व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अब्राहामसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा!

अब्राहामसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा!

अब्राहामसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा!

“जे विश्‍वासाचे तेच अब्राहामाचे पुत्र आहेत.”गलतीकर ३:७.

१. कनानमध्ये आलेल्या एका नवीन परीक्षाप्रसंगाला अब्रामने कसे तोंड दिले?

 अब्रामने यहोवाच्या आज्ञेनुसार ऊर नगरातील ऐषआरामाचा त्याग केला होता. यानंतर अनेक वर्षांपर्यंत त्याला ज्या खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले ते ईजिप्तमध्ये त्याला सोसाव्या लागलेल्या परीक्षांकरता जणू प्रस्तावनेदाखल होत्या. बायबलचा अहवाल असे सांगतो की “पुढे देशात दुष्काळ पडला.” अब्राम सहज आपल्या परिस्थितीविषयी कुरकूर करू शकला असता! पण त्याने असे केले नाही. उलट, त्याने आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी व्यावहारिक पावले उचलली. “काही दिवस मिसरात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता.” अब्रामचे मोठे घराणे ईजिप्तच्या लोकांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. यहोवा आपल्या प्रतिज्ञांविषयी विश्‍वासू राहून अब्रामचे सर्व अनिष्टापासून रक्षण करणार होता का?—उत्पत्ति १२:१०; निर्गम १६:२, ३.

२, ३. (अ) अब्रामने आपल्या पत्नीची खरी ओळख का जाहीर केली नाही? (ब) त्या विशिष्ट परिस्थितीत अब्राम आपल्या पत्नीशी कशाप्रकारे वागला?

उत्पत्ति १२:११-१३ येथे आपण असे वाचतो: “तो मिसरात प्रवेश करणार तो तो आपली बायको साराय हिला म्हणाला, ‘[“कृपा करून माझे ऐक,” NW] पाहा, तू दिसावयाला सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे. तुला मिसरी लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील, आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवितील. तर मी याची बहीण आहे असेच तू [“कृपा करून,” NW] सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्यायोगे माझा जीव वाचेल.’” सारायचे वय ६५ वर्षांहून जास्त होते, पण अजूनही ती अतिशय सुंदर होती. यामुळे अब्रामच्या जिवाला मात्र धोका होता. * (उत्पत्ति १२:४, ५; १७:१७) त्याहून महत्त्वाचे म्हणजे, यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेचा प्रश्‍न होता, कारण त्याने म्हटले होते की अब्रामच्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. (उत्पत्ति १२:२, ३, ७) अब्रामला अद्याप मुले नसल्यामुळे त्याचे जिवंत राहणे अत्यंत महत्त्वाचे होते.

अब्रामने आपल्या पत्नीला, त्यांचे आधीच ठरल्याप्रमाणे, आपण त्याची बहीण आहोत असे म्हणण्यास सांगितले. लक्षात घ्या, की तो कुलपिता असल्यामुळे त्याला अधिकार असूनही त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला नाही तर आपल्याला सहकार्य व साहाय्य करावे अशी सारायला विनंती केली. (उत्पत्ति १२:११-१३; २०:१३) असे करण्याद्वारे अब्रामने पतींसाठी फार चांगला आदर्श मांडला की त्यांनी आपल्या मस्तकपदाचा वापर प्रेमाने करावा आणि सारायने त्याच्या अधीन राहून पत्नींकरता आदर्श मांडला.—इफिसकर ५:२३-२८; कलस्सैकर ४:६.

४. बांधवांना धोका असल्यास देवाच्या विश्‍वासू सेवकांनी कशाप्रकारे वागावे?

आपण अब्रामची बहीण आहो असे साराय म्हणू शकत होती कारण ती खरोखर त्याची सावत्र बहीण होती. (उत्पत्ति २०:१२) शिवाय, ज्यांना ती माहिती जाणून घेण्याचा हक्क नव्हता त्यांना ती देण्यास अब्राम बांधील नव्हता. (मत्तय ७:६) आधुनिक काळात देवाचे विश्‍वासू सेवक प्रामाणिक राहण्याविषयी बायबलच्या आज्ञेचे पालन करतात. (इब्री लोकांस १३:१८) उदाहरणार्थ, ते कधीही कोर्टात शपथ घेऊन खोटे बोलत नाहीत. पण छळ किंवा मुलकी संघर्षाच्या काळात त्यांच्या बांधवांना शारीरिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचा धोका असल्यास ते येशूच्या सल्ल्याचे पालन करून “सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी” राहण्याचा प्रयत्न करतात.—मत्तय १०:१६; टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, १९९६, पृष्ठ १८, परिच्छेद १९ पाहा.

