायबल असे म्हणते, की “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त [“उतावीळ,” NW] आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९) निर्णय घेताना तुम्ही एखाद्या कपटी किंवा उतावीळ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्याल का? निश्चितच नाही. उलट, अशी व्यक्ती जे सांगेल त्याच्या अगदी उलट तुम्ही कराल. म्हणूनच बायबल आपल्याला आठवण करून देते: “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.”—नीतिसूत्रे ३:५-७; २८:२६.
देवाला काय स्वीकारयोग्य आहे ते ठरवणे
१२. आपण “देवाची इच्छा” समजून घेणे का आवश्यक आहे?
१२ चांगलेवाईट ठरवण्यासाठी जगाच्या किंवा स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहणे जर योग्य नाही तर मग आपण काय करावे? प्रेषित पौलाचा हा सुस्पष्ट सल्ला लक्षात घ्या: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) देवाची इच्छा काय आहे हे समजून घेणे का आवश्यक आहे? बायबलमध्ये यहोवा याचे सरळसोट व पटण्याजोगे कारण सांगतो: “आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.” (यशया ५५:९) तेव्हा तथाकथित सामान्य ज्ञानावर किंवा स्वतःच्या भावनांवर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्याला असे सांगण्यात येते: “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.”—इफिसकर ५:१०.
१३. देवाला काय संतोषकारक आहे हे जाणून घेण्याच्या आवश्यकतेवर योहान १७:३ येथील येशूचे शब्द कशाप्रकारे भर देतात?
१३ असे करणे किती आवश्यक आहे यावर अधिक भर देताना येशू ख्रिस्ताने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे [“ज्ञान घ्यावे,” NW].” (योहान १७:३) ‘ज्ञान घेणे’ या संज्ञेचा अर्थ फक्त ‘ओळखण्यापर्यंतच’ सीमित नाही. व्हाईन्स एक्स्पॉसिटरी डिक्शनरी यानुसार “ओळखणारी व्यक्ती आणि ओळखली जाणारी व्यक्ती या दोन्हींमध्ये नातेसंबंध असल्याचे या संज्ञेवरून सूचित होते; या संदर्भात, त्या व्यक्तीला जे माहीत असते ते तिच्या फायद्याचे किंवा तिच्याकरता महत्त्वाचे असते आणि अशारितीने त्यांच्यात एक नातेसंबंध निर्माण होतो.” एखादी व्यक्ती कोण आहे किंवा तिचे नाव काय आहे एवढेच माहीत असल्यास, त्या व्यक्तीसोबत नातेसंबंध आहे असे म्हणता येत नाही. तर त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, आचारविचार व आदर्श जाणून घेणे—आणि त्यांचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे.—१ योहान २:३; ४:८.
आपल्या ज्ञानेंद्रियांना प्रशिक्षित करणे
१४. आध्यात्मिक बाळके आणि प्रौढ यांच्यात कोणता मुख्य फरक आहे असे पौलाने सांगितले?
१४ मग चांगले व वाईट यात फरक करण्याची क्षमता आपण कशी विकसित करू शकतो? पौलाने पहिल्या शतकातील इब्री ख्रिश्चनांना लिहिलेल्या शब्दांतून याचे उत्तर मिळते. त्याने असे लिहिले: “दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बाळक आहे; पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.” आधीच्या वचनात पौलाने “देवाच्या वचनाची मुळाक्षरे” असे वर्णन केलेल्या ‘दुधाची’ तुलना ‘जड अन्नाशी’ केली. हे जड अन्न “प्रौढांसाठी” आहे व त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा [“बऱ्यावाईटात भेद करण्याचा,” NW] सराव झाला आहे.”—इब्री लोकांस ५:१२-१४.
१५. देवाचे अचूक ज्ञान मिळवण्याकरता मेहनत घेणे का आवश्यक आहे?
१५ याचा अर्थ सर्वप्रथम आपण देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये प्रकट केलेल्या त्याच्या आदर्शांचे अचूक ज्ञान मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. अर्थात आपण काय करावे वा करू नये याची लांबलचक सूची असावी अशी आपण अपेक्षा करू नये. बायबल अशाप्रकारचे पुस्तक नाही. उलट पौलाने सांगितल्याप्रमाणे: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे. ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) पण या सद्बोधाचा, सुधारणुकीचा व नीतिशिक्षणाचा लाभ घेण्याकरता आपण आपल्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा उपयोग केला पाहिजे. यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, पण याचा फार चांगला परिणाम होईल, अर्थात आपण ‘पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज’ होऊ.—नीतिसूत्रे २:३-६.
१६. ज्ञानेंद्रियांचा सराव होणे म्हणजे काय?
१६ यानंतर पौलाने सांगितले, की प्रौढांच्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.” हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘ज्ञानेंद्रियांना सराव झाला आहे’ याचा शब्दशः अर्थ त्यांची “ज्ञानेंद्रिये (कसरतपटूसारखी) सराईत झाली आहेत.” (किंग्डम इंटरलिनियर ट्रान्सलेशन) अनुभवी कसरतपटू विशिष्ट कसरतीच्या साधनांवर, उदाहरणार्थ, रिंग्स किंवा बॅलेन्स बीम इत्यादींवर क्षणार्धात अशा अचूक हालचाली करतो की त्याला जणू गुरुत्वाकर्षणाच्या व इतर नैसर्गिक नियमांवरही नियंत्रण आहे असे भासते. त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांवर त्याचा सतत पूर्ण ताबा असतो आणि विशिष्ट कसरत यशस्वीपणे करण्यासाठी केव्हा कोणती हालचाल करावी याची जणू त्याला उपजत बुद्धी असते. अर्थात कठोर प्रशिक्षण आणि सतत सराव केल्यानेच हे शक्य होते.
