व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वास ठेवण्याचा तुमचा हक्क

विश्‍वास ठेवण्याचा तुमचा हक्क

विश्‍वास ठेवण्याचा तुमचा हक्क

तुम्हाला वाटेल ती गोष्ट खरी मानण्याचा तुम्हाला हक्क आहे. आणि हा हक्क निश्‍चितच तुम्हाला प्रिय वाटत असेल. तुमच्याप्रमाणेच जवळजवळ प्रत्येक व्यक्‍तीला तो प्रिय वाटतो. याच हक्कामुळे पृथ्वीवरच्या सहा अब्ज रहिवाशांनी असंख्य वैविध्यपूर्ण समजुती निर्माण केल्या आहेत. सृष्टीतील विविध रंग, आकार, पोत, चवी, सुवास आणि ध्वनी यांप्रमाणे लोकांच्या वैविध्यपूर्ण समजुती व विश्‍वास देखील जीवनातील मौज व आनंद वाढवतात. खरोखर ही विविधता जीवनात रंग भरते.—स्तोत्र १०४:२४.

पण या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काही विश्‍वास केवळ वेगळेच नाहीत तर घातकही असू शकतात. उदाहरणार्थ, २० व्या शतकाच्या सुरवातीला काही लोक असे मानू लागले की यहुदी आणि फ्रीमेसन पंथाच्या लोकांनी “ख्रिस्ती समाजाला नष्ट करून एकमेकांच्या मदतीने एक जागतिक सरकार उभारण्याची” योजना केली आहे. लोकांची अशी धारणा बनण्याचे एक कारण म्हणजे प्रोटोकॉल्स ऑफ द लर्नड एल्डर्स ऑफ झायन ही यहुदीविरोधी पत्रिका. या पत्रिकेत दावा करण्यात आल्याप्रमाणे यहुदी व या विशिष्ट पंथाने मिळून अनेक योजना केल्या होत्या, उदाहरणार्थ, अवास्तव कर बसवणे, शस्त्रांच्या उत्पादनाला बढावा देणे, व व्यापार क्षेत्रात एकाधिकाराला उत्तेजन देऊन ‘विदेश्‍यांची आर्थिक व्यवस्था अचानक कोलमडून टाकणे.’ त्यांनी इतरही योजना केल्याचा आरोप करण्यात आला, जसे ‘विदेशी अडाणीच राहावेत’ म्हणून शिक्षण व्यवस्थेवर ताबा ठेवणे, इतकेच काय तर राजधानी शहरांना जोडणारा भूयारी लोहमार्ग बांधणे जेणेकरून ‘कोणी विरोध केल्यास [यहुदी नेते] त्यांना उडवून लावू शकतील.’

अर्थात हे सर्व खोटे होते आणि यहुद्यांच्या विरोधात लोकांना भडकवण्यासाठी मुद्दामहून सांगितलेले होते. ब्रिटिश म्युझियमचे मार्क जोन्स सांगतात त्याप्रमाणे ‘या अर्थहीन अफवा रशियातून पसरल्या होत्या;’ तिथे १९०३ साली पहिल्यांदा एका वृत्तपत्रातील लेखात या गोष्टी छापण्यात आल्या होत्या. मे ८, १९२० रोजी त्या लंडनच्या द टाईम्स दैनिकातही छापून आल्या. एका वर्षाहूनही अधिक काळानंतर द टाईम्सने ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे जाहीर केले. पण या दरम्यान व्हायचे ते नुकसान झाले होते. जोन्स म्हणतात ‘अशाप्रकारची खोटी माहिती दाबून टाकणे कठीण असते.’ कारण एकदा का लोकांनी या गोष्टी खऱ्‍या मानल्या, की मग त्यातून अतिशय द्वेषपूर्ण, विकृत आणि घातक समजुती निर्माण होतात—आणि २० व्या शतकात स्पष्ट झाल्याप्रमाणे, सहसा याचे परिणाम अनर्थकारी असतात.—नीतिसूत्रे ६:१६-१९.

समजूत विरुद्ध सत्य

अर्थात, फक्‍त जाणूनबुजून अफवा पसरवल्यामुळेच अशाप्रकारचे गैरसमज होतात असे नाही. कधी कधी आपण स्वतःच काही गोष्टी नीट समजून घेत नाही. काही गोष्टी खऱ्‍या मानल्यामुळे अकाली मृत्यू ओढवलेल्या कित्येकांची उदाहरणे आहेत. शिवाय, बऱ्‍याचदा आपण केवळ मनाला वाटते म्हणून एखादी गोष्ट मानू लागतो. एक प्राध्यापक सांगतात की वैज्ञानिक देखील “कित्येकदा आपल्या सिद्धान्तांच्या अक्षरशः प्रेमात पडतात.” आणि आपलेच विचार खरे मानल्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. आणि मग ते आयुष्यभर आपल्या चुकीच्या समजुतींना आधार देण्याचा व्यर्थ प्रयत्न करत राहतात.—यिर्मया १७:९.

धार्मिक विश्‍वासांच्या बाबतीतही असेच घडले आहे; आणि या क्षेत्रात तर असंख्य परस्परविरोधी समजुती अस्तित्वात आहेत. (१ तीमथ्य ४:१; २ तीमथ्य ४:३, ४) एकाला देवावर मनापासून विश्‍वास आहे, तर दुसरा म्हणतो की देवावर विश्‍वास ठेवणे म्हणजे “निव्वळ मूर्खपणा” आहे. एक म्हणतो मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो. तर दुसरा असे मानतो की मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा संपूर्ण अंत. अर्थात, हे सगळेच विश्‍वास खरे असू शकत नाहीत. मग आपण जे मानतो ते खरोखर सत्य आहे आणि केवळ आपल्याला वाटते म्हणून आपण ते मानत नाही याची खात्री करून घेणे शहाणपणाचे ठरणार नाही का? (नीतिसूत्रे १:५) पण खात्री करायची कशी? पुढचा लेख या विषयावर चर्चा करेल.

[३ पानांवरील चित्र]

“प्रोटोकॉल्स ऑफ द लर्नड एल्डर्स ऑफ झायनविषयी” हकीकत सांगणारा १९२१ सालचा लेख