५. साराय अब्रामने विनंती केल्यानुसार वागण्यास का तयार होती?

सारायने अब्रामच्या विनंतीला कसा प्रतिसाद दिला? तिच्यासारख्या स्त्रियांना प्रेषित पेत्र “देवावर आशा ठेवणाऱ्‍या” स्त्रिया म्हणतो. त्यामुळे साराय या विशिष्ट परिस्थितीशी संबंधित असलेले आध्यात्मिक पैलू समजू शकली. शिवाय, तिचे आपल्या पतीवर प्रेम होते आणि ती त्याचा आदर करत होती. आणि म्हणून तिने आपल्या “पतीच्या अधीन राहून” आपण विवाहित आहोत ही गोष्ट लपवून ठेवण्याचे ठरवले. (१ पेत्र ३:५) अर्थात, असे केल्यामुळे ती धोका पत्करत होती. “अब्राम मिसर देशात जाऊन पोहंचला तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसऱ्‍यांनी पाहिले. फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेविले.”—उत्पत्ति १२:१४, १५.

यहोवाचे तारण

६, ७. अब्राम व साराय यांच्यावर कोणती दुःखदायक परिस्थिती आली आणि यहोवाने सारायला संकटातून कसे सोडवले?

अब्राम व साराय यांच्यासाठी हे किती दुःखदायक ठरले असेल! आता नक्कीच सारायची अब्रू लुटली जाईल असे त्यांना वाटले असेल. फारोला साराय एक विवाहित स्त्री आहे हे माहीत नसल्यामुळे तो अब्रामला बऱ्‍याच भेटवस्तू देऊ लागला आणि अशारितीने अब्रामला “मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले.” * (उत्पत्ति १२:१६) अब्रामला या सर्व भेटवस्तू किती घृणास्पद वाटल्या असतील! पण या परिस्थितीतून मार्गच नाही असे भासत असले तरीही, यहोवाने अब्रामला त्यागले नव्हते.

“अब्रामाची स्त्री साराय हिच्या पायी परमेश्‍वराने फारो व त्याचे घराणे यास भारी पीडा भोगावयास लाविली.” (उत्पत्ति १२:१७) या पीडा येण्याचे खरे कारण फारोला सांगण्यात आले; पण कसे, ते स्पष्ट केलेले नाही. त्याने लगेच हालचाल केली: “तेव्हा फारोने अब्रामास बोलावून म्हटले, तू मला हे काय केले? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितले? ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेविले होते; तर आता ही पाहा तुझी बायको, हिला घेऊन जा. तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्यासंबंधाने हुकूम केला, आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेस लाविले.”—उत्पत्ति १२:१८-२०; स्तोत्र १०५:१४, १५.

८. यहोवा आज ख्रिस्ती लोकांना कोणत्या प्रकारे सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन देतो?

आज यहोवा आपल्याला मृत्यू, गुन्हेगारी, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवण्याची हमी देत नाही. अर्थात आपल्या आध्यात्मिकतेला ज्यामुळे धोका संभवू शकतो अशा गोष्टींपासून तो नेहमी सुरक्षा देण्याचे आपल्याला वचन देतो. (स्तोत्र ९१:१-४) हे तो प्रमुखतः आपल्या वचनातून आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने समयोचित सूचना देण्याद्वारे करतो. (मत्तय २४:४५) छळ होत असताना ठार केले जाण्याविषयी काय? एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू होऊ दिला तरीसुद्धा देव आपल्या लोकांचे सामूहिकरित्या अस्तित्व कधीही नाहीसे होऊ देणार नाही. (स्तोत्र ११६:१५) आणि जर विश्‍वासू जनांना मृत्यू आला तरीसुद्धा त्यांचे पुनरुत्थान केले जाईल याची आपण खात्री बाळगू शकतो.—योहान ५:२८, २९.

शांती कायम राखण्यासाठी स्वार्थत्याग

९. कनानमध्ये असताना अब्राम ठिकठिकाणी भटकत राहिला हे कशावरून सूचित होते?

कनानमधील दुष्काळ संपल्यावर, “अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यांस घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे [यहूदाच्या डोंगरांच्या दक्षिणेकडील अर्धशुष्क प्रदेश] गेला. तो कळप, रुपे व सोने ह्‍यांनी संपन्‍न होता.” (उत्पत्ति १३:१, २) अर्थातच त्या प्रदेशातील रहिवाशी त्याला सत्ता व अधिकार असलेला मोठा माणूस किंवा बलशाली सरदार समजत असतील. (उत्पत्ति २३:६) अब्रामला या ठिकाणी स्थायिक होऊन कनानी लोकांच्या राजकारणांत सामील होण्याची मुळीच इच्छा नव्हती. उलट “तो नेगबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला.” नेहमीसारखेच अब्रामने ज्या ज्या ठिकाणी तो गेला तेथे यहोवाच्या उपासनेला प्रथम महत्त्व दिले.—उत्पत्ति १३:३, ४.