१७. आपण कोणत्या अर्थाने कसरतपटूंसारखे असले पाहिजे?
१७ आपले निर्णय नेहमी योग्य असतील याची खात्री करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने आपण देखील कसरतपटूप्रमाणेच सराईत असले पाहिजे. आपल्या ज्ञानेंद्रियांवर आणि शारीरिक अवयवांवर आपले सतत पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. (मत्तय ५:२९, ३०; कलस्सैकर ३:५-१०) उदाहरणार्थ, तुमचे डोळे अश्लील साहित्य पाहणार नाहीत, किंवा तुमचे कान अनुचित संगीत किंवा भाषा ऐकणार नाहीत इतके तुमचे त्यांच्यावर नियंत्रण आहे का? अर्थात अशाप्रकारचे अपायकारक साहित्य आज सर्वत्र आढळते. पण, तरीसुद्धा या वाईट गोष्टींचा आपल्या मनात आणि हृदयात शिरकाव होऊ द्यावा किंवा नाही हे ठरवणे आपल्या हातात आहे. आपण त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे वृत्ती बाळगू ज्याने म्हटले: “मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करितो; तो मला बिलगणार नाही. . . . असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही.”—स्तोत्र १०१:३, ७.
वहिवाटीने आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव द्या
१८. ज्ञानेंद्रियांना सराव होण्याविषयी पौलाने दिलेल्या स्पष्टीकरणात “वहिवाटीने” या संज्ञेचा काय अर्थ होतो?
१८ आपल्या ज्ञानेंद्रियांना चांगले आणि वाईट समजण्याचा सराव “वहिवाटीने” होतो हे आठवणीत असू द्या. दुसऱ्या शब्दांत, निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळी आपण त्या विशिष्ट परिस्थितीशी कोणती बायबल तत्त्वे संबंधित आहेत आणि त्यांचा कशाप्रकारे अवलंब केला जाऊ शकतो हे समजून घेण्यासाठी आपल्या विचारशक्तीचा उपयोग करण्यास शिकले पाहिजे. ‘विश्वासू व बुद्धीमान दासाच्या’ माध्यमाने पुरवण्यात आलेल्या बायबल प्रकाशनांतून संशोधन करण्याची सवय लावा. (मत्तय २४:४५) अर्थात आपण अनुभवी ख्रिस्ती बंधुभगिनींचीही मदत घेऊ शकतो. पण देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आपण स्वतः मेहनत घेतली आणि त्यासोबत यहोवाकडे त्याच्या मार्गदर्शनाकरता आणि आत्म्याकरता प्रार्थना केली तर आपल्याला दीर्घ पल्ल्यात अनेक आशीर्वाद मिळतील.—इफिसकर ३:१४-१९.
१९. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा प्रगतीशीलपणे सराव केल्यास आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?
१९ आपल्या ज्ञानेंद्रियांचा अधिकाधिक सराव करत असताना आपला हा उद्देश आहे की “आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.” (इफिसकर ४:१४) उलट, देवाला काय संतोषकारक आहे याविषयी ज्ञान व समज असल्यामुळे, त्या आधारावर आपण लहानमोठ्या सर्व बाबींमध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो; असे निर्णय जे आपल्याला लाभदायक ठरतील, आपल्या बांधवांना प्रोत्साहनदायक ठरतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्याला संतोषकारक ठरतील. (नीतिसूत्रे २७:११) या कठीण काळात आपल्याला असे योग्य निर्णय घेता आले, तर हा किती मोठा आशीर्वाद आणि संरक्षण ठरेल!
[तळटीप]
^ डॉ. थॉमस होम्स आणि रिचर्ड रे यांनी संकलित केलेल्या लोकांच्या जीवनातील ४० सर्वात तणावपूर्ण अनुभवांच्या यादीत जोडीदाराचा मृत्यू, घटस्फोट आणि विभक्त होणे या गोष्टी पहिल्या तीन स्थानांवर आहेत. विवाह करणे सातव्या स्थानावर आहे.
तुम्ही समजावू शकता का?
• योग्य निर्णय घेण्याकरता काय करता येणे आवश्यक आहे?
• चांगल्यावाईटातला भेद ओळखण्यासाठी सुप्रसिद्ध व्यक्तींकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करणे किंवा स्वतःच्या भावनांवर विसंबून राहणे का सुज्ञपणाचे नाही?
• निर्णय घेताना देवाला काय संतोषकारक आहे याची पारख करणे का महत्त्वाचे आहे आणि आपण हे कसे करू शकतो?
• ‘ज्ञानेंद्रियांचा सराव होणे’ याचा काय अर्थ होतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
धनिक व लोकप्रिय असलेल्यांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे
[१० पानांवरील चित्र]
कसरतपटूप्रमाणे, आपल्यालाही आपल्या ज्ञानेंद्रियांवर व शारीरिक अवयवांवर पूर्ण ताबा असला पाहिजे