१०. अब्राम व लोट यांच्या गुराख्यांमध्ये कोणती समस्या निर्माण झाली आणि या समस्येचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावणे का महत्त्वाचे होते?

१० “अब्रामाबरोबर लोट जात होता त्याचीहि मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना; कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती.” (उत्पत्ति १३:५-७) अब्राम व लोट या दोघांच्या कळपांसाठी पुरेसे पाणी आणि कुरणे या ठिकाणी नव्हती. त्यामुळे गुरांची राखण करणाऱ्‍यांमध्ये तणाव आणि द्वेषपूर्ण भावना उत्पन्‍न होऊ लागल्या. अशी भांडणे खऱ्‍या देवाच्या उपासकांना शोभणारी नव्हती. आणि हे तंटे सुरू राहिल्यास त्यांच्यातील संबंध कायमचे तुटण्याची शक्यता होती. मग अब्रामने ही समस्या कशी सोडवली? लोटच्या पित्याचा मृत्यू झाल्यावर अब्रामने त्याला दत्तक घेतले होते, कदाचित पोटच्या पोराप्रमाणे त्याने त्याचे पालनपोषण केले असावे. शिवाय वयाने मोठा असल्यामुळे अधिक चांगला प्रदेश निवडण्याचा त्याला हक्क नव्हता का?

११, १२. अब्रामने उदारपणे लोटला कोणता उपाय सुचवला आणि लोटचा निर्णय अयोग्य का होता?

११ पण “अब्राम लोटास म्हणाला, ‘हे पाहा माझ्यातुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.’” बेथेलजवळ एक असे ठिकाण आहे ज्याच्याविषयी असे म्हणण्यात आले आहे की “पॅलेस्टाईनच्या या उंचावर असलेल्या ठिकाणाहून भोवतालचा सबंध परिसर पाहता येतो.” कदाचित तेथूनच “लोटाने आपली दृष्टि फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्‍वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्‍वराच्या बागेसारखा, आणि मिसर देशासारखा होता.”—उत्पत्ति १३:८-१०.

१२ बायबलमध्ये लोटला “नीतिमान” म्हटले आहे. पण का कोण जाणे, या प्रसंगी त्याने अब्रामचा मान राखला नाही किंवा त्याने आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या अब्रामचा सल्ला मागितला असेही दिसून येत नाही. (२ पेत्र २:७) “यार्देनची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला; ते ह्‍याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला, आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला.” (उत्पत्ति १३:११, १२) सदोम वैभवशाली नगर होते आणि येथे अनेक भौतिक सुविधा होत्या. (यहेज्केल १६:४९, ५०) लोटचा निर्णय भौतिक दृष्टिकोनातून विचार केल्यास योग्य वाटत असला तरीसुद्धा आध्यात्मिक दृष्टीने मात्र हा अयोग्य निर्णय ठरला. का? कारण उत्पत्ति १३:१३ यानुसार “सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्‍वराविरुद्ध महापातके करणारे होते.” येथे येऊन राहण्याचा लोटचा निर्णय त्याला व त्याच्या कुटुंबाला महागात पडणार होता.

१३. ख्रिस्ती बांधवांमध्ये आर्थिक बाबींवरून मतभेद झाल्यास अब्रामचे उदाहरण कशाप्रकारे मार्गदर्शक ठरू शकते?

१३ अब्रामला मात्र पूर्ण विश्‍वास होता की यहोवाने प्रतीज्ञा केल्याप्रमाणे आज न उद्या हा सबंध देश त्याच्या संततीला मिळणार होता; त्यामुळे एका लहानशा प्रदेशावरून त्याने घासाघीस केली नाही. उलट तो मोठ्या मनाने, १ करिंथकर १०:२४ येथे नंतर लिहिण्यात आलेल्या तत्त्वानुसार वागला: “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे.” सहविश्‍वासू बांधवांपैकी एखाद्यासोबत आर्थिक बाबीवरून काही मतभेद निर्माण झालेल्यांसाठी हे एक आठवणीत ठेवण्यासारखे उदाहरण आहे. मत्तय १८:१५-१७ येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याऐवजी काहींनी आपल्या बांधवांना कोर्टात ओढले आहे. (१ करिंथकर ६:१, ७) अब्रामच्या उदाहरणावरून आपण हे शिकतो की यहोवाच्या नावाला कलंक लावण्याऐवजी किंवा ख्रिस्ती मंडळीची शांती भंग करण्याऐवजी आर्थिक नुकसान पत्करणे अधिक चांगले आहे.—याकोब ३:१८.

१४. अब्रामला त्याच्या उदारपणाचे कोणते प्रतिफळ मिळणार होते?

१४ अब्रामला त्याच्या या उदारपणामुळे आशीर्वाद मिळणार होता. देवाने वचन दिले: “मी तुझी संतति पृथ्वीच्या रजःकणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रजःकणांची गणना करिता आली तर तुझ्या संततीचीहि गणना होईल.” अपत्यहीन अब्रामला देवाच्या या आश्‍चर्यकारक अभिवचनाने किती दिलासा मिळाला असेल! मग देवाने अशी आज्ञा दिली: “ऊठ, या देशाची लांबीरुंदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार.” (उत्पत्ति १३:१६, १७) अब्रामाला कोणत्याही नगरात स्थायिक होऊन आरामशीर जगण्याची परवानगी मिळणार नव्हती. त्याला कनानी लोकांपासून वेगळेच राहायचे होते. आज ख्रिस्ती लोकांनी देखील या जगापासून अलिप्त राहिले पाहिजे. ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत पण देवाच्या वचनाच्या विरोधात असलेल्या वर्तनात सामील होण्यास जे कोणी त्यांना भुरळ पाडू शकतात अशांपासून ते दूरच राहतात.—१ पेत्र ४:३, ४.

१५. (अ) अब्रामच्या प्रवासी जीवनाची काय अर्थसूचकता असावी? (ब) अब्रामने आजच्या ख्रिस्ती कुटुंबांसाठी कोणता आदर्श मांडला?

१५ बायबलच्या काळात, एखादी जमीन घेणाऱ्‍या व्यक्‍तीला ती ताब्यात घेण्याआधी तिचे परीक्षण करण्याची परवानगी होती. त्याअर्थी, अब्रामचे या देशात सतत फिरत राहणे या गोष्टीची सतत आठवण करून देत असावे की एक दिवशी हा देश त्याच्या संततीचा होणार आहे. देवाच्या आज्ञेनुसार “अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोनजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला; तेथे त्याने परमेश्‍वराची वेदी बांधिली.” (उत्पत्ति १३:१८) पुन्हा एकदा अब्रामने दाखवून दिले की देवाच्या उपासनेला त्याच्या जीवनात सर्वात प्रथम स्थान होते. तुमच्या कौटुंबिक जीवनात कौटुंबिक अभ्यास, कौटुंबिक प्रार्थना, आणि सभांना सर्वात प्रथम स्थान आहे का?

शत्रूंचे हल्ले

१६. (अ) उत्पत्ति १४:१ येथील सुरवातीचे शब्द अनिष्टसूचक का आहेत? (ब) चार राजांनी हल्ला का केला?

१६ “शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर * आणि गोयीमाचा राजा तिदाल यांच्या वेळी असे झाले की, त्यांनी . . . युद्ध केले.” मूळ इब्री भाषेत, (“. . . यांच्या वेळी असे झाले की . . .”) हे सुरवातीचे शब्द अनिष्टसूचक आहेत; ते अशा कालावधीला सूचित करतात जो “संकटाने सुरू होतो पण ज्याच्या शेवटी आशीर्वाद प्राप्त होतो.” (उत्पत्ति १४:१, २, तळटीप, NW) या चार राजांनी आपापल्या सैन्यासह कनानवर हल्ला केला तेव्हा हे संकट सुरू झाले. त्यांचा उद्देश काय होता? सदोम, गमोरा, अदमा, सबोयिम आणि बेला या पाच शहरांचे बंड दडपून टाकणे. या पाचही शहरांच्या प्रतिकारक सैन्यांचा पराभव करून ते “सर्व एकजूट करून सिद्दीम खोऱ्‍यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षार समुद्र.” लोट आणि त्याचे कुटंब जवळच राहात होते.—उत्पत्ति १४:३-७.

१७. लोटला बंदी बनवून नेण्यात आल्यामुळे अब्रामचा विश्‍वास का पारखला जातो?

१७ कनानी राजांनी हल्लेखोरांचा दटून सामना केला पण त्यांचा घोर पराजय झाला. “सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्‍नसामुग्री शत्रु लुटून घेऊन गेले. अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता; त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताहि नेली.” या संकटाची खबर लवकरच अब्रामच्या कानावर पडली: “तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले. त्या वेळी तो अष्कोल व आनेर यांचा भाऊ अमोरी मम्रे याच्या एलोन राईत राहत होता; हे अब्रामाच्या जुटीतले होते. आपल्या भाऊबंदास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले.” (उत्पत्ति १४:८-१४) ही विश्‍वासाची केवढी मोठी परीक्षा होती! चांगला प्रदेश स्वतःसाठी निवडल्याबद्दल अब्राम आपल्या पुतण्याविषयी द्वेष बाळगत होता का? शिवाय हेही आठवणीत असू द्या, की हल्ला करणारी ही सैन्ये त्याच्या मायदेशातून अर्थात शिनार येथून आली होती. त्यांच्याविरुद्ध लढाई केल्यावर अब्राम आपल्या मायदेशी परतण्याची आशाच करू शकत नव्हता. शिवाय, कनानच्या सर्व सैन्यांचा ज्यांच्यापुढे पराभव झाला होता त्यांच्याविरुद्ध अब्राम तरी काय करू शकला असता?

१८, १९. (अ) अब्रामने लोटाला संकटातून कशाप्रकारे सोडवले? (ब) या विजयाचे श्रेय कोणाला मिळाले?

१८ पुन्हा एकदा अब्रामने यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला. “तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशेअठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्याजवर रात्रीची चाल केली आणि त्यास मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणिली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारे आणिले.” (उत्पत्ति १४:१४-१६) यहोवावर अढळ विश्‍वास बाळगून अब्रामने शत्रुच्या तुलनेत अगदीच कमी असलेल्या आपल्या माणसांचे नेतृत्व करून विजय मिळवला आणि लोट व त्याच्या घराण्याला संकटातून सोडवले. आता अब्रामला शालेमाचा राजा मलकीसदेक भेटतो. “शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्यास सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला: आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो; ज्या परात्पर देवाने तुझे शत्रु तुझ्या स्वाधीन केले तो धन्य! तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला.”—उत्पत्ति १४:१८-२०.

१९ होय यहोवाचा विजय निश्‍चित होता. अब्रामच्या विश्‍वासामुळे त्याला पुन्हा एकदा यहोवाचे तारण अनुभवायला मिळाले. आज देवाचे लोक खरोखरच्या युद्धात सहभाग घेत नाहीत पण त्यांना अनेक परीक्षांना व आव्हानांना तोंड द्यावे लागते. या परीक्षांना यशस्वीपणे कसे तोंड देता येईल हे पुढच्या लेखात सांगण्यात येईल.

[तळटीपा]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), या ग्रंथानुसार “एका प्राचीन पपायरस लिखाणात एका फारोने एका सुंदर स्त्रीला जबरदस्तीने धरून आणण्यासाठी आणि तिच्या पतीला ठार मारण्यासाठी सशस्त्र माणसांना नेमले होते,” असा उल्लेख आढळतो. त्याअर्थी, अब्रामची भीती निराधार नव्हती.

^ हागार जी नंतर अब्रामची उपपत्नी बनली ती कदाचित या वेळी अब्रामला देण्यात आलेल्या दासदासींपैकी असावी.—उत्पत्ति १६:१.

^ भाष्यकारांचे एकेकाळी असे म्हणणे होते की शिनार प्रदेशात एलामचा इतका दबदबा कधीही नव्हता आणि त्यामुळे कदार्लागोमर राजाने हल्ला केल्याचा अहवाल साफ खोटा आहे. बायबलच्या अहवालाची सत्यता दाखवून देणाऱ्‍या पुरातनवस्तुशास्त्रीय पुराव्याविषयी जुलै १, १९८९ टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील पृष्ठे ४-७ वरील चर्चा पाहा.

तुम्ही याकडे लक्ष दिले का?

• कनान देशात आलेल्या दुष्काळामुळे अब्रामच्या विश्‍वासाची कशाप्रकारे परीक्षा झाली?

• अब्राम व साराय या दोघांनी आजच्या काळातील पतीपत्नींकरता कशाप्रकारे उत्तम आदर्श मांडला?

• आपल्या व लोटच्या सेवकांमधील भांडणे मिटवताना अब्राम ज्याप्रकारे वागला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चित्र]

अब्रामने आपले हक्क मिळवण्याचा अट्टहास करण्याऐवजी व स्वतःचा फायदा पाहण्याऐवजी लोटाचे भले करण्याचा प्रयत्न केला

[२४ पानांवरील चित्र]

आपला पुतण्या लोट याला संकटातून सोडवताना अब्राम यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